रहस्यकथा – लेन नंबर बारा
चौकातील टॉवर वरील घड्याळाने बारा टोल द्यायला सुरुवात केली , तशी रिमा पुस्तक बाजूला ठेवून उठली . त्या निरव शांततेत बारा टोल चे आवाज बऱ्याच जणांना भयावह आणि त्रासदायक वाटत . पण रिमा ला लहानपणापासूनच ह्या टॉवर आणि त्यावरील घड्याळाचं आकर्षक होतं .
बारा वाजले की बाहेर अंगणात यायचं ,
बागेत शतपावली करत घड्याळाचा घुमणारा टोल ऐकायचा , आणि आई ओरडेपर्यंत बाहेरच रमायचं .
आजही तिने पुस्तक बाजूला ठेवलं , खिडकीवरील पडदा ओढून घेतला , आणि बाहेर आली .
दिवसा प्रचंड गजबजलेला रस्ता कसा शांत झाला होता . विहान केपटाऊन ला गेल्याने ती एकटीच होती घरात . आई च्या आजारपणात ती आणि विहान इथे रहायला आले , ते तिच्या जाण्यानंतरही इथेच राहिले होते .
लॉनवर पाय ठेवल्याबरोबर तिला नेहमीची सुखद भावना झाली . मऊ गवत , त्यावरील हलकं हलकं दव ..हे सगळं अनुभवत ती फेऱ्या मारत होती .
घड्याळाचे घ sण ,
घ sण टोल ऐकत भराभर फाटका जवळ येऊन गज पकडून ती टॉवर कडे बघू लागली . त्या आवाजाने नेहमीच तिला आपल्या सोबत कुणीतरी असल्याची आश्वासक जाणीव दिली होती . टॉवर कडे बघतांना तिची नजर सवयीनेच समोरील कोपऱ्यावरील पाच मजली “मॅजेस्टिक” कडे गेली ; आणि ती थोडीशी चमकली . तिसऱ्या मजल्यावर कायम अंधार असणाऱ्या सदनिकेत अगदी हलकासा उजेड होता . तिने पुन्हा पुन्हा बघितलं . दुसरीकडचा कुठला प्रकाश परावर्तित तर नाही न झाला , हे बघितलं . पण तसं नव्हतं . रिमा आत आली .
‘आज अचानक कोमल जैन च्या फ्लॅट मध्ये दिवा कुणी लावला असेल ? ती तर तीन महिन्या पूर्वीच ऑस्ट्रेलिया ला गेलीये . आपल्याला सांगून गेली , आणि तिने हा फ्लॅट कुणाला भाड्याने पण दिला नाहीये . मग … ‘
ह्या विचाराने तिला झोप येईना .
‘ तिसऱ्याच मजल्यावर बापूसाहेब संघवी रहातात , त्यांना फोन करावा ..निदान आपलं मन तरी शांत होईल .’ म्हणत तिने संघवीना फोन लावला .
इतक्या रात्री त्रास दिल्याबद्दल क्षमा मागून फोन चे कारण सांगितले .
कंटाळा न करता संघवी तातडीने बाहेर जाऊन बघून पण आले .
आणि त्यांनी रिमा ला कॉल केला .
” नाही ग रिमा , मी दोन्ही गॅलरीतून बघितलं . आत अंधार आहे , समोर लॅच
लावलेले आहे , आणि आत कुणीच नाहीये . तुला वरचा दामलेंचा फ्लॅट दिसला , ज्यांच्या हॉल चा लाईट सुरू आहे . झोप शांतपणे . काळजी नको करुस हं .”
रिमा ला शंभर टक्के खात्री होती की तिने कोमलच्याच फ्लॅट मध्ये उजेड बघितला होता . ती पायऱ्या चढून वर गेली . वरच्या बेडरूमच्या खिडकीतून नीट निखून बघितले , पण आता मात्र त्या फ्लॅट मध्ये पूर्ण अंधार होता . तिने खालून नीट मोजून तिसरा मजला तपासून पुन्हा बघितलं , फ्लॅट मध्ये खरच अंधार होता .
‘ आपलंच काही चुकलं असेल ‘ म्हणत ती झोपायला गेली .
दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार असल्याने ती आरामात नऊ वा ता. उठली . निवांत नाश्ता करून फ्रेश होऊन बाहेर पडली . भाजी चा स्टॉल जवळच कॉर्नर वरच असल्याने चिंता नव्हती .
एक छोटंसं वळण घेऊन पुढे गेली , तर मॅजेस्टिक समोर ही गर्दी!
काहीश्या अमंगलाची जाणीव होत असतानाच तिला त्यांच्या गल्ली मधील
धोबी , संतोष भेटला .
” काय झालं संतोष दादा ? “
” मॅडम , खून झालाय . फ्लॅट 302 मध्ये!”
” खून? क..कुणाचा?” तिला रात्री जे विचित्र वाटलं होतं , ते हे असं होतं तर .
” माहीत नाही , मी आत्ताच आलो” म्हणून तो निघून गेला .
‘ म्हणजे आपल्याला काल रात्री किंचित प्रकाश दिसला , बारा वाजता , तेव्हा तिथे कुणीतरी होतं?’ ह्या विचारानेच तिला घाम फुटला .
आपण पुढे जावं , हे पोलीसांना सांगावं , आणि संघवीना भेटावं म्हणून ती पुढे गेली . इमारतीच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती . ऍम्ब्युलन्स पण उभी होती . पोलीस तिथल्या लोकांना प्रश्न विचारत होते . रिमा पुढे पाय टाकणार इतक्यात तिचा फोन वाजला .
अनोळखी नंबर होता .
