‘लढा’

आॅफिसमधून बाहेर पडल्यावर शाल्मली, पार्किंगमध्ये ग्रेसीच्या गाडीजवळच थांबलेली. ट्रेझरी हेड असलेल्या शाल्मलीचं, खरंतर बरंच आधी आटोपत असे… लाॅजिस्टीक हेड असलेल्या ग्रेसीच्या. पण आज एक्स्चेंज रेट बंद झाल्यावरही बराचवेळ टंगळ मंगळ करुन, अखेर कंटाळून शाल्मली खाली उतरली होती. ग्रेसीला कितीही वाजले असते तरी, शाल्मली आज थांबणारच होती ग्रेसी येईपर्यंत. कारण आज शाल्मलीला अजिबात घरी जायचं नव्हतं, इच्छाच नव्हती तिची आज घरी जायची.
काल रात्री अगदी अंथरुणाला पाठ टेकण्याआधीच, शाल्मलीचं कडाक्याचं भांडण झालं होतं शार्दुलशी. मग शार्दुलही तिरमिरीत उठून, बाहेर हाॅलमध्ये जाऊन झोपला होता. आणि आपणही चिडलोय हे दाखवायला मग, शाल्मलीनेही बेडरुमचा दरवाजा धाडकन बंद केला होता. सकाळी शाल्मली उठली, ती मेन डोअर बंद झाल्याच्या आवाजानेच. पावणे आठ वाजताच शार्दुल आॅफिससाठी बाहेर पडला होता… मुद्दामहूनच लवकर, अगदी चोरपावलांनी आवरत स्वतःचं. भांडण झाल्यानंतरचं हे ठरलेलंच असे शार्दुलचं. शाल्मलीनेही मग आवरायला घेतलं स्वतःचं… मनाशी ठरवुनच की, मला न सांगता गेला ना शार्दुल आॅफिसला लवकर… आता मी ही संध्याकाळी त्याला न सांगताच आॅफिसहून उशिरा येणार. आणि ह्याच तिने केलेल्या निश्चयाची अंमलबजावणी करण्यासाठीच, शाल्मली ग्रेसीची वाट पहात उभी होती.
आॅफिसमधल्या बर्‍याचजणांसाठी, हक्काचं ठिकाण होतं ग्रेसीचं घर म्हणजे. पंचवीस वर्षांपुर्वी जबलपुरहून इथे मुंबईला आलेली ग्रेसी, एकटीच रहात असे तिच्या आलिशान 3 BHK फ्लॅटमध्ये. सात आकडी CTC घेणारी ग्रेसी अनमॅरीड होती… आणि वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीही बेधडक, बेधुंद, बेछूट आयुष्य जगत होती ती. नवी रात्र नवा गडी हा हिशोब असे तिचा. आॅफिसमध्ये अतिशय स्ट्रिक्ट आणि सिन्सिअर असलेली ग्रेसी, आॅफिसबाहेर तेवढीच हॅपी गो लकी होती. तर आज सकाळी आॅफिसमध्ये आल्या आल्याच, शाल्मलीने ग्रेसीला पिंग केलेलं… आजची संध्याकाळ तिच्यासाठी मोकळी ठेव म्हणून. ग्रेसीचे त्याच्यावर थम्ब्स-अप, आणि बिअरच्या दोन आपटणार्‍या ग्लासांचे इमोजीही आले होते. अजून कशी आली नाही ही बया असा विचार शाल्मली करतच होती की, तिला दुरुन ग्रेसी दिसली येतांना. नेहमीप्रमाणेच पंचविशीच्या तीन – चार हँडसम पोरांनी वेढलेली. सिगारेटचे कश मारत येत होती ग्रेसी. पोनी बांधलेले डोक्यावरचे दाट केस, बर्‍यापैकी चंदेरी झाले होते… गोरीपान आणि भुर्‍या डोळ्यांची… रुपयाच्या आकाराचं लालभडक कुंकू… गळ्यात जाडजूड मण्यांची माळ… सैलसर कुर्ता नी खाली पलाझो… मनगटात मोठ्ठालं कडं… दोन्ही हातांच्या अंगठ्यात, पाच – सहा घेर्‍यांची कसलीशी वळी… आणि डाव्या फोरहँडवर एक ड्रॅगनचा टॅटू. वयाच्या पंचेचाळीशीतही कमालीची वाईल्ड तरीही अॅट्रॅक्टिव्ह दिसणारी ग्रेसी, हसतच येऊन समोर उभी राहिली शाल्मलीच्या.
ग्रेसीच्या गाडीपाशी शाल्मलीला उभं बघूनच… ती तीन – चार पोरं विसेक पावलं आधीच पांगली होती, ग्रेसीला बाय करुन. शाल्मलीच्या मनात येऊन गेलं लगेच की, आपण खोडा घातला आज ह्यांच्या रात्रीच्या प्लॅनमध्ये. साॅरी चा पाच – सहा वेळा जप करत, ग्रेसीने शाल्मलीला हग केलं नी अस्खलित मराठीत बोलली ती… “आजच नेमका निघायला उशिर झाला बघ… अगं अगदी आयत्यावेळी काम निघालं… उद्या जयपुरला जायचंय, सो ते काम आजच उरकणं मस्टच होतं”. कंटाळलेल्या शाल्मलीने… ‘इट्स ओके गं’ ची मान हलवत, जराशी नावाला जिवणी