डाक- भाग १
“ठक ठक ”
आवाज करत, शांतरामचं शिक्के मारणं अन पत्रांचं सॉर्टिंग सोबतच चाललं होतं. जमलंच तर एखाद्या कार्डावरून नजर फिरवणं चाललं होतं.
गोरख लव्हाराच्या बहिणीचं पत्र, सोबत राखीचं लेट झालेलं पाकीट. शंकर गुरवाच्या मिलिटरी मधल्या लेकाचं कार्ड……. सुट्टी मिळत नाही म्हणे.
उतळे मामीच्या लेकाचं कार्ड, …….. यंदा दिवाळीला यायला जमणार नाही, ……. या महिन्याची मनी ऑर्डर पण पाठवू शकत नाही. कार घेतल्यामुळं तंगी चालू आहे……. ई…. ई.
म्हणजे मामीचं या महिन्याचं लाईट बिल बोंबललं. वाण्याकडं उधारी होईल एकवेळ, पण लाईट कट झाली तर……. चालवंल मामी, रॉकेलची चिमणी……. जाऊ दे आपल्याला काय करायचंय म्हणत, शेवटचे दोनतीन शिक्के मारून शांताराम मोकळा झाला. बटवड्याची सॅक भरली. अन शेख पोस्टमन सोबत, समोरच्या टपरीवर चहा प्यायला गेला.
हा नाद शांतारामला एक दिवशी अंगाशी येणार होता. वरवर का होईना, कार्ड वाचायची, तारा वाचायची सवय, शांतारामला लागली होती. तसं त्याचं पोट मोठं होतं. या कानाचं त्या कानाला लागणार नव्हतं. पण वाचलेल्या मजकुरातल्या चिंता, ताणतणाव दिवसभर डोक्यात घोळत राहायचे. घरी गेला की मात्र, लहान लेकीशी खेळण्यात अन बायकोशी गप्पा मारण्यात सगळं विसरायला व्हायचं.
पुन्हा सकाळी आठला, पोस्टाची पेटी उघडली की नव्या चिंता, नव्या समस्या, नव्या गोड बातम्या …… सगळं नवीन. तो आपल्या सॅक मध्ये भरायचा अन सॉर्टिंग करायला घेऊन जायचा.
भावनांचं सॉर्टिंग……..
पत्त्यानुसार वेगवेगळं, …… वेगवेगळ्या पातळीवर.
कुणाची म्हैस व्याली म्हणून आनंद, अन कुणाच्या सासऱ्याने नवीन कार घेऊन दिली तरी नणंदेला समाधान नाही. तसंही हल्ली, कोण लिहून भावना व्यक्त करतं. सगळे मोबाईल वर लटकलेले. तशी हल्ली पत्रं कमीच झालेली.
मोबाईल वर बोललेलं, आकाशवाणी सारखं एकदा ऐकायचं अन विसरून जायचं.
पत्रातल्या सारखं, शब्द पुन्हा पुन्हा भिजवून भिजवून वाचता थोडेच येतात. अन शांताराम सारखे दुसऱ्याच्या भावभावनांमध्ये अडकणारे कोरडेच राहायचे.
असो.
शांताराम निघाला.
पत्रं वाटायला…….
दोनचार गल्ल्या फिरून, फारतर चार पत्रं झाली. तोवर त्याचं घर आलं. बायको वाट पहात होतीच.
लगबगीनं जेवण वाढलं.
जेवण जेवता जेवता, त्यानं बायकोला विचारलं,
“उतळे मामीचा मुलगा कुठं नोकरी करतो ग ?”
“कुठंतरी सरकारी कारकून आहे म्हणे.” बायकोने शक्य तितकाच तिऱ्हाईतपणा आणत उत्तर दिलं.
तिच्याकडे दुर्लक्ष करत, शांतारामने हातावर पाणी घेतलं. आणि सायकलला टांग मारून, पुढच्या बटवड्यासाठी निघाला.
“मामी आहेत का घरात ?”
“आं, …… कोण हाय ?” मागच्या अंगणातल्या आडाजवळ पाणी भरत असलेल्या उतळे मामींनी आवाज दिला.
मामी म्हणजे अख्ख्या गावाची मामी. लेकीचं अन लेकाचं लग्न लावून, एकट्या राहणाऱ्या मामींना आता वयामुळे शेतीकाम होत नव्हतं. परंपरेनं मिळालेल्या दहा बारा गुंठ्यांत, अर्धलदार जे पिकवेल त्यातलं थोडंफार वर्षाकाठी देत होता. पण लेकानं पाठवलेली मनीऑर्डर हाच खरा एकमेव आधार होता.
मामी लगबगीने बाहेर आल्या.
“काही खास नाही ओ मामी, तुमचं पत्र होतं.” असं म्हणत, शांतारामने बॅगेत हात घातला. नुसतं पत्र म्हटल्यावर, मामी जरा नाराजच झाल्या. पण त्यांनी तसं दाखवलं नाही.
पण मामीचं कार्ड काही त्याला सापडेना. खरंतर एक दोनच कागद सॅक मध्ये राहिले होते.
सकाळीच तर वाचलं होतं. खरंतर मामीला कार्ड वाचून, टेन्शन येईल म्हणून शांतारामला काळजी वाटत होती.
त्याने जवळपास सॅक उलटी केली. पण मामीचं कार्ड काही सापडत नव्हतं.
पण सॅकमध्ये दोन हजाराच्या दोन नोटा अन मनी ऑर्डरचा एक कागद निघाला. त्यावर मात्र मामीचं नाव होतं. शांतारामचं डोकं फिरायचं बाकी होतं.
जी मनीऑर्डर येणार नाही, अस पत्र वाचलं होतं, …… तीच मनीऑर्डर त्याच्या हातात होती. सॅक मधल्या रजिस्टर वर देखील तशी नोंद होती.
त्याला फक्त पैसे देऊन मामीचा अंगठा घ्यायचा होता.
तो पूर्ण गोंधळला होता. सकाळचं पत्र आभास होतं की आताची मनीऑर्डर हेच त्याला समजत नव्हतं.
स्वतःच्या डोक्यात चाललेल्या वेगवेगळ्या काल्पनिक चिंतांचा, ….. ते पत्र परिपाक होतं की उतळे मामीला मदत करण्याच्या अतीव इच्छेमुळं मनीऑर्डरचा भास होत होता हे काही समजेनासं झालं होतं.
त्याने अखेर पाणी मागितलं.
मामींनी त्याचा गोंधळ अन टेन्शन बघून त्याची साखर कमी झाल्याचा समज करून घेतला अन तो सॅक, रजिस्टर, मनीऑर्डर हे सगळं चेक करे पर्यंत चहाच बनवून आणला.
चहा पिऊन झाल्यावर, त्यानं निमूटपणे तिचे पैसे तिला दिले अन तिचा अंगठा घेतला.
तो जरी वरवर निमूटपणे खाली बघून चालत असला तरी त्याच्या मनातला गोंधळ त्याच्याशी बराच वाद घालत होता. अन सायकल एका हाताने धरून , शांताराम दुसऱ्या हाताने, हातवारे करत चालला होता.
(क्रमशः)©बीआरपवार
Image by Bishnu Sarangi from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Pingback: डाक- भाग २ – LekhakOnline – Excellent Marathi Articles