” जीव प्यारा असेल तर पुढे जाऊ नकोस . माघारी जा !”
कुणीतरी पलीकडून जरबेत बोलत होते ,
तसं तिने चमकून आजूबाजूला बघत विचारले , “कोण बोलतय ?”
फोन बंद झाला होता .
‘ माझा कॉन्टॅक्ट ह्यांना कुणी दिला? नेमका कुणाचा खून झालाय?’ ह्या प्रश्नांची उत्तरं न शोधता ती तिथून सरळ घरी वापस आली . मनातून घाबरलेली ती कुणाकडून माहिती मिळवावी हा विचार करत घरात शिरली , आणि पाठीमागच्या काळे वाहिनींनी हाक मारली . तिला उगाच हायसं वाटलं .
” अग रिमा , मॅजेस्टिक मध्ये खून झाला म्हणे !”
” हो , पण कुणाचा ? कोमल तर तीन महिन्यांपासून तिथे रहात नाही न !”
” नाही ग , कोमल चा तर 301 आहे . खून तर 302 मध्ये झालाय . त्या लीला काकूंच्या नवऱ्याचा.”
” संघवी काकांचा?”
” हो ग , बिचारे!…
काळे वहिनी पुढे बरच काय काय बोलत होत्या , पण रिमापर्यंत ते पोचतच
नव्हतं . तीच्या डोळ्यासमोर कालचा प्रसंगच येत होता . संघवी काकांना आपण बोलतो काय , ते उठून चेक करतात काय , आणि सकाळी ….
इतक्यात बेल वाजली . काळे वहिनींना सांगून ती घरात आली . पोलीस आले होते . तिने दार उघडले .
इन्स्पेक्टर दिवाकर आणि सोबत दोन कॉन्स्टेबल होते .
” काय घडलं ते समजलं न तुम्हाला?”
” शेजारून समजलं की संघवी काकांचा खून झालाय ते .”
” रात्री बराच उशिरापर्यंत जाग्या होता तुम्ही …मिस ?…”
” मिसेस रिमा . रीमा विहान नायक .”
” इतक्या उशिरा तुम्ही संघवी साहेबांना कशासाठी फोन केला होता ?”
” माझ्या गेटवरून मॅजेस्टिक ची एक बाजू दिसते . रात्री तिथल्या 301 मध्ये मला अगदी अंधूक प्रकाश दिसला . …….” तिने जे घडलं ते सगळं सविस्तर त्यांना सांगितलं . एक
कॉन्स्टेबल ते सगळं लिहून घेत होते .
इन्स्पेक्टर दिवाकर नी तिला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . आणि अजिबात काळजी न करता रहाण्याचा दिलासा दिला . गरज पडेल तेव्हा फोन करा , आम्ही हजर असू , लागल्यास तुम्हाला सिक्युरिटी देऊ . असे सांगून ते गेले .
तिला बराच धीर वाटला . कामवाल्या सुशीला मावशींना कामं सांगून ती वर गेली .
पुस्तकात डोकं घालून चार पानं होत नाहींत , तर सुशीला मावशी खालून ओरडल्या , ” ताई , खाली या पोलीस आले आहेत .
रिमा विहान सोबत फोनवर बोलत होती . तिने मुद्दाम त्याला काहीही सांगितले नव्हते .
सुशीला मावशींचा आवाज ऐकून तिने फोन बंद केला .
“पोलीस? आले हं ” म्हणत भराभर पायऱ्या उतरून ती खाली आली .
आणखी काही माहिती हवी असेल त्यासाठी पोलीस वापस आले असतील म्हणून समोर आली . दारात उभे हे पोलीस अधिकारी कुणी वेगळेच होते .
” हॅलो ! मी इन्स्पेक्टर राठोड . तुम्हीच का रिमा नायक ?” एका तगड्या ऑफिसर ने विचारले . तिने यांत्रिक पणे मान हलवली .
” आम्ही पूर्ण लेन मध्ये चौकशी करतोय . माहितेय न तुम्हाला , तुमच्या लेन बारा मध्ये एक खून झालाय ते?”
तिचा चेहरा वाचत त्यांनी विचारलं .
ती थिजल्या सारखी एकाच जागी उभी होती . भीतीने सगळ्या अंगाला घाम सुटला होता .
सुशीला मावशी पाणी घेऊन आल्या .
” तुम्ही फार घाबरलेल्या दिसताय .” पाण्याचा ग्लास उचलत इ. राठोड म्हणाले .
” म ..मला ..त..तुमचे आय कार्ड बघायला मिळेल का ?”
” हो , नक्की.” म्हणून त्यांनी आणि सोबतच्या एका कॉन्स्टेबल नी आपले ओळखपत्र दाखवले .”
” काय झालं मॅडम ? नीट सांगा , विश्वास ठेवा , आम्ही तुमची पूर्ण मदत करू .”
” तुमच्या डिपार्टमेंट कडून पोलिसांची आणखी एखादी टीम तपास करतेय का ? ” तिने घाबरतच विचारले , आणि रात्रीपासून चा सगळा किस्सा सांगितला .
इ. राठोड च्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . सोबतचे कॉन्स्टेबल सगळं नोंदवून घेत होते .
” सर त्या तोतया पोलिसांना सगळंच समजलंय . माझं घर , मी इथे एकटी आहे , हे सगळं माहीत झालंय. “
” चिंता नका करू . हे कोण लोकं आहेत , का तुमच्या मागे लागले आहेत ,
ह्या सगळ्याचा शोध आम्ही घेऊ .
मी तुम्हाला इथे सिक्युरिटी देतो . किंवा इथे एकटं न रहाता तुम्ही कुणा नातेवाईकांकडे रहायला जा . मी तिथेही माणूस पाठवतो , तो प्रश्न नाही , पण तेवढीच तुम्हाला सोबत होईल .”
