घातक हिरे- भाग1
रोमा घाईघाईने एलिट एम्पायर मधून बाहेर पडली . उद्याच्या प्रेझेंटेशन ची तयारी करायला रात्रीचे साडे दहा वाजले होते . त्यात नेमकी आज कार आणली नव्हती .
टॅक्सी करावी म्हणून ती मुख्य रस्त्यावर आली . अजूनही दिवस असल्या सारखी वर्दळ पाहून तिला हसू आले . ‘मुंबई चोवीस तास जागीच असते ‘ हे जय चे वाक्य आठवले तिला . जय होता म्हणून इथे सोपं गेलं तिला , नाहीतर दिल्लीहून आलेल्या मुलीला इथे इतक्या लवकर रुळणे सोपे नाही . ती विचार करत असतांनाच एक टॅक्सी येतांना दिसली .
तिने अधिरपणे हात दाखवला . टॅक्सी वेगात पुढे गेली , काही मीटर वर थांबली , आणि वापस मागे आली .
” किधर जाना है ? ”
” माटुंगा ”
लांब अंतराचे भाडे मिळाले म्हणून तो तयार झाला .
रोमा ने खांद्यावरची बॅग काढून आरामात बसत मागे मान टेकवली . तेव्हा तिच्या लक्षात आले की ती फार थकलीये . इतक्यात जोरात गचका बसला , ती दणकून समोरच्या सीट वर आदळली . टॅक्सी ने एका कार ला ठोकले होते . कारवाला संतापाने बाहेर
आला . टॅक्सी ड्रायव्हर चा मुळीच मूड नव्हता भांडण्याचा . त्याने आधीच ओरडून माफी मागितली .
कार चा मागचा लाईट फुटला होता .
” माफ करना साब , मै आपक नुकसान भर के देता हुं ”
” तुला माहितेय का कितीचा आहे तो ‘लॅम्प ‘ ? ”
ड्रायव्हर ने शांतपणे पाच हजार काढून दिले , आणि कारवाला खूष होऊन निघून गेला . रोमाला आश्चर्य वाटले .
” त्याने न मागताच पाच हजार देऊन टाकले ? ” तिने न राहवून विचारले .
” पैशा पेक्षा कधी कधी वेळेला महत्व असते मॅडम ! जाऊ द्या , तुम्हाला आणखी उशीर झाला असता .”
” ओह , थँक्स . ” ती रात्री बारा वाजता तिच्या फ्लॅटवर पोहोचली .
सकाळी उठून लवकर आवरून ती पुन्हा ऑफिस मध्ये पोहोचली . साधारण अकरा वाजता वर्मा साहेबांचा निरोप आला . तिला केबिन मध्ये बोलावले होते .
” येस सर ? ”
” रोमा , ये . अग , काय केलंस बाई , पोलीस येताएत तुला भेटायला . ”
” मला ? …अन ..पोलीस ? ….
हा s s काल मी बसलेल्या टॅक्सी ने एका कारला ठोकलं होतं ! ” ती हसली .
” इथे ऑफिस मध्ये नको . खाली कँटीन मधेच भेट तू त्यांना . उगाच
अख्ख्या बिल्डिंग मध्ये चर्चा ! ”
” हो सर , मीच जाते खाली . ”
…… …. ” तर …टॅक्सी ड्रायव्हर ने चक्क पाच हजार दिले ? तुम्ही मोजले ? आणि तुम्हला आश्चर्य नाही वाटलं ? ” इन्स्पेक्टर रुद्रनी ने तिचे म्हणणे ऐकून खोचक पणे विचारलं .
” सर , त्याने माझ्या समोर मोजून दिले . पण हे प्रकरण बाहेरच मिटलं होतं , तुमच्यापर्यंत कसं आलं ? ”
इन्स्पेक्टर रुद्र तिच्याकडे रोखून बघत म्हणाला , ” कारण त्या टॅक्सी मध्ये , म्हणजे व्हॅन मध्ये ‘ डेड बॉडी ‘ होती . ”
तिच्या हातातून चमचा गळून पडला .
कॉफी चा कप खाली ठेवत ती म्हणाली , ” म्हणजे ? मी टॅक्सी मध्ये बसले होते …तेव्हा ….देखील ..” त्या विचाराने तीच्या अंगावर काटा आला .
” हो !! ”
” आता मला सविस्तर नीट सगळे सांगा . ”
” रात्री दहा वाजता ……..
तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला .
