निसरडी वाट- 1

“शेवटी तू सांगितलं नाहीसच ना आईला की आपण लोणावळ्याला जात आहोत सायलीच्या बंगल्यावर?”

शुभ्राने आनंदीला विचारले

आनंदी , शुभ्रा , सायली आणि जुई अश्या चार जीवश्च कंठश्च मैत्रिणी , म्हणजे अगदी शाळेपासून एकत्र. नंतर कॉलेजं बदलली पण तरीही मैत्री कमी नाही झाली. उलट वाढतच गेली. आनंदी आणि शुभ्रा ,ह्या  दोघींनी दहावी नंतर सायन्स घेतलं आणि पुढे त्या दोघी इंजिनिअर झाल्या आणि सायली आणि जुई ह्यांनी कॉमर्स घेऊन त्यांनी पुढे MBA केलं.

आणि आजच्या दिवशी आपापल्या शेवटच्या परीक्षेतून पास आउट झाल्याच्या आनंदात त्या चौघींनी लोणावळ्याला सायलीच्या बंगल्यावर एन्जॉय करयाला जायचे असे ठरवले. आनंदीच्या घरी जरा प्रॉब्लेम होता. म्हणजे तिची आई आनंदीला जास्त कुठे राह्यला वगैरे एकटीला पाठवायची नाही , कारण तिच्या मोठ्या बहिणीने इतर जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केल्यापासून घरात थोडं वातावरण गंभीर असायचं.

“शुभ्रा…. तुला माहीतच आहे ना आई हल्ली किती तणावाखाली असते. बाबांचा रागही अजून गेला नहिये. आपणच चौघी जात आहोत कुठेतरी असं तिला कळलं तर मुळीच जाऊन नसतं दिलं तिने. आणि हि ट्रीप मला मिस करायची नव्हती , कारण ह्यापुढे आपण नोकरी करणार , वेळ मिळेल न मिळेल आपल्याला एन्जॉय करयाला , मला हे चार दिवस तुमच्या सोबत भरभरून जगायचं आहे”

“अगदी योग्य केलंस dear, मुळात तुला न घेता आम्ही गेलो तरी असतो का गं ?, आणि तू आली आहेस तर तुझी जबाबदारी आमच्यावर आहेस, तुला जशी आली आहेस तशी तुझ्या आईच्या हवाली करायची  जबाबदारी आमची …. काय म्हणतेस जुई?”

सायलीने जुईला टाळी देत हसत विचारलं

“yes … सही बोला जनाब आपने…. गेलो तर चौघी नाहीतर नाहीच. आणि जशी आहे तशी म्हणजे गं?” डोळा मारत जुईने सायलीला विचारले आणि चौघी एकमेकींकडे बघून हसायला लागल्या.

सायलीची घरची परिस्थिती खूपच चांगली म्हणजे तिच्या वडिलांचा मोठा  बिझनेस होता , त्यामुळे बंगलाही तिचा आणि आत्ता त्या जात असलेली कारही तिचीच होती.ती  एकुलती एकच होती, ना बहिण ना भाऊ

“अगं पण शेवटी कारण काय सांगितलं आईला” जुईने विचारले

“काही नाही , सायलीची एक काकू राहते लोणावळ्याला तिच्या घरी जात आहोत , असं सांगितलं”

“मग?? …. हो म्हणाली लगेच?”

“छे गं… सायलीच्या आजीचे सहस्त्र चंद्रदर्शन आहे , तब्येत ठीक नसते हल्ली आजीची , सायलीला तिला भेटायचे आहे , मग आम्हीही येतो फिरून वगैरे अनेक कारणं सांगितल , खूप मस्का लावला तेव्हा कुठे हो म्हणाली, आणि बाबांना कालच प्रमोशन मिळालं , त्यामुळे ते हि आनंदात होते… सो आता चार दिवस आपण चौघी आणि फक्त मजा …. no टेन्शन”

आनंदीला ती एक बहिण सोडून एक मोठा भाऊ सुद्धा होता ,पण  तो नाशिकला जॉब करत होता.

जुईला एक धाकटी बहिण होती आणि तिचे वडील डॉक्टर होते आणि आई बँकेत नोकरीला. तशी चौघींच्या घरची परिस्थीति उत्तम होती.