पसरवली. ग्रेसीने शाल्मलीकडे बघून… ‘बस कारमध्ये’ अशी डोळ्यांनी खूण केली. आॅफिस ते ग्रेसीचं घर ह्या पाऊण तासाच्या ड्राईव्हमध्ये… ना शाल्मलीने ग्रेसीला काही सांगितल, ना ग्रेसीने तिला काही विचारलं. ग्रेसीने लॅच की ने दार उघडलं. तिच्याकडचे दोन लॅब्रेडाॅर, नेहमीप्रमाणे तिच्या अंगावर आले. त्यांना थोपटण, कुरवाळणं, त्यांचे मुके घेणं वगैरे प्रोग्राम पाचेक मिनिटं चालला मग. आणि त्यानंतर ते दोघेही पुन्हा आपापसात रममाण झाले. शाल्मलीला खरतर चीडच आलेली त्या श्वान जोडीला बघून. ग्रेसीने शाल्मलीला बसायला सांगितलं, नी ती फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन येता येताच, ती दोन ग्लासही घेऊन आली. दोन्हीत स्मिर्नआॅफचा एकेक पेग भरत, ग्रेसीने स्वतःच्या ग्लासात काठोकाठ आईस क्युब्ज टाकले… तर शाल्मलीच्या ग्लासात आॅरेंज ज्युस भरलं. एकमेकींना “चिअर्स” करत दोघींनी पहिला सिप घशाखाली उतरवला, नी ग्रेसी म्हणाली… “हा बेबी… अब बोल… whats the matter?”.
शाल्मलीने आणिक एक सिप घेतला नी बोलू लागली ती… “परेशान करके रखा है यार शार्दुलने. सारखं आपलं जाॅब सोडतो जाॅब सोडतो करत होता. मी म्हंटलं ठिकेय नुसता बोलतोय, nothing to b worried about. पण काल मला झोपायच्या जस्ट आधी सांगतो की, I have put down the papers. I said what? म्हंटलं अरे माझ्याशी डिस्कस करावसं नाही वाटलं तुला? तर म्हणतो… तू कुठे काय सिरियसली घेत होतीस. bullshit man… what serious? Can anyone expect such a stupid thing, from a 40 years old chap? दुसरा जाॅब मिळायच्या आधी, पहिला जाॅब कोणी सोडतं का? हा काय नुकताच MBA झालेला मुलगा आहे का, २३-२४ वर्षाचा? मग झाली जबरी तू तू मै मै आमच्यात. गेला मग तोंड न दाखवता मला आज, मी जागं व्हायच्या आधीच”.
“But have u ever tried to understand the reason behind the step he took? विचारलंस का त्याला एकदातरी?
“काय विचारायचं? ह्याला ऐकून घ्यायची सवय नाहीये गं. अरे ला कारे करणार हा… अगदी बाॅसलाही. आता बाॅसचं ऐकून नको घ्यायला? आपण नाही ऐकत बाॅसचं? आपलं नाही ऐकत स्टाफ? असं कसं चालेल? ह्याचं आपलं एकच टुमणं… एक्स्प्लाॅईट करतात, ह्युमिलिएट करतात… यांव करतात नी त्यांव करतात. अरे तू काय गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कामाला आहेस का, की तुझ्याशी डेकोरम, एटिकेट्स पाळत बाॅस वागेल. Bloody u r in MNC… आणि कोण इथे शिष्टाचार पाळत एकमेकांशी वागतो, बोल ना”.
“And u really think thts the only reason?”.
“अजून काय असणारेय ग्रेसी?”.
“Then let me tell u the correct reason, behind his resignation”.
“And u think u know that”.
“Its a small small world dear. शार्दुलच्या कंपनीला आपल्या कंपनीकडून, एक खूप महत्वाचं असं काॅन्ट्रॅक्ट हवंय. And believe me its too big. ज्यासाठी त्याची कंपनी जाम प्रयत्नही करतीये…  अगदी on war footing. काँपिटिशनमध्ये आणिक दोन कंपन्या आहेत, पण शार्दुलची कंपनी आपल्या सुपर बाॅसेसची योग्य प्रकारे काळजी घेतेय. U know na all that give n take system. Now being a logistics head, माझ्या समोरच घडतंय सगळं… and m telling u, खूप मोठी देवाण घेवाण चालू आहे. Money, Real Estate and… and each others wives also . आणि शार्दुल एकटा ह्या सिस्टिमच्या विरोधात उभा आहे. त्याला ह्या अशा कुठल्याही आडमार्गाने काम करायचं नाहीये. Since