” टॅक्सी चे भाडे तुम्ही …..
” रोख रक्कम दिली सर . तुम्हाला कसे कळाले की मी त्या व्हॅन मध्ये होते ? ”
रुद्र ने तिला तिचा कंपनी गेटपास दाखवला , जो गाड़ीत पडला होता .
त्याने तिला ड्रायव्हर बद्दल अनेक प्रश्न विचारले . रोमाने शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली .
रुद्र एक तरुण तगडा पोलीस ऑफिसर , प्रसंगी मवाळ आणि गरज पडली तर तितकाच जहाल !
पुन्हा मदत लागेल तेव्हा भेटूच असे सांगून तो गेला . रोमा त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत तिथेच बसून होती .
********* संध्याकाळी मरिन ड्राईव वर रोमा जय सोबत बसली होती . मनात चलबिचल असली की ती नेहमी जय जवळ मन मोकळे करत असे . तिथे एक चणे वाला आल्याने त्याला पैसे देण्यासाठी तिने काही रक्कम पर्स मधून काढली . वीस रुपयाची नोट चणे वाल्याला दिली , आणि हातातील दहा रुपयाचे नाणे उलट सुलट करून बघतच राहिली .
” काय झालं रोमा ? ”
” जय , हे बघ हे नाणं ! ”
जय डोळे फाडून बघतच राहिला .
******* इं . रुद्रने ते नाणं बारीक चिमट्या ने प्लास्टिक पिशवीत टाकले .
” खूप छान झाले मॅडम , हे नाणे तुम्ही आणून दिलेत . ह्याला लागलेले रक्त नक्कीच त्या मृत व्यक्तीचे असणार . आता तुमची पूर्ण पर्स मला तपासावी लागेल . कदाचित आणखी काही धागा मिळेल . ”
” मी टॅक्सीत बसले , आणि पर्स मधून हे नाणे खाली पडले . गाडीत खूपच कमी उजेड होता , त्यामुळे तिथे रक्त असेल , ते ह्याला लागले असेल असे कळालेच नाही . ”
इं . रुद्रने तिची पर्स पूर्ण उलटी करून एकेक वस्तू बारकाईने तपासली .
नंतर ड्रावर मधून एक फोटो काढून तिच्या समोर धरला .
” हे नीट पहा , हाच ना तो टॅक्सी ड्रायव्हर ? ”
तिने नीट निरखून पाहिले .
” नाही सर , हा तो नाही . ”
” माहीत होतंच , कारण ती व्हॅन म्हणजे टॅक्सी , ऍक्सीडेंट च्या दिवशी संध्याकाळीच चोरीला गेली होती . ”
” बापरे !! म्हणजे मी नेमकी कोणाच्या गाडीत गेले त्या दिवशी ? ”
” ही गाडी रमेश नाईक नावाच्या माणसाची आहे , जो स्वतःच ती चालवतो . त्या दिवशी तो प्रवासी घेऊन बाजारपेठेत गेला होता . प्रवासी उतरल्यावर चहा घेण्यासाठी थांबला . येऊन बघतो तो गाडी गायब ! …. …पण रोमा , मला एक गोष्टीचे खूप आश्चर्य वाटतंय ! डेड बॉडी गाडीत असतानाही त्या ड्रायव्हर ने तुम्हाला आत
घेतलच कसं ! तशा अवस्थेतही तुमच्या सहाशे रुपये भाड्याची त्याला कशी काय भुरळ पडली . ”
” सर , मी कुठून फसले ह्यात . ” तिच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती .
” काळजी करू नका मिस रोमा . एक सांगा , …त्या दिवशी ऍक्सीडेंट झाला तेव्हा गर्दी जमली असेल . बघे लोक थांबले असतीलच ………”
” हो , काही जण थांबले होते , आणि लगेच पुढे निघून पण गेले .एका तरुणाने तर मोबाइलवर फोटोही काढले . ” हे बोलणे ऐकून इं . चे डोळे चमकले .
रोमा ने पाहिले होते . जेव्हा टॅक्सी ड्रायव्हर कार चालकाला पैसे देत होता , नेमकं तेव्हाच एका मोटारसायकल स्वाराने अपघाताचे फोटो काढले होते . गाडीच्या मागे ‘ प्रेस ‘ लिहिले होते .