” थँक्स सर , पण इथून मला ऑफिस जवळ पडतं …सर , मला खूप भीती वाटतेय .”
” रिल्याक्स मॅडम . आम्ही आहोत न …
तुम्हाला धमकी देणारा फोन आला होता न ? त्याची तातडीने चौकशी करूच .
मला एक सांगा , 301 च्या मालकीण कोमल जैन आणि मृत व्यक्ती संघवी यांना तुम्ही केव्हापासून ओळखता ?”
” सर , कोमल ला तर मी जवळपास दहा वर्षांपासून ओळखते . माझ्या लग्नाच्या आधीपासूनच ती इथे रहाते .
खूप मैत्री अशी नसली , तरी ओळख आहेच .
“आणि संघवी ?”
” ते फारसे इथे नसतात सर . त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो . ते तिथे आणि मुलीकडे नागपूर ला असे बाहेरच जास्त असतात . चारच दिवसांपूर्वी ते इथे आले आहेत .”
” म्हणजे मॅजेस्टिक च्या तिसऱ्या मजल्यावर तसं कुणीच नसतं तर . “
“बाकी दोन फ्लॅट आहेत न सर?”
” ते तर इथे नसतातच अशी माहिती मिळाली आम्हाला .”
” ओहह . तशी ती इमारत बरीच रिकामी आहे सर . अति श्रीमंत लोकांनी फ्लॅट्स घेऊन तर ठेवले , पण कुणीच रहात नाही. आमची ही टॉवर ची लेन नंबर बारा फार शांत असते सर . खूप उच्चभ्रू आणि स्वयंकेंद्रित लोक आहेत . पाहिल्यांना इथे असं काही घडलंय .”
” तुम्हाला रात्री बारा वाजता 301 मध्ये लाईट दिसला , … ” इ. राठोड ने विषय पुन्हा उकलत विचारले .
” लाईट नाही सर , अत्यंत अंधुक प्रकाश ..जसा मेणबत्ती किंवा छोटा टॉर्च चा असावा , तसा . “
” पण तुमच्या आजूबाजूला कुणीच तिथे असा प्रकाश बघितला नाहीये .”
” सर , योगायोगाने मला तो नादच लागलाय . बारा वाजता बाहेर येऊन सगळीकडे बघायचं . विशेषतः 301 कडे , कारण तो कोमल चा आहे , आणि मला माझ्या अंगणातून दिसतो. आम्ही एकमेकींना हात दाखवून नेहमी हाय म्हणायचो . “
“अच्छा ! …
बरं , ह्या टॉवर भागात विद्यार्थी किती संख्येने आहेत? खास करून रेंट वर रहाणारे ?”
” भरपूर आहेत सर . आणि ते चार किंवा पाच जण एकत्र रहातात , कारण मोहन नगर च्या सगळ्या लेन मधील फ्लॅट चं भाडं खूप जास्त आहे . एक दोन जणांना परवडतच नाही . पण ..असं का विचारताय सर ?”
इ. राठोड थोडं विचारात होते . अचानक म्हणाले ,
” अशात 301 च्या मालक कोमल जैन शी तुमचं काही बोलणं झालं आहे का ?”
” नाही सर . तितकी घसट नाहीये आमची , पण ओळखतो एकमेकींना .
हां सर !! मागील महिन्यात तिचा फोन आला होता . तिच्या घरी काम करणाऱ्या कमला बाई ला हजार रुपये द्यायचे होते . ते मी दिले , आणि तिने मला डिजिटल ट्रान्सफर केले . इतकं तर ओळखतोच सर .
इथेच टॉवर जवळ लेन बारा मध्येच रहातोय गेले काही वर्ष .”
” हे तुम्ही त्या तोतया पोलिसांना सांगितलं आहे ?”
” नाही सर.”
कॉन्स्टेबल ने राठोड सरांच्या कानात काहीतरी सांगितले . सरांनी ठीक आहे , अशी मान हलवली .
“मॅजेस्टिक मधील संघवी सोडून आणखी कुणाला ओळखता ?”
” नाही सर.”
” ठीक आहे . रिमा मॅडम , धन्यवाद.
घाबरू नका . तुम्हाला धमकी देणारे कोण लोक आहेत आणि हे प्रकरण आणखी कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं आम्ही खणून काढुच! दोन साध्या वेशातील सिक्युरिटी दोन शिफ्ट मध्ये तुमच्या साठी इथे कायम सोबत असतील . तुम्ही नेहमी सारख्या ऑफिस ला जाऊ शकता .”
” हे मी कुठल्या भलत्याच संकटात सापडलेय सर ?”
” डोन्ट वरी ! आम्ही आहोत न .” इं. राठोड नी दिलासा दिला , पण
रिमा मात्र खूप घाबरली होती .
****** इं. राठोड नी मॅजेस्टिक चा तिसरा मजला , लिफ्ट आणि पायऱ्या सील केल्या होत्या . सकाळी आलेल्या फोनवरून ते आणि सारी टीम इथे तातडीने हजर झाली होती . चौथ्या मजल्यावरील तरुण अक्षय ह्याला 301 च्या दाराशी संघवी पालथे पडलेले दिसले होते . छातीत गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती . त्यानेच पोलिसांना फोन केला होता .
कोमल जैन च्या सदनिकेत कुणीतरी गुपचूप रहात होतं , ज्याचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते . आश्चर्य म्हणजे इमारतीतील कुणालाही त्याची किंचितही खबर नव्हती .
