आई
” चंदर ! ये की लवकर ….हितं पोळी भाजी वाटताएत .” कालू ओरडला तशी चंदर नि ब्लॅंकेट वाटपाची रांग सोडली , त्याची लाडकी पिशवी उचलून काखेत मारली , आणि कालूच्या दिशेने पळाला . तो पोहोचेपर्यंत ती रांग कुठल्या कुठे पोहोचली होती . मजूर , डॉक्टर , वकील ….सगळे सारखेच. निर्वासित! दोन घासांसाठी धडपडणारे जीव .
ह्या भूकंपाने होत्याचं नव्हतं केलं होतं …..सगळीकडे नुसता विध्वंस .
लोकांना आपलं सगळं सोडून इथे सरकारी छावणीत यावे लागले होते .
आपला नंबर येइपर्यंत सगळं संपलं तर …..हा विचार करत चंदर दूरवर बघत होता ….कुठे आणखीन काही मिळेल का ह्या आशेने ….निसर्गाने त्याला आता
भूक सहन करायची ताकद दिलीच होती …. ह्यात त्याला कालू ची सतत सावली सारखी जिवाभावाची साथ होती . अरदांड गुंडांपासून आणि पकडून रिमांड होम मध्ये टाकणाऱ्यांपासून त्यानेच वाचवले होते चंदरला .
” चंदर , ती बघ ! आली पुन्हा” कालू शेवटचा घास चघळत बोट दाखवत म्हणाला .
” ती तर आपल्या रेल्वे स्टेशनवर पण दिसली होती रे!…काय शोधतेय बिचारी?” पोळीचा मोठ्ठा घास तोडत चंदर म्हणाला .
” चार वर्षांपूर्वी तिचं पोरगं हरवलय स्टेशनवर…. सतत फिरत असती…पलीकडच्या शेहरातील हाय…..हितं काय सापडणार तिला?….हितं तर… निस्त …..हिचं पोर हिला भेटव की रं देवा!”
अवघ्या चौदाव्या वर्षी जग जवळून पाहिलेला कालू….कळवळून तिच्याकडे बघत म्हणाला .
चंदर ने आपल्या पिशवीत हात घालून फोटो काढला बाहेर…..त्याच्या इवल्याश्या जगातील एकमेव अमूल्य ठेवा….त्याच्या आईचा फोटो……तिचा चेहरा …गेली चार वर्ष सतत उराशी बाळगलेला …..कुठेतरी एक अंधुक आशा जागी ठेवणारा….
अशीच आपली पण आईशी ताटातूट झाली होती …….पाणी घुसलं होतं घरात …..एका मोठ्या लोंढ्यानी दोघांना वेगळं केलं होतं ….कायमचं ……जे हाताला लागेल ते घेऊन निघाले होते मायलेक..
पिशवीतलं बाकी सगळं सामान गेलं ….तेव्हढा फोटो मात्र कुणी चोरला नव्हता .
तो फोटो घेऊन कुठेकुठे नाही शोधलं ह्या चिमण्या जिवानी तिला . मग आशा सोडली , माणसांच्या तांड्यात हरवला , आणि स्टेशन हेच घर झालं त्याचं . रोज हा चेहरा बघत आपल्या स्मृतीतील आई जिवंत ठेवायचा चंदर .
” ए चंदर ! काय सारखं ती पिशवी घेऊन फिरतूस रं! काय हाय त्यात?”
” ………..” त्याच्या मनाच्या ह्या हळव्या कप्प्यावर चंदर गप्प .
” तुझ्या माय चा फोटू न?….तू मला भेटला तवाच पाहीलं होतं ….आता ती कुटं सापडायची असती व्हय !! ”
“……….” चंदर ची जखम सोलवटली होती .
त्या कोलाहलात देखील अपार भीषण शांतता मनात ठेवून चंदर आपल्या आईच्या आठवणी जागवत होता .
“कसं असतं त्यांचं आयुष्य …ज्यांना आई नसते रे? ” शाळेत संजू ने विचारले होते …….आता अनुभवत होता तो ….जणू संजुच्या प्रश्नाचं उत्तरच शोधत होता …
“अमेय !!!…..माझा अमेय!!!” खूप अधीर आर्त हाक आली तसा चंदर चमकून मागे वळला .
