गुरफट भाग चार

मिटिंग नंतर, दोघी जुन्या मैत्रिणी कॅफेमध्ये आल्या होत्या. येणं गरजेचं होतं. कॉलेज मैत्रीण पुन्हा भेटली म्हणून अर्पिता एकसाईटेड होती. अन स्वातीला मात्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची होती.

“कधी केलीस ही कंपनी जॉईन ?”

“आता चार वर्षे होतील जवळजवळ …..”

“काय ? अगं तु जुन्नरमध्ये होतीस ना ? ……”

“काहीही काय ? …. ते माझं माहेर आहे, म्हणून काय मी तिथेच सेटल होईन का ?…… आणि जुन्नरमध्ये काय करिअर ठेवलंय ? तूच सांग मला.”

“तु कधीपासून एवढी करिअर ओरिएंटेड झालीस ?”

“हं, ….. झाले हळूहळू …… तुझ्या सारख्या करिअरिस्ट मैत्रिणी पाहून येतो हुरूप.”

“पण मग मी ऐकलं ते खरं नव्हतं तर ?”

“काय ऐकलं होतंस माझ्या विषयी ?”

“हेच ……. अबाउट डायवोर्स ……”

“हं ….. ते होय …… ते होतं खरं, ……. या बेंगलोर बेस जॉब मुळं , वारंवार भांडणं होऊ लागली होती. दूर राहणं अन संसाराशी एकरूप होणं, दोन्ही गोष्टी जमतील असं वाटत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाद व्हायला लागल्यावर, म्युच्युअल ऍग्रिमेंट वर , सेपरेट होण्याचा विचार दोघांच्या मनात आला होता….. पण एनीवे, ते झालं सॉल्व्ह. नवऱ्यालाच मिळाला …… बेंगलोर मध्ये जॉब. मी पण घेतली माघार. ”

“किती दिवस झाले, सेटलमेंट होऊन?” स्वातीच्या प्रश्नांना , उलटतपासणीचा गंध येत होता.

“दिवस काय ? ….. दोन वर्षे होतील आता….”

तिच्या कॉफीच्या सिप मध्येही प्रचंड आत्मविश्वास होता. स्वातीला तो जास्त त्रासदायक वाटत होता. खोटं वागण्यातसुद्धा किती आत्मविश्वास. बंगलोरला ही अलीकडेच गेलीय हे नक्की…….. पण मी जो मंगेशच्या कॉल मध्ये आवाज ऐकला तो खोटा असणं शक्य नाही. आणि खात्रीने ही तिचा डायवोर्स लपवतेय. मंगेशसोबतचे संबंध लपवण्यासाठीच ही बेंगलोर क्लायंट सोबत आलीय. मला खात्री पटवून देण्यासाठी …की ही जुन्नरमध्ये नसते. ही मंगेश अन अर्पिताची चाल आहे , हे नक्की….. विचार, ….. विचार अन  कॉफी सगळं एकत्र स्क्वॅश होत होतं डोक्यात, भराभर लिंक लागत होत्या गोष्टींच्या …… क्लायंटला मंगेशने सेट केलं असेल, अर्पिताला बरोबर नेण्यासाठी. हो ….. तो हिचा सिनिअर, राव ….. मंगेशच्याच कंपनीत, रशियन प्रोजेक्टवर होता…..  राईट …… येस्स ….. काहीतरी सापडल्या सारखं झालं. या सगळ्या वैचारिक गोंधळात तिने पटकन, अर्पिताचा हात धरला.

“खोटं बोलू नकोस , …… अप्पे.”

“काय , खोटं बोलले ?”

“तुझ्या अन मंगेश विषयी कळलंय मला ….”

“काय ?……” अर्पिता जवळजवळ किंचाळलीच. “हे काय नवीन ? आणि काय कळलंय तुला ?”

“तुला समजतंय मी काय बोलतेय ……” आता स्वातीचा आवाज वाढला होता. तिच्या हाताची पकड अजून घट्ट होत चालली होती.

“Are you sick ?  have you lost your mind  ?”

दोघींचा आवाज वाढत चालला होता. अर्पिताला पळून जावंसं वाटलं, ….. अन ती निघालीही.

ती कॅफेमधून बाहेर पडली. लोक पहात होते. दोघी हाय प्रोफाइल स्त्रियांना असं ओरडताना पाहून, पाहणाऱ्यांची बरीच करमणूक होत होती.

अर्पिता मागोमाग, स्वातीही बाहेर आली. तिच्याकडचे सगळे लॉजिक्स , पुरावे ती सांगत सुटली होती. आणि हे काही तरी विचित्र चालु आहे, अशा भावनेनं, अर्पिता मंगेशचा फोन ट्राय करत होती. बहुतेक तिचा फोन लागला. त्याला सगळं ऐकू  येत होतं. त्याने फोन कट केला.

अन इकडे, स्वातीच्या फोनवर, स्वप्नील रिंग देत होता. तिने फोन उचलला. बोलत बोलतच ती कार मध्ये बसली, अन स्वप्नीलजवळ मन मोकळं करू लागली. बंद काचेआड , ढसढसून रडू लागली.

“आपण भेटून बोलू या , स्वीटू …..”तो पलीकडून शक्य तितकं मृदू भाषेत बोलून, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.

“कुठं, …… भेटायचं ?”

“मी बालगंधर्व जवळ येतो , तू पोहोच तिथं …..”

एवढं बोलून फोन कट झाला. इतक्या वेळात, अर्पिता तिथून सटकली होती.

बालगंधर्व जवळ कार पार्किंग शक्यच नव्हतं. तिनं रुचिरा समोर गाडी शक्य तितकी डावीकडे उभी केली. ड्रायव्हिंग सीटवर बसूनच, ती त्याच्या फोनची वाट पाहत होती.

अन तेवढ्यात, ती समोरून चालत येताना दिसली , …… हो तीच …… स्वप्नीलची बायको, ……. दोन तीन वेळा, ऑफिस समोरच्या हॉटेलमध्ये खूप वेळ गप्पा मारताना, त्या दोघांना तिनं पाहिलं होतं. पण आता इथे, स्वप्नील येणार होता….

मग ……. ही कशी इथे? आता स्वप्नील आला तर त्याची पंचाईत होईल. …… पण हरकत नाही, स्वातीलाही तिच्याशी मैत्री करायची होतीच. बहुधा, हीच ती वेळ. ती पटकन खाली उतरली. दरवाजा उघडतच बोलून गेली,

“हॅलो …..”

“हॅलो, …… मला म्हणालात ?”

“हो …… मिसेस स्वप्नील जामदार ना ?”

“कोण ? …… मी ? …… नाही ….. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ….. कोण स्वप्नील ? …..  मी ती नाही ….” एवढं बोलून ती चालू लागली.

स्वाती गोंधळली…

हे काय चाललंय, हिला स्वप्नीलच माहीत नाही. आणि या दोघांना, मी एकत्र पाहिलंय. ….. दोन तीनवेळा….. असं कसं विसरेन मी…. नक्की काय ? पूर्ण गोंधळलेल्या नजरेनं ती त्या व्यक्तीकडे पहात होती. ती थोडीशी वैतागून , ओरडलीच.

“मग कोण आहात तुम्ही ? …..”

ती व्यक्ती शांतपणे माघारी वळली. जवळ येऊन म्हणाली,

“मी रुपाली …… रुपाली धुळप ……. …… इथं जवळच , मागे आपटे रस्त्याला माझं क्लिनिक आहे.”

एवढं बोलून ती स्त्री आणखी गती वाढवत, चालू लागली. (क्रमशः)

©बीआरपवार

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

One thought on “गुरफट भाग चार

  • September 15, 2021 at 2:18 pm
    Permalink

    Superb twist and turns… Mazach gondhal hotoy…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!