सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५

आधीच्या भागाची लिंक- सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग 4

गाडी सुरैयाच्या घराच्या दिशेने जात होती तशी दोघींच्याही मनात हुरहूर वाढत होती..आम्ही पोहचायच्या आधी प्रकाश तिथे पोहचलेला नसावा व ऋतू सुखरूप असावी हीच प्रार्थना देवाला करत होते. गाडी एका चाळीजवळ थांबली. मी आणि सुरैया उतरून झपाझप पावलं टाकत तिच्या घरापाशी पोहचलो. बघितलं तर घराला बाहेरून कडी होती…सुरैयाच्या म्हणण्याप्रमाणे रोज तर ऋतू ती यायच्या आधी शाळेतून येऊन बाजूच्या काकी कडून चावी घेऊन घरात खेळत बसलेली असते. आज कशी नाही??? शत्रुच्याही मनात जे येत नसेल तसे विचार त्यावेळी डोक्यात येत होते…सुरभीच्या डोळ्यात तर पाणीच उभं राहिलं. तिला सावरत आजूबाजूला कुठे गेली का ते पाहायला सांगितलं पण कोणाच्याच घरी ऋतू नव्हती.

तिला प्रकाशने तर…..एक मन हा विचार करायला नको म्हणत होत तर दुसरीकडे परिस्थिती हाच विचार करायला भाग पाडत होती. सुरभी दरवाजात बसूनच रडायला लागली तोच आई अशी हाक तिला ऐकू आली. अचानक आलेल्या हाकेने सुरभी उभं राहून इकडे तिकडे बघू लागली तर समोरून ऋतू धावत येऊन तिच्या कुशीत शिरली. किती आश्वस्त ठिकाण आईची कुशी….सुरभीने तिचे खूप पापे घेतले आणि विचारलं कुठे होतीस??

ऋतुही आईचे डोळे पुसत म्हणाली अग तू रडतेस का?? मी त्या काकांच्या दुकानात गेलेले खाऊ आणायला . तुला काय वाटलं मी तुला सोडून…

ऋतुच वाक्यही पूर्ण न होऊ देता तिच्या ओठांवर हात ठेवत काही न बोलता सुरभीने तिला घट्ट मिठीत घेतलं. ऋतू दुरावेल की काय या भीतीने तिच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. तिला भानावर आणत मी लवकरात लवकर इथून निघुया असे तिला सांगितले. तस तिने घरातील पैसे,सोने,थोडे कपडे व काही महत्वाच्या वस्तू बॅगेत भरल्या व आम्ही तिथून तडक माझ्या घरी निघालो. रस्त्यात आपण कुठे चाललोय..का चाललोय असे ऋतूचे न संपणारे प्रश्न चालूच होते. आता इतके प्रश्न पडणाऱ्या ऋतूला तिच्या आईचा भुतकाळ कसा सांगावा व तिला तो कळून ती सुरभीला स्वीकारेल का असे बरेच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात उमटत होते. विचारातच घराजवळ पोहचलो. दोघींना आत घेऊन जाऊन त्यांना fresh व्हायला पाठवलं.. काही वेळाने जेवण आटोपली. आता ऋतुशी बोलण्याची वेळ आली होती. सुरभी प्रचंड तणावाखाली जाणवत होती…का नसावी?? तिच्याबाबतीतलं इतकं मोठं सत्य आज ती तिच्या मुलीला सांगणार होती…ते ऐकून ती कशी प्रतिक्रिया देईल याचा काहीच अंदाज नव्हता पण तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला…तिनेही सगळा आत्मविश्वास गोळा करून बोलण्याची तयारी केली.

रात्रीच्या  काळोखात चांदण्याच्या मंद प्रकाशात घराबाहेरच्या कट्ट्यावर ऋतू आणि सुरभी बसून बोलत होत्या….सुरभीच्या प्रत्येक शब्दासोबत अश्रुधारा वाहत होत्या…ऋतूच्या त्या कोवळ्या वयाला सुरभीच दाहक सत्य कितपत कळलं कोणास ठाऊक पण इवलेसे हात सुरभीच्या डोळ्यांवरून फिरवत ‘मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आई’ म्हणत ती तिला आश्वस्त करत होती. हे दृश्य पाहून डोळे भरून आले. आज आपल्या आईला समजून घेणारी ऋतू उद्या अचानक तिचा बाबा समोर आल्यावर हळवी होईल का?? इतकी वर्षे बाबाच्या प्रेमाला आसुसलेल तिचं मन त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का? आई की बाबा अशी द्विधा मनःस्थिती या कोवळ्या वयात तिच्या वर येऊन पडली…हा आघात ती कसा पचवू शकेल?? ऋतू बाबाच्या बोलण्यात अडकून त्याच्याच सोबत गेली तर?  आजवर प्रत्येक टप्प्यावर परीक्षा देत इथवर आलेल्या सुरभीच काय होईल की तिला पुन्हा कुंटन खाण्यात जावं लागेल???

