चिमणी कॅन थिंक साला!
मी चिमणी. हायवे ग्रँड एक्सप्रेस मधली. काय म्हणता? हायवे ग्रँड एक्सप्रेस तुम्हाला माहीत नाही? हे म्हणजे फास्टॅग माहीत नाही म्हटल्यासारखं झालं. बरं, सांगते सगळं.
माझा जन्म झाला घरट्यात. म्हणजे सगळ्या चिमण्यांचा होतो तसाच. माझे आई-बाबा, तुमच्यासाठी एक चिमणा-चिमणी. तुम्हाला सगळी चिमण-फॅमिली सारखीच दिसेल, पण मला ओळखतात माझे आई-बाबा. तर ते म्हातारे झाले आणि आमचे घरटे ही नाहीसे झाले. म्हणून त्यांना मी इकडे आणले, हायवे ग्रँड एक्सप्रेस मध्ये.
आम्ही खालापूरचे रहिवासी. तिथे घनदाट जंगल कधीच नव्हतं. झुडपं होती बरीच. ओसाड जमीन होती. आमच्या पिढ्यान् पिढ्या तिथे वाढल्या. माझ्या चिमणी-आई आणि चिमण-बाबांचा जन्म पण तिथेच झाला. माझ्या आई-बाबांनी या गोष्टी मला सांगितल्या. थोडे कारखाने होते आजूबाजूला. त्यात काम करणारी माणसं दिसायची. एक झोपडी होती जवळ. तिच्यातली आजी चहा बनवायची. तिचा नातू चहा नेऊन देत असे. तिच्याकडच्या बरणीत रंगीबेरंगी बिस्किटे असायची. सकाळी आणि संध्याकाळी आमच्या समाजातल्या चिमण्या जवळपास भटकत असत. बिस्किटांचा भुगा मिळण्याच्या आशेने. नाहीतर रोज खायचे होते धान्याचे कण, बिया, रानबोरं, जांभळं, करवंदं. आजीकडे चहा पिणारी माणसं गरीब होती, बिस्किटं बुडवून खायची. कण सुद्धा खाली सांडत नसत. बिस्किटाचा कण मिळाला की पक्वान्न खाल्लं असं वाटायचं. आजी तोंडाने चिऊताईची गाणी म्हणायची आणि आम्ही जास्त चिवचिवाट केला की खोटं खोटं रागवायची. गप्प बसा रे मेल्यांनो, किती तुमचा आरडाओरडा. माझ्याकडे काय मिळणार तुम्हाला? चाय देऊ का गरम? त्यापरीस जा, उडा, रानमेवा खा.
ही माणसं बहुधा चालत किंवा सायकलवर जायची. क्वचित कुणी स्कूटर वा फटफटीवर यायचे. एका सकाळी आजी खूप खूश होती. एक अख्खं बिस्किट चुरुन तिने आमच्या दिशेने भिरकावलं. आजीने त्या दिवसापासून झोपडीसमोरची जमीन मुरूम टाकून , पाणी मारून चोपून छान करून घेतली. पुढचे दोन दिवस सारवली. मग तिथे मांडव घातला. बाजूने पांढरी कनात लावली. आम्हाला कोण उत्सुकता – आता काय होणार याची. आम्हाला अडवणार तरी कोण? आम्ही खालून जायचो, भिरभिरत आत फिरायचो, वरच्या बाजूने बाहेर जायचो. मधूनच आजी बाहेर येऊन बोलायची – काय उच्छाद मांडलाय या चिमण्यांनी.