घटना घडून आता दोन दिवस झाले होते . पण अजूनही मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती . गाडी ची बारकाईने तपासणी झाली तेव्हा पोलिसांना दोन तीन ठिकाणी बोटांचे ठसे मिळाले होते . रोमाने दिलेल्या नाण्यावरील रक्त मृत व्यक्तीच्या रक्ताशी जुळले होते . खुन्याने खून करून मृतदेह डिक्कीत टाकण्याचा प्रयत्न केला असणार , कारण तेच रक्ताचे डाग डिक्कीतही आढळले होते . डिक्कीत आधीच बरेच सामान ठेवलेले होते . ते काढत बसण्यापेक्षा बॉडी सिटखाली ठेवणे सोपे वाटले असणार . म्हणूनच नंतर बॉडी चादरीत नीट गुंडाळून व्हॅन च्या मधल्या मोठ्या सीट खाली नीट सरकवून ठेवलेली होती . सीट रुंद असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने आपल्या सीट खाली नेमके काय आहे हे रोमाच्या लक्षातच आले नव्हते .
********* सबइन्स्पेक्टर थोरात आणि रुद्र ‘ ताहीर स्क्रॅप ‘ च्या कबाड खान्यात उभे होते . एका दुसऱ्या केसची चौकशी करतांना त्यांना ह्या व्हॅन बद्दल कळाले होते . ताहीर च्या मते ती गाडी डेड बॉडी सकट पूर्णपणे मोडून चपटी करण्याचा खुन्याचा डाव होता .
” इतक्या रात्री इथपर्यंत येऊन त्याला काय मिळणार होते ? ” थोरात डोकं खाजवत म्हणाला .
” हे सगळं इतकं सोपं नाहीये थोरात ! कुणीतरी इथे आहे , ज्याच्या मदतीने गाडी आणि बॉडी , दोन्हींचीही विल्हेवाट लावायचा बेत
होता ….मग …त्यांनी…. .असं…..का नसेल केलं ….” रुद्र ची विलक्षण बुद्धी कामाला लागली होती .
” ह्यात आणखी कुणीतरी आहे थोरात . चला कामाला लागा .” रुद्र ने थोरात ला ‘ताहीर स्क्रॅप ‘ च्या सगळ्या कामगारांची चौकशी करायला सांगितले .
******** रात्री एक वाजता रोमाच्या फोन ने जय ला जाग आली .
” जय , ऐक ! मला धमकीच्या चिठ्ठ्या येत आहेत .म्हणे हिरे वापस द्या नाहीतर परिणाम वाईट होईल…….” असे म्हणून धमकावत आहेत . मला खूप भीती वाटतेय रे ! ”
” चिठ्ठी ? आणि हिरे ? ही काय नवीन भानगड आहे ? ”
” बघ न !! आता हिऱ्याचा काय संबंध ? कुठून मी त्या दिवशी टॅक्सीत बसले , आणि हे झेंगट मागे लागलं !! ”
” उद्या रवीवारच आहे , आपण जाऊया पोलीस स्टेशनमध्ये . ….आत्ता मी येऊ का तिथे ? ”
” नको , मी ठीक आहे . ”
दुसऱ्या दिवशी जय आणि रोमा रुद्र ला भेटले .
रुद्रने जयची खोलवर जाऊन चौकशी केली . कुठे, कोणासोबत राहतो , काय करतो….. जय तसा एक शिस्तप्रिय आणि शांत व्यक्ती वाटला रुद्रला .
रोमाने हिऱ्यासाठी मिळालेल्या धमकीच्या चिठ्ठ्या दाखवल्या .
” हिरे ? …म्हणजे हा खून हिऱ्यांसाठी झालेला दिसतोय . मिस रोमा , ह्याबद्दल तुमचे मत काय ? ”
रुद्रने समोरची फाईल तपासत प्रश्न केला .
ह्या प्रश्नाने तर तिला आणखीनच घाम फुटला .
” खुन्याला मी कुठे रहाते , काय काम करते हे पण माहीत झाले आहे सर ! दारा खालून एक चिठ्ठी आत आली होती . एक चिठ्ठी ऑफिस च्या पार्किंग मध्ये माझ्या गाडीच्या वायपर मध्ये अडकवली होती . ”
रुद्र ने त्या दोन्ही चिठ्ठ्या नीट बारकाईने वाचल्या . त्यावरील अक्षर , त्याचा कागद , मागील बाजूवरील खोडलेलामजकूर , ह्या सगळ्याची त्याच्या मेंदूने नोंद घेतली होती .
