तुकड्या तुकड्याने जगतांना….

हल्ली काही शब्द सतत कानावर येतात. जसं be you, me time, spiritual quotient, live in today असं बरंच. त्यातले काही आपल्या जगण्यातले असतात. काही नव्यानं कळतात. मग आपण थोडं वाचन करतो. कधी शोधतो. कधी कधी पटकन काही सापडतं. कधी बराच वेळ लागतो. पण गवसतं प्रत्येकालाच. साधारण चाळीशी ओलांडली की काही काही प्रश्न असे येऊन एकदम आदळतात तुमच्यावर. त्यांचं नक्की काय करायचं. त्यांना कसं सोडवायचं? कोणाकडे जायचं नीट माहित नसत. मग प्रचंड गोंधळ उडतो. तगमग होते. घुसमट वाढते. आणि प्रश्न असे रोज घेऊन जगताना साधं जगण्याचा पण ताण येतो. येतोच. तो सर्वात आधी मान्य करायला हवा, नाही का?

ह्या संज्ञा जेव्हा नव्याने भेटतात तेव्हा नक्की काय होतं, त्याचा विचार करूया का जरा. माझ्या मते आपण आधी हरखून जातो. मैत्री नवीन असताना कसं होतं. किंवा असं शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर सुरुवातीच्या दिवसांत कसं वाटतं तसंच काहीसं वाटू लागत. मग हरखून जातं असतांना बरेचदा पारखायचं राहून जात. जसं आंतरजालावर गेल्यावर कसं होतं बघा. म्हणजे आलो असतो ज्याच्या शोधात त्याच्या बरोबर इतर इतकं काय काय सापडतं की गोंधळ उडतो मनाचा. तसंच होतं नवीन काहीही शिकताना, नाही का? हरखणं पण खरंय. आणि गोंधळ उडणं मनाचा सुद्धा. आता तो कसा निपटायचा हे खरंतर ज्याचं त्यानंच शोधलं पाहिजे. माझ्या मते ह्या शोधाला सोप्पी उत्तरं नाहीत. वेळ काढूच प्रश्न आहे हा. पण ह्यापासून सुटका पण नाहीये कुणाची. त्यामुळे हा प्रश्न पडणारं आहे आपल्याला आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यात ह्याची कल्पना करून ठेवायला हवीच. पण त्याचा बागुलबुवा मात्र नक्कीच नको. नाहीतर मग जगण्यातली सहजता आणि पर्यायाने मजा निघून जाईल.

कसं जगायचं? ह्याचं मला तरी असं एकच एक आणि साधं सरळ उत्तरं नाही देता येत. कारण ते ज्याचे त्यानेच असते ठरवायचे. जास्तीत जास्त आपण दुसऱ्याला विचारू शकतो. पण ती उत्तरं दरवेळी योग्यचं असतील. असं होतं नाही. कधी उत्तरं अपूर्ण असू शकतात. कधी ती योग्य असली तरी आपल्याला लागू होत नाहीत. कधी ती पटतं नाहीत. मग काय करायचं. मी काय करते तितकंच मी सांगू शकते. मी अशा वेळेला सुचतं ते करते. खरंच. म्हणजे कधी कोणाला विचारते. कधी थोडं सोडून देते. कधी स्वतःच परत विचार करते. तपासून बघते. कधी react होते. कधी respond करते. कधी ते सपशेल चुकतं. कधी बरोबर ठरतं. पण ते स्वतःच स्वतः ठरवलं असल्याने त्याचा खंत खेद उरत नाही. अगदी खरं सांगू तर पुस्तकांत लिहिलेलं असतं. स्वीकार करा. स्वतःचा, इतरांचा, एकूणच आपल्या आयुष्यातील माणसांचा. स्वीकार करा. केलेल्या चुकांचा पण. बरोबरच आहे ते. पण पुस्तकातलं सगळं जगतांना करणं वाटतं तितकं सोपं नाही. लोकं म्हणतात धरून ठेवू नका, सोडून द्या. “let it go” पण ते सोडून देण्यासाठी जो वेळ लागतो. तो लोकांनी नसतो ठरवायचा. तो आपला आपण ठरवायचा. आणि कसं सोडायचं काही ते पण.

