माझे messy अनुभव १
मी वयाच्या सोळाव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर सात वर्ष हॉस्टेलवर आणि दोन वर्ष पेईंग गेस्ट म्हणून राहिले. हॉस्टेलवर राहिलेल्या प्रत्येकाला जेवणाचे, तिथल्या मेसचे, डब्याचे विविध अनुभव आलेले असतात. अन्नच महत्त्व प्रत्येकाला असतं पण हॉस्टेलवर राहणाऱ्या, राहिलेल्या प्रत्येकाला अन्नाचं महत्त्व एका वेगळ्या प्रकारे पटलेलं असतं. त्यांच्या लेखी अन्न हे फक्त उदरभरण न राहता तो एक जीवनानुभव होऊन गेलेला असती, यात चांगले वाईट असे दोन्ही अनुभव आले. या लेखात मी माझे messy (!) अनुभव मांडायचा प्रयत्न करणार आहे.
अकरावीला हॉस्टेलच्या सगळ्यात पहिल्या दिवशी माझी रूममेट मला जेवणासाठी मेसमध्ये घेऊन गेली. एक जुनं बांधकाम असलेलं घरच होतं ते, अजूनही असावं. जायचा रस्ता एका बोळातून, किचनपासून होता, म्हणजे जातानाच कळायचं आज मेनू काय असणार आहे. इथे विविध वास यायचे, एक टिपिकल तेलाचा, डाळ रटरटण्याचा, बटाटे शिजवल्याचा वास कायम यायचा. इथेच हात धुण्यासाठी मोठी बेसीन्स होती. पुढे जाऊन एका लांबूळक्या हॉलमध्ये खुर्च्या आणि टेबलं लावली होती. प्रत्येक टेबलावर चार ताट. दोन मुली वाढायला असायच्या. पहीले दोन दिवस मला प्रचंड उत्सुकता वाटली या सर्व सोहळ्याची. आपापलं जायचं, जेवायचं, मेसमध्ये रोज नवीन चेहरे पहायचे, ताट उचलून ठेवायचं. घरापासून लांब, आईशिवाय आपण आपलं स्वतःच जेवण मॅनेज करायचं म्हणजे काहीतरी ग्रेट करतोय असं वाटायचं. पहिल्या दिवशीचा मेनू मला अजून आठवतो. पोळी, कोबीची भाजी, टोमॅटोची कोशिंबीर, आमटी आणि भात. चटणी, लोणची कॉमन ठेवलेली असायची. चटणी लगेच संपायची. लोणचं छान असायचं. ज्याला जे हवंय ते त्याने घ्यायचं.
हॉस्टेलमधल्या सिनियर मुली जेवण पाहून सतत तोंड वाकडी करत. भारतभरातल्या मुली होत्या तिथे. प्रत्येकीला महाराष्ट्रीयन जेवण आवडेलच अस नाही. त्यातून त्या हॉस्टेलमध्ये बऱ्यापैकी रुळलेल्या होत्या. त्याच त्याच जेवणाचा त्यांना कंटाळाही आलेला असावा. “आज भी दोडका क्यू बनाया? मावशीsss, ये आमटीमे पानी डालते हो की पानी मे आमटी?”म्हणत त्या ओरडायच्या. मला गंमतही वाटायची आणि वाईटही वाटायचं.
माझा पहिला महिना कुतुहलात गेला. रोज कोणती भाजी, कोणती कोशिंबीर असेल, चटणी रोज एकच असते की वेगवेगळी, रात्रीचं जेवण जास्त चवदार असतं का, मुली आपापल्या रूममेटची, कंपूची जागा धरून ठेवतात का या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गेला. हळूहळू सगळं अंगवळणी पडलं. मी तशी जेवणाबाबत अजिबात कटकटी नाही. समोर येईल ते आनंदाने खाणारी आहे. जेवणात त्रुटी काढणं, सतत परफेक्शनच्या मागे धावणं मला मूर्खपणाचं वाटतं. आपल्यासाठी जेवण आहे, जेवणासाठी आपण नाही हे ब्रीद मी आजवर मानत आले आहे. पुढे मी एका जेवणाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आणि नेमस्त कुटुंबात लग्न होऊन जाणार होते हे मात्र तेव्हा मला माहित नव्हतं.
