सभ्य माणसांच्या देशात
काय असते संस्कृती? आपल्या माणूस म्हणून असणाऱ्या जीवनाचं संचित? का आपलं अस्तित्व उलगडून दाखवणारं काही? आपल्या मनाचा, विचारांचा आरसा? माणूस म्हणून जगतांना कित्येकदा अडखळतो आपण. ठेचकाळतो, जखमी होतो. पण परत उभे राहतो. कोणत्या बळावर? त्यामागे काय फक्त अनुभव असतात आपले? का प्राप्त परिस्थितीनुसार बदलतं जाण्याचं माणसाकडे असलेलं उपजत शहाणपण? मला वाटतं माणसं बनत, बदलत आणि घडत जातात त्यामागे त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे फार मोठे योगदान असते.
जेव्हा मी जपानमध्ये पहिल्यांदा गेले तेव्हा आधी अचंबित झाले. माणसं इतकी शालीन आणि सभ्य असतात? आणि तरीही ती माणसं असतात, रडणारी, हसणारी, व्यक्त होणारी. हाडामासाची माणसं. देऊन जाणारी दुसऱ्याला. आणि ते सुद्धा सतत आणि सहज, अगदी जाता जाता. नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले तेव्हा मध्यरात्रीचे २.३० वाजले होते. इमिग्रेशन म्हणजे काय, इथून कुठं आणि कसं जायचं आहे वगैरे काही काही माहित नव्हतं. वय होतं २३ आणि शिकायला नव्हते निघाले. नोकरी करायला चालले होते. तोपर्यंत ती सुद्धा कुठे केली होती. सगळ्याचाच गिरवायचा होता श्रीगणेशा. आणि तो सुद्धा विदेशात. पण अशा एका देशात जिथं जाण्याचं, राहण्याचं स्वप्न होतं पाहिलं. आणि स्वप्न रम्यच असतात. सुंदर आणि विभोर. फक्त ती जेव्हा प्रत्यक्षात येतात तेव्हा जमिनीवर येऊन पडतो आपण. डोळ्यांतली स्वप्न आणि जमिनीवरच वास्तव ह्यामधल्या अवकाशात आपण घिरट्या घेतं असतो. तशीच मी घेते होते त्या मध्यरात्री.
माझ्या सोबतचे पंधरा सहकारी निघून गेले डोळ्यांदेखत माझ्या, त्यांच्या बस मध्ये बसून. कारण सोप्प होतं. माझ्या पुढल्या सहकाऱ्याचे तिकीट समोर उभ्या असणाऱ्या बसमधले शेवटचे होते. मग आता? काही नाही. मला वाट बघायला लागणारं होती. पुढचा अर्धा तास. एकटीनं. पण भीतीच नाही वाटली. का? कारण डोळ्यांत खूप झोप होती. आणि मनाची खात्री that I am safe. अशी कशी पाऊल टाकल्या टाकल्या सापडली ती. वयाच्या ४२ व्या वर्षी माझ्याच देशात मला नव्हतं वाटलं सुरक्षित अशाच एका मोठ्या आणि गजबजलेल्या विमानतळावरच. फरक इतकाच होता की २३ व्या वर्षी एक जगाचा कोणताही अनुभव नसलेली मुलगी नारिता, जपानमध्ये होती. तर ४२व्या वर्षी जगाचा बराच अनुभव घेतलेली एक मध्यम वयाची बाई तिच्याच देशातल्या राजधानीतल्या विमानतळावर होती. ह्या सगळ्याच्या मध्ये जे काही येतं तिचं असते ना संस्कृती.
जपानी माणूस जपानी शिवाय दुसरी भाषा बोलतं नाही. आणि मला तर ती येतं होती. आणि चांगली येतं होती. म्हणून तर जात होते ना मुळात. त्यामुळे सुद्धा कणभरही भीती नाही वाटली. म्हणजे भाषा येणं हे सुद्धा इतकं दिलासादायक असू शकतं हा विश्वास दिला त्या रात्रीने मला. मी उभी होते त्या काळात कोणीही मला न्याहाळून गेलं नाही उगाच. किंवा काय मॅडम कुठं जाताय? आमच्या टॅक्सीने चला ना, चला ना. असा तगादा लावला नाही. बरं अगदी तिथे कोणाला माझी पडली नव्हती असं सुद्धा नव्हतं वाटतं. म्हणजे कोरडेपणा नसलेली एक शांत, सभ्य, अबोल आपुलकी होती त्या वातावरणात. असे सुद्धा काही देश असतातं इतकंच.