रात्रीच्या गर्द अंधारात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या तेजोमय प्रकाशात लख्ख दिसणार होती…एकीकडे उदास होऊन तर एकीकडे उत्सुक होऊन मन उद्याची वाट आतुरतेने पाहत होतं.

सकाळी नेहमीच्या वेळेत सगळं आवरून फॅक्टरी मध्ये जायची तयारी केली. खूप वर्षांनी आपलीच कोणतीतरी परीक्षा असल्याचा तो दिवस भासत होता. ऋतू,सुरभी आणि मी ही देवाला नमस्कार करून आज जे घडेल ते चांगलंच होउदे अशी प्रार्थना करून घराबाहेर पडलो. ठरल्याप्रमाणे ऋतू माझ्या सोबत गाडीतून येणार होती व सुरभी मागून बसने. प्रकाशला कोणताही संशय यायला नको व सुरभीला माझ्या सोबत बघून त्याने पळ काढायला नको म्हणून हे प्लॅनिंग केलं होतं. आम्ही वेळेच्या जरा आधीच फॅक्टरी मध्ये जाऊन पोहचलो. काही गोष्टींची तयारी तिथेही केली.

सुरभी रोजच्या वेळेवर गेट मधून आत आली आणि आमच्या अपेक्षेप्रमाणेच प्रकाश तिच्यासमोर येऊन हजर झाला. सुरभी दचकली पण सावरली. तिला सांगितल्याप्रमाणे ती चालत चालत पुढे आली..तिच्या मागून तोही आला. बाजूलाच एक शेड होत जिथे मी आणि ऋतू एका कोपऱ्यात बसलो होतो जिथून सुरभी आणि प्रकाश आम्हाला दिसत होते.. ते काय बोलतील ते ऐकू येणार होत. त्याच ठिकाणी एका माणसाला या दोघांचं संभाषण रेकॉर्डिंग  करायलाही बसवलं होतं. प्रकाशने नेहमीसारखी तिच्या सुरभीसोबत अरेरावीची भाषा सुरू केली.

“सुरैया तुला बऱ्या बोलानं  सांगतोय माझ्यासोबत चल नाहीतर तुझं काय खर नाय..माझ्या पायावर विळा मारून पळून आली होतीस…तुला काय वाटलं की कायमची माझ्या तावडीतून सुटशील?? त्या दिवशीच शपथ घेतली तुला पाताळातून पण हुडकायची आणि तुझी जागा दाखवायचीच तुला. वाटलं नव्हतं ग एकटी राहून एवढी प्रगती करशील…मला तर वाटलेलं गेली असशील पुन्हा धंदाच करायला…त्याशिवाय तुला माहीतच काय होत नाहीतर तुला…मानलं पण आपण तुला…पोरीसाठी तू परत तो रस्ता पकडला नसशील पण सगळं तुला वाटत तस सोप्प नसत ग…लय मजा केलीस आजवर मला सोडून…आता निघायचं…माझ्यासोबत यायचं..पोरीला पण घ्यायचं आणि जे मी सांगतो तेच करायचं. हे सभ्य सरळ बाईच नाटक बंद म्हणजे बंदच.”

सुरभी – मी तुला आधीही सांगितलं आणि आताही सांगते मी कुठेही येणार नाही तुझ्या सोबत. निघून जा इथून.

(सुरभीला जितकं बोलायला सांगितलं होतं तेव्हढंच बोलत होती)

प्रकाश – (कुत्सित हसत) माझ्या सोबत येणार नाहीस?? मग कुठे जाशील ग आणि मी तुला अस सोडेन वाटलंच कस तुला?? तू नाही आलीस तर मी काय करेन तुला चांगलंच माहितीये….तुझ्या पोरीला तुझी हकीगत सांगेन आणि तिलाच सोबत घेऊन जाईन माझ्या..तू नाही तर तुझी पोरगी तर माझ्या कामी येईल..ती मला पैसे कमवून देईल.

