Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक

इम्रान हाश्मी आवडतो असे म्हणले की अजूनही बऱ्याच वेळी ऐकणाऱ्याची भुवई वर होते. त्याने सिरीयल किसर इमेजपासून फारकत घेऊनही बराच काळ झाला आहे. त्यानंतर त्याने एक से एक सरस भूमिकाही केल्या आहेत. पण त्याला ती इमेज चिकटलेली आहे हे खरं. त्याला तो स्वतः जबाबदारही आहे. एके काळी त्याने फक्त तेव्हढेच काम मनापासून केलेले आहे पडद्यावर.

मर्डरच्या आधीही त्याने बऱ्याच चित्रपटांमधून काम केले आहे. पण मर्डरमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. पडद्यावर बोल्ड सीन्स साठी प्रसिद्ध असलेल्या नायिकांची श्रेणी आपल्याला माहित आहे. त्यात गाजलेल्या भल्या भल्या अभिनेत्रींपासून पार मलायका अरोराची आयटम सॉंग्स पर्यंत लांबलचक यादी आहे. नायकांनी अशी दृश्ये दिली नाहीयेत असे नाहीये पण इम्रान हाश्मी सारखी सातत्याने दिलेली नसावीत. भट्ट फिल्म्सची इंग्रजीतले चित्रपट टाकोटाक हिंदीत आणायची हातोटी जेव्हा उत्तम चालत होती तेव्हाच काळ. डीएन लेन आणि रिचर्ड गेअरचा अनफेथफुल आला आणि चांगलाच गाजला. त्याची हिंदी आवृत्ती मर्डर. नेहमीप्रमाणे त्याचे यशस्वी हिंदीकरण. पतिनिष्ठ असलेली पण त्याच्या दुर्लक्षामुळे कंटाळलेली बायको, तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर, दोघांचे अनैतिक संबंध, मग तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होणे, तिने नवऱ्याला सांगणे, त्याचे दुखावले जाणे आणि अंत मे त्याने मोठ्या मनाने तिला माफ करून घरादाराची अब्रू राखणे. भट्ट कॅम्पने या थीम वर बरेच चित्रपट केलेले आहेत. मर्डरमध्ये कथेच्या दृष्टीने काहीही नवीन नव्हते. नवीन होता बोल्ड इम्रान हाश्मी आणि त्याला साथ देणारी मल्लिका शेरावत. मर्डर हा बराचसा सॉफ्ट पॉर्न कॅटेगरी मध्ये येऊ शकतो इतका या दोघांनी स्क्रीनवर उतमात घातलेला आहे. मर्डरची खरी सशक्त बाजू होती गाणी. आजही भिगे होठ तेरे आणि कहो ना कहो अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असेल.

इम्रानचे मर्डर नंतरचे बरेचसे चित्रपट याच पठडीतले होते. त्यातले अक्सर, जहर, तुमस नही देखा, आशिक बनाया आपने हे चांगल्यापैकी चालले. हिट नाही झाले पण पडलेही नाहीत. या सगळ्या चित्रपटांमध्ये इम्रान हाश्मी हा एक समान धागा आणि गाणी हा दुसरा. इम्रानच्या सगळ्या चित्रपटांची गाणी खतरनाक आहेत. मग ते नदीम श्रवण यांचे मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक असेल, ये धुआ धुआ सा रेहने दो असेल, हिमेशने नाकात गायलेले आशिक बनाया आपने असेल किंवा आतिफ अस्लम चे वो लम्हे वो बाते कोई ना जाने असेल. अगदी त्याच्या अगदी अलीकडच्या चित्रपटांपर्यंत उत्तम संगीताची ही परंपरा चालू आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

इम्रानच्या उदयाचा काळ लक्षात घेण्यासारखा आहे. नव्वदीच्या दशकातून प्रेक्षक बाहेर पडत होता. नदीम श्रवण, आनंद मिलिंद अशा संगीतकारांच्या कामात तोचतोचपणा जाणवायला लागला होता. अनिल कपूर माधुरी दीक्षित पासून पार सलमान पर्यंत सगळे चेहरे बऱ्यापैकी रोजचे झाले होते. त्याच काही वर्षांमध्ये इम्रान हाश्मी, तनुश्री दत्ता, सोनू सूद, शमिता शेट्टी, मल्लिका शेरावत, कुणाल खेमू, उदिता गोस्वामी असे अनेक नवे चेहरे आले. यातले इम्रान हाश्मी, सोनू सूद आणि बऱ्यापैकी कुणाल खेमू टिकले. बाकीचे लयाला गेले.