मग यथावकाश बस आली. दीड तासानं हॉटेल आलं. सामान दिलं उतरवून आणि गेली सुद्धा बस. ते सामान आता घेऊन आत कसं जायचं? प्रश्नांना उत्तरं सुद्धा असतातच. तिथेच काही ट्रॉल्या होत्या. त्यावर चढवल्या बॅगा. प्रवासात नेहमीच आपण आपले असतो. आणि तेच छान असतं. कष्टदायक असलं तरीही. सामानाचा डोलारा सांभाळत आत गेले तर सगळे खोळंबलेले. भाषा येतं नव्हती नां त्यांना. करणार काय मग? तिथेच सुरु झालं मग माझं काम. तिथल्या रिसेप्शनवरच्या काकांनी निश्वास सोडला आणि मग त्यांची जी तुफान मेल सुटली ती थांबेना. हा असा आहे जपानी माणूस. भाषा येतं नसल्याने अगम्य वाटणारा. पण येऊ लागल्यावर अथक बोलणारा, मनापासून पण मनातलं मात्र कधी कधीच. ही सुद्धा संस्कृती त्यांची. ती अशी एकच एक थोडीच असते. ती असतेच व्यामिश्र आणि संपृक्त. त्या काकांना वाटतं होती भीती, कसली? तर आम्ही तिथे लिहिलेल्या नियमांना सरळ सरळ तोडून आणि त्यांना अजिबात न जुमानता कुकर लावू. त्यामुळे त्यांनी आधी आमची माफी मागून पण कडकपणे सांगितलं की आम्हांला तसं मुळीच करता येणार नाही. तसं लिहूनच घेतलं त्यांनी. त्यावेळी एकच एक भावना आली दाटून मनात, विषादाची. ही का आपली प्रतिमा आहे ह्यांच्या देशात. नियम तोडणारी माणसं म्हणून. पण सत्य हे कायम वास्तवाचं निखळ भान देणारचं असतं. मग तसं लिहून दिल्यावर त्यांना दिलासा मिळाला. आणि त्यांनी मग माझ्या जपानीची वारेमाप तारीफ करायला घेतली. हे मात्र अगदी जपानी असलं तरी खूप खूप वरवरचं आणि खरंच दिखाऊ. आता पाच वर्ष दिलीच आयुष्यातली तर का नाही येणारं उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता जपानी. काहीही येईलच. हा असतोच माणसाकडे असणारा आत्मविश्वास. पण जपानी माणसं इथं सपशेल मार खातात. आणि खातातच. त्यांचे आहेतच असे हास्यास्पद वाटणारे गैरसमज की त्यांची भाषा फक्त आणि फक्त जपानी वंशाच्या म्हणजे पिवळ्या कांतीच्या आणि मिचमिच्या डोळ्यांच्या माणसांनाच येऊन शकते. मी तशी दिसतं नसून सुद्धा मला ती येते असं कळताच क्षणी कोणताही जपानी स्त्री किंवा पुरुष तुमची स्तुती करू लागतो. अगदी कुठेही. त्यावर अजिबात हुरळून न जाता, त्यांच्यासारखंच जिवणीत हसणं जमलं की झालाच तुम्ही जपानी. त्यासाठी व्हिसा मिळायची गरज नसते वेगळा. अजपानी व्यक्ती नाहीच होऊ शकतं नागरिक त्या देशाचे. हे सुद्धा ह्या अत्यंत सहनशील आणि सभ्य समाजातले दुसरे वास्तव आहे. जे तितकेच त्रासदायक आहे. आणि हे खरंय.
मग झोपून उठल्यावर सुरु झाला एक नवीन दिवस. एक हसणारी आणि उत्साही मुलगी आली होती घ्यायला आम्हाला. नाव तिचे एमिको. अजून मैत्रीण आहे ती माझी आणि कायम राहिलं. इतकं जवळून पाहिल्यावर अजून काय उरतं मनात माझ्या तर हेच की ही माणसं भाषा वगैरे येतं नसतांना सुद्धा परदेशी माणसांना मदत करण्यासाठी किती तत्पर असतात. निखळ आणि निव्वळ तत्पर आणि सहकार्य करणारी. त्यात गुळावर घोंगवणाऱ्या माशांचा ओशट, चिवट चिकटपणा नसतो की मांजरीच्या लबाड डोळ्यांत असणारा लुब्रेपणा. ती आपली आपण कुठे अडखळलो की येतात आणि मदत करतात. आणि लगेच निघून जातात. त्यांचं हे वागणं म्हणजे सरणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. अवचित आणि हवंहवंसं काही.
