नैना ठग लेंगे…2
निमिषा ला राहुल आणि नैनाची अवस्था बघून धडधडत होतं.. आणि अशा अवस्थेत तिला परत कसं पाठवायचं यांचही टेन्शन आलं होतं..
गावकऱ्यांनी त्यांना थोडं खायला दिलं, चहा दिला आणि दुपारच्या कलत्या उन्हात परतीचा प्रवास सुरु झाला..
आता कुणीच कुणाशी बोलत नव्हतं.. अनपेक्षित घटनेनं त्या सगळ्यांच्या मनावर एक विचित्र ताण आला होता..
सगळे नचिकेत च्या घरी आले.. झाला प्रसंग काहीही नं लपवता त्यानं आईला सांगितला..
कारण बाबा गेल्यापासून आई आणि त्याच्या नात्याची वीण अधिकच घट्ट झाली होती आणि काहीही झालं तरी एकमेकांना सगळं सांगायचं हा अलिखित नियम होता..
आईनं सगळ्यांना जेवायला कढी खिचडी वाढली आणि त्यांना धीर देऊन त्यांची निजायची व्यवस्था केली..
पिनाक आणि नचि त्याच्या खोलीत,..
आई आणि पोरी आईच्या खोलीत गेल्या आणि
राहुल आणि प्रशांत दोघे ही नचिकेतचे भाडेकरू होते. ते त्यांच्या खोलीत गेले.
नैना आणि निमिषा निजायला काकूंच्या खोलीत आल्या.. काकूंनी मायेनं नैना च्या डोक्यावरून हात फिरवला..
पण ती शांत होती.. जणु स्थितप्रज्ञ…
निमिषा नं ही विचारलं पण ती काहीच बोलली नाही.. निमिषाला वाटलं तिला कदाचित बरं वाटत नसेल..आता नको बोलायला.. उद्या विचारू.. असं म्हणून त्या निजल्या..
*****
आता पिनाक आणि नचिकेत, राहुल पाशी आले.. त्याला नेमकं काय झालं? असं विचारताच तो त्यांच्या कडे एकटक पाहत राहिला.. आणि मग आठवत नाही असं म्हणून तो निजला…
प्रशांत ही निजला.. आणि हे दोघे परत खोलीत आले..
****
राहुल आणि प्रशांत हे दोघे ही भाडेकरू होते नचिचे.. आणि त्यांना नाशकात येऊन 3 वर्ष झाली होती.. हे दोघे ही नाशिकच्या इंजिनिअरिंग कॉलेजात शिकत होते.. एका कॉमन मित्रामुळे त्यांना इथे जागा मिळाली होती.. नचिचे बाबा गेले आणि मागे हा मोठा बंगला आणि एक जमिनीचा तुकडा इतकीच इस्टेट ठेवून गेले.. नचि शाळेत होता.. आईनं शिक्षिकेची नोकरी धरली आणि घर सावरलं.. तेव्हापासून सोबत आणि पैशाची अडचण सोडवायला त्यांनी आउट हाऊस भाड्यानी द्यायला सुरवात केली… गेली 2वर्ष राहुल आणि प्रशांत राहत होते.. मुलं ही चांगली होती.. मदतीला कायम तयार.. नचि पेक्षा एकच वर्षानी मोठी…
नैनाला हे सगळेजण ठाऊक होते आणि ती एक दोनदा भेटलीही होती पण प्रत्यक्षात असं इतक्या वेळासाठी भेटणं आजच झालं…
आणि त्यात आलेला हा अनुभव…
***
खोलीत परत आला तरी पिनाक च्या डोक्यातलं विचारचक्र थांबत नव्हतं..
राहुल सापडत नव्हता, नैनाला त्यानं वाचवलं कि तिच्या बाबतीत काही वावगं घडलं? हा कसा इतक्या लांब गेला? यातल्या एकाही प्रश्नाची उकल झाली नाही..
नचि झोपलाय याची खात्री करून पिनाक उठला..
त्यानं त्याच्या बॅगेतलं व्याघ्रजीन काढलं.. आसनाला नमस्कार केला..
जमिनीवर मंडल केलं.. त्यावर आसन ठेवून तो पद्मासनात बसला.. समोरच्या भिंतीवर नवनथां चा फोटो होता.. त्याकडे पाहत नजर स्थिर केली आणि काही क्षणातच त्याने डोळे मिटून त्याची साधना सुरु केली..
नियतीनं एकवार त्या घराकडे नजर टाकली आणि ती छद्मी हसत पाहत राहिली…
##नक्की काय घडलं त्यांच्या बाबतीत ?
##पिनाक नेमकी कसली साधना करतोय?
©मनस्वी
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Next part keva taknar?