शुभ्राला वडील नव्हते , ती दहावीला असतानाच ते एका अपघातात गेले होते. ती एकुलती एक होती. तिची आई एका मोठ्या फार्म मध्ये जॉबला होती.

मुंबई ते लोणावळा चौघी नुसत्या हसत खिदळत, जुन्या आठवणी काढत होत्या.

जवळजवळ दोन ते तीन तासांनी ड्रायव्हर काकांनी सायलीला जागं केलं

“ताई आला बंगला”

नेमका उतरायच्या वेळी चौघीना बाहेरच्या थंड हवेमुळे डोळा लागला.

“अय्या काय मस्त पाउस पडतोय बाहेर , मी तर भिजणार बुआ”

असं म्हणत जुई दरवाजा उघडून बाहेर येऊन आभाळाकडे तोंड करून दोन्ही हात पसरून अशी उभी राहिली की जणू पावसाला कवेत घेत होती

“जुई बाई आता back ground ला एखादं romantic music वाजून तुमचे स्वप्नील महाशय नाही येणारेत इथे , आणि पहिल्याच दिवशी पावसात भिजून आजारी पडलात तर बाबा पण नाही येणारेत तुझे औषध वगैरे घेऊन”

“स्वप्नील ???काहीही … उगाच काय , तुझं आपलं काहीही , फक्त मित्र आहे तो माझा” असं म्हणून गालावर पसरलेली लाली आणि ओठांवरची लाज लपवत जुई घराकडे जायला वळली”

“हे स्वप्नील प्रकरण आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजेच”

असं म्हणून सायलीने दाराकडे जाणाऱ्या जुईला मागे खेचलं

आनंदी आणि शुभ्रा ह्याना ह्या स्वप्नील बद्दल काहीच माहित नव्हतं कारण सायली आणि जुई एकत्र शिकत होत्या , ह्या दोघी वेगळ्या.

“ए प्रकरण वगैरे काहीही नाही , MBA करताना सोबत होता आमच्या आणि त्याने मला प्रपोज केलं होतं, जे मी नाही स्वीकारलं , पण आम्ही मित्र म्हणून आहोत अजून, तसं तो मला आवडतो , पण मी ‘हो’ नाही म्हटलं आहे कारण एकदा हो म्हंटल की समोरच्याचं प्रेम कमी होतं हे अनेक मुलींच्या बाबतीत बघितला आहे मी”

“बरं. बरं… पण नाही म्हंटल आणि मित्र आहोत म्हणजे काय असते?”

जुईकडे मोठे डोळे करत शुभ्राने विचारले.

“ए जाऊ दे ना सोडा तो विषय , आपण इथे मस्त एन्जॉय करयाला आलेलो आहोत, चार दिवस आहेत आपल्या जवळ हिला छळायला, पण प्लीज आत्ता मस्त फ्रेश होऊ , गणू काकांनी आपली चहा आणि snacks ची मस्त सोय केली असेल , ते घेऊ आणि बाहेर फिरायला जाऊ , काय म्हणताय दोस्त लोग ?

सायलीने असं म्हणत सगळ्यांना बंगल्याच्या आत नेलं.

चहा आणि गरमा गरम बटाटेवडे असा सगळ्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊन त्या चौघी गाडीतून फिरायला बाहेर पडल्या . त्यांच्या आजूबाजूला सगळेच सुंदर सुंदर बंगले होते , आणि आनंदीचे त्यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या एका सुंदर बंगल्याकडे सहज लक्ष गेले . तिथे बाहेर टेबल खुर्ची मांडून गरम चहा आणि खूप लाईट music असा सगळ्याचा आनंद घेत एक मुलगा खुर्चीवर मान मागे टेकून शांतपणे बसलेला तिला दिसला. आणि कसं ते माहित नाही त्याने हि त्याचं क्षणी गाडीतून मान वळवून त्याच्याकडे बघत असलेल्या आनंदीकडे बघितलं आणि एक सुंदर स्माईल दिलं. आनंदीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला तो मुलगा पहिल्या नजरेतच खूप आवडला. तिला मित्र बरेच होते , पण असं कुणी मन मोहरवून टाकणारं कुणीच भेटल नव्हतं. ती दिसायला खूप सुंदर होती. म्हणजे कॉलेज मध्ये तिला सगळे माधुरी दीक्षित असेच चिडवायचे.