इं. राठोड यांना त्या फ्लॅट मध्ये काही वस्तू सापडल्या ज्यामुळे त्यांची खात्री झाली की हा खून चोरी च्या उद्देशाने झाला नाहीये . अन्यथा संघवीच्या घरात लुटमार झाली असती .
शिवाय त्यांच्या बोटातील दोन्ही अंगठ्या तशाच होत्या . ..फक्त त्यांचा फोन मात्र गायब होता .
त्यांच्याकडे येणारी कामवाली कमला बाई ही रोजच्या सारखी सकाळी नऊ ला आली असतांना तिच्याकडून पोलिसांना अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली होती .
कमला चा मुलगा केशव हा एक इस्टेट ब्रोकर होता . अनेक तरुण मुलं मुली त्याच्या मार्फत मोहन नगर च्या टॉवर जवळील लेन 11 , 12 तेरा मध्ये भाडेतत्त्वावर फ्लॅट घेत असत .
राठोड सरांनी 301 मधील काही वस्तू ताब्यात घेतल्या होत्या . बॉडी पोस्टमार्टेम साठी पाठवली होती . आता भराभर सुत्र हलवणे भाग होते . त्यांनी
स्पेशल फोर्स च्या मेजर कामत यांना फोन लावला होता . शिवाय संघवीच्या नातेवाईकांना निरोप पाठवण्याची व्यवस्था पण केली होती .
आता लेन 12 मधील सगळ्या राहिवास्यांकडे चौकशी करायची होती .
लाऊंड्री वाल्या संतोष ने सांगितले होते , की
‘कोपऱ्यावरील नायक मॅडम 301 च्या कोमल ला ओळखतात . संघवी साहेबांशी पण त्यांची ओळख आहे ‘
त्यामुळे ह्या नायक मॅडम ला लवकर गाठणे आवश्यक होते .
********* झालेल्या सगळ्या प्रकाराने रिमा आतून हादरली होती .
साध्या वेशातील पोलीस श्री . माने सतत तिच्या सोबत होते .
सगळ्या डिपार्टमेंट मध्ये तो एक चर्चेचा विषय झाला होता .
( रिव्हॉल्व्हर धारी) पोलीस सुरक्षेतच घरी वापस जाण्यासाठी तिने गाडी काढली .
आपल्या गाडीचा पाठलाग होतोय हे मानेंच्या च्या लक्षात आले होते .
रिमा सावध झाली . बारीक गल्लीतून ते रुंद रस्त्यावर आले ; आणि तिने अचानक गाडीचा वेग वाढवला .
पाठीमागच्या गाडी ने देखील वेग वाढवत पाठलाग सुरू ठेवला .
मानेंनी ताबडतोब इं. राठोड ना फोन लावला .
त्याच क्षणी रिमा च्या गाडीचा ताबा सुटला . पाठीमागून गाडीच्या टायर वर गोळ्या घातल्या गेल्या होत्या .
गाडी विचित्र पणे वळून फुटपाथला धडकली .
” मॅडम , तुम्ही बाहेर उडी मारा , आणि समोरच्या टपरी आड जा ” माने जोरात ओरडले , तशी तिने दार उघडून जमिनीवर लोळण घेतली . एक गोळी मागून येऊन सटकन दरवाज्यावर आदळली .
ती धावत पान टपरीच्या मागे गेली , आणि तिथून जाणाऱ्या बोळात धावत सुटली .
********** स्पेशल फोर्स चे मेजर कामत , इं. राठोड , सबइन्स्पेक्टर जीवन आणखी एक फोन जण
मोहननगर पोलीस चौकीत बसले होते .
इं. राठोड ने काही ठळक मुद्दे अधोरेखित केले .
संघवीचा खून हा पैसे अथवा चोरी च्या उद्देशाने झालेला नव्हता .
301 मध्ये दोन व्यक्ती कदाचित गेल्या दोन – तीन दिवसांपासून रहात असाव्यात .
संघवींनी नक्की असं काहीतरी बघितलं , जे खुन्यांसाठी धोकादायक होतं , ज्यामुळे त्यांनी सायलेन्सर असलेल्या रिव्हॉल्व्हर ने गोळ्या झाडून त्यांचा खून केला .
रिमा पासून त्यांना नेमका काय धोका वाटत असेल , हे अजून स्पष्ट होत नव्हते .
एक गोष्ट तपासात समजली होती ती म्हणजे
रिमा ला आलेला धमकीचा फोन हा घटना स्थळावरूनच आलेला होता , जो नंबर आता
‘डी ऍक्टिव्हेट ‘ केलेला होता .
******** रिमा जीव घेऊन एका बोळीत घुसली , आणि तिच्या लक्षात आलं की तिचा पाठलाग होतोय . ती खूप गजबजलेली वस्ती होती . अत्यंत वेगात ती एका घराच्या भिंती मागे लपली . तिथे खूप सारे कपडे वाळत असल्याने त्या मागे लपून ती बघू लागली . ते दोन जण होते .
तिने चेहरा बघितला .
” रफिक???” ह्याला तर आपणच फ्लॅट मिळवून दिला होता !
तिच्या अंगावर शहारा आला .
तीने आणखीच अंग चोरून घेतले ,
आणि तिचा फोन वाजला .
मेजर कामत आणि इं.राठोड पुन्हा फ्लॅट 301 मध्ये आले होते .
तिथे बरीच जास्त धूळ होती . उरलेले खाद्यपदार्थ , किरकोळ भांडी आणि बाकी सगळे फर्निचर तसेच होते .
आतल्या खोलीत धुळीत एक मोठा लांबट ठसा होता ..एखाद्दया लांब पेटी सारखा . नीट बारकाईने बघितल्यास लक्षात यावा , असा .