” सर , मला खूप भीती वाटतेय . मला ह्यातून मोकळं करा , मी कुठे दुसरीकडे नोकरी पत्करते . इथे नाही रहात . ”
रुद्र ने तिला शांत केले , आणि सुरक्षेसाठी एक कॉन्स्टेबल सोबत दिला .
थोरात आले होते . ” सर , तो मोटर सायकल वाला दैनिक सत्यप्रत चा वार्ताहर आहे . त्याच्या कडून हे फोटो मिळालेत . ”
रुद्र ने ते फोटो बघितले . आणि त्यातल्या टॅक्सी आणि कार ड्रायव्हर चा फोटो झूम केला .
” थोरात , त्या ताहीर स्क्रॅप चे काय ? ”
” सर , त्या दिवशी रात्री एक च्या सुमारास ही टॅक्सी तिथे पोहोचली होती . तिथे रझाक म्हणून एक कामगार आहे , त्याच्याशी ह्या टॅक्सी चालकाचे म्हणजे संभावित खुन्याचे बोलणे झाले होते . तो ही टॅक्सी पूर्ण पणे स्क्रॅप प्रेस करणार होता .
ड्रायव्हर त्याला त्याचा हिस्सा देणार असे नेहमीप्रमाणे ठरले होते .
पण टॅक्सी ताहीर स्क्रॅप च्या गेटवर पोहल्या बरोबर अचानक दोन जण तिथे आले . त्यांची ड्रायव्हर शी बाचा बाची झाली , त्यांनी त्याला मारपीट सुरू केली , आणि ड्रायव्हर तिथून पळून गेला . ….त्या रझाक ला ताब्यात घेतलंय सर . ”
” गुड !! ”
रोमा मात्र खूप चिंतेत होती , तिच्या कामाचा बराच वेळ ह्या भानगडीत वाया जात होता . आपण सतत पोलीस स्टेशन मध्ये जातोय हे तो खुनी बघत असेल ना!! अशी तिला भीती देखील वाटत होती .
******** गाडी पार्किंग मध्ये लावून रोमा लिफ्ट मध्ये शिरली . कुलूप उघडून आत गेल्याबरोबर तिला आत कुणीतरी असल्याचा संशय आला . आत जावे की नाही या विचारात दबकत ती पुढे गेली . बाहेरच्या खोलीत कुणीच नव्हतं . ती आत बेडरूम मध्ये जाणार , इतक्यात तिला जोरात धक्का देऊन कुणीतरी वेगाने आतून बाहेर आले , आणि हॉल ला लागून असलेल्या बाल्कनीतुन त्याने बाहेर उडी टाकली . तिने भांबावून जाऊन आत नजर टाकली ……सगळे सामान अस्ताव्यस्त पडले होते . रिकामे उघडे कपाट आ वासून बघत होते , आणि त्यातील सामान पसरले होते खोलीभर !! ‘कोण असतील हे लोक ? ‘ याचा नक्की त्या धमकीच्या फोनशी संबंध असणार म्हणून
तिने पुन्हा रुद्र ला कळवण्या साठी फोन हातात घेतला .
******* ‘ ताहीर स्क्रॅप ‘ मधील रझाक ने सबइन्स्पेक्टर थोरात समोर तोंड उघडले होते . ‘त्या ‘ रात्री गाडी चालवणारा हा एक भाडोत्री मारेकरी होता , ‘ निरंजन ‘ ! तो गाड्या चोरण्यात तरबेज होता . त्याने आणि रझाक ने ह्या पूर्वी देखील दोन चोरीच्या गाड्यांची वापरून झाल्यावर ‘ताहीर स्क्रॅप’ मधेच
‘ विल्हेवाट ‘ लावली होती . त्यासाठी निरंजन त्याला चांगली रक्कम देत असे . एक गाडी तर बँक दरोड्यासाठी वापरली होती . मालक ताहीर ला मात्र ह्यातलं काहीच माहिती नव्हते . रात्री फक्त रझाकच ड्युटीवर असे . आदल्या दिवशी निरंजन ने रझाकला भेटून आणखी एक गाडी गायब करायचीय असे सांगितले होते . ‘ह्या वेळी नेहमीपेक्षा दुप्पट रक्कम मिळेल , थोडी जोखीम आहे ‘ असे ही त्याने सांगून ठेवले होते . पण ऐन वेळेवर दोन जण तिथे आले , त्यांची निरंजन सोबत हातापाई झाली , आणि निरंजन तिथून पळून गेला होता . तेव्हा रझाकही काहीच माहीत नाही असे दाखवून यार्ड मध्ये गप्प बसून राहिला होता .