आणि इथे मग इम्रान हाश्मीच्या करियरचा किंवा चित्रपटांचा बदलता सांधा लक्षात घ्यावा लागतो.

साधारण आवारापन आला आणि नेहमीचाच इम्रान बघण्याच्या अपेक्षेने गेलेल्या प्रेक्षकाला धक्का बसला. तोपर्यंत इम्रानचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला होता. अगदी स्टाईल आयकॉन वगैरे नसला तरी त्याच्या प्रेक्षकाला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे हे त्याला पक्के ठाऊक होते. बेदरकारीने हिरॉईनला जाळ्यात अडकवणे, तिचा पुरेपूर फायदा घेणे, तिला नंतर त्रास देणे अशी कामे करण्याचा त्यालाच बहुतेक कंटाळा आला असावा. असेही म्हणले जाते की या सुमारास त्याचे परवीन शहानीशी लग्न झाले. तिला इम्रानचा ऑन स्क्रीन अवतार नापसंत होता. त्यामुळेही त्याने ही इमेज बदलायचा निर्णय घेतला असावा. कारणे काही असतील बदल घडला हे नक्की.

हिंदी चित्रपटसृष्टीत असेही कलाकार आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला बदलायचा प्रयत्न केला. इम्रान हाश्मी अशा मोजक्या लोकांपैकी आहे. तो अत्यंत सिन्सिअर म्हणून ओळखला जातो. त्याला आपल्या मर्यादा माहित आहेत. जे काम दिलय ते तो मनापासून करतो. आवारापन हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. अजूनही भट्ट कॅम्पच्याच चित्रपटांमधून तो काम करत असला तरी आता त्याच्या भूमिका निवडण्यामध्ये बरेच वैविध्य होते. जन्नतने त्याच्या कामाला दिशा दिली. के के, प्रीतम आणि इम्रान हाश्मी हे एक उत्तम समीकरण आहे. गँगस्टर, जन्नत ही त्या समीकरणांची यशस्वी उदाहरणे. इम्रान हाश्मीने हिमेशचा आवाज अनेक गाण्यात वापरला आहे. ती वर्षेही हिमेशची होती. आधी संगीतकार म्हणून आणि नंतर गायक म्हणून हिमेशने लोक कंटाळेपर्यंत गाणी केलेली आहेत. पण सोनिये गाणारा के के आणि इम्रान, तू ही मेरी शब है सुबह है गाणारा के के आणि इम्रान आणि जरा सी दिल मे दे जगाह तू गाणारा के के आणि इम्रान हे फार भन्नाट कॉम्बिनेशन होते. जन्नतने इम्रानला अभिनेता म्हणून हात दिला. त्यानंतर आतापर्यंत मर्डर २, डर्टी पिक्चर, शांघाय, राज २ असे अनेक चित्रपट केले आहेत.

