चष्मा

लंगडत लंगडत पक्या सोसायटीत शिरला.खरं तर सक्काळी साडेसात वाजताच तो सोसायटीबाहेर गेलेला. त्याच्या बाईकवर. त्याची बाईक कुठाय ? जप्त केली असणार. बाहेर जायचंच कशाला ? काय माहित ? बहुतेक ऊगाचच.कमल पृष्ठभागावर रट्टे पडले असणार. अवघड जागेचं दुखणं. सांगताही येईना आणि सहनही होईना. असंच पाहिजे पक्याला.
पक्या. सोसायटीचं अवघड जागेचं दुखणं झालंय. काॅलेजात शिकतोय म्हणलं तर, दिवसभर सोसायटीतच असतो. दोघा चौघांचं कोंडाळं करून गप्पा छाटत बसायचं. सोसायटीच्या मेनगेटसमोर गार्डनला लागून एक बाकडं. तिथं दिवसभर अड्डा. एकमेकांना टाळ्या देणं, मोबाईलच्या स्क्रीनला चिकटणं, अनबघणेबल चारचौघात चोरून बघणं. भसाड्या आवाजात गाणी गाणं. जीना यहाँ, मरना यहाँ.आईबापालाही दाद द्यायचं नाही पोरगं.
नशीब. नजर वाईट नाहीये पोरांची.कुणाची छेड वगैरे काढणं असले प्रकार करत नाहीत.देव पावला म्हणायचा. लिमिटेड देवकृपा. सगळी सोसायटी बाहेरच्या जगात जायची.पक्या सोडून.तो घरकोंबड्यासारखा तिथंच.याचा सगळ्यात जास्त त्रास व्हायचा तो आप्पांना. आप्पांची गॅलरी एक्झॅक्टली पक्याच्या बाकड्याच्या डोक्यावर. पक्याच्या गप्पा आप्पांच्या दुपारच्या झोपेचं खोबरं करीत.गॅलरीत बसून पेपर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, पाठ होईपर्यंत वाचायचा ही आप्पांची सवय. ते सुद्धा जमेना झालं. सतत पक्याच्या गप्पांचा डिस्टर्बन्स. साम दाम दंड भेद. पक्या दाद देईना.शेवटी नशीब फुटकं म्हणून आप्पांनी पक्याची सवय करून घेतली. नाईलाज को क्या ईलाज ? जिसकी जलती है ना जान …. जाऊ दे.
आप्पांनी मनातल्या मनात पक्याला सत्तर वेळा ठोकून काढला असेल, ऐशीवेळा विषप्रयोग करून ठार मारला असेल, नाहीतर नव्वद वेळा हत्तीच्या पायदळी तुडवला असेल. हकीकत में.. आप्पा ईज ट्रॅजीकली हेल्पलेस.आप्पा म्हणजे पोरगं दूरदेशी ऊडून गेलेल्या रिकाम्या घरट्याचा चौकीदार.
म्हातारा अन् म्हातारी.दोघच दोघं. मै और मेरी तनहाई टाईप आयुष्य जगायची दोघं.कसा का होईना. रिकाम्या आयुष्याला पक्याने भलामोठा टीआरपी मिळवून दिलेला.
आप्पा गॅलरीतच होते. कुणाचं तरी बोलणं ऐकलं. पक्याला पोलिसांनी ठोकून काढला.आप्पा खुष. खरं तर लंगडणार्या पक्याला आप्पांना डोळे भरून बघायचा होता.कलीजे को ठंडक का काय ते मिळणार होती जसं काय. काही ऊपयोग नाही.आप्पांचं नशीब फुटकं आहेच. चार दिवस झालेत चष्माही शहीद झालाय. पेपर बंद. टी. व्ही. बंद. परमेश्वर किती परिक्षा बघणारेय कुणास ठाऊक ? आप्पांचा धृतराष्ट्र  झालेला आणि माईंचा संजय.रोजचं साधं जगणं अवघड होऊन बसलेलं..
एवढ्यात बेल वाजते.” माई हा घ्या चष्मा.नाईकाच्या घरीच गेल्तो.घरापुढं दुकान तेचं. दुकान बंद. तयारच नव्हता गडी. त्याला म्हन्लं जिंदगीचा सवाल हाई. आप्पा मरून जाईल अशानं. तेचं घर ऊल्टपाल्टं केलं. घरी दोन चार फ्रेम होत्या. त्यातली एक फीट्ट बसली. काचा शाबूत होत्या म्हणून काम झालं.आप्पाची लाईट डीम झाल्यागत झालेली. रोज बगतू मी गॅलरीत.भाजी आनायला गेल्तो.नाईकाकडे लेट झाला. माझीच चुकी जाली. येताना प्रसाद भ्येटला.पुन्यांदा घराभाईर न्हाई पडनार आता.”
डीम लाईट आप्पांचे कान तिखट होते अजून. पक्या समजलाच नाहीये त्यांना अजून. जगाकडे बघायचा नवीन चष्मा गिफ्ट मिळाला होता आप्पांना आज. पक्याकडून.
A gift for someone you love very much !
…….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Free-Photos from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “चष्मा

  • July 12, 2021 at 4:59 am
    Permalink

    वाह, पुन्हा एकदा माणुसकीवर विश्वास ठेवावीसा वाटतो, अशा कथा वाचल्या की.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!