आनंदाचे झाड – तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सायली वझे
माधव ,त्याची बायको ‘राधा’ ,गोंडस मुलगा
‘रोहन ‘ आणि माधव ची म्हातारी आई ‘मालती ‘असं हे चौकोनी कुटुंब .कोकणातील मालगुंड मध्ये मस्त भव्य
वाड्यात राहणारे.घरची आंब्या-फणसाची ,नारळाची झाडं ,वाड्यातच असणारं छोटंसं गणपतीचं देऊळ, आणि वाड्याच्या मोठ्या अंगणात असणारं एक प्राचीन कातळशिल्प , हे सगळं म्हणजेच या कुटुंबाचं ‘आनंदाचं झाड ‘ होतं . हीच काय ती यांची श्रीमंती !
माधव सरकारी नोकरीत कामाला ,पण कधीही चुकीच्या मार्गाने पैसे न कमावणारा , अडीनडीला सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा साधा ,सरळ माणूस.त्याची बायको ‘राधा ‘, रोज सडारांगोळी , घरची कामे आणि संसार यात रमलेली .’रोहन ‘ , वय वर्ष सात , तिथल्याच जवळच्या एका शाळेत शिकणारा,मित्रांबरोवर मजा मस्ती करणारा मात्र अभ्यास अजिबात न आवडणारा .’ मालती ‘ , सगळ्यांची लाडकी ‘आक्का’ , गणपतीची रोज मनोभावे पूजा करणारी ,नातवाचे लाड करणारी ,रोज रात्री त्याला गोष्ट सांगणारी आजी. असं हे एक सुखी आणि समाधानी कुटुंब.
सरकारी कामानिमित्त माधवला खूपदा मुंबईला
जावं लागायचं . तरीही या सगळ्यात मुलाला सायकलवरुन शाळेत सोडणे, रोज गणपतीला नमस्कार करुन आक्का आणि बायकोशी बोलून मगच पुढचं काम सुरु .गणपतीबरोबर तर त्याच्या खासच गप्पा असत.सगळी सुख -दुःख गणपती बाप्पा बरोबर वाटून घेतल्यावरच त्याला हलकं वाटत असे.
माधव मुंबईहून परत आल्यावर तिथल्या बऱ्याच गमतीजमती रोहनला सांगत असे.साहजिकच रोहनच्या मनात मुंबईचे एक वेगळंच चित्र तयार झालं आणि त्यालाही मुंबई बघायचे वेध लागले.काहीच दिवसात अनायसे तशी संधीही चालून आली.कामानिमित्त माधवला मुंबईला राहावे लागणार होते.ऑफिसमधून परवानगी मिळाल्यामुळे त्याचे कुटुंबही त्याच्याबरोबर मुंबईला निघाले.मुंबईचे गेस्टहाऊस बघून मात्र रोहनची फार निराशा झाली. त्याला त्यापेक्षा त्यांचा कोकणातील वाडाच भव्य वाटू लागला; पण मुंबई फिरताना मात्र त्याला खूप मजा आली.भव्यदिव्य इमारती ,म्हातारीचा बूट, मोठमोठे मॉल बघून तर त्याचे डोळेच दिपले.मुंबई एयरपोर्ट च्या जवळच त्यांचे गेस्टहाऊस असल्यामुळे खूप कमी उंचीवरून होणारे विमानांचे उड्डाण पाहून तर त्याला काय करु नी काय नको असे झाले.एकंदरीत मुंबईची ट्रिप मस्तच झाली होती.
घरी परतल्यावर मात्र विमानात बसून कुठेतरी
लांब जायचे असा हट्ट धरला रोहनने. लगेच माधवने कबूलही केले पण एका अटीवर, परीक्षेत पहिला नंबर मिळवलास तर नक्की.माधवला मनोमन माहित होते ,रोहनचा पहिला नंबर येणे काही शक्य नाही.दुसरीकडे मात्र रोहनमध्ये एकदम आमूलाग्र बदल झाला. दिवसरात्र रोहन अभ्यासात बुडाला.रोहनला अभ्यासात बुडालेला पाहून इकडे माधवराव मात्र चिंतेत बुडाले.गणरायाकडे आगळंवेगळं मागणं मागू लागले , “कृपा कर आणि या परीक्षेत रोहन दुसरा येउदे. “कारण अर्थातच तेवढे पैसे नव्हते हो माधवकडे.बाबांची पाठ वळताच रोहनची बाप्पाकडे मागणी ,” मी खूप मेहनत करतोय.माझा पहिला नंबर येउदे “.बिचार्या विघ्नहर्त्यालाच संकटात टाकले बाप लेकानी .