he is heading Vendor Procurement unit there, तो काँस्टंटली विरोध करतोय ह्या सगळ्याला. आणि त्यांच्या मॅनेजमेंटला कळून चुकलंय की, शार्दुल वाटेतून हटल्याशिवाय त्यांचा मार्ग मोकळा होणार नाहीये. म्हणूनच गेले काही महिने ते शार्दुलचा, प्रचंड मानसिकरीत्या छळ करतायत. पण शार्दुलही त्यांना पुरुन उरतोय… अर्थात असं मला वाटत होतं. पण तुझ्याकडून कळलं की, त्याने पेपर्स टाकलेत आता. So sad yaar… he must b tired facing all this alone for so long. पण खरं सांगू… त्याला तिथून निघू दे शाल्मली, तेच योग्य आहे. नाहीतर उद्या त्याच्या जिवाचं बरं वाईट करायलाही, हे लोक मागे पुढे पहाणार नाहीत. And if anything bad really happens, God forbid… how u gonna live alone my dear? खरंच पडलीस अशी एकटी कधी, तर काय करशील? मला विचार शाल्मली, एकटं राहणं किती पेनफुल आहे. हे स्वातंत्र्य, नी अपने मर्जीका मालीक वगैरे फुसके बार आहेत बरं… because being alone is good, but being lonely is the worst. अगं म्हणूनच तर मी लॅब्रेडाॅरही दोन घेतलेत, कारण माझ्या माघारी अगदी थोड्यावेळाकरताही त्यातलं कोणी एकटं पडायला नको”.
ग्रेसीकडून ही बॅक स्टोरी कळून… शाल्मलीची चलबिचल झाली, पण काहीच क्षण. प्रयत्नपुर्वक स्वतःला सावरत, खंबिर करत आपलं मन शाल्मली बोलली… “बरं झालं ग्रेसी तू सांगितलीस मला वस्तुस्थिती, निदान आत्ता तरी. आता मीच रिझाईन करते आपल्याईथून. आणि कन्व्हिन्स करते शार्दुलला त्याचं रेझिग्नेशन मागे घेण्यासाठी. त्याला विश्वास देते… रादर आत्मविश्वास देते की, तू जेव्हा कधी थकून भागून घरी येशील… मी असेन घरी तुझ्यासाठी… कायम… तुझी वाट बघत उभी दारात. So now just dont worry… and dont compramise at any cost. कोणाहीसमोर झुकू नकोस… मग तो बाॅस असेल, सुपर बाॅस की सुपर सुपर बाॅस. अरे ला फक्त कारे करु नकोस… तर वेळप्रसंगी गचांडी पकड, अगदी कोणीही असो समोर. पण लढ… लढाई सोडू नकोस. उद्या एकटा पडून हरलास जरी, मी तुझ्यासाठी एका हाकेच्या अंतरावरच असेन… आयुष्याची नविन सुरुवात करायला. चल येते मी ग्रेसी… and thanks a lot darling”.
उरलेला तिसरा पेग एका घोटात संपवला शाल्मलीने, आणि जागेवरुन उठली ती. ग्रेसीने बसल्याजागीच मान हलवत, हातातला ग्लास उंचावला शाल्मलीकडे बघून. आपापसात खेळणार्‍या लॅब्रेडाॅरच्या जोडीकडे बघून, शाल्मलीचे डोळे पाणावले होते आता. आणि ग्रेसीकडून तत्परतेने निघाली शाल्मली तिच्या… अ हं… त्यांच्या घरी जायला, शार्दुल पोहोचण्यापुर्वीच तिथे हजर रहायला.
Sachin Deshpande
Latest posts by Sachin Deshpande (see all)

Sachin Deshpande

नमस्कार, मी सचिन शरदचंद्र देशपांडे राहणार मुलुंड (पुर्व), मुंबई. गेली २२ वर्षे बँकींग सेक्टरमध्ये कार्यरत आहे. वाचनाची आवड अगदी लहानपणापासूनच जोपासली गेली होती, परंतू लिखाणाचा प्रयत्न मात्र गेल्या दोनेक वर्षांपासून करु लागलो. ह्या व्यतिरीक्त सिनेमा, म्युझिक, स्पोर्ट्सची ही आवड आहेच. पण बेकर आणि ग्राफ रिटायर्ड झाल्यावर टेनीस बघणं बंद झालं... आणि तेंडुलकर, द्रविड नंतर क्रिकेट. RD, किशोर, अमिताभ, विजय आनंद ह्या प्रभुतींना देवाखालोखाल मानतो. सध्या जास्तीत जास्त लेखनात जिव रमवणं चालू आहे.

2 thoughts on “‘लढा’

  • August 13, 2021 at 7:59 am
    Permalink

    It’s realistic story 👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!