गुरफट भाग एक
“मला तुझं तोंड पाहण्याची अजिबात इच्छा नाही. पण सृष्टीचा वाढदिवस मी मिस करू शकत नाही.”
“मलाही तुझं तोंड पाहण्यात कुठे इंटरेस्ट आहे……”
“मी संध्याकाळी सहा वाजता, अपार्टमेंटच्या खाली येतोय.”
“……….”
………………………………………………..
मेसेज पाहून, त्याने फोन बाजूला ठेवला. पुन्हा लॅपटॉप वर नजर फिरवली. ओव्हरसीज कॉल सुरू होता. त्याची टर्न येईपर्यंत त्यानं, सिगारेट शिलगावली. धुराची वलयं खिडकीशी सोडताना, त्याला सहज आठवली,……स्वाती……..
बावीस वर्षांपूर्वी होस्टेलच्या गेटजवळ उभी असलेली. इंजिनिअरिंग कॉलेजचं बॉईज हॉस्टेल. बाहेर कल्लेदार मिश्यातले मामा खुर्ची टाकून बसलेले. त्यांना कट मारून आत येणं तिलाच काय पण जेम्स बॉण्डलाही शक्य नाही अशी त्यांची ख्याती होती.
सकाळी सातच्या आसपास चहा प्यायला बाहेरच्या टपरीवर जाणाऱ्यांसाठी तिची गेटवरची बॉबकट हजेरी कुतूहलाचा विषय होती. तसाही मुलींचा दुष्काळ असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुणाची तरी मैत्रीण भेटायला येणं, हा जिवलग मित्राच्या गळ्यात हात टाकून , जवळजवळ त्याचे कान खात चर्चा करण्याचा विषय होता. त्यापैकी कुणीतरी ओळखणाऱ्याने, आत मंगेशला वर्दी दिली.
ती खूप अधीरतेने वाट पाहत होती.
मंगेश धावतच आला. अजून अंघोळ नव्हतीच. शर्टाची बटणं लावत, धावतच गेटपाशी आला.
तिच्या डोळ्यात पाणी…….
घरी भांडण करून आली होती. जवळजवळ घर सोडूनच.
सासवडच्या तिच्या घरी मंगेशविषयी कळलं होतं. त्यामुळं भावानं हात उचलला. आईवडील रात्री उशिरापर्यंत ओरडत होते. तिला सहन झालं नाही. तसंही तिचे बहुतेक कपडे तिच्या होस्टेलवरच होते. उरलीसुरली बॅग भरली अन रामराम ठोकला घराला.
खरंतर आततायी धाडस होतं ते…..
दोघेही लास्ट इयरला होते. अजून जॉब सिलेक्शन बाकी होतं. जमिनीला पाय लागणं बाकी होतं. पण तिला तिच्या अन मंगेशच्या पंखांवर भरोसा होता.
सगळं ऑल वेल होईल ही खात्री होती. तिची पारखी नजर चुकणार नाही ही खात्री होती. सासवडच्या निसर्गोपचार केंद्रात एका युथ फेस्टिवलमध्ये भेट झाली होती.
वादविवाद स्पर्धेत, दणकून भांडले होते एकमेकांशी….. तिने भांडवलशाही अन ग्लोबलायझेशनच्या विरोधात मुद्दे मांडले होते. अन तो पूर्णपणे भांडवलशहांच्या बाजूने उभा होता.
“पैसा है तो सबकुछ है” अशा विचारसरणीचा मंगेश जगात कधी मागे राहणं शक्य नव्हतंच. आणि हे तिला माहीत होतं.
ती वादविवाद स्पर्धा तिने जिंकली होती. पण रमाकांत गुरूजीनी दोघांना नावाजलं होतं. आणि नकळत त्याच्या कोड कौतुकाचं कौतुक तिच्या गालावरच्या लालीत पसरलं होतं. ते मित्रांनी टिपलं अन पुन्हा एकदा श्रमदानाच्या कार्यक्रमात त्यांची भेट घडवून आणली…… मुळशीच्या रम्य वातावरणात.
मनं जुळली, वेव्हलेंग्थ जुळली……. पण वादविवाद स्पर्धा सुरूच राहिली ……. थेट आजतागायत.
हे तोंड न पाहण्याचे मेसेजेस, हे दोघे एकमेकांना कधीतरी पाठवतील, या गोष्टीवर त्या वेळचे, कुणी मित्र विश्वास ठेवणं अशक्य होतं.
स्वातीचं घर तसं मध्यमवर्गीय. पण मंगेशच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. कमवा अन शिका या योजनेतून तो इथपर्यंत आला होता. इंजिनिअरिंग शिकताना शैक्षणिक कर्ज काढलं होतं, त्याचा भार वेगळाच. पण घरची आर्थिक ओढाताण त्याला लवकरात लवकर सावरायची होती.
त्यानं हा विषय तिच्याजवळ त्या दिवशी काढला.
“मी पण नोकरी करणार आहेच न…… मग कशाला काळजी करतोस…..”