मेजर आणि राठोड यांना ताबडतोब समजले की हा ठसा लांब पल्ल्याच्या बंदुकीच्या पेटीचा आहे . म्हणजे अशी पेटी इथे आणण्यात आली होती तर .
काहीतरी मोठा घातक प्रोग्रॅम करायचा बेत दिसत होता .
म्हणूनच राठोड सरांनी मेजर कामत यांना सामील करवून घेतले होते , आणि ही केस त्वरित इंटेलिजन्स कडे सुपूर्द झाली होती . भराभर सूत्र हालत होते .
इतकी मोठी पेटी कुठल्या वाहना शिवाय हलवणे शक्य नव्हते . त्या वाहनाचा शोध घेणे सुरू होते .
कामवाल्या कमला बाईचा मुलगा केशवच्या चौकशीत कळाले होते , की इतर राज्यातील तरुण मुलांना कागदपत्र न तपासता तो रहायला फ्लॅट मिळवून देतो . त्याने दोन मुलांना विजय नगर मध्ये एक फ्लॅट मिळवून दिला होता . त्यातील एक जण IT इंजिनिअर
असून तो SIGNA informatics मध्ये सहा महिन्यापूर्वी काम करत होता . त्याचं नाव होतं रफिक जरीवाला . आणि दुसरा होता नाविद .
त्या विजयनगर च्या फ्लॅट मध्ये एक दोन जणांनी ह्या दोघांना बघून हटकल्याने त्यांनी ताबडतोब तो फ्लॅट सोडून केशवच्याच मदतीने मॅजेस्टिक मध्ये अवैध पद्धतीने आश्रय घेतला होता .
**** सोमवारी संध्याकाळी मेजर कामत आणि राठोड कंट्रोल रुम मध्ये बसले असतांना रिमा सोबत तैनात असलेल्या मानेंचा फोन आला .
” सर , आमच्या गाडीवर आत्ता संध्याकाळी सात वाजता पाठलाग करून गोळीबार झाला . ती एक पांढऱ्या रंगाची कार होती . मी पण फायर केलं . एक जण जखमी झालाय , त्याच्या मांडीत गोळी झाडलीय मी , पण दोन जण उतरून रिमा मॅडम च्या मागे गेले आहेत सर . माझ्या पायात गोळी घुसल्याने मी जाऊ शकलो नाही . मला मदत मिळालीये ; आणि एक जण सब इन्स्पेक्टर जीवन सरांनी ताब्यात घेतलाय सर .”
” ठीक आहे माने , जीवन नी तिच्या तपासासाठी टीम पाठवली आहे , तुम्ही काळजी घ्या.”
हे बोलून इ.राठोड ने सबइन्स्पेक्टर जीवन ला फोन लावला .
” जीवन , तो हाती लागलेला जखमी …काय नाव म्हणालास ?…अन्वर ..राईट? त्याला सेफ ठेवा . आपल्या SSC ( special security cell ) मध्ये ठेवा , आम्ही आलोच .”
” येस सर !”
मेजर कामत हा संवाद ऐकत होते .
” राठोड , रिमा पण SIGNA मध्येच काम करते न ? हे कनेक्शन जबरदस्त आहे . रफिक चे फोटो व्हायरल करा ताबडतोब !!! त्या दुसऱ्या नाविद चे स्केच बनवा.”
” ते काम सुरूच आहे सर , प्रश्न आहे की यांचा पुढील प्लॅन आणि रिमा ची सुरक्षितता . आता त्या ताब्यात घेतलेल्या जखमी माकडाचा समाचार घेऊया .”
तितक्यात एक फोन आला .
” सर , शनिवारी रात्री संघवी ची हत्या झाली त्या नंतर रविवारी पहाटे चार वाजता हायवे पेट्रोल पंपापासून थोड्याच अंतरावर एक लाल रंगाची टाटा इंडिका बराच वेळ थांबली होती . त्यात दोन जण बसले होते . नंतर एक व्हॅन आली . ह्या दोघांनी काही सामान काढून त्या व्हॅन मध्ये टाकले , आणि इंडिका पुन्हा वापस शहराच्या दिशेने गेली . “
” आणि व्हॅन?”
” ती मिरपूर च्या दिशेने गेली असं तिथल्या गावकऱ्याने सांगितलय सर.”
” ताबडतोब आपली टीम साध्या वेशात मिरपूर ला पाठवा . आणि सतत आम्हाला कळवत रहा . त्या गावकऱ्याचे पण सगळे डिटेल्स घ्या.”
इं. राठोड आता काळजीत पडले होते .
मेजर कामत तिथून उठत म्हणाले ,
” राठोड , मिरपूर ला परवा थर्मल प्लांट चे पी.एम साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे न ? …चला आता आधी त्या माकडाचं बघू . “
****** रिमा समोर चहा आणि पाव ठेवण्यात आला होता .
” खाऊन घे . पुन्हा मिळेल की नाही सांगता येणार नाही .” तोंड बांधलेला कुणीतरी म्हणाला .
” मला इथे का आणलंय ? मी तुमचं काय बिघडवलं ?”
इतक्यात त्या अंधारात कुणीतरी आत आलं .
” रफीक ? तू ह्यात कसा?” तिने आधी त्या बोळात रफीकला बघितलं होतं .
नेमका त्याच वेळेला विहान चा फोन आला , आणि ती त्यांच्या ताब्यात सापडली होती .
” हे बघ . तू मला , केशव ला आणि ह्या नदीम ला चांगलं ओळखतेस . ऑफिस मध्ये पण दोन तीन दा तू मला टोकलं होतंस . तुला माझा संशय आला होता न ?”