आणि हे सगळं करताना एक मात्र मी करते अगदी कटाक्षानं. तो म्हणजे cathesis. निचरा. कधी तो मनातल्या भावनांचा असतो, कधी विचारांचा. कधी केलेल्या चुकांचा. कृतीचा. सगळ्याचाच. कधी बोलून करते. कधी लिहून काही. कधी सांगून कोणाला. कधी स्वतःलाच. पण वेळोवेळी करते. मला वाटतं हे करणं खूपचं गरजेचं आहे. तितकंच जसं आपण आपलं कपाट आवरतो. किंवा फ्रीज पुसतो, आतून बाहेरून. टाकून देतो, आत सरकवलेलं काही. कधी हळहळतो जीव. वाईट वाटतं. पण मग अस परत इतकं साठवायचं नाही ह्याची जाणीव होते. आणि मग लगेच नाही पण काही वेळानं आपण खरंच तसं करत नाही. आता कसा करायचा हे खरंतर ज्याचं त्यानं ठरवायचं. पण करावा इतकं मात्र मी आवर्जून सांगेन.

तसंच मध्यंतरी वाचनात आलं काही. त्याबद्दल थोडं लिहिते. कारण ते फारचं स्पर्शून गेलं आहे माझ्या मनाला. गोंदवलेकर महाराजांचे एक वाक्य वाचलं. ते म्हणतात की सुखाकडे जाण्याचे मार्ग दोन एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरा अनुभव. त्यांनी प्रवासाचं उदाहरण देऊन इतकं सहज सोपं समजावलं आहे. ते म्हणतात की तुम्ही प्रवासाला जाताना मोटारीने पण जाऊ शकता आणि चालत सुद्धा. चालतं गेलात तर वेळ लागेल पायाला काटे बोचतील. पण पोचाल तसे सुद्धा. त्यामानाने श्रद्धेचा मार्ग सोपा. पण शेवटी कोणता मार्ग किंवा माध्यम निवडायचं हे त्यांनी सुद्धा आपल्यावरचं सोडलं आहे. मी अनुभवाचा मार्ग स्वीकारला. तुमचा तुम्हांलाच शोधावा लागेल. दुसरी होती एक कविता. विंदांची. इतकी सुंदर आहे ती. जरूर वाचा, “एवढे लक्षात ठेवा”. त्यातल्या दोनच ओळी इथे देते. पटल्या तर तुम्ही पुढे स्वतःच शोध घेऊन वाचाल ह्या खात्रीनं. “जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा”.

म्हणूनच माझी तरी हीच धारणा आहे जगतानाची. आयुष्य असं एकसंध नाही येतं जगता. ते चुकतं माकत शिकायचं. कधी अनुभव घेतं. कधी विच्रारतं कोणाला. माणसांना, पुस्तकांना, कवितेला. कधी जगण्याला. थोडं थांबायचं. अगदी थोडं तरी निश्चित. कधी सोडून द्यायचं. आपलं नव्हतं म्हणून. पण आपला वेळ घेऊन. चुका, त्याबद्दल काय बोलणारं कोण काही. त्या मुद्दामहून जाऊन कोणीही करतच नाही. झाली चूक तर मान्य करायची. परत करायची नाही. इतकं सोपं सहज. मोकळेपणाने. अर्थातच हे लिहायला आणि मला सांगायला खूप सोपंय. पण मी हे असं पण हल्ली करत असते. म्हणजे स्वतःलाच परत परत सांगायचं. थोडा जास्त वेळ द्यायचा आपण आपल्यालाच. शेवटी आपलं आयुष्य आहे. आपण ते छान जगायलाच हवं. कधी नसेल ना एकसंध. तर तसंही. तुकड्या तुकड्याने असेल ना, हरकत नाही.  पण तो तुकडा जर तुमच्या आरशाचा असेल तर देऊन जाईलच तो तुम्हांला आणि ते सुद्धा बरंच काही.

© प्राची बापट

Image by Gerd Altmann from Pixabay 

Prachi Bapat

Prachi Bapat

प्राची सुमीत बापट ह्या गेल्या २२ वर्षांपासून जपानी भाषेच्या अनुवादक आणि दुभाषी म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. २००१ ते २००४ दरम्यान त्या जपानमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक होत्या. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्या NTT Netmagic, Blue star Infotech, Toyo Engineering, Accenture इ. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये आणि रुईया कॉलेज, माटुंगा इथे जपानी भाषेचे अध्यपान करत होत्या. मराठी भाषा अनुवादक ह्या नात्याने क्रिसिल फाऊंडेशन आणि राधाकृष्ण हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस मध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत तसेच सकाळ वृत्तपत्रात जपान विषयक काही लेख लिहिलेले आहेत. लवकरच, पुणे येथील बुक्स अँड स्टोरीज ह्या प्रकाशन संस्थेतर्फे त्यांचे 'भवताल' नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येईल.

One thought on “तुकड्या तुकड्याने जगतांना….

  • June 9, 2021 at 3:48 am
    Permalink

    छान लिहिलय.👌
    Catharsis असा शब्द आहे न?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!