नैना ठग लेंगे…९
पिनाक ला आता पावसाच्या जोरानं बेजार केलं.. एका ठिकाणी त्यानं गाडी थांबवली.. बाजूला आडोसा दिसला... त्यानं गाडी त्या बाजूला घेतली.. नीट पार्क केली आणि तो उतरला.. समोरचा रस्ता हि दिसेना इतका जाड पावसाचा पडदा होता त्याच्यासमोर.. रस्त्याच्या पल्याड दरीं होती.. थोडावेळ तो तसाच पाऊस पाहत राहिला आणि अचानक त्याला समोरच्या बाजूनी कुणीतरी येतंय असा भास झाला... त्यानं डोळे चोळले... नजर स्थीर केली आणि हळूहळू एक उंच आकृती त्याच्या दिशेने चालत येताना दिसली.. काही क्षणात ती व्यक्ती समोर आली... अंगावर घोंगडी हातात उंच काठी, बलदंड यष्टी, झुपकेदार मिश्या आणि दाढी... डोळे मात्र उग्र, लालसर... भव्य कपाळावर बुक्का आणि गंधाचे नाम.. पिनाकला एकवार पाहून तो त्याच्या मागे गेला... पिनाकला जणू त्या नजरेनं काबीज केलं.. अचानक आत खूप शांत वाटू लागलं.. नजरबंदी झाली आणि तो यंत्रवत त्याच्यामागे चालू लागला... इतका वेळ उभं राहूनही त्याचं, मागे काही लक्ष गेलं नव्हतं..मागे एक वाट होती.. अरुंद काहीशी जंगल पायवाट... .. बराच वेळ चालल्यावर त्याला एक डोंगर दिसला.. ऐन जंगलात एक छोटासा डोंगर.. पाहता पाहता ती व्यक्ती तो डोंगर चढू लागली आणि एका कपारीत शिरली.. पिनाक ही तिथंवर पोचला.. वाकून आत गेला.. आता पाऊस थांबला होता.. पण डोंगराच्या आसपास धुकं दाटलं होतं.. ही जागा अघोरीं उपासना करणाऱ्या साधूंची होती... पिनाक नी आत बसलेल्या साधूंना नमस्कार केला.. आणि समोरच्या शंकराच्या पिंडीला साष्टांग नमस्कार केला.. एका साधूनी त्याला समोर बसायला सांगितलं.. आणि त्याच्या कडे पाहत डोळे मिटले.. काही क्षण तसेच गेले.. मग डोळे उघडून त्यांनी पिनाक कडे पाहिलं.. नाथ दिक्षा मिळावी म्हणून तळमळतोयस ना? हो.. पिनाक नी तितक्याच शांतपणे उत्तर दिलं.. पण एक कार्य घडणार आहे तुझ्या हातून आणि तें केल्याशिवाय तुला दिक्षा मिळणार नाहीं.. अनुग्रह मिळावायचा तर परीक्षा ही द्यावी लागेल. काय कराव लागेल? आज इथेच थांब.. साधना कर.. तुला ध्यानात मार्ग मिळेल.. पिनाक नी पुन्हा नमस्कार केला आणि तो उठणार इतक्यात त्यांनी त्याच्या गळ्यात एकमुखी रुद्राक्षाची माळ घातली.. ही बळ देईल.. आणि मार्ग ही दाखवेल.. ती माळ पाहून तो गहिवरला.. समोरचा साधू हा नाथ संप्रदायातलाचं असावा याची त्याला मनोमन खात्री पटली..आणि त्याची नजरबंदी भंगली.. तो तिथल्याचं एका आसनावर बसला.. दिग्बंध केला आणि ध्यान लावलं.. समोर दिसणारा धुरकट प्रकाश हळूहळू विरून गेला.. आता प्रचंड वेगाने तो प्रवास करताना दिसला... आणि समोर एक विशाल वृक्ष.. अफाट उंचीचा.. तो अलगद त्याच्या बुंध्याशी पोचला.. त्या वृक्षाच्या मुळाकडे जाणारा एक रस्ता होता.. तो त्या दिशेने निघाला.. आत मिट्ट अंधार, ओलसर मुळं, निसरडी वाट.. पण तरीही एक अंधुक प्रकाश. एका क्षणी त्याचा तोल गेला आणि आधाराला एक मूळ हाताशी आलं.. त्यानं तें घट्ट धरलं आणि खेचून हाताभोवती गुंडाळलं.. त्याला समोर एक वेलिंनी वेढलेली स्त्री दिसली.. तिची काया त्या वेलिंच्या घर्षणानं सोलवटली होती.. एक पुरुष तिच्या समोर बसून विचित्र हातवारे करत होता.. आणि त्या वेदनेनी ती स्त्री व्हिवळत होती.. पिनाक हे पाहून चिडला.. त्या पुरुषासमोर येऊन उभा राहिला.. पण त्या समोरच्या दृष्यात आणि पिनाक मध्ये एक अदृश्य पडदा होता.. आणि मुळात तिथे पिनाक चं स्थूल नाहीं सूक्ष्म शरीर होतं.. पिनाक पुन्हा माघारी फिरला.. आता तें दृश्य पालटू लागलं.. ती स्त्री त्या वेलिंशी खेळत होती आणि तो बसलेला पुरुष यातनांनी तडफडत होता.. ***** वरद ला ही वाटेत पावसाने गाठलं पण तो विलंबानं का होईना पण मुंबई ला पोचला .. त्यानं मुद्दाम त्याचं ड्राइव्हरं ला सोबत नेलं होतं.. दादरच्या हिंदुजा कॉलनीत एक दिमाखदार बंगला होता.. विश्रांती नावाचा.. विभा चे वडील रणविजय भालेराव हे नामांकित वकील होते.. विभा च्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाला उगीच चर्चेचा विषय करायला नको या हेतूनी त्यांनी तिचं नावं पोलीस रेकॉर्ड मधून हटवलं होतं.. पण सध्या होणारा तिचा त्रास पाहून त्यांना ही आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी हे पटलं होतं.. आणि म्हणूनचं त्यांनी इन्स्पेक्टर वरद ला बोलवून घेतलं.. वरद आत आला.. विभा तिच्या आईच्या बाजूला बसली होती.. पण प्रचंड घाबरलेली दिसत होती.. तिच्या समोर एक डॉक्टर आणि नर्स उभे होते.. ती थरथरत होती.. डॉक्टरांनी तिला विचारलं.. काय होतंय विभा? ती.. ती ss जीव घेईल माझा.. वाचवा... वाचवा.. तिचा एकच धोषा चालू होता.. तिने मारलं.. सुमित, अजय, राज.. आम्हा सगळ्यांना तिनेच मारलंय... ती.. ती