” न..नाही”
” चूप !! तू सिनियर कडे माझी तक्रार केली होतीस . माझी नोकरी गेली , पण माझ्या विरुद्ध पुरावे नाही मिळाले ह्या ×××× ना .
शनिवारी रात्री तू फोन केल्यामुळे तो म्हातारा आमच्या फ्लॅट पाशी आला . दाराजवळ येऊन त्याने दार ठोकले . आम्ही तेव्हा आतच होतो . पटकन दार उघडून आत ओढलं त्याला .”
रिमा च्या कानामागून घामाच्या धारा लागल्या होत्या . काय झालं असणार ह्याची कल्पना येऊन तिचा थरकाप झाला .
“म्हणजे त्यांनी मला कॉल केला तेव्हा ..संघवी काका ..”
” तेव्हा तो आमच्या ताब्यात होता. आमचं सगळं सामान त्याने बघितलं ,आणि धमक्या द्यायला लागला सा s ला! .” असं म्हणून अतिशय कुत्सित हसला रफिक .
त्या अंधारात कसलातरी आवाज आला . तिला कोपऱ्यातलं दिसत नव्हतं . पण तीन चार जणं असावेत असं वाटत होतं . अचानक तिच्या अंगावर एक मोठा कपडा फेकल्या गेला . चादर असावी ती , आणि तिचं बोचकं कुणीतरी उचलून एका गाडीत टाकलं . काही क्षणात गाडी सुरू झाली होती .
*******मेजर कामत यांनी खूप मोठी कुमक मागवली होती . दिल्लीहून चीफ सिक्युरिटी ऑफिसर नी स्वतः लक्ष घालून ट्रूप ची निवड केली होती .
मिरपूर ला कडक सुरक्षा प्रदान करण्यात आली होती . तिथे एक खूप मोठा थर्मल पॉवर प्लान्ट उभारण्यात आला होता . त्या कडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांनी नाकेबंदी करण्यात आली होती आणि आतल्या परिसरात पण कडक व्यवस्था होती .
केशव कडून मिळालेल्या माहितीनुसार सब इन्स्पेक्टर जीवन यांनी विना कागदपत्र रहाणाऱ्या अनेकांची चौकशी केली होती . रिमा कडे तोतया पोलीस बनून गेलेल्या दोघांना ताब्यात घेतलं , पण ते फक्त मामुली प्यादे होते . त्यांच्या फोन मधील कॉल लॉग देखील काहीच सुचवत नव्हते .
रिमा चा पाठलाग केलेली गाडी चोरीची होती , ज्यात बोटांच्या ठस्यां शिवाय काहीच नव्हतं . सगळ्या बाजूने प्रयत्न करूनही
ह्या कारस्थानातील प्रमुख सूत्रधार अजून हाती यायचेच होते .
इं. राठोड आणि मेजर कामत जातीने मिरपूर मध्ये सगळं बघत होते .
मोठ्या घातपाताची शक्यता होती , कारण कोमल च्या फ्लॅट मध्ये त्यांना
कचऱ्यात एक पिवळट पावडर लागलेला कागद दिसला होता . तपासणीत ती TNT असल्याचे सिद्ध झाले . म्हणजे हे लोक तिथे रात्री बॉम्ब
बनवत असणार . ..
रिमा च्या सावधते मुळे खूप मोठा कट उघडकीला येत होता . पण रिमाचा शोध घेण्यात त्यांना अपयश येत होते .
जीवन च्या ताब्यातील जखमी अन्वर हा फक्त एक भाडोत्री मारेकरी होता . त्याला रफिक ने मात्र हजार रुपये घेऊन रिमा च्या मागे लावलं होतं . रफिक शिवाय इतर कुणालाही तो फरसं ओळखत नसावा असं सध्या तरी दिसत होतं .
मिरपूर च्या एका शेतकऱ्याच्या घरात साध्या वेशात मेजर कामत , इ. राठोड , चार शार्प शूटर , चीफ इंजिनिअर पाठक , आणि काही साध्या वेशातील पोलीस बसले होते .
मेजर कामत जवळ पॉवर प्लान्ट आणि आजूबाजूच्या परीसराचा नकाशा होता .
तो मध्यभागी ठेवून ते बोलत होते .
” अलर्ट everybody . एक लक्षात घ्या . आपल्याला फक्त अशी शंका आहे की ते एकच गन घेऊन एकच शूटर डिप्लोय करतील , पण शक्य आहे , की अश्या जास्त guns असतील . पाठक सरांनी सांगितल्या प्रमाणे P.M आणि बाकी VIP मंडळी
जेव्हा रिमोट ने curtain raise करतील , तेव्हा ते पश्चिमेला तोंड करून उभे असतील .
आपले शार्प शूटर्स तो सगळा कॅनव्हास
कव्हर करतील . शिवाय PM ची सिक्युरिटी असेलच .”
चीफ इंजिनिअर पाठक साहेब खूप अस्वस्थ झाले होते . कपाळावरील घाम पुसत ते म्हणाले ,
” मेजर साहेब , आपण हा कार्यक्रम रद्दच केला तर ?”
” हाच तर फरक आहे साहेब तुमच्या आणि आमच्या विचारात . अतिरेक्यांना वेळेचं ठेचलं नाही तर ते आपल्या छातीवर नंगा नाच करतील . काळजी करू नका . आम्ही कशासाठी आहोत?
माझं ऍथोरिटी शी सगळं बोलणं झालंय . तसा प्रोटोकॉलच आहे साहेब .”
त्या नंतर मेजर कामतांनी सगळा प्लान समजावून सांगितला .
सगळे लक्ष देऊन ऐकत होते .
