जानकी…
आमच्याकडे कामाला असायची…
नव्हे नव्हे ती आमच्या घरचीच एक झाली होती…
तिचे सासरे, तिचा नवरा, मुलगा, मुलगी, सून अख्ख कुटुंबच आमच्याकडे कामाला…
तशी कोकणातली माणसं एकवचनीच..त्यामुळे सगळे जानकीच म्हणायचे…
आम्ही पोरं मात्र जानकी आजी म्हणायचो…
आमचे आजोबा गेल्यापासून ती आमच्याकडेच राहायची…
आजीला सोबत म्हणून…
मला सगळे सख्खे चुलत मिळून दहा – बारा काका आणि चार – पाच आत्या…
हळुहळू एकेकाची लग्न व्हायला लागली…
अमुक सून कुठली, तमुक जावई कुठला वगैरे ती आजीजवळ अगदी जातीनं चौकशी करत असे…
थोरली, मदारली आणि धाकली असे तिने सुनांचे तिच्या भाषेत वर्गीकरण केलेले…
आम्हां पोरांना ती रायवळ आंबा, करवंद,जांभळं,आणून देत असे…
कधी कधी तर ती आम्हाला दुकानावरून फापश्या (पेप्सीकोला) पण आणून द्यायची…
माझा धाकटा काका सोडून सगळे हूंबईत…
त्यामुळे घरात फक्त तिघेच..आजी, काका आणि जानकी आजी…
घरातल्या प्रत्येक वस्तूचा पत्ता जानकीला बरोब्बर माहिती…
सकाळी उठून पाणचुलीला विस्तव घालण्यापासून ते रात्रीच्या जेवणाची भांडी घासेपर्यंत बरीचशी कामं ती करायची…
विस्तव घातला की मग वाड्यात जाऊन शेण काढणं, गुरांना खायला घालणं ही ठरलेली कामे…
मग ती मशेरी लावून ओटीवर चहाची वाट बघत असे…
चहा पिऊन झाला की ती सगळ्यांचे कप पन्हळीवर धुवायला घेऊन जात असे…
आम्ही पोरं कधी तिकडे गेलो आणि गप्पा मारताना चहा प्यायला उशीर केला तर ती म्हणायची..’मला म्होप कामं हाईत..आधी कप देवा मला रिकामे करून..इसलायला..मंग तुमी गप्पा छाटत बसा…’
मग घरचा केर,अंगणातला केर, सारवण, कपडे धुणं अशी सगळी कामं…
मग ती गुरांशी जायची…
ती वाड्यात गेली की गुरं खुश…
आम्हाला ती फिरायला घेऊन जाणार ही गुरांना सुद्धा पक्की खात्री…
दुपारी आली की वाड्यात गुरं बांधून ती तिच्या घरी जेवायला जायची…
आमचा तीन वाजता चहा होतोय तोपर्यंत ही परत चहाला हजर…
मग संध्याकाळचे केर वारे…
दिवे लागले की आजीचा स्वयंपाक होईपर्यंत काकाशी गप्पा…
मग जेवण आणि भांडी घासणे…
हा दिनक्रम ठरलेला…
शेतीच्या सिझनल कामांमुळे थोडासा बदल व्हायचा…
कालांतराने आमची आजी गेली आणि काका एकटा पडला…
तेव्हाही तिने आमच्या घराची साथ सोडली नाही…
अगोदर आजीच्या सोबतीला आणि आता काकाच्या…
मग काकाचं लग्न ठरलं…
काकू घरात आली…
तिनेही जानकी आजीशी पटकन जुळवून घेतलं…
एकदा काकूने जानकीला केसांना लावायला शाम्पू दिला आणि ती शाम्पूचा फेस बघूनच घाबरली…
‘काय ता शम्पू..निसता फेश..मला नको ग परत देव…’
छातीत कफ झाल्यावर ती ‘कपक्ष’ झालाय असं म्हणायची…
तिला झोपताना टायगर बाम मात्र रोज लागायचा…
कोणी चिपळूणास जाताना दिसलं की..मला ‘बॉम’ घेऊन ये रं..असं सांगायची…
घराला तिची सवयच झालेली…
कालांतराने ती थकली…
मग फक्त सकाळचीच यायची काम करायला…
हळुहळू ती ही बंद झाली आणि घर सुन्न झालं…
तिची सर दुसऱ्या कोणालाच नाही…
मग मधून मधून काका काकूच घरी भेटायला जायचे…
बरं वाटायचं तिला…
सगळी चौकशी करायची..गुराढोरांपासून सगळ्यांची…
असच एकदा तिचा मुलगा सांगत आला..’आई बोलत न्हाय हाय सकालपासना..काय खात बी न्हाय…’
काका तिच्या घरी जाईपर्यंत सगळं संपलेलं…
जानकीला देवाने कधीच बोलावून घेतलेलं…
काकाच्या अंगावर चर्रकन काटा आला आणि तिचा तो आमच्या घरातला प्रेमळ वावर चटकन त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला…
आता आम्ही गावाला जातो..मजा करतो..पण जानकीची उणीव कायमच भासते..
आता आपण नेलेला टायगर ‘बॉम’ आपणच लावायचा आणि आपल्या चहाचा कप पण आपणच ‘इसलायचा’…………..
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
Chhan
🙏
अश्याच माझ्या सासरो बबिताई म्हणून कामाला होत्या,त्यांनी आमच्या अहोना 6 महिन्याचे होईपर्यंत व माझ्या मुलाला आंघोळ घातली आहे .अत्ता वयोमनानुसार बंद झाल्या यायच्या आम्ही गावाला गेलो की भेटून येतो ,खुप आनंद होतो त्यांना त्यंचा डोळ्यात दिसतो
🙏🙏👍
Hi , Ashwini
ह्या आजीला मी बहुतेक दोणोवलीला बघितले असावे .. मला अंधुक अंधुक आठवतंय ..
स्नेहा फडके रानडे