विघ्नहर्त्याच्या मात्र रोहनच्या मेहनतीला न्याय दिला.रोहन शाळेतून नाचतच घरी आला.” मी पहिला आलो बाबा .हुर्र्रे …” इकडे बापाचे काळीज मात्र धडधडू लागले.रोहनला आता विमानातून फिरवून आणावे लागणार होते मात्र पैशाचे सोंग काही आणता येणार नव्हते.रोहन विमानाची स्वप्ने रंगवू लागला तर माधव दिवसरात्र पैशाच्या चिंतेत.बापाचं काळीज ते शेवटी.काही करून पोराची एवढी इच्छा पूर्ण करायची
होती त्याला.
एवढे दिवस हसतखेळत सगळ्यांची मदत करणारा,सरकारी कामे करूनसुद्धा कोणाकडूनही लाच न घेणारा माधव आता मात्र कुठल्या मार्गाने पैसे मिळवता येतील ह्याचाच विचार करू लागला.लोकांची कामे करून द्यायला जास्तीचे पैसे घेऊ लागला.हे करत असताना मात्र गणरायापुढे जायची मात्र लाज वाटू लागली त्याला.बायकोशी छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद घालू लागला.आईशीही बोलेनासा झाला. ‘आनंदाचं झाड ‘ रडू लागलं .
कहर म्हणजे वाड्याची शान असणारं प्राचीन कातळशिल्प माधवने घरी काही न सांगता एका रात्रीत कोणाला तरी विकलं .रात्री वाडा साखरझोपेत असताना ते कातळशिल्प घेऊन जाण्यासाठी लोक आले.रोहनने हे पाहिलं आणि तो ओरडणार एवढ्यात माधवनेच त्याला शांत केलं .
दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात येताच कातळशिल्प जागेवर नाही म्हणल्यावर अक्का आणि राधा किंचाळल्याच .अक्कांना तर फार वाईट वाटलं.एकंदर सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.अक्का खूप आजारी पडल्या.नेमका माधव मुंबईला गेलेला.राधाला काय करावे काही सुचेना. एवढ्याशा रोहनने हे सगळे पाहिले आणि वाऱ्याच्या वेगाने बाबांच्या सायकलवर टांग मारुन डॉक्टरना घेऊन हजर .डॉक्टर चे वेळीच उपचार मिळाल्यामुळे आजीला लगेच तरतरी आली.रोहनच्या डोक्यावरुन आजी आणि आई दहा वेळा प्रेमाने हात फिरवू लागल्या.रोहन आजीच्या उशाशी बसून तिला काय हवे नको याची विचारपूस करत होता.
संध्याकाळी माधव परतताच रोहनने माधवला कडकडून मिठी मारली.” मला विमानाने कुठेही जायचं नाहीये ; पण आता मी रोज शाळेत मात्र तुमच्या सायकलवरुन जाणार ” असं रोहनने म्हणताच माधवला अश्रू आवरेनात.जीवनाच्या शर्यतीत सुद्धा आज रोहनचा पहिला नंबर आला होता.माधवने कातळशिल्प परत ज्याला विकलं होतं त्याच्याकडून परत आणून वाड्यात स्थानापन्न केलं .पुन्हा एकदा ‘आनंदाचे झाड ‘ आनंदाने डोलू लागलं .सुखाचे वारे वाड्यात परत एकदा वाहू लागले. गणरायाच्या चेहेर्यावरही आज हास्याची लकेर उमटली होती.
Image by Free-Photos from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
ताऱ्याचे बेट चित्रपट ची कथा कॉपी केलीय…
मलाही तेच वाटलं..
३
Taryanche bet….