सुशीच्या पल्याड…..
जपानी जेवण म्हटलं की डोळ्यासमोर हमखास उभं राहते ती, सुशी. कच्च्या माशांपासून बनवलेला हा पदार्थ जगभर जपानची ओळख बनून गेलेला आहे. पण जपानी जेवण काही सुशी पे शुरु सुशी पे खतम असा मामला नक्कीच नाही. जपान हा चिमुकला देश पॅसिफिक महासागरामधलं एक छोटंसं बेट आहे. त्यामुळे समुद्राने वेढलेल्या ह्या देशात मासे आवडीने आणि रोज खाल्ले जातात, त्यात नवल ते काय. जपानी लोकांचं मत्स्यप्रेम हे पराकोटीचं आहे. इतकं की जेव्हा ते मत्स्यालयात जातात तेव्हासुद्धा त्यांच्या जिभेला पाणी सुटतं. जपानी माणूस तसा खवय्याचं. जपानी संस्कृतीमध्ये जेवण डोळ्यांनी आधी जेवतो असा एक सार्वत्रिक समज आहे त्यामुळे ते अतिशय कलात्मक पद्धतीने सजवून पेश केलं जातं.
रोजचं जपानी जेवण हे अगदी सोपं, झटपट बनणारं आहे. तळलेलं पदार्थ जपानी लोकं तुलनेनं फारच कमी खातात. पण त्यांचं मत्स्य प्रेम आणि भात प्रेम सर्वसाक्षी आहे. भल्या पहाटे जपानी माणूस जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा तो न चुकता न्याहारी करूनच पडलेला असतो. काहीसा चिकट भात, त्याबरोबर कधी मासे, कधी अंड्याचे काही पदार्थ किंवा काही उकडलेल्या भाज्या असतात. कधी कधी मिसो सूप असते. हे मिसो सूप म्हणजे सोयाबीनच्या पेस्टपासून बनवलेलं सूप असतं. कधी ह्याच्या सोबतीला टोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधापासून बनवलेलं पनीर असतं. ह्याला जपानीत तोफू असं म्हणतात. स्वतःची अशी काही खास चव नसलेला हा पदार्थ आहे. बरेचदा जपानी माणसं पाश्चिमात्य न्याहारी पण करतात. ज्यात सर्वसाधारणपणे अंडी आणि अंड्यापासून बनणारे विविध पदार्थ बनवले जातात. उदा. ओमुराईस. हा एका अतिशय झटपट बनणारा पदार्थ आहे. जाडसर ऑम्लेटच्या गुंडाळीमध्ये आधी सॉस लावून आत पांढराशुभ्र पण चिकटसा भात घातला जातो की झाला ओमुराईस तयार. बरेचदा न्याहारी मध्ये सुद्धा जपानी माणसं मासे खातात. त्यांच्याकडे असं वर, तिथी, वेळ पाळून मत्स्याहार केला जातं नाही. थोडक्यात त्यांच्या संस्कृतीमध्ये शुद्ध आणि सात्विक अशी प्युअर व्हेज थाळी ही संकल्पनाच नाही. त्यामुळे आपला शाकाहार सोडून द्या पण आपण जे दिवस पाळून मांसाहार करणं वगैरे प्रकार करतो ह्या पद्धती त्यांच्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत,
दुपारचे जेवण जपानमध्ये तुलनेनं थोडं लवकर घेतलं जातं. त्यांचा लंच टाईम हा चांगला घसघशीत एक तासाचा असतो. जपानी माणसं कधी आपल्याच डेस्कवर बसून जेवतात. कधी घोळक्याने कँटीन मध्ये जातात. कधी बागेत, कधी छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवतात. पण मी कोणत्याही जपानी माणसाला दुपारच्या ह्या लंच टाईममध्ये घरी जाऊन जेवलेलं पाहिलं नाहीये. जपानी माणसांचं संपूर्ण वागणंच नियमबद्ध असतं. जपानमध्ये नियमांसाठी माणसं असतात. त्यामुळे बाराच्या ठोक्याला म्हणजे ठोक्याला कितीही व्यस्त असलेला माणूस सुद्धा कॉम्युटर किंवा समोरची फाईल बंद करतो आणि सरळ जेवतो. कधी रांग लावून कॉम्बिनी मधून काही घेऊन खातो. तिथे सॅन्डविच पासून जपानी थाळी म्हणजे ओबेंतोपर्यंत सगळं काही मिळतं. वर हे जेवण उभ्यानं सुद्धा खाता येऊ शकेल अशा सोप्या, साध्या पद्धतीने पॅक केलेलं असतं.