” थोरात , हा रझाक खरे बोलतोय .
त्याने सांगितलेल्या सगळ्या पत्यांवर माणसं पाठवा . निरंजन सापडलाच पाहिजे . त्या प्रेस रिपोर्टर ला बोलवा , मला भेटायचंय त्याला . ” रुद्र भराभर सूचना देत होता . रझाक मुळे बरीच माहिती मिळाली होती .
इतक्यात कॉन्स्टेबल राणेंचा फोन आला .
” सर , टॅक्सी मधील बॉडीची ओळख पटलीये . दोन दिवसांपूर्वी घरच्यांनी डोंबिवली ठाण्यात ‘मिसिंग ‘ ची तक्रार नोंदवली होती . ”
“मुद्द्याचे बोला राणे ! ” रुद्र जरबी आवाजात बोलला .
” सर ह्याचे नाव आहे सागर . खून होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी हा सुप्रसिद्ध हिऱ्याचे व्यापारी मगनलाल झवेरी यांच्या साठी काम करत होता . गेले सहा महिने मात्र अधून मधून काही काम त्याला मिळाले होते . ”
” ठीक आहे , झवेरीकडे माणसं पाठवा आणि आता सागर ची बॉडी घरच्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करा , मी येतोच . ”
केसचा तपास फार वेगाने पुढे जात आहे ह्याचे समाधान मानून तो निघाला .
रुद्र ने तांत्रिक विभागात रोमाला आलेल्या धमक्या चिठ्ठ्याचे तपशील गोळा करायला सांगितले होते . तिला धमकावले गेले असल्याने खोल तपास आवश्यक होता . पण सध्या तरी हे सागर प्रकरण निपटायचे होते .
रुद्र घडलेल्या घटनांची मनात उजळणी करत होता . रात्री गाडीत लिफ्ट देणे , त्यातच एक मृतदेह , मग गाडीचा अपघात , ताहीर स्क्रॅप मध्ये गाडी सापडणे , रोमाला धमक्या , तिच्या घरात घुसून सामानाची उलथापालथ , हिऱ्यांचा संबंध …..इत्यादी ..
तांत्रिक विभागाकडून
रोमाला धमकी देणाऱ्या चिठ्ठ्याचा माग घेतल्या गेला होता . तसा फोन आल्याबरोबर रुद्र तिथे गेला .
” सर , ह्या दोन्ही चिठ्ठ्या एकाच हस्ताक्षरात आणि एकाच शाईने लिहिल्या आहेत . त्यातील एक चिठ्ठी ही एका हॉटेल च्या पावती मागे खरडली गेली आहे सर ! पावतीचा मजकूर घाई घाईत खोडलाय . तो आम्ही मिळवलाय . ”
” ग्रेट !! त्या हॉटेल मध्ये जाऊन निरंजन चे फोटो दाखवा . काहीतरी माहिती नक्कीच मिळेल . ”
इतक्यात थोरातांचा फोन आला .
” सर , ताबडतोब या ! त्या रोमा प्रकरणातील ऍक्सीडेंट चे फोटो काढलेल्या वार्ताहरावर जीवघेणा हल्ला झालाय . तो सध्या ओझोन हॉस्पिटलमध्ये भरती आहे . जीवाला धोका नाहीये , पण गंभीर जखमा आहेत . ”
ह्या प्रकरणात एकानंतर एक घटना घडतच होत्या . आता तपास आणखीनच वेगात करणे आवश्यक आहे , असा विचार करतच रुद्र ओझोन हॉस्पिटलमध्ये पोहोचला .
(क्रमशः)
©अपर्णा देशपांडे
पुढील भागाची लिंक- घातक हिरे- भाग 2
Image by carmule from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Very interesting…next part lavkar please
Thank you.
चांगली सुरुवात. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
Dhanywad
Next part may be tomorrow 👍👍😊
Khup interesting goshta, next part lavkar post Kara please
Thank you so much
Interesting 👌
Thank you
zakas suruwat.
Pudhchya bhagachi utsukta ahe!
Lawkar upload kara 🙂
सांगते जोग साहेबांना😃😃😃लवकर पोस्ट करा म्हणून😃😃
वा अपर्णाताई! मस्त सुरुवात आहे.👍 पूर्ण वाचणार आहे कथा.
सुंदर… Interesting…Next part please
एक ही दिल है अपर्णा जी.. कितनी बार जीतोगे 😀❤️