एक दिवस सकाळी वाजंत्रीवाले आले. त्यांनी एका कोपर्यात बसून वाद्य जुळवायला सुरुवात केली. सनई-चौघडा सुरू झाला, वातावरण प्रसन्न झाले. ह्या माणसांना काय काय करता येतं नं? यांना हात आहेत, पाय आहेत, हातांनी कित्ती गोष्टी करतात ही माणसं. पायांनी सायकल, स्कूटर चालवतात. कुणी शोध लावला असेल या सगळ्याचा? आम्हाला तर बाई फार कौतुक वाटतं या माणसांचं. आजी कशी भराभर चहा बनवते. गॅस चालू करते, एका गॅसवर आधण ठेवते, दुसर्यावर दूध. पटापट साखर घालते, आधणात चायपत्ती घालते. छोट्या छोट्या ग्लासमध्ये चहा गाळते. काम करून दमून-भागून आलेली माणसं असोत की कामावर जात असोत, ताजीतवानी होऊन जातात. आमच्या दुनियेत का नाही असा चहा? बिस्किट? बिस्किट आजी कुठून आणते? माणसाला अशी कुरकुरीत बिस्किटे कशी बनवता येतात? एकंदरीत ही माणसं फारच आयडियाबाज! आईने सांगितलं होतं मला – आपल्यापेक्षा डोकं मोठं असतं यांचं. म्हणून त्यांच्या डोक्यात मोठे विचार येतात. मग माझं डोकं कधी मोठ्ठं होणार असं विचारल्यावर घरट्याबाहेर हाकललं होतं आईने. काही असो. आपल्याला माणसं आवडतात.
बरीच माणसं जमली होती मांडवात. नवे कपडे घालून, दागिने घालून, त्यांची लगबग चालली होती. त्यांच्या बोलण्यावरून काहीतरी ‘लग्न’ आहे असे समजले. ही ‘लग्न’ नावाची भानगड मी पहिल्यांदाच बघत होते. पिवळ्याधम्मक गोड लाडूचा चुरा खायला मिळाला. चिवड्यातला चुरचुरीत, तिखट-मिठाचा पोहयाचा दाणा मिळाला. जेवणाच्या पंगतीत माणसांनी जे काही सांडले, ते सगळे वेचून वेचून खाल्ले. कोणते पदार्थ ते कळलं नाही, पण वेगवेगळया चवी चाखल्या. आजीच्या नातवाच्या ‘लग्नात’ मज्जा होती आमची!
दूरवर एक शाळा होती. जेमतेम दोन वर्ग भरायचे. तिथे म्हणे मुलं शिकायला जातात. आम्ही तिकडे क्वचित जायचो. ती छोटी, गोंडस मुलं खूप आवडायची. त्यांच्या अंगावर एकसारखे कपडे असायचे. शाळा, त्यातले शिक्षक आणि मुलं गरीब होती. खायची तर वानवाच. मी तिथे माझं गाणं ऐकायला जात असे. “उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही.” हे शिक्षक मुलांना असं चुकीचं का शिकवतात? आम्ही चिमण्या माणसांच्या आधी उठतो. कामाला लागतो. यांना काय आम्ही आळशी वाटतो? मला वाटायचं , महिन्याभराने गेल्यावर गाणं बदलले असेल. पण नाही. यांची चिऊताई अजून झोपलेली कशी? यांच्या मोठ्ठ्या डोक्यात अजून प्रकाश पडला नाहीये का?
आमचं विश्व आजीची झोपडी आणि दूरची शाळा यात सामावले होते. कावळे, मैना, साळुंक्या, पोपट, घारी, घुबडं यांच्या छावण्या होत्या जवळपास. एक्सप्रेस वे सुरू झाला तेव्हा आमची दुनिया आवाजी झाली. आवाजाचे प्रदूषण असे काहीतरी माणसे म्हणतात, ते आम्हाला कळले. कसा कमी करणार हा ट्वेंटी फोर बाय सेवन (माणसं म्हणतात म्हणून मी म्हणते. मला काऽऽही कळत नाही.) आवाज? घराचे दरवाजे बंद करता येतात, साऊंडप्रूफ खिडक्या बसविता येतात. आमच्या घरट्याला कोणता दरवाजा लावू? माणसं ईयर प्लग लावतात. आम्ही पक्षांनी कुठे ईयर प्लग लावायचे? जास्त झाडे लावली पाहिजेत असं माणसे म्हणतात. आम्हा पक्षांना डायरेक्ट काही करता येत नाही, पण आम्ही बिया खाऊन हागतो जागोजाग! तेवढीच आमची पर्यावरणाला मदत.