तीच होती….माऊली ….आपल्या कोकराला शोधणारी .
चंदर ची पिशवीवरची पकड आणखीनच घट्ट झाली .
” अमेय !!….बाळा!!!….सापडलासच शेवटी! ” बेभान होत तिने चंदर ला कवटाळले . तिला काही सुचत नव्हते.
” माझी तपश्चर्या फळाला आली ……तोच चेहरा , तेच डोळे .….अमेय !!” तिने पटापट त्याचे मुके घ्यायला सुरुवात केली .
तिच्या घट्ट प्रेमळ मिठीत चंदर गुदमरत होता . असा मायेचा स्पर्श !! किती वर्षांनी ! ….आई?….कुठे आहेस तू?……आई ग s s त्याचे मन आक्रंदले .
त्याला कळाले , ह्या काकूंचा गैरसमज झालाय ..म्हणून म्हणाला ,
” मी …मी …अमेय ना…” त्याची जीभ मधेच अडकली कारण कालू तिकडून खुणावत होता . तोंडावर बोट ठेवून गप्प रहाण्याची खूण करत !
” तू ओळ्खलस न मला ? मला वाटलंच की ह्या विध्वंसात देखील ईश्वर माझं भलंच बघतोय! आता कधीच नाही सुटायचा माझ्या हातून तुझा हात !
किती वाळलास रे बाळा! काय काय सोसलं असशील! हे बघ! तुझ्यासाठी तू मागीतलं होतं न , ते जॅकेट , बूट आणि काय काय आणून ठेवलंय ! ….चल !…चल! घरी डोळ्यात प्राण आणून सगळे वाट बघत आहेत .” तिचा आवाज कापरा…..
चंदर हातातल्या पिशवी कडे एकटक बघत असतांना ….कालू मध्ये आला .
” आरं तुझ्या मायनं किती लांबूनच वळीखलं तुला ! …मी म्हणलं हाs …तोच हाय अमेय! …रोज आपल्या माय ला शोधत फिरत असतो . अजून तुमचीच छान छान भाषा बोलतोय बघा! “
चंदर चा जीव घुसमटून गेला होता .
” कालू , तू ..”
” काही बोलू नगस! ….माय विना जिंदगी पाईलिस न ?…..जाय बे, जा की आता! ”
ती कासावीस नजरेने चंदर कडे बघत होती , त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडून…..
” काय झालं अमेय?….तू ओळखलं नाहीस आपल्या मम्मा ला? … तुझा फ्रेंड शिव , लाडका टेडी , आणि तुझा डॉगी , सगळे तसेच आहेत रे ! झुरताएत तुझ्यासाठी ……देवा , तुझी कृपा रे !! ”
तिच्या डोळ्यातील पाणी खंडत नव्हतं .
चंदर ने पिशवी उघडली . त्यात आईचा फोटो नव्हता ! त्याने एकदम वर बघितले .
आपले हात पाठीमागे ठेवून
कालू त्याच्याकडे बघून केविलवाणं हसत होता . त्याची नजर वाचली चंदरनी . आईचा फक्त चेहराच तर बदलतोय न ! असं सांगणारी ,
तू तरी ह्या नरकापासून दूर जा असं सांगणारी .
त्याने कालूला घट्ट मिठी मारली .
रडत रडत गाडीत बसतांना चंदर ने वळून बघितलं .
कालू हसून हात हलवत होता .
गाडी दूर गेली ……कालूच्या पायाजवळ फोटोचे तुकडे विखुरले होते .
गाडी शहराच्या दिशेने भरधाव निघाली….
तिने मनातच देवाला हात जोडले .
‘देवा , तुझ्या कृपेने माझ्या कान्हाला नक्की त्याचं गोकुळ मिळेल , पण तुला वचन देते की मी ह्या कान्हाची आयुष्यभर यशोदा आई होईन.
©अपर्णा देशपांडे
Image by Nasir Akhtar from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
sundar !
धन्यवाद
सुंदर 👍
धन्यवाद