“ब्लॅकमेल”

सकाळी साडेनऊ.
आजी कुठेय ?
बसलीय तिच्या खोलीत.
मी जाऊ तिच्याशी सात आठ खेळायला ?
बिलकूल जायचं नाही.
आजीच्या खोलीत शिरशील तर तंगडी तोडून हातात देईन.
जा हाॅलमधे.
गुपचूप टीव्ही बघ.
आता वाजले की बारा…
दुपारी सव्वाबारा.
आई मला भूक लागली.
हातपाय धू आणि..
बस पानावर.
वाढते लगेच.
आजीला बोलवू जेवायला ?
नाऽऽही.
मी मगाशीच ताट ठेवून आलेय आजीच्या खोलीत.
तिचं ती जेवेल.
अगं पण…
तू आॅफीसला जातेस तेव्हा आजीच वाढते मला.
कधी कधी घास भरवते सुद्धा.
माझ्याशिवाय आजीला जेवणच जाणार नाही.
नसेल जात तर राहू दे.
राहील ऊपाशी.
दुपारी दोन.
आई, आजी रडतेय तिच्या खोलीत..
मी जाऊ तिच्या खोलीत ?
रोज दुपारी जेवण झाल्यावर तीच गोष्ट सांगते मला.
जाऊ ?
पियू , तुला एकदा सांगून समजत नाही ?
आभाळ कोसळलं तरी चालेल.
आजीच्या खोलीत जायचं नाही.
गोष्ट सांगते म्हणे..?
एवढी छोटीशी गोष्ट समजत नाही.
मी आहे ना ईथं.
आजी कशाला हवीय ?
दुपारी चार.
आई, आजीला चहाला बोलवू ?
नको…
तिचा चहा खोलीत पाठवलाय तिच्या.
अग पण तिचा चहा बिनसाखरेचा असतो ना ?
पियू , माहित्येय मला.
जास्त शहाणपणा करू नकोस.
गेली तेरा वर्ष डायबेटीस सांभाळतेय त्यांचा.
त्यांना काय आहे का त्याचं.
संध्याकाळी सहा.
पियू, देवापुढे दिवा लावलाय.
शुंभकरोती म्हण.
आई शुभंकरोती म्हणून झालं माझं.
आजीला नमस्कार करून येवू ?
काही गरज नाही..
देवाला केलास ना ?
आजीला पोचेल आपोआप.
रात्रीचे आठ.
आई , काय आहे जेवायला ?
मस्त झुणका आणि तांदळाची भाकरी.
आजीला बोलवू ?
नाही…
आपली जेवणं झाली की..
मी ताट देऊन येईन त्यांच्या खोलीत.
रमा , सकाळपासून बघतोय मी.
काय चालवलं आहेस तू?
आईशी आत्तापर्यंत अशी कधीच वागली नव्हतीस तू ?
समजतंय ना हे..?
मग समजून घे जरा.
अशी वागत्येय म्हणजे …
काहीतरी कारण असेलच ना..
तू मधे पडायचं नाहीस.
मी आणि माझी सासू.
आम्ही बघून घेऊ.
माधवा,
अन्नावरची वासनाच ऊडून गेलीय रे माझी.
काय गुन्हा केलाय रे मी ?
वाळीत टाकलंय जणू मला.
तुझी वाचा गेली की काय ?
तोंडही दाखवलं नाहीस आख्ख्या दिवसात.
बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस तू.
निर्लज्ज कोडगा झालायेस अगदी.
जड झालेय मी या घराला.
समजतंय मला सगळं.
आई,
जेवून घ्या.
थांबा मीच भरवते घास तुम्हाला.
खरंच समजत नाहीये का तुम्हाला..?
छोटीशी गोष्ट आहे.
कोरोनाची गोष्ट.
नाही समजली तर वाळीत टाकेल जग तुम्हाला.
साठी पार झालीय तुमची.
मला काय धाड भरलीय ?
काॅलनीतल्या काॅलनीत चक्कर मारून येते जरा.
इथे गर्दी नसतेच मुळी.
नकाहो असं ब्लॅकमेल करू आम्हाला.
कंटाळा आलाय आम्हालाही.
तुमचा नाही लाॅकडाऊनचा.
हव्या आहात तुम्ही आम्हाला.
आजचा दिवस क्वारन्टाईनचा ट्रेलर होता.
ट्रेलरलाच केवढ्या घाबरलात तुम्ही..
स्पष्टच बोलते.
वयाचा दाखला हा अनुभवाची समृध्दी देणारा असावा.
ईमोशनल ब्लॅकमेलर नको.
गुणाची गं पोर माझी.
नाही गो जाणार बाहेर.
ऊद्यापासून प्रभातफेरी बंद.
अग्गोबाई सासूबाई.
शाब्बास सूनबाई.
ईवलीशी गोष्ट.
कोरोनाची गोष्ट.
सूनबाईनं रंगवून सांगितली.
सासूबाईंना ऊशीरा का होईना..
मस्त समजली..
साठाऊत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.
शुभम् भवतु ||
…….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

4 thoughts on ““ब्लॅकमेल”

  • May 25, 2021 at 10:52 am
    Permalink

    खूप छान! वेगळीच कथा👌👌😊

    Reply
  • May 26, 2021 at 10:59 am
    Permalink

    Sorry for negative comment…पण गोष्टीत पण करोना नको…त्या सगळ्या पासून दूर जाण्यासाठी इथे वाचतो

    Reply
  • May 26, 2021 at 6:10 pm
    Permalink

    Vaccine n ghenarya , gharatil hatti jyeshthana asa samjavl pahije…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!