आपले काम आणि प्रसिद्धी यापासून आपल्या घराला कटाक्षाने दूर ठेवणाऱ्या इम्रानची मधली काही वर्षे प्रचंड ताणाची गेलेली आहेत. त्याचा मुलगा अवघा चार वर्षांचा असताना त्याला कँसर डायग्नॉस झाला. इम्रान आणि त्याच्या बायकोने जिद्दीने, सर्वस्व पणाला लावून त्याला त्यातून बाहेर काढले आहे. आयुष्याचा झगडा माणसाला खूप काही शिकवतो. सुरुवातीची बेफिकिरी त्याच्या भूमिकांमधूनही दिसते. पण आताशा तो गंभीर झालाय हे कळते. त्याच्या निवडीत चोखंदळपणा आला आहे. तो स्वतःला चांगला अभिनेता म्हणून सिद्ध करायच्या धडपडीत आहे. त्याच्या अभिनयात आणि कामात फरक पडलेला दिसतोय आता आता. कदाचित ज्या मुलासाठी तो इतका लढला झगडला त्याच्या नजरेत आपली काही चांगली प्रतिमा असावी असेही त्याला वाटले असेल. त्याची कारणे जी काही असतील ती पण त्याच्यातला बदल सुखावह आहे हे नक्की. डर्टी पिक्चरमध्ये सिल्कच्या प्रेमात पडलेला इम्रान तिच्या घरी जातो आणि तिला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तो सिन जितका विद्या बालनचा आहे तितकाच तो इम्रानचाही आहे. जिंदगीमे तूने कोई सिधा काम किया है कभी असे म्हणताना तो तिचे निरीक्षण करत राहतो. तिच्या बोलण्याची टर टिंगल उडवत नाही. कमालीच्या गांभीर्याने तिचे बोलणं ऐकणारा आणि तिला समजून घेणारा इम्रान पाहताना छान वाटते. डर्टी पिक्चर हा सर्वस्वी विद्या बालनचा चित्रपट असला तरी इम्रानला विसरता येत नाही. मर्डर २ मध्ये जॅकलिनच्या जीवाला धोका आहे हे कळल्यावर आकाश पाताळ एक करणारा इम्रान हा मर्डर १ मध्ये मल्लिका बरोबर बेडसीन देणाऱ्या इम्रानच्या जवळपास १८० अंश विरुद्ध आहे.

अझहर याच गंभीर चित्रपटांच्या मालिकेतला. अझहरची पटकथा मुळातूनच गंडलेली होती. इम्रानचा प्रयत्न मात्र नक्कीच छान होता. त्याने काम केलेल्या माझ्या आवडत्या चित्रपटांमध्ये वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईचा उल्लेख केला नाही तर चालणार नाही. पी लू सारखे गाणे, अजय देवगण सारख्या अभिनेत्यासमोर त्याचे ताकदीने उभे राहणे, मलिकला गोळ्या घालताना त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा भावना बाजूला सारून येणारा एक बेरड भाव आणि आपल्याला काय हवय हे पक्के ठाऊक असणारा त्याचा चित्रपटातला वावर. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई इम्रानच्या कारकिर्दीतला मानाचा चित्रपट आहे.

भट्ट कंपनीचा इंग्रजी चित्रपटांचे हिंदीकरण फॉर्म्युला कधीच बंद पडला आहे. आता भट्ट कंपनीची पुढची पिढी चित्रपटात उतरली आहे आणि यशस्वीही आहे. इम्रान अजूनही एखाद्या चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. उशिरा का होईना पण त्याच्यातल्या चांगल्या अभिनेत्याला त्याने मनापासून न्याय देण्याचा प्रयत्न केला हे काय कमी आहे. तो दिसायला देखणा वगैरे मुळीच नाही, स्मार्ट आहे पण तितकेच आहे. त्यामुळे त्याला हिरोच्या भूमिका आता कितपत शोभतील हाही प्रश्नच आहे. आणि तरीही त्याला स्वतःला सिद्ध करता येईल अशा भूमिका अजून मिळाव्यात असे नक्की वाटते.

तेरे वास्ते मेरा इश्क सुफियाना ….  त्याला म्हणायला मिळावे आणि त्याचे काम बघून आपल्यालाही.

©प्राजक्ता काणेगावकर

Image by Luisella Planeta Leoni from Pixabay 

Prajakta Kanegaonkar

Prajakta Kanegaonkar

मॅनेजमेंटची प्रोफेसर म्हणून नोकरी. खाद्यपदार्थांचा स्वतःचा व्यवसाय. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या घटनांकडे चौकस कुतूहलाने बघणारी, लिखाणातून व्यक्त होणारी नजर. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व पण अभिव्यक्ती मराठीवरच्या प्रेमामुळे मराठीतूनच. सर्व प्रकारचे लिखाण करायला आवडते.

2 thoughts on “Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक

  • May 28, 2021 at 6:48 pm
    Permalink

    मस्त…इम्रान आवडत नाही फारसा पण गाणी मात्र मस्त असतात आणि once upon ,dirty picture मध्ये मात्र आवडला होता..तुमचा लेख वाचून इम्रान बद्दल चा दृष्टिकोन बदलला

    Reply
  • May 28, 2021 at 7:10 pm
    Permalink

    छान लिहिलं आहे…सगळी गाणी आवडीची❤️

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!