सुरभी – बाप आहेस की गिधाड?? माझीच फक्त नाही तर ती तुझी पोरगी आहे नालायक माणसा. मला त्या दलदलीतून बाहेर काढलंस तेव्हा मी तुला देवमाणूस मानलं होतं पण आज तू स्वतःच्या पोरीला तिथेच न्यायची भाषा करतोयस.. हैवान आहेस तू हैवान. जा काय करायचं ते कर..मी नाही घाबरत या हैवानाला.

असं म्हणत सुरभी तिथून पुढे निघाली तोच सुडाने पेटलेल्या प्रकाशने तिचा हात खेचुन जोरात मुरगळला. “बऱ्या बोलान चल नाहीतर तुझा जीव घेऊन पोरीला उचलून घेऊन जाईन” प्रकाशची ही धमकी ऐकून आईची ती अवस्था न बघवलेली ऋतू माझा हात सोडून “आई” ओरडत सरळ बाहेर पळाली.

तिला अचानक समोर बघून प्रकाश आधी गडबडला पण नंतर पुन्हा जोरजोराने हसायला लागला.

प्रकाश – “वा..आज तर आपली छकुली पण आयतीच सापडली की”

(ऋतूच्या गालावरून हात फिरवत) बेटा मी तुझा बाबा..आईने तुला माझ्याबद्दल नसेल सांगितलं पण मी आता आलोय परत तुला न्यायला…तुझ्या आईला पण न्यायला पण ती नाही म्हणते. तू समजाव बाळ तिला आता…आपण तिघेही मस्त राहू हा…येशील ना माझ्यासोबत?”

ऋतू  प्रकाशचा हात झिडकारत आईकडे पळत गेली.

ऋतू – कोण तुम्ही? मला नाही यायचं तुमच्या सोबत आणि आईलाही नाही यायचं. तुम्ही जा ईथुन. आणि परत माझ्या आईला त्रास द्यायला यायचं नाही. जा.

प्रकाश – मी बाब आहे ग तुझा…तुझ्या आईने मला धोका देऊन पळवून आणलं तुला माझ्या पासून. जिला तू आई म्हणतेस ती चांगली बाई नाही ग..ती घाणेरडी बाई आहे….तिने काय काय केलय तुला माहीत नाही. तुला पण उद्या ती तसंच करेल…म्हणून मी तुला घ्यायला आलोय.

ऋतू – माझ्या आईबद्दल एकही वाईट शब्द बोलायचा नाही. ती काय होती मला सगळं माहीत आहे. याआधी ती बुधवार पेठेत राहायची…स्वतःच पोट भरण्यासाठी तिथल्या बायका धंदा करतात तेच आईही करत होती. तुम्ही तिला तिथून घेऊन आला..स्वप्न दाखवली मग मी झाली तस सगळं बदललं. तुम्ही आईला फसवलंत.. तुम्ही तिला धोका दिला म्हणून ती खूप दुर निघून  आली आणि आता माझ भविष्य चांगलं करण्यासाठी ती दिवस रात्र काम करते. तुम्ही घ्यायला आलाय पण परत आम्हाला नेऊन बुधवार पेठेतच सोडाल…जिथे कोणतीच बाई मुलगी सुखात नाही राहू शकत. आम्हाला तुमच्या सोबत यायचं नाही एकदा सांगितलं तर कळत नाही का??  जा इथून तुम्ही.

सुरभी अभिमानाने ऋतुकडे पाहत होती.

प्रकाश ऋतुच बोलणं ऐकून चरकला होता पण तो नमणारा नव्हता. यावेळी त्याने ऋतूचा हात पकडून जोरात स्वतःकडे खेचलं…तिला आवळून धरत सुरभीला म्हणाला,

प्रकाश – पोरीला तर तू चांगलंच तयार केलंस..माझ्या भीतीने का होईना पण तिला तू तुझं सत्य सांगितलंयस तर…एकंदरीत बरच झालं…आता बुधवार पेठ,वेश्या याच्याशी तिची ओळख झालीच मग माझं काम सोप्प झालं. डायरेक्ट नेऊन तिला तिथेच ठेवतो पुढचं जस तू निभावलस तस ती पण निभावेल. ही धंदा करेल आणि हिच्या जीवावर माझं भविष्य सुखकर होईल.