तर हा हायवे ग्रँड एक्स्प्रेस म्हणजे मुंबई-पुणे मार्गातला फूड मॉल! मला मुंबई माहीत नाही आणि पुणे कुठे आहे तेही माहीत नाही. हा फूड मॉल बांधायला घेतला तेव्हा तिथली मोठी झाडे अजस्त्र कटींग मशीन आणून कापली गेली. आमच्या डोळ्यादेखत घरटी नाहीशी झाली, तरी आमच्यावर तीच वेळ येणार आहे हे कुठे माहीत होते? दहा-बारा दिवसांनी एक जेसीबी आले, त्याने छोटी झाडे-झुडपे पार जमीनदोस्त करून साफ करून टाकली. तेव्हा माझ्या आई-वडिलांनी जवळ थोडी झुडपे असलेला प्रदेश शोधला आणि पुनश्च हरिओम केले. आजीच्या नातवाला थोड्याशा पैशाचे आमिष दाखवले, तेव्हा त्याने झोपडीवर बिनधास्त बुलडोझर फिरवू दिला. आजीच्या डोळ्याच्या कोपर्यातले पाणी मला दिसले. ‘चिव चिव’ – माझ्या भाषेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. माझा चिवचिवाट तिला समजलाच नाही. नंतर परत आजी मला कधी दिसणार नव्हती. बिस्किट दिसेल का?
बांधकाम सुरू झाले आणि वर्षभरात पूर्ण देखील झाले. तोवर खाण्याची पंचाईत झाली आमची. बांधकामावर पाणी भरपूर होते. माझा चिमणा मला इथे भेटला. ‘टिप टिप बरसा पानी, पानीने आग लगाई’ हे गाणं ऐकलं होतं कुणाच्या तरी फोनवर! आम्ही यथेच्छ डुंबायचो. चिमणा म्हणाला – आपण दोघं लग्न करू या आणि इथेच राहू या. या हायवे ग्रँड एक्स्प्रेस मध्ये खूप जागा आहे. वरती आपण घरटं बांधू. कुणाचाही डिस्टर्बन्स नाही होणार. आपण दोघं राजा-राणी. मी लाजत लाजत त्याच्या प्रपोजलला ‘हो’ म्हटलं. मग मी जाऊन जागा बघून आले. खरंच, मोठ्ठी होती जागा. उंचावर होती. आणि माणसं झाडं पाडतात. त्यांनीच बांधलेला फूड मॉल ती थोडीच पाडणार? मुख्य म्हणजे जागा सेफ होती. नवीन घर बांधण्याच्या स्वप्नात मी अगदी रंगून गेले होते. असंच असतं नाही का? वरती बघण्याच्या नादात माझे खाली लक्षच गेले नाही.
खालची दुनिया अजब, रंगरंगिली होती. मला वरून ‘बर्ड’स् आय व्ह्यू’ दिसायचा. चौकोनी प्रांगण, चारही बाजूला काही छोटे, काही मोठे क्यूब म्हणजे दुकानाचे गाळे, चकचकीत, गुळगुळीत टाइल्स, सुटसुटीत रचना असलेली टेबले आणि खुर्च्या, प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर म्हणजे पॅसेजच्या दुसर्या टोकाला माणसांची प्रसाधनगृह. आम्ही तर काय कुठेही (?) करू शकतो, पण मला आपली फार उत्सुकता होती. म्हणून मी आत जाऊन बघून आले. बायकांचे आणि पुरूषांचे वेगळे प्रसाधनगृह असते, हे मला आत्ता समजले. मी बाऽई, जिथे बाईचं चित्र काढलं होतं, तिथेच गेले. मोठे मोठे आरसे होते, बरेचसे कप्पे असावे तशी एका रांगेत टॉयलेट होती. पण सगळी वरुन उघडी. मला सगळंच दिसलं वरून. मज्जा वाटली, मी बघत्ये, हे आतल्या बायकांना कळत नव्हतं. मी ठरवलं, आता कधी कंटाळा आला, एंटरटेनमेंट हवी असं वाटलं की आत एक चक्कर मारून यायचं आणि खो खो हसायचं!