जपानचे राष्ट्रीय जेवण करी राईस आहे. पण नावाशिवाय आपल्या आणि त्यांच्या करीत काहीच नाही मिळतंजुळतं कारण ह्यातला मुख्य पदार्थ म्हणजे बीफ. ह्याशिवाय ह्यांची करी होऊच शकत नाही. बरं ह्यात फोडणी वगैरेची भानगड नाही. थोड्याशा म्हणजे अगदीच नावाला कांदा, बटाटा, गाजर घालून केलेली ही गोडसर चवीची गिळगळीत करी आपल्या तरी घशाखालून उतरता उतरत नाही. पण त्यांचे काही पदार्थ मात्र अतिशय चविष्ट असतात. मी करायला सुद्धा शिकले ते, उदा. तेम्पुरा. ही जपानी भाजी इतकी खमंग आणि खुसखुशीत लागतात की क्या कहने. वांगी, बटाटा, कांदा तसंच कोलंबीची भजी फार चवदार लागतात. फक्त ह्यात बेसनाऐवजी तांदुळाचे पीठ जातं वापरलं. असाच अजून एक सुंदर पदार्थ म्हणजे रताळ्याचे काप. रताळी छान, स्वच्छ धुऊन त्याची सालं वगैरे काढून गोलसर कापतात आणि तुपात तळतात. आणि मग त्या कुरकुरीत कापांवर सढळ हाताने मध ओतला जातो, अगदीच अहाहा होऊन जातं बघा.
जपानमध्ये ऋतूनुसार आहार बदलतो. ह्यात काही नवल नाही म्हणा. जगभर तसंच होतं. आणि काही काही पदार्थ त्या त्या ऋतूमध्येच गोड लागतात. पाऊस म्हटलं की कांदा भजीचं येतातं नां डोळ्यासमोर तसं काहीस. अगदी तसंच काही काही पदार्थ एकत्र जमून आले सगळे म्हणजेच करायचे असतात. आपल्याकडे कसं आपण उंदियो किंवा पोपटी किंवा खदखदं करतो. जपानमध्ये तसंच सुकियाकी करतात. हा पदार्थ नाबेमोनो ह्या सदराखाली मोडतो. नाबे म्हणजे भांडं. हे मातीचं असतं. मग ह्यात तुम्हांला आवडणाऱ्या भाज्या आणि आवडणारं मांस घालून केला जातो हा पदार्थ. टेबलाच्या खाली आच पेटवून, सावकाश शिजवून. मग त्या टेबलाच्या सभोवती माणसं छान कोंडाळं करून बसतात आणि कुठल्या कुठल्या जुन्या गप्पा मारतं ह्या सुकियाकीचा आस्वाद घेतात. गप्पा पण मग अगदी चविष्ट होऊन जातात. अजून एक गंमत म्हणजे काही पदार्थ पुरुषांनीच करायचे असतात. आपल्याकडे कसं बघा बऱ्याच घरांमध्ये श्रीखंड करायचं असेल तर तो चक्का पुरुष गाळतात. अगदी तसं. आजकाल विकतचं आणलं जातं तो भाग वेगळा. तर जपानमध्ये पण असं ओमोची बनवली जाते. आपल्या आग्राच्या पेठ्यासारखा दिसणारा हा पदार्थ. चवीला अगदी हलका गोड. म्हणजे जवळपास गोडात जमाचं नाही म्हणा ना. आणि वर चिकट किती. पण मला आवडली ही मोची. ‘ओ’ हा उपसर्ग लावून तिचा आदर केला जातो, जपानमध्ये आदराचं फार कौतुक बाई. महात्म्य म्हणा अगदी. आणि ते अगदी खाद्यपदार्थांना पण होतं लागू. म्हणजे सुशीची ‘ओसुशी’ होते. नशीब खायच्या आधी त्या जेवणाला पण ते तीन तीनदा लवून नमस्कार करतं नाहीत.