********* रिमा ला जाग आली तेव्हा बहुतेक पहाट झाली असावी . बाहेर पक्ष्यांचा आवाज येत होता . तिने पाय लांब करण्याचा प्रयत्न केला , आणि सणकून कळ आली . तिचे दोन्ही हात आणि
पाय बांधलेले होते . खोलीत आणखी कुणी असावे कदाचित म्हणून ती निपचित पडून राहिली . कान गोळा करून ऐकू लागली .
” अन्वर ला किती माहिती आहे?”
” कुछ भी नही . साला मामुली चिरीमिरी
गुंडा है । रफिक ने हायर किया था । “
” मिरपूर साठी कधी निघायचं?”
” उधर कायको ? उधर जाना ही नही है . अगर पुलीस के हाथ कुछ लगता भी है , तो भी वो पुरी ताकत मिरपूर मे लागाएंगे । वो PM की सब गाडीया ऊस नये युनिव्हर्सिटी मे कुछ देर रुकने वाले है ना? .. कल बताया तो था !”
आणि टाळी दिल्याचा आवाज आला .
दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये एका आलिशान कक्षात एक तातडीची सभा भरली होती .
ताहीर मुझलीम नुसता आग ओकत होता . दुबईवरून त्याला एक कामगिरी सोपवण्यात आली होती . त्यासाठी त्याने पेरलेले जुने लोक कामात आणावेत , स्थानिक माणसांची मदत घ्यावी ह्या त्याच्या कल्पनेला दुबई कडून होकार आला होता , पण एका अटीवर . अट होती की ,
एक जरी महत्वाचा माणूस पकडल्या गेला तर ताहीर ला संपवण्यात येईल .
ताहीर ने आतापर्यंत दोन मोठ्या कारवाया पूर्णपणे स्वतःच्या बळावर राबवल्या होत्या . भारतीय इंटेलिजन्स आणि अँटी टेररीस्ट स्क्वाड च्या लोकांनी
काही किरकोळ जणांना ताब्यातही घेतले होते . चौकशी सुरू होती , पण ताहीर पर्यंत ते पोहोचू शकले नव्हते .
ह्यावेळी पूर्ण नवीन टीम वापरून ‘कामगिरी फत्ते’ करु असा ताहीर चा प्लान होता . त्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती . त्यासाठी शहरातील शांत विभाग वेचून तिथे आपली माणसं रहिवासी म्हणून पेरून तयारी सुरू होती . त्यासाठी विकाऊ माणसं हाताशी धरून रफिक आणि नाविद ची निवड करण्यात आली होती . रफिक हा इंजिनिअर असल्याने तांत्रिक बाबी लवकर आत्मसात करत असे .
दिल्ली वरून ‘गन’ असंख्य सुट्या भागात आणून मोहन नगर सारख्या अत्यंत सुरक्षित आणि निरुपद्रवी भागात आणून जोडणी करणे , मोठया प्रमाणात TNT नेमक्या ठिकाणी पोचोवणे , ‘आपल्या’ माणसांची साखळी उभी करणे अशी कामं रफिक वर सोपवण्यात आली .
दिल्लीतील बॉम्ब स्फोटात त्याची मुख्य भूमिका होती . तिथेच त्याची ओळख नाविद शी झाली होती . नाविद हा अतिशय घातक , चलाख , चपळ आणि अनुभवी
‘खिलाडी’ होता . गेल्या काही महिन्यात त्यानेच रफिक ची साथ दिली होती .
आताची कामगिरी पार पाडण्यासाठी फक्त बंदूक आणि काही स्फोटकं ठराविक ठिकाणी नेऊन पोचवणे , इतपतच रफिक ची जबाबदारी होती . त्यात
एका सामान्य महिलेमुळे आणि चुकी मुळे त्याची ओळख उघडी पडली आहे हे समजल्या पासून ताहीर पिसाळला होता . म्हणून मूळ प्लॅन मध्ये बदल करून त्याने रफिक ला बाजूला व्ह्यायला फर्मावले होते .
ताहीर मुझलीम ने एका कंपनी साठी काम करणारी आपली खास चार माणसं विद्यापीठाकडे पाठवली होती .
******* रिमा ला कुणीतरी एका कळकट प्लेट मध्ये भात आणून दिला होता . ते कुणीच आपापसात बोलत नव्हते . सकाळचे नऊ – दहा वाजले असावेत . पहाटे ऐकलेल्या संभाषणावरून तिला समजले होते की
PM च्या हत्ये चा किंवा बॉम्ब स्फोटाचा कट आहे . कदाचित विद्यापीठातील तरुण विद्यार्थ्यांना पण टार्गेट करण्यात येईल .
याचा अर्थ शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावरील नवीन विश्व विद्यापिठात घातपाताची ही तयारी सुरू आहे हा अंदाज तिने बांधला .
तिला बंदी का बनवलं असेल याचाही अंदाज आला तिला . आपल्याला कदाचित ओलीस ठेवल्या जाईल असे तिला वाटत होते .
तिने भात संपवल्यावर त्याच इसमाने तिची प्लेट उचलून नेली , आणि पुन्हा तिच्या अंगावर चादर फेकून गेला .
**********इं. राठोड , जिल्ह्याचे एस.पी , पोलीस कमिशनर , मेजर कामत सगळे युद्ध पातळीवर कामाला लागले होते .
डॉग स्क्वाड पण बोलावण्यात आले होते . कुणालाही दिसणार नाही , अशा ठिकाणी शार्प शूटर्स तैनात होते . बॉम्ब डिफ्युज करणारी यंत्रणा हजर होती .
रफिक ला दिल्लीहून ताहीर च्या हस्तकाचा चा फोन होता .
“नालायक ! तुमची छोटीशी गलती किती महागात पडली कळतंय का ? तिथून दफा व्हा तुम्ही दोघे!
इब्राहिम पुढचं सगळं सांभाळेल .
आता वर्षभर नाव आणि वेष बदलून एकदम दूर कलकत्त्यात रहायचं . तुमची बिदागी तिथेच मिळेल “
रफिक ने मान डोलावून विचारलं ,
” बकरी ची कुरबानी देऊ का आता ?”
********** अतिशय मोठ्या विस्तीर्ण परिसरात विश्वविद्यापीठ उभे केले होते .
कडक सुरक्षा व्यवस्था होती . ओळ्खपत्रा शिवाय आत प्रवेश नव्हता .
साफसफाई आणि मेंटेनन्स चं कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या RVG कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आधीच आत प्रवेश मिळाला होता . त्यातच ‘इब्राहिम’ कडे सफाईची आणि ध्वनी संयोजनाची जबाबदारी होती .
इब्राहिम ने आपले ‘खास’ कामगार योग्य तिथे नेमले होते . एका प्रशस्त प्रांगणात उभारलेल्या स्टेज वरून प्रधानमंत्री फक्त दहा मिनिटं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते . स्टेजच्या समोर
कंपाउंडच्या बाहेर असलेल्या इमारतीच्या गच्चीवर याकूब इशाऱ्याची वाट बघणार होता . त्याच्या मार्फतच
दिल्लीत बसलेल्या ताहीर ला लाईव्ह टेलिकास्ट मिळणार होते .
*********रिमा अस्वस्थ होती . काहीतरी हालचाल करून आपल्या पोलिसांकडे ही माहिती पोहोचवायला हवी असं वाटून तिने स्वतःला मोकळं करण्याचा निष्फळ प्रयत्न केला . त्या खोलीला एक छोटीशी खिडकी आणि वर फक्त एक छोटासा झरोका होता .
काही मिनिटातच तिथे भराभर हालचाली झाल्या . काही सामान डब्यात भरणे सुरू असावे बहुतेक .
अचानक तिला कुणीतरी उचलले , खांद्यावर टाकले , आणि ठाय करून गोळी चालल्याचा आवाज आला .
**** खास हेलिकॉप्टर ने माननीय पंतप्रधानांचं आगमन झालं . इब्राहिम स्टेज जवळ श्वास रोकून बघत होता . दिल्लीत ताहीर चे तर
अस्तित्वच पणाला लागले होते . काही मिनिटातच प्रधानमंत्री व्यासपीठावर आले .
याकुब सरसावून तयार झाला …त्याने पोझिशन घेतली …ट्रिगर वर बोट ठेवले …आणि तो कोसळला .
एक गोळी मागून आरपार त्याच्या मस्तकाला छेदून गेली होती . कोसळताना त्याने वर बघितले , तो वाजिद होता ! रफिक सोबत रहाणारा भारतीय एजंट !
स्टेज जवळ इब्राहिम वाटच बघत राहिला . मग त्याने बाकी तीन जणांना खुणावले ….ठीक ठिकाणी ठेवलेले टाइम बॉम्ब ऍक्टिव्ह करण्या साठी .
तीन जण बॉम्ब पर्यंत पोहोचल्या बरोबर त्यांना ताब्यात घेण्यात आले .
मेजर कामत ते बघून गालातल्या गालात हसत होते . नावीद ने सगळे टाइम बॉम्ब आधीच निकामी करूनच पाठवले होते , आणि मेजरने विद्यापीठात मुद्दाम त्याचा शिरकाव होऊ दिला होता .
********* पी.एम चं भाषण झालं . ते स्टेजवरून खाली उतरले .
अजून काहीच अपेक्षित घडत नाहीये हे बघून चिडून इब्राहिम स्टेज च्या मागील बाजूला आला , आणि इ. राठोड आणि त्यांच्या माणसाने त्याच्या मुसक्या आवळल्या .
कमिशनर साहेबांनी आधीच दिल्लीला फोन केला होता . नाविद ने गोळी झाडल्यावर रफिक ने ताहीर चा पत्ता सांगितला होता . नाविद च्या मदतीला सब .इं . जीवन आणि मेजर कामतांचे कमांडो होते . सगळे बॉम्ब निकामी करूनच खोक्यात भरण्यात आले होते . रफिक आणि तिथल्या दोन माणसांना बंदुकीच्या टोकावर ठेवूनच विद्यापीठापर्यंत नेण्यात आले होते .
बॉम्ब चे खोके त्यांच्या माणसांच्या ताब्यात देई पर्यंत नाविद स्वतः त्यांच्या
सोबत होता . आणि मग धावत जाऊन याकूब ची वाट पहात इमारतीपर्यंत पोहोचला होता .
दिल्लीवरून आलेल्या इब्राहिम आणि तीन जणांना ह्या सगळ्या हालचालींची किंचितही कल्पना नव्हती . तिकडे सगळ्या घातक कटाचा म्होरक्या ताहीर मिलिटरी च्या ताब्यात होता .
********रिमा पोलीस सुरक्षेत गाडीत बसली होती . ती धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होती , कारण
तिला उचलल्या बरोबर नाविद ने रफिक ला गोळ्या घातल्या होत्या .
” कुठे जायचंय मॅडम?” ड्रायव्हर ने विचारले .
आरामात मागे टेकत ती म्हणाली ,
” मोहन नगर , टॉवर!! .”
( समाप्त)
© अपर्णा देशपांडे
Image by Henryk Niestrój from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
जबरदस्त!!!!
धन्यवाद🙏🙏
भन्नाट , आवडली
धन्यवाद
Thank you
Baap re … Simply marvelous… 👏🏼👏🏼
Thank you
मस्त. खूप भारी…..
धन्यवाद