तसं तर चौघीही दिसायला सुंदरच होत्या , पण आनंदी जास्त , म्हणून तर तिची आई तिला जास्त जपायची.

“अगं… ए आनंदी मी काय म्हणते आहे , कुठे लक्ष कुठे आहे तुझं”

असं म्हणून तिला शुभ्राने अगदी हात हलवून तंद्रीतून जागं केलं. गाडी खूप पुढे निघून  आली तरीही आनंदी  त्या मुलाचाच विचार करत होती, त्याचे डोळे इतके बोलके होते की ….. तिला खूप काही जाणवलं त्या लांबून दिसणाऱ्या डोळ्यातही

“sorry अगं आईचा विचार करत होते , काळजी करत असेल ना , एक फोन करते तिला”

“मला वाटलं ह्या जुईली सारखं पटवलास की काय कोणीतरी आणि त्याच्याच खयालों में वगैरे , कारण इतकं romantic वातावरण आहे ना …. तर यार कुणीतरी मिठीत घेणारा हवाच”

जुई लाजेनं आणि बाकीच्या खिदाळून हसायला लागल्या.

आनंदीने  आईला फोन करून त्या चौघीही काकुच्या घरी व्यवस्थित पोचल्या असे सांगितले.

“थांबा थांबा थांबा ड्रायव्हर काका …. काय मस्त spot आहे , बघा ना , धुकं आहे पूर्ण आणि ह्या पायऱ्या अश्या खोल खोल खाली गेल्या आहेत…. ए आपण इथे जातोय” असं म्हणत सायलीने गाडी थांबवायला सांगितली

“woow , सहीच” असं म्हणत चौघी घडीतून खाली उतरल्या.

“ताई पायऱ्या निसरड्या झाल्या असतील जरा सावकाश जा” ड्रायव्हर काकांनी काळजीने त्या चौघीना सांगितले.

“हो काका आम्ही एकमेकींचा हात हातात धरून सावकाश जातो , नका काळजी करू तुम्ही”

आणि त्या चौघी हळूहळू पायऱ्या उतरू लागल्या.

“ ए शुभ्रा गाणी लाव ना मोबाईलवर तुझ्या , हे असं पावसाळी धुंद वातावरण , धुकं , हा समोर दिसणारा नजारा , आणि boy फ्रेंड नसला तरी निदान romantic गाणी तरी ऐकू , काय म्हणतेस सायली ?”

“नक्कीच लावते”

शुभ्राने जुनी हिंदी गाणी लावली आणि त्या चौघी गाणं गुणगुणत उतरू लागल्या. शेवटी आनंदी होती आणि काय झालं अचानक कळलं नाही तिचा पाय घसरून ती पडणार एवढ्यात तिला मागून कुणीतरी सावरलं…. तिने मागे वळून बघितलं , तर तो मगाशी त्या बंगल्याच्या बाहेर तिने बघितला तो मुलगाच होता. आनंदीचा तोल गेल्यामुळे ह्या तिघीही थोड्या गडबडल्या आणि भीतीने एकमेकींकडे बघू लागल्या. त्यांनि मागे वळून बघितलं तर तो मुलगा आनंदीला हात धरून सावरत होता.

“sorry , पण मी तुम्हा तिघींना इथे ह्या बाजूला येताना बघितलं आणि का कुणास ठाऊक मला अगदी मनातून वाटलंच की हा spot तुम्ही घेणारच , आणि काही दिवसांपूर्वी इथे एक बऱ्यापैकी एजेड कपल पायऱ्या उतरतांना खोल दरीत पडलेलं मी ऐकलं होतं, तर तुम्हाला इन्फोर्म करणे मला योग्य वाटलं , सो मी नुकताच आलो इथे आणि ह्यांना सावरलं पडताना. मला वाटतं की तुम्ही वरती या , उगाच विषाची परीक्षा कशाला ना?”