हं, तर काय सांगत होते, त्या प्रांगणात चहू बाजूला फूड मिळण्याची दुकाने होती. फक्त चहा आणि बिस्किट पाहिलेली मी तर बाई हरखूनच गेले. मी आणि माझ्या चिमण्याने घरटं बांधायला घेतलं. मला हळूहळू त्या जागेची सवय व्हायला लागली. काडी काडी जमू लागली, मध्ये कामात ब्रेक घेतला, खाली गेले, तर कांदेपोहे खाल्ले, कधी साबुदाणा खिचडी, कधी इडली, डोसा, उत्तप्पा खाल्ला. एका दुकानात ड्रायफ्रूट आणि खजूर मिळतात. उपासाच्या दिवशी खातात म्हणे. मग मी नजरच ठेवून होते. एक पिशवी थोडी फुटकी दिसल्यावर मारला की डल्ला! खजूर खूप आवडला मला. मिट्ट गोड. हॅवमोरचं आइस्क्रीम माझ्या चिमण्याला भारी प्रिय. एकदा मी कामात गुंग असताना चिमण्याची प्रेमऽळ शीळ ऐकू आली. तो बोलवत होता, मॅकडोनाल्ड समोर. कुणीतरी १ बर्गर अख्खा तसाच टेबलवर सोडून गेला होता. आम्ही मिटक्या मारत आलू टिक्की, चीज, सॅलडची हिरवी पानं खाल्ली. एकदा तर चिमण्याने तोंडात काहीतरी वळवळणारे आणले. मी काय नॉन व्हेज खाते का? तर म्हणाला, “अगं, चायनीज माल आहे हा, याला नूडल्स म्हणतात.” मी ते गिळगिळीत गपकन गिळून टाकलं. चायनीजच ते. पोटात काही टिकलं नाही. मी सूड घेतला. ज्या दुकानातून आणलं होतं त्याच्या समोर जाऊन पोट रिकामं करून आले.
घरटं बांधून झालं, पण खाण्यातली नवलाई ओसरली. मग खालच्या चित्रविचित्र माणसांना न्याहाळण्याचा छंद लागला. काय बाई त्यांचे कपडे, मला पुरुष की बाई ते ओळखता यायचे नाही. मी नऊवारी साडीतल्या आजींना पाहिलं होतं. इथे गोल पातळ नेसलेल्या, पंजाबी ड्रेस, शरारा, जीन्स, स्कर्ट, क्रॉप टॉप, जंपसूट वाल्या, जाड्या, बारीक, उंच, बुटक्या, काळ्या, गोर्या, सावळ्या – कित्ती वेगळ्या बायका-मुली पाहिल्या मी. त्यांचे दागिने, चपला, बूट, उंच टाचाच्या सॅन्डल्स आणि फाटक्या जीन्स बघून वाटलं – आमच्या कर्नाळ्याच्या जंगलातल्या कातकरी, आदिवासी बायका घालतात असे फाटके कपडे.
वर पूर्ण छप्पर असल्यामुळे आमच्या घरट्याला ऊन, वारा, वादळ, पाऊस, थंडी कशाचीच भीती नव्हती. माझ्या चिमणी-आई आणि चिमण-बाबांना आग्रह केला, आता तुम्ही म्हातारे झालात, आमच्या इकडे रहायला या, तिथे सुरक्षित आहे. ते दोघं आले आणि दुसर्याच दिवशी मोठ्ठा अॅक्सीडेंट होता होता टळला. काय म्हणताय, मला कसा माहीत ‘अॅक्सीडेंट’ हा शब्द. अहो, खाली बोलतात नं सारखी लोकं. दररोज मी ऐकते – ट्रॅफिक आणि अॅक्सीडेंट. ट्रॅफिक जॅम असतो. मला स्ट्रॉबेरी जॅम माहिताय, खाली मिळतं ना जॅम सॅंडविच. ट्रॅफिक जॅमचं सॅंडविच खाल्लं नाही कधी. तर काय सांगत होते, आमच्या इथे दोन मोठ्ठे पंखे आहेत. खूपच मोठ्ठे. माझ्या चिमण-बाबांच्या उडताना काही लक्षात नाही आलं. कापलेच गेले असते. माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. सुरक्षित सुरक्षित म्हणताना हा धोका लक्षात नाही आला. आई असली ओरडली ना मला. तेव्हापासून कायम लक्ष ठेवते, ते बाहेर गेले की.