संभाजी पार्कच्या त्या झाडा आड, दोघांचं संसाराची स्वप्नं रंगवणं सुरू होतं. कधी संभाजी पार्क तर कधी चतुशृंगी असा स्वप्नांचा प्रवास सुरु होता. मिलनातली आतुरता, दोघांच्याही डोळ्यात साचत होती. पण काही मर्यादा अजून ओलांडायच्या नव्हत्या. एकमेकांच्या बाहुपाशात धुंद होऊन, चतुशृंगीच्या टेकडीवरून, सूर्यास्त पाहताना, मात्र, आयुष्यात समोर दिसणाऱ्या , सगळ्या अडीअडचणी विरघळत जायच्या. दाटलेल्या तिन्ही सांजा त्यांच्या प्रेमाच्या साक्ष व्हायच्या.
पण त्या दोघांवर कुणीतरी लक्ष ठेवून होतं, हे मात्र स्वातीला सतत जाणवत होतं.
………………………………………..
कॉलेजमध्ये हे कपल, जवळजवळ सर्वाना माहीत झालं होतं. अगदी प्राध्यापकांना देखील, कुणकुण होती. कधी एकटा मंगेश दिसला तरी , कुणी तरुण प्राध्यापक त्याला नजरेनं चिडवायचे.
सुरुवातीला कॉलेजमध्ये सतत तिचं सोबत असणं, कधीकधी मंगेशला नको वाटायचं. मित्रांबरोबरची मस्ती तो मिस करायचा. पण हळूहळू ती त्याच्या ग्रुपमध्ये रुळत गेली. सासरी गेल्यावर, नवी नाती निर्माण व्हावीत तशी काही नातीही निर्माण झाली. हीच नाती, त्यांच्या लग्नाच्या धाडसी प्रसंगात, त्यांच्या पाठीशी उभीही राहिली. वेडं वय…… मित्रासाठी, अन आता नव्या वहिनीसाठी, काहीही करायला धजावणारे ते मित्र, त्यांना घरच्यांपेक्ष्या जास्त जवळचे वाटत होते.
आयुष्यात पुढे उभा असलेला संघर्ष, कधी कधी तिच्या डोळ्यांना दिसायचा. अगदी मन सुन्न होऊन जायचं. ते शांत करताना, तिनं कवितांचा आधार घेतला. काही कथाही ती लिहू लागली. कॉलेजच्या मॅगेझिनमध्ये , तिनं लिहिलेलं प्रसिद्ध होऊ लागलं.
“आर्ट्स घेऊन साहित्यिक झाली असतीस तर एव्हाना, एखादा पुरस्कारही मिळाला असता तुला….. किती छान लिहितेस. अगदी आपलंच आयुष्य वाटावं इतकं सहज अन relatable.”
देसाई मॅडम अगदी, भरभरून स्तुती करत होत्या.
पण तिला चांगलं माहीत होतं, कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून ती जास्त कमावणार होती. आणि सध्या तरी तिच्यासाठी तेच महत्वाचं होतं.
अन अशातच, कॅम्पस सुरू झाले. कुणी कुठं कुणी कुठं सिलेक्ट होऊ लागले. वास्तवाची धग , इंटरव्ह्यू मध्येच जाणवू लागली. रिटन , ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, अशी चक्रं आठवड्यात एक दोन वेळा तरी पार पडत होती.
कोणती कम्पनी चांगली, आणि चांगली म्हणजे काय ? पगार जास्त देणारी की वर्षानुवर्षे एम्प्लॉयी सांभाळणारी ………. यातलं काहीही माहीत नसलेली मुलेमुली संघर्ष करत होती. होस्टेलवर चर्चासत्र झडत होती. आपण काय सिलेक्ट करायचं, …… आणि आपल्याला आवडलेल्या कंपनीने आपल्यालाही सिलेक्ट केलं पाहिजे….. तिचे प्रॉडक्ट, पॉलिसी सगळं वेगळं जग होतं. इंजिनिअरिंग सोडून खूप वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत होता.
सिलेक्शन झालेल्यांची लिस्ट दर सोमवारी पोर्च मध्ये लागत होती.
कधी स्वाती , मंगेशच्या इंटरव्ह्यू रुमबाहेर ताटकळत होती तर कधी तिच्या एगझाम हॉल बाहेर तो वाट पहात राहायचा.
त्यांचं भेटणं कमी झालं असलं तरी, एकमेकांच्या सिलेक्शनची उत्सुकता कायम होती. त्यावरच भविष्याचे प्लॅन्स उभे राहणार होते.
अन अशातच एक दिवस, लिस्टमध्ये नाव पाहता पाहता, दोघांनाही समजलं. त्याचं मुंबईच्या एका मोठ्या मल्टिनॅशनल मध्ये अन तिचं पुण्यातल्या हिंजवडीच्या पण बेंगलोर बेस कंपनीत सिलेक्शन झालं होतं.
“मेकॅनिकल इंजिनीअर्सला जितकं मुंबई देते तितकं कुठलंही शहर देऊ शकत नाही…… आणि मॅनेजमेंट मध्ये जाण्याचा रस्ता, मुंबईच्या ब्रँचमधून नक्की सोपा असेल.” मंगेश त्याच्या सिलेक्शन वर खुश होता. अर्थात स्वातीही खुश होतीच. पण तिचा हिंजवडीमधला जॉब एका प्रश्न चिन्हाला लटकल्यासारखं तिला वाटत होतं.
(क्रमशः) ©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
खूप सुरेख
Thanks
Gd 1
Pingback: गुरफट भाग दोन – LekhakOnline – Excellent Marathi Articles