ऋतू प्रकाशच्या हातात कळवळत होती.. तिची कळवळ बघून आतापर्यंत शांत बसलेली सुरभी चिडली..तिची नजर इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागली…बाजूला पडलेलं लाकूड उचलून ती प्रकाशवर वार करणार तितक्यात मी आणि माझी मैत्रीण जान्हवी पोलीस इन्स्पेक्टर बाहेर आलो.  मी सुरभीच्या हातातून लाकूड काढून घेतलं. जान्हवीला पोलीस इन्स्पेक्टरच्या वेशात बघून प्रकाश चांगलाच घाबरला…ऋतूला त्याने लगेच सोडून दिलं व तिथून धूम ठोकायच्या तयारीत होता तेव्हाच फॅक्टरी मधील बाकीच्या बायका त्याच्या भोवती घोळका घालून जमा झाल्या. सुरभीने ऋतूला स्वतःजवळ घेऊन तिचे डोळे पुसले व म्हणाली,

“आपण कुठे जायचे नाही बाळा….स्वतःच्या पोरीलाच बाजारात विकायला निघालेला हा नालायक माणूस, नराधम आता जेलमध्ये जाणार आहे.”

प्रकाशने सुरभीला दिलेल्या धमक्या,तिच्यावर केलेला मारहाणीचा प्रयत्न, ऋतू आणि तिला  देहविक्रीसाठी तयार होण्यासाठी केलेली जबरदस्ती सगळंच मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. ते पुरावे घेऊन जान्हवी प्रकाशला अटक करून घेऊन गेली.

सुरभीने इकडे अखेर सुटकेचा निःश्वास सोडला. एवढ्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढलं म्हणून माझे आभारही मानले. ऋतुही आईला कवटाळत मला गोड आवाजात thank u म्हणाली. सुरभीच्या डोळ्यात नव्याने जिंकण्याची धमक आणि ऋतूच्या डोळ्यात सुंदर,सुरक्षित भविष्याची स्वप्नं दिसत होती.

तिचा तो निरागस चेहरा पाहून तीच ते निष्पाप हसू कुंटखाण्यातील अंधारात मिटून जाण्यापासून वाचलं म्हणून समाधान वाटलं पण अशा कितीतरी सुरैया असतील ज्या सुरभी नाही होऊ शकत…त्यांच्याही पदरी अशी ऋतू असेल तर तिलाही त्या अंधारातून बाहेर नाहीत काढू शकत. यामागे आपलीच समाजव्यवस्था, पुरुषसत्ताक समाज, मुलीला गर्भातच विकणारा बाप…तिची विक्री करणारा नीच दलाल…तिच्या देहविक्रीवर हा बाजार वाढवणाऱ्या स्वार्थी बायका…माणुसकीला, स्त्रीजन्माला काळीमा फासणारे हजारो हात आहेत जे लाखो करोडो सुरैया जन्माला घालतात फक्त आणि फक्त उपभोगासाठी.

……………………

सुरैया या माझ्या कथेतील वेश्या जीवनातील स्त्रीच्या घटना सत्य घटनेवर आधारित आहेत ज्या मी कथा स्वरूपात तुमच्या समोर मांडल्या. एकीकडे आपल्या मुलीसाठी या काळ्या जगातून बाहेर पडून सामान्य जगात लढणाऱ्या स्त्रीचं दर्शन घडतं तर दुसरीकडे काही पैश्यांसाठी मुलीचा चेहराही न पाहता…तिची जगात यायची वाटही न पाहता गर्भातच तिची विक्री करणाऱ्या बापासारखं भयानक वास्तवही पाहिलं. मुली वाचवा मुली शिकवा हे वाक्य जगवणाऱ्या जगात हे भयाण वास्तव दिवसा ढवळ्या चालू राहतं.. रोज कितीतरी सुरैया जन्मास येतात पण याच हीन समाजामुळे प्रत्येक सुरैयाला सुरभी नाही होता येत हेही कटू सत्य आहे.

©सरिता सावंत भोसले

Image by Pexels from Pixabay 

Sarita Sawant

Sarita Sawant

मी By Profession सॉफ्टवेअर इंजिनिअर असले तरीही मनापासून लिखाणातच रमते. कथा,कविता,चारोळी,लेख हे मराठी साहित्य लिहायला मला आवडते. स्त्री विषयक व सामाजिक विषयांवर लेखन करणे मनाला जास्त भावते. आजपर्यंत बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लेखन केले असून पुण्यनगरी वृत्तपत्रातही माझे स्त्रीविषयक लेख वुमनिया सत्रातुन छापून आले आहेत. मन:पटलावर जे कोरलं जात ते व स्त्रीमनाच्या भावना माझ्या लेखणीतुन उमटतात बस्स इतकंच. माझ्या लिखाणातून मी मलाच गवसते.

2 thoughts on “सुरैया (असामान्य जगातील स्रीअस्तित्वाचा लढा)- भाग ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!