दोन-तीन महिन्यात आमच्या घरट्यातली लोकसंख्या वाढली. माझं काम आता संपेचना. मला थोडं वजन वाढल्यासारखं वाटलं. कामाचा उरक कमी झाला. पूर्वी आमचं जगणं सूर्याशी बांधलेलं होतं. पहाट होताच उठायचं, आन्हिकं उरकायची, दाणे वेचायचे, दुपारच्या उन्हात आराम करायचा, संध्याकाळी थोडा चिवचिवाट, तुमच्या शब्दात गॉसिप, करायचा. सूर्य अस्ताला गेला की चिडीचूप व्हायचे. आताशा दिवस कधी उगवला, कधी मावळला काऽही कळत नसे. सूर्याचे दर्शन होत नसे. आमच्या हायवे ग्रँड एक्स्प्रेस मध्ये चोवीस तास माणसे येत जात आणि बकाबका खात. ढणाढणा दिवे जळत असत. आम्हाला कोणत्याही वेळेला भूक लागली, की मार चक्कर खाली. जे मिळेल ते घे खाऊन. श्रम करायची सवय सुटली होती. माझ्या चिमण्याच्या तब्बेतीच्या तक्रारी वाढल्या होत्या. असं अनिर्बंध वागून माझी काही पिसं गळायला लागली होती. अहो, खाली गेले होते तेव्हा चक्क एका जाड्या बाईने मला हिणवले. माझ्याकडे बोट दाखवून आपल्या छोट्या मुलीला म्हटले – शोना, ती बघ ढब्बी चिमणी. मी अकाली म्हातारी झाले की काय?
अशीच एक दिवस खाली वॉशरूमला गेले. मोठठ्या आरशासमोर चिवचिवले. ओह माय गॉड! हाय रे माझ्या कर्मा! कशी दिसत होते मी? हॉरीबल. अंगाने जाड पण चेहर्याने एकदम अशक्त, गालफडं वर आलेली, मधून मधून पिसं गेलेली, डोळ्यातला स्पार्क जणू हरवून बसलेली. हे कसं झालं? काय करू आता? कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे आमच्या मुंबई-पुणे हायवेवर कमी गर्दी होती. आमच्या इथे शांतता होती. मला आत्मचिंतनाला वेळ मिळाला. माझा मेंदू इटुकला असला म्हणून काय झालं? विचार तर मला करता येतोच ना. खालच्या माणसांचे निरीक्षण करून माझी आकलन शक्ती सुप्पर झाली आहे.
आम्ही आमची वस्ती सोडली, आमचा दिनक्रम, रुटीन हो, सोडला. चटकमटक खाण्याच्या मोहापायी नेहमीचे धान्य कण नाकारले. छे छे, माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं मी कसं विसरले? माझ्या गोजिरवाण्या पिल्लांना मी हे भविष्य देणार का? नाऽही. विचारांच्या तंद्रीत मी बाहेर आले. किती दिवसांनी बाहेर पडले होते मी. नुकतीच सकाळ झाली होती. कोवळी सूर्यकिरणे पार्किंग लॉट मध्ये पसरली होती. दहा-बारा गाड्या उभ्या होत्या. गाड्यांच्या मधल्या गॅपमधून हिरवी पालवी दिसली. अच्छा! पार्किंग आखीव-रेखीव होते. गाड्या उभ्या करण्यासाठी नीट ओळी आखल्या होत्या. प्रत्येक दोन ओळींमध्ये झाडे लावली होती. माझा आशेचा किरण! ही झाडे आता पावसाळा झाला की मोठी होणार. मी चिमण्याला सांगायचे ठरवले – बस झाले हे आरामाचे, सुखलोलुप जीवन. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नही, मेरे काम की नहीऽऽ. बाहेरच्या झाडावर आपण त्याच उत्साहाने काडी-काडी जमवून घर बांधू. आपल्या पिल्लांनाही समजू दे, ऊन, वारा, पाऊस यात तग धरून कसं राहायचं. आपलं आयुष्य आपणच कसं घडवायंच ते. माणसं म्हणतात, चिमण्या कमी होतायत. त्यांची प्रजाती हळूहळू नष्ट होणार. या बुद्धिमान माणसांच्या स्पर्धेत मला आणि माझ्या पिल्लांना टिकून रहायलाच हवं. मला डार्विनचा सिद्धांत माहीत आहे – फिटेस्ट आर गोइंग टु सर्व्हाइव्ह! अँड आय वॉन्ट टु बी फिट.
- चिमणी कॅन थिंक साला! - April 13, 2021
मस्त
अत्ता याच संदेशाची गरज आहे सगळ्यांना.
धन्यवाद
Khupch chaan..laay bhavle rao..chimni can think saala.good one..👌👌
Thank you
वेगळाच angle . परंतु छान लिहीलंय. भट्टी एकदम सुंदर जमली आहे.
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.