रिस्क!

एका घरात राहणारी इन-मिन तीन माणसं- हम दो- हमारा एक! कोविडचे वारे सुरु झाले अन सगळं गणितच बिघडलं. सुरुवातीला वर्क फ्रॉम होम त्या तिघांनी छान एन्जॉय केलं. निरनिराळ्या रेसिपीज करून बघ, लहानपणीचे बैठे खेळ मुलाला शिकव, घर स्वच्छ करून ठेव, एक ना दोन सगळे प्रकार करून झाले. मग हळूहळू ऑफिसवाल्यांनी पाश आवळायला सुरुवात केली. अत्यावश्यक सेवेमध्ये दोघांचेही जॉब्स समाविष्ट  झाले. तिचं काम दुप्पट झालं. आधीच कामवाली येत नव्हती, आता घरी आलं की कपडे धुणं, दुसऱ्यांदा आंघोळ करणं, त्यासाठी सकाळीच जास्तीचं पाणी भरून ठेवणं हे ओघानी आलंच. त्यात रोजच्या बातम्या- अमक्याला झाला, तमक्याला झाला, म्हणता म्हणता घरा-घरापर्यंत करोना येऊन ठेपला.

आता ऑफिसवालेही हुशार झाले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन घरच्या घरी चौदा दिवस अस्पृश्यासारखे घरी बसवू लागले. तीच युक्ती इतरांनीही काढली. आपापल्या बबलमध्ये सुरक्षिततेचा आव आणू लागले. वाघ म्हंटलं तरी आणि वाघ्या म्हंटलं तरी… किती दिवस असा घाबरून राहणार ना… आणि होऊ नये तेच झालं!

ह्या दोघांचं लसीकरण झालं तरी लेकाचं झालं नव्हतं. त्यातच हे दोघे दिवसभर नोकरीला जाऊ लागल्यावर त्याला शेजारच्या मावशींकडे सोडणं भागच होतं. मावशी प्रेमानी आजू-बाजूच्या चार-पाच मुलांना सांभाळायच्या. त्यांची भांडणं सोडवणं, शाळेच्या लॉगिनचे प्रकार – जेवण-खाणं, खेळ सगळं लीलया पार पाडत होत्या. आणि त्यातल्याच एकाची टेस्ट पॉसिटीव्ह आली. झालं सगळ्या पालकांनी आपापल्या मुलांना चौदा दिवस वेगळं ठेवण्याचं ठरवलं.

त्यातल्या त्यात हे सगळे सुखवस्तू असल्याने निदान दोन बेडरूम, दोन संडास-बाथरूम असल्यानी ह्या तिघांना अडचण वाटली नाही. लेकानी अजिबात आपल्या खोलीतून बाहेर यायचं नाही असं ठरलं. त्याला जेवण-खाणंही दारातच ठेवून देऊ लागले. सुदैवानी त्याचा ताप फारसा नव्हता, वासही अजून गेला नव्हता. तरीही ते तिघे अतिशय काळजी घेत होते. एकाचाच संपर्क यावा त्याच्याशी म्हणून तीच लेकाचं औषध-पाणी बघत होती. कळत-नकळत का होईना, लेकाशी संपर्क होतो म्हणून त्यानी तिची गादीही हॉलमध्ये टाकायला लावली. तीन खोल्यांमध्ये तिघं जण घरातच एकमेकांपासून लांब झाले. तिचा स्वयंपाक चालू असताना, दहा वेळा तिला हात धुवायची आठवणही करून देत होता, बेडरूमच्या दारात उभं राहून.  सहाव्या दिवशी त्याची टेस्ट करणं गरजेचं होतं. त्यानी तत्परतेने अँपॉइण्टमेण्टही घेऊन ठेवली.

व्हाट्सअँप वरून घरातल्या घरात त्यांच्या गॅप सुरु झाल्या,  “काय गं, त्याला टेस्टिंगला घेऊन जाणार कोण?”

” मी जाईन की. त्या निमत्तानी त्याच्याशी चार शब्द बोलता तरी येतील रे. लेकरू पाच दिवस घरात असूनही आपल्यापासून लांब आहे रे, मलाच करामत नाहीये. आणि असंही तू दुपारची अपॉइंटमेंट घेतलीयेस. तुला उन्हाचा त्रास होतो ना. मग कसं जमेल तुला?”

“बरं बरं तूच जा. तुलाच करमत नाहीये त्याच्याशिवाय. अशीही तुला हौस (!) आहेच बाहेर फिरण्याची. जाऊन ये, तुलाही बरं वाटेल बाहेर पडलीस की.”

“अरे, ह्यात कसली आलीये हौस? असो, मी जाईन त्याला घेऊन.”

तिनी बॉसची बोलणी खाऊन दोन तास ऑफलाईन राहायची परवानगी काढली. मुलाला घेऊन खाली उतरली. आणि रिक्षेला हात करणार तितक्यात लक्षात आलं की पर्स तर घरीच राहिली. त्याला तिथेच सावलीत उभं करून ती पटकन वर गेली. दार लोटलेलंच होतं. नवऱ्याचं फोनवर बोलणं चालू होतं.

“हो ना, आता टेस्ट तर करायलाच लागणार. तरी बरं लेकाचं त्याच्या बेडरूममध्ये आणि माझं आमच्या बेडरूममध्ये quarantine चालू होतं. आता त्या कोविड सेण्टरवर किती गर्दी असेल काय माहिती. त्यात तिकडे सगळे येणारे असेच – कोणाला झालाय- कोणाला नाही काही पत्ता नाही. तिकडे जाऊन आपल्यालाच व्हायचा, काम ना धंदा नसताना. म्हणून मी तर घरीच राहिलो. उगाच कशाला रिस्क घ्या…”

तिनं निमूटपणे पर्स उचलली आणि दार हलकेच लोटून घेतलं.

Image by Thank you for your support Donations welcome to support from Pixabay 

Ketaki Joshi
Latest posts by Ketaki Joshi (see all)

Ketaki Joshi

सतत काहीतरी करून बघण्याची जिगीषा असल्याने- शिक्षणाने इंजिनियर, पण कागदावर खरडत राहणे, डोंगर-कपारी धुंडाळणे आणि योगा शिकणे/शिकवणे ह्यात जास्त रस! अमेरिकेत स्थाईक आणि मनाने सदैव भारतात.

2 thoughts on “रिस्क!

  • September 7, 2021 at 9:39 am
    Permalink

    Kharay tevha lokani ase khup vichitra vagne anubhavle ahe

    Reply
    • September 7, 2021 at 10:03 pm
      Permalink

      Ho na, vichitra paristhitit mansanche khare chehre distat.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!