ह्या देशानं मला खूप दिलं. मैत्रिणी तर अनेक दिल्या. सगळ्याच सुंदर मनानं आपापल्या परीनं. त्यांनी मग माझे शीतल हिवाळे उबदार केले त्यांच्या मऊ आणि आश्वासक हातांनी. ह्या मुली आणि बायका कुठे कुठे घेऊन गेल्या मला. बर्फाळ डोंगरावर स्कीईंग करायला. तोपर्यंत बर्फ अगदीच एक दोनदा पाहिला होता. आणि खेळ वगैरे तर माहीतही नव्हते. पण मला येतं नाही म्हणून किंवा जमलं नाही म्हणून ही माणसं उगाच फिदीफिदी हसली नाहीत किंवा सल्ले नाही दिले त्यांनी मला हजार. दोनदा पडले त्या बर्फात तर लांबूनच कसं उठायच ते सांगितलं. करायच्या आधी सुद्धा झालीच होती दाखवून आणि करून प्रात्यक्षिकं हजार. हे अगदीच जपानी. आपण खचितच घेण्यासारखं काही. अथकपणे उत्तम जमेस्तवर करतं राहणं तेच काम. सतत आणि न कंटाळता. ह्या प्रोसेस मध्ये होणाऱ्या सगळ्या चुकांची परत शिस्तशीर नोंद केली जाते. म्हणजे तिचं चूक पुन्हा टाळता येऊ शकते. प्रशिक्षण देणारा आणि घेणारा जपानी असेल तर सहज जमूनच जातं सगळं, विनासायास. पण ही अपेक्षा झाली. वास्तवात असं कुठं घडतं. मग तिथे येतात आमच्यासारखे लोकं येतात कामी. दुभाषी, दोन्हीही भाषा जाणणारे. अर्थातच आम्ही सुद्धा करतोच चुका. अजूनही करतो आणि घालतोच घोळ. पण ते मान्य करून लगेच दुरुस्त केले आणि परत केले नाहीत की जपानी माणसं खुश होतात. एकदा का त्यांचा विश्वास बसला की झालं. मग दुसरा, तिसरा कोणी नको असतो त्यांना. इतके सरळ हिशोब.
बरेचदा मला लोकं विचारतात, काय ग ही माणसं कशी वाटली तुला? आता ह्याचं एकच एक उत्तर नाहीच येतं देता. माणूस माझ्या मते तरी चिकणमातीचाच असतो बनलेला. पटकन निसटणारा हातातून. पारा जसा. पण ही माणसं वेगळी निश्चित आहे. कलासक्त आहे. शिस्तीची आणि नियमबद्ध आहेत. अलिप्त तरीही आपुलकीनं वागणारी, बोलणारी आहेत. अंतर्मुख आणि मितभाषी आहेत. ती आपल्यासारखी शरीरानं पण बोलत नाहीत. हे त्यांचं वेगळेपण. ती खूपशी आत्ममग्न आहेत पण ती हेतुपुरस्सर काहीही न करणारी आहे. तशी सुद्धा माणसं कुठचीही असू देतं सतत बदलत जाणारी असतातच. पण तरीही जपान सारख्या एकाच वेळी मनानं पारंपरिक आणि बुद्धीनं आधुनिक असणाऱ्या देशातील माणसं वेगळी आहेत हे ओघानं आलंच. बरंच अव्यक्त पण तरीही असंवेदनशील नसणारं मन लाभलेली ही माणसं. अतिशय सभ्य, हसतमुख आणि कायम सेवेला हजर असणारी ही माणसं. त्यांनी खरोखरंच समृद्ध केलं आयुष्य एका साध्या मुलीचं कायमसाठी, शेवटी हे ऋण त्यांचं माझ्यावर राहतंच, हे किती खरंय.
Image by Igor Ovsyannykov from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
खूप आवडतय हे अनुभव वाचायला.
Khupach changle vatatey vachayla
मसत,आवडतील अनुभव वाचायला,वाचटाना देश फिरून् येऊ😁