प्रिय…
प्रिय…..
फिरून फिरून कंटाळले आज. खरंतर खूप बघण्यासारखं आहे इथे. शॉपिंग, फिरण्याची ठिकाणे……. अविनाश खूप खुश आहे. दिवसभर बडबड करत, हसवत असतो. त्याचं मन राखायला हसते पण मनापासून हसत नसते रे…. आपण ठरवलं होतं इथे यायचं हनिमून ला…… काय काय बघायचं, काय काय करायचं याची जंत्री तयार होती आपली. आता पदोपदी तुझी आठवण तर आहे पण तू नाहीस. कुठे आहेस रोहित ? का नाहीस तू माझ्या बरोबर ? नुसते प्रश्नच आहेत. उत्तरं कशाचीच नाहीत.
प्रिय……
तू हनिमून ला गेल्याचं कळलं. तेसुद्धा आपल्या आवडत्या ठिकाणी. How could you, शिवानी ? मी तरी इतका आजारी पडलो… मेलो का नाही ? नाही….. असा विचार करून चालणार नाही मला. आईसाठी, पिंकि साठी जगावं लागणार….. सध्या फार अशक्तपणा आलाय. शरीराला आणि मनाला पण !
काम नाही, अंगात शक्ती नाही. नुसतं पडून राहायचं. त्यातल्या त्यात मनाला विसावा म्हणजे रोज भेटायला येणारी गायत्री. गायत्री खरंतर तुझी खास मैत्रीण. आपली पत्र पोचवणारी, आपल्यासाठी तुझ्या घरी खोटं बोलणारी….. शांत, सरळ मनाची. मी आजारी आहे असं कळल्यावर मला खूप मदत केली तिने. ती आणि यशवंत यांच्यामुळे मी आज जिवंत आहे. पण शिवानी, तुझ्याशिवाय अर्थ वाटत नाही गं कशातच ! कुठे आहेस तू शिवानी….
माझ्याबरोबर का नाहीस…..
प्रिय……
नवलाई संपून रुटीन सुरु झालंय. आणि खरं सांगू… अगदी सुटल्यासारखं वाटतंय. नको नको झालेलं…. आता अविनाश बराच वेळ कामासाठी घराबाहेर असतो. सारखं खुश असल्याचं, मजेत असल्याचं, त्याच्या प्रेमात असल्याचं नाटक करावं लागत नाही. नाटक नाही तर काय…… नाटकच ! मला वाईट वाटत त्याच्यासाठी. त्याचं प्रेम आहे खूप माझ्यावर. जीवापाड जपतो मला. पण माझ्या मनाविरुद्ध मी नाही प्रेम करू शकत त्याच्यावर. पण मग नाटक मात्र करते. आपली स्वप्न पूर्ण झाली नाहीत म्हणून मला त्याचं आयुष्य खराब करण्याचा काय हक्क आहे ? He is a nice soul…..
कुठे आहेस रोहित ?
काल पाऊस पडला तेव्हा माझी आठवण आली का माझी ?
गाणं ऐकलंस आपलं ?
छम छम बरसे घटा…घुंगरू बजाती है हवा….. आजा रे…..
प्रिय……
काल दिवसभर पाऊस पडत होता. आणि मी दिवसभर मी आपलं गाणं loop मध्ये ऐकत होतो. दुपारी गायत्री आलेली औषधं द्यायला. सारखं तेच गाणं ऐकून म्हणाली….. माझं आवडतं गाणं ऐकवते तुला. आणि तिनी तिच्या सुरेल आवाजात ” ओ सजना, बरखा बहार आयी” सुरु केलं. लयीत पडणारा पाऊस आणि तिचा घुंगराच्या नादाचा आवाज….. पाऊस हसायला लागला जणू !
प्रिय…….
काल दिवसभर पाऊस आणि तुझी आठवण यात गुंग होते. अविनाश खूप भिजून आला. अगदी चिंब ! मग त्याला मस्त आल्याचा चहा दिला करून. तू करायचास ना… अगदी तसा ! खुश झाला तो अगदी ! त्याला नंतर खूप सर्दी झाली. मग त्याला विक्स लाव, गोळी दे…. यातच संध्याकाळ गेली. गोळी दिल्यावर माझ्या मांडीवर शांत झोपलेला. अगदी लहान बाळासारखा दिसत होता……तसाच आहे स्वभावाने…. निरागस….
प्रिय……
आज सकाळी गायत्री भेटली बस स्टॉप वर. तेव्हाच वाटलं, आज काम होणार ! आणि तसंच झालं शिवानी…. नोकरी मिळाली मला ! आपलं एक स्वप्न पूर्ण झालं शिवानी…. मला मुंबईत नोकरी मिळाली ! पहिले हि बातमी आईला सांगितली फोन करून. इतकी इतकी आनंदी झाली ती…. काय सांगू तुला !
मग पेढे घेऊन सरळ यशवंत च्या घरी गेलो आणि तिथून गायत्री च्या ऑफिस वर…. गायत्री म्हणाली, “मला खात्रीच होती “.
तुला पेढा द्यायचा होता शिवानी….. पण कसा देणार ? म्हणून तुझ्या गणपतीच्या मंदिरात ठेवला. शंभरदा विचार केला, तुला फोन करून सांगावी हि बातमी…. पण आवरलं स्वतःला….. तुला कळलं असेल का शिवानी?
प्रिय……
बंगलोर हुन परत आले. तिथे अविनाश च सगळं कुटुंब असतं. आई, वडील, भाऊ, वहिनी, पुतणे…
आपल्या माणसात आणि कामाचा स्ट्रेस नसल्याने एक वेगळा अविनाश भेटला मला. हळुवार, थोडा शॉर्ट टेम्पर असला तरी लगेच शांत होणारा.
त्याला आपल्या बद्दल सगळं माहित होतं रोहित ! मी नाटक करतेय हेही माहित होतं. पण कधी जाणवू दिलं नाही मला त्याने.
आणि खरं सांगू….. नाटक मागे पडलंय आता. हळूहळू आवडू लागलाय तो मला या दीड दोन वर्षात !
इलाज नाही रोहित…. we have to move on….
तुही झाला आहेस…. कळलंय मला. लग्न करतो आहेस ना गायत्रीशी ? खूप शुभेच्छा…..
नीट रहा रोहित…. मजेत जग….
आता साद देणार नाही तुला. जिथे असशील तिथे मजेत आहेस असं समजीन मी…..
तुम्ही असंच समज….
तुझी
शिवानी
-मंजिरी प्रसाद देशपांडे
Gd 1…
Life goes on…
khup chhan .. kay karnar kadhi kahi nailaj asto..
astonishing ! apratim !