असाच अजून एक गंमतीचा आहे एक पदार्थ जो मी सर्वप्रथम पाहिला तेव्हा माझ्या अंगावर काटाच आला फुलून. झालं काय की मी नाहीच खाऊ शकतं मासे, चिकन वगैरे रोज, रोज तर करणार काय. मग दुकानं धुंडाळतं बसण्यावाचून पर्याय नसतो. कारण त्यावेळी तिथे राहणारी अट्टल शाकाहारी भारतीय माणसं दुकान उघडतंय ना उघडतंय की जाऊन तिथे असतील नसतील तितकी सगळी व्हेज सँडविच घेऊन पसार होतं असतं. माशांच्या वासावर टपून बसलेले लबाड बोके जणू. आणि ज्या शिताफीनं रॅकच्या रॅक खाली करायचे ते त्यावरून ते नक्की आपल्याच मातीमधले असणारं ह्यात शंकाचं नाही. तसं सुद्धा आपल्यासारखं शाकाहारी सोवळं ओवळं गोऱ्यांना कुठलं आलंय जमायला. त्यामुळे बरेचदा मी फॅमिली मार्ट मध्ये जाईपर्यंत व्हेज सँडविच संपून गेलेलं असे. मग एकदा असंच भुकेल्या पोटी मी फार काकुळतीने तिथल्या दुकानदाराला विचारलं, “काही शाकाहारी नाहीये का हो?” तर त्याने माझी पंचाईत ओळखून जे आणलं ते बघून रिकाम्या पोटी पण मळमळूनच आलं. त्याला जपानीत म्हणतात ‘ओनिगिरी’. नावाचं काही नाही हो, पण दिसायला अगदी पिंडाचे गोळे बघा वर ताण म्हणजे त्यावर काळे तीळ पण असतात लावलेले. कावळाचं झाल्यासारखं वाटलं एकदम. त्यात एक आंबट चेरी असते. इंग्रजीत cherry on the cake हे चांगल्या अर्थी म्हणतात ना पण इथे सगळाच मामला उलटा. परत हा चिकट भाताचा गच्च गोळा, गडद हिरव्या रंगाच्या पातळ कागदासारख्या दिसणाऱ्या समुद्री शेवाळात गुंडाळलेला. काय बाई तो वास, नाकाला रुमाल लावला मी. हे असलं काही कसं हो खाणार. पण इलाज नसतोच. नंतर नंतर मी चक्क ह्या गोळ्यांवर ताव मारू लागले. पण आधी आलाच होता शहारा अंगभर फुलून…
सुशीच्या खालोखाल जपानात आणि जगात सुद्धा जपानी जेवणात साशिमी प्रसिद्ध आहे. परत एकदा कच्चा मासा. पण अतिशय पातळ कापलेला. इतका सफाईदार की अचंबित व्हायला होतं. पण सुशी आणि साशिमी प्रकरण माझ्यासारख्या बाईच्या खरंच पल्याडचं होतं आणि अजून आहे. आता थोडं नूडल्स बद्दल. म्हणजे जपान म्हटलं आणि नूडल्स बोललो नाही तर पाप ठरेल इतकं हे संवेदनशील प्रकरण. हे म्हणजे कोल्हापूरला जाऊन मिसळ न खाण्यासारखं होईल. किंवा नागपुरात जाऊन आणि ते सुद्धा सीझनमध्ये जाऊन संत्रा बर्फी न खाल्ल्यासारखं. जपानमध्ये आठ प्रकारच्या नूडल्स मिळतात. रामेन ज्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या असतात आणि ज्या चीनमधून जपानमध्ये आल्या असं मानलं जातं, ह्यांना सोबा असं सुद्धा म्हणतात. दुसरा फार चविष्ट आणि लोकप्रिय नूडल्सचा प्रकार म्हणजे गव्हापासूनच बनवलेल्या जाड नूडल्स ज्यांना उदोन म्हटलं जातं. आणि ह्या अतिशय अगदी बर्फासारख्या थंड खाल्ल्या जातात. ह्याचप्रमाणे सोबा, याकीसोबा, सोमेन वगैरे काही लोकप्रिय प्रकार आहेतच अजून. नूडल्स झटपट होतात, पचायला हलक्या असतात, फार काही जिन्नस लागत नाहीत बनवायला म्हणून कदाचित जपान सारख्या देशात त्या लोकप्रिय ठरल्या असाव्यात आणि रोजच्या जेवणात त्यांनी मानाचं स्थान पटकवलं असावं असा आपला एक माझा अंदाज आहे. जपानी माणसं सूप सहित नूडल्स खातात. खातांना वर आवाज काढत खातात. आधी आधी ती मचमच कानांना फार खटके. पण त्यांच्या देशात तसं खाणं म्हणजे चव घेऊन खाणं असं मानलं जातं. आणि देश बदलला संस्कृतीपासून जेवणापर्यंत सगळं काही बदलतचं जातं. हेचं किती खरंय….
Image by Adamsov Production from Pixabay
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
Khub chan article
👌👌
जपानमधील खाद्यसंस्कृती अगदी वेगळीच आहे. 😘