मुक्कामपोस्ट बाल्कनी २
मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे आमच्या बाल्कनीची मला नव्याने ओळख झाली. तिथे भरपूर वेळ गेला आणि सभोवतालचा परिसर मी बारकाईने पाहायला शिकले. खूप गोष्टी मला नव्याने समजल्या, निसर्गाची वेगवेगळी रुपं पाहायला मिळाली. याबद्दल पहिल्या भागात लिहिले आहे. या वर्षी जानेवारीत शिशिर ऋतू जसा सुरू झाला तशी पानगळ सुरू झाली. बदामाच्या झाडाची मोठाली पानं खाली गळून रस्ता दिसेनासा करतात. याच सुमारास अमेरिकेतील आपले लोक त्यांच्या फॉल सिझनचे फोटो पाठवत असतात. किती मनोहारी दृश्य असतं ते! लाल पिवळी सुरेख बोडकी होत जतानाची झाडं! सोडून जाताना सुद्धा एखादी गोष्ट इतकी सुंदर कशी काय दिसू शकते? तर सांगत होते इथल्या बदामाच्या झाडांच्या फॉलबद्दल. बदामी, पिवळी, हिरवी, चॉकलेटी रंगाची पानं पडून खाली सुरेख रांगोळी चितरतात. आपल्याला पाहायला छान वाटतं पण आमचे माळीकाका वैतागतात. ते या झाडांना “कचऱ्याचं झाड” असं म्हणतात.
फेब्रुवारी मार्च तसे रखखीतच जातात, पण बाल्कनीसमोरची हिरवाई मात्र कमी होत नाही. नारळाच्या झाडांची ही आणखी एक खासियत. ऋतू कोणताही असो ही कायम सदाबहार राहतात. रात्रीतून एखादी झावळी दणकन खाली पडली की मात्र दचकायला होतं. या नारळाच्या झाडांशी मी कितीतरी गुजगोष्टी केल्या असतील. माझ्या खोलीची खिडकी उघडली की पहिले तेच दिसतात. आधी बुटके सुकुमार असलेले आता चांगले टंगाळे उंच झाले आहेत, अगदी आमच्या लेकसारखे. एखाद्या रात्री उदास वाटलं तर खिडकीपाशी जाऊन त्यांच्याकडे पाहायचं. हलकेच वाऱ्यावर डोलत असलेली ही झाडं कायम धीर देतात असं वाटतं.
उन्हाळा सुरू होतो तशी इथल्या पक्ष्यांची पाणी शोधायला लगबग सुरू होते. इथले मॅगपाय पक्षी आता हुशार झालेत, त्यांना पाण्याची खळगी बरोबर माहीत झालीत. दुपारी सगळीकडे निवांत असलं की ते त्यांची अंघोळ, पाण्यात नाचणं वगैरे उरकून घेतात. हा काळापांढरा नाच फार सुरेख दिसतो. तीच कथा बुलबुलांची. आधी मला वाटायचं सगळे बुलबुल सारखे दिसतात. पण इथल्या वाढलेल्या मुक्कामपोस्टामुळे समजलं, शिपाई बुलबुलाला डोक्यावर लाल तुरा असतो, Red whiskered बुलबुलला लाल दाढी असते. ही बुलबुल मंडळी अतिशय गोडघाशी असतात. आम्ही बाल्कनीत त्यांच्यासाठी दररोज काही ना काही फळ खायला ठेवतो. पठ्ठे सगळं चाटूनपुसून साफ करतात. केळं तर त्यांचं अत्यंत आवडतं खाणं! आधी लांबून कानोसा घेऊन जातात, मग आपसात चर्चा करतात. मग दोघेजण येऊन चोची मारून, सतत माना वेळावून इकडेतिकडे बघत खाऊन जातात. कधीकधी तीनचारजण जमले की त्यांची च्यु च्यु करून भांडणं होतात. हे पाहायला फार मजा येते. एवढसे जीव पण काय हिरीरीने भांडत असतात! द्राक्ष दिसली की ते विशेष खुश असतात. बाकी यांना कलिंगड, पपईदेखील फार आवडतात. लॉकडाऊनमध्ये आमच्या इथल्या बुलबुलांची संख्या दुपटीने वाढली आहे. याचा अर्थ लॉकडाऊनचा सर्वात चांगला उपयोग यांनी केला आहे! – इति नवऱ्याचा पांचट विनोद.
या जानेवारीत मला एक सुखद धक्का बसला. कोकिळेला जसा कंठ फुटला तसा बाल्कनीसमोरच्या दोन नवीन आंबाच्या झाडांनीही मोहोर धरला. मोहोराचा वास अतिशय सुरेख यायचा. उन्हाळ्याची हीच गंमत आहे. गरमीचा थोडा त्रास होतो पण आंबे, लोणची, ऊसाचा रस, बहावा, गुलमोहोराचा बहर या काही विशिष्ट गोष्टी उन्हाळ्यातच अनुभवता येतात. या वर्षी चक्क त्यांना पहिल्यांदा आंबे लागले. अक्षरशः लगडली आहेत दोन्ही झाडं आंब्यांनी. हापूसची कलमं आहेत म्हणतात. एखादी चुकार खार झाडावरून पळताना एखादा आंबा खाली पाडते. आंबा फुटतो पण आत छान गर आहे हे दिसतंय. अतिशय नेत्रसुखद आहे या आंब्यांनी लगडलेल्या झाडांना रोज पाहणं. यांना उतरवतात कसं हा प्रश्न मला सध्या पडला आहे आणि यातले दोन आंबे जरी खायला मिळाले तरी काय बहार येईल असंही वाटून जातं! शेवटी दारातल्या आंब्याची चव वेगळीच असणार ना!
उजवीकडच्या चाफ्याच्या झाडाला आता छोटी फळं लागली आहेत. तिथे पोपट आणि मैना येतात. फळ खाण्यासाठी सर्कशीच्या करामती करतात हे दोघे! फांदीला पायात पकडून उलटं होऊन चोचीने फळ खातात. आवडलं तर खातात नाहीतर बिनधास्त खाली फेकून देतात. याच झाडावर कोकिळेचे एक पिल्लू आहे. त्याला फारसं उडता येत नाही. थोडं उडतं मग एकदम गप्प बसतं. हळूहळू त्याचे प्रयत्न सुरू असतात. बाय द वे हे कोकिळेचं पिल्लू धड आईसारखंही दिसत नाही, धड बाबांसारखंही दिसत नाही. कमालीचं वेगळं दिसतं. याच झाडावर दोन चमकते, गर्द निळ्या रंगाचे छोटेसे सनबर्ड येतात. यांना दिवसातून एकदा नुसतं पाहायला जरी मिळालं तरी दिवस छान जातो.
तर असं हे आमच्या बाल्कनीतून दिसणारं निसर्गाचं रूप. थँक्स टू लॉकडाऊन मला निसर्गाची ही सगळी किमया इतक्या जवळून पाहता आली. निरीक्षणाची चटकही याच मुळे लागली. सध्या इतकंच, पुढेही माझ्या इथल्या मुक्कामाबद्दल जमेल तसं लिहीत राहीन.
Image by Annalise Batista from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Chhan lihilay
स्वत:चे विचार जे कागदांवर उतरवता येत नाही. छान
Chhan