साधारण सवाबारा, साडेबारा वाजता मेसमध्ये गेलं की गरम जेवण मिळायचं. हेच जेवण उशीर झाला की अत्यंत बेचव लागायचं. आमटी थोडी जास्तच फुळूक व्हायची, टोमॅटोच्या कोशिंबिरीत कांदा ऍड व्हायचा, भात ऐनवेळी लावल्यामुळे गुरगुट्या तरी व्हायचा नाहीतर फडफडीत तरी व्हायचा. मेसमध्ये जेवलेले लोक खऱ्या भाताची चव खरंतर विसरतात, कारण सोडा घातलेला भात तुम्हाला बाकी कसलीच चव फारशी लागू देत नाही. भाजी कधी बरी कधी ठीक म्हणावी अशी असायची. माझ्या संपूर्ण मेसी जीवनात पालेभाजी, जो माझ्या अत्यंत आवडीचा प्रकार आहे, तो मला फारसा दिसला नाही. तो अनेकदा परवडतही नाही. भाज्या ठरलेल्या असत. कोबी, फ्लॉवर, पापडी, सुरण, बटाटा, टोमॅटो आणि परत तेच रिपीट. बाकी बीट, मुळा,पालक, मेथी, सॅलड कधी फारसे दृष्टीस पडले नाहीत.
मेसमधले दोन सगळ्यात आवडीचे वार म्हणजे शनिवार रात्र आणि रविवार दुपार असायचे. शनिवार रात्रीचा मेन्यू चविष्ट आणि माझ्या आवडीचा असायचा. मुगाची खिचडी, पापड, पिठल आणि कढी! बस. पोळी, भाकरी बहुधा नसायची किंवा असली तरी आम्ही तिच्याकडे पाहायचो नाही. संपूर्ण बटाटासुरणाच्या आठवड्यानंतर हा मेन्यू म्हणजे स्वर्गसुख असायचा. त्यात बऱ्याचश्या मुली शनिवार रात्री त्यांच्या लोकल गारडीयनकडे गेलेल्या असायच्या. त्यामुळे मेसमध्ये तशी कमी गर्दी असायची आणि हे सगळे पदार्थ पुरवणीला यायचे. त्यादिवशी मात्र सगळ्या मुली आनंदाने जेवायच्या. कोणीही रागवायचं नाही. उगाच नाही आपण मूगाची खिचडी, कढीला comfort food म्हणत. आम्हा सर्वजणींना घरच्या जेवणाची आठवण करून देणारं comfort food होतं ते.
मग उगवायचा रविवार. रविवार म्हणजे आम्हा हॉस्टेलवासियांसाठी देवाचा वार कारण तो स्वीटचा वार असायचा. आज कोणतं स्वीट असेल यावरून आम्ही मैत्रिणी पैजा लावायचो. पण जगाच्या व्याख्येतली स्वीटस आणि मेसच्या भाषेतली स्वीटस फार वेगळी असतात बरं. मेसमधलं सगळ्यात कॉमन स्वीट म्हणजे मऊ पडलेली जिलेबी आणि दुसरं म्हणजे तांदळची खीर. ही खीर सुद्धा कशी? तर चक्क भात उकडून दुधात घालून त्यात साखर घालून बनवलेली. इतका बेचव लागायचा तो प्रकार! पण पर्याय नसल्यामुळे खावा लागायचा. नंतर अनेक वर्षांनी मी माझ्या जावेकडे किंचितसे मूग भाजून घातलेली अतिशय उत्कृष्ट चवीची तांदळाची खीर खाल्ली. त्यादिवशी मला समजलं तांदळाची खीर कशी असते ते! मेसमधलं ते तांदूळ, पाणी, दूध, साखर कॉम्बिनेशन आठवून मला एक ठसका मात्र लागला होता. कधीतरी क्वचित श्रीखंड पुरी असायची तेव्हा मुली खुश असायच्या. बाकीचे गोड पदार्थ मेसमधल्या लोकांना फारसे माहीत नसतात. दुपारी स्वीट झालं की रात्रीच्या जेवणाला सुट्टी असे. मग आम्ही मुली रात्रीच्या जेवणासाठी फार वेगवेगळे जुगाड करत असू. मॅगी हा त्यातल्यात्यात स्वस्त जुगाड.
अशा या मेसच्या जेवणाची मला हळूहळू सवय झाली. एरवी माहीत नसलेले सुरण पापडी ओळखीचे झाले. जेवणाच्या बाबतीत मी फारशी picky नसल्याने तसा त्रास झाला नाही, पण काही दिवसांत मला एका वेगळ्याच messy अनुभवाला सामोरं जायला लागणार आहे हे मात्र मला माहित नव्हतं. थोडक्यात मी आमचं चाळीतलं घर सोडून एका three स्टार हॉटेलमध्ये राहायला जाणार होते? माझे three star messy अनुभव कसे होते? जाणून घेऊ या पुढच्या लेखात….
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
खूप छान लिहिलंय… मलाही माझ्या हॉस्टेलच्या दिवसांची आणि मेसची आठवण आली.
Thanks 😊
बाहरचे जेवणाची चव ज्याला माहित असते त्यालाच घरच्या साध्या जेवणाची किंमत कळते.
Pingback: माझे messy अनुभव २ – LekhakOnline – Excellent Marathi Articles