अफाट धुकं , भयानक थंडी , भुरभुरणारा पाऊस आणि जस्ट काही सेकांदापूर्वी त्यांना मोठ्या अपघातातून वाचवणारा मागून अचानक आलेला तो तरुण , आणि त्याने थरकाप उडवणारा सांगितलेला प्रसंग . त्या चौघींच्या डोळ्यांतून पाणी येणेच बाकी होते. कुणी बोलायलाच तयार नव्हते. शेवटी सायलीने शांतता भंग केली

“बापरे , खरंच तुम्ही अगदी  देवदूतासारखे आलात हो …. म्हणजे आज तर काहीच खरं नव्हतं .. हि खोल दरी …. बापरे अंगावर कटाच आला हो, खूप खूप खूप thanks , म्हणजे आता आभार कसे माणू हे हि सुचत नाहीये”

“इट्स ओके , तुम्ही सगळ्या सेफ आहात मला ह्यातच आनंद आहे , आणि वर या आता , जोरात पाऊस सुरु होणार आहे. निघायला हवं , कारण ह्या जंगलातला पाऊस फार भयानक असतो”

त्या तरुणाने आनंदीचा आधारासाठी पकडलेला हात अजूनही त्याच्या हातात तसाच होता . ह्या तिघी मागे वळून पायऱ्या चढायला लागल्या तेव्हा गडबडून तिने तो सोडला.

सगळेच एकमेकांचा हात धरून सेफली वर आले.

“तुमचं नाव ? आणि तुम्ही कधी आणि कुठे बघितलं आम्हाला इकडे येताना”

“मी समीर … समीर कुलकर्णी , तुमच्या शेजारच्या बंगल्यात राहतो , चार पाच दिवस झाले मी आलो आहे इथे”

मग त्या चौघींनी सुद्धा आपला परिचय करून दिला. त्याने सगळ्याना hi केलं , पण आनंदीकडे त्याने विशेष लक्ष देऊन तिची माहिती ऐकली. आणि हे तिघींनाही जाणवलं

“ओके ओके तो गुलाबी रंगाचा बंगला का” सायलीने विचारले

“yes तोच”

“मला फार आवडतो तो बंगला , मी नेहमी बाबांना म्हणते की एकदा आतून मला तो बघायचा आहे”

सायली तर गप्पाच मारायला लागली समीर सोबत आणि हे आनंदीला विशेष आवडले नाही.

“नक्कीच नक्की या … म्हणजे उद्या सकाळचा नाश्ता माझ्या बंगल्यावरच करू आपण सगळे , मी वाट बघतो आणि प्लीज कुठे थांबू नका , सरळ घरीच जा” असं तो हसत हसत सांगून गाडीत बसला आणि बंगल्याच्या दिशेने निघूनही गेला आणि त्या चौघीही त्याच्याकडे बघत राहिल्या

“कसला handsome आहे यार हा , लग्न बिग्न नसेल ना झालं?”

सायलीचा tp सुरु झाला . पण आनंदीला तो मनापासून आवडला होता आणि अजून अजून आवडायला लागला होता

“ठीके , इतका पण काही हे नाही” तिने सायलीला उगीच अडवायचं म्हणून म्हंटल

“ए माधुरी दीक्षित , तू तर बोलूच नकोस , मगाशी बघितलं ना गं मुलीनो कसा आनंदीकडे नीट लक्ष देऊन तिची माहिती ऐकत होता , आपली तर नावं सुद्धा नसतील लक्षात त्याच्या …. आणि मगाशी च्यायला एकतर इतका वेळ त्याचा हात तुझ्या हातात होता , इतका जवळ होता तुझ्या तो म्हणजे मला तर वाटतं त्याचे श्वासही जाणवले असतील तुला इतका जवळ होता तो … तर तेरे को कुछ कुछ तो हुआ होगा ना?”

आणि शुभ्रा आणि जुई हं…. हं असं म्हणून तिला चिडवायला लागल्या

जुई तर गाणं म्हणायला लागली

“तुम पास आये …. कुछ कुछ होता है “

आनंदीला हे चिडवणं मनातून खरं तर आवडलेलं होतं, पण उगाचच ती रागाने बोलली

“जुई गप्प बस गं, नाहीतर मी स्वप्नीलला इथे बोलवून घेईन”

आणि चौघीही हसत हसत गाडीत बसल्या कारण पावसाला समीर म्हणला तशी सुरवात झालीच आणि तो पाऊस भयानक होता.

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

2 thoughts on “निसरडी वाट- 1

  • September 22, 2021 at 11:30 pm
    Permalink

    Wah utkantha vadhliye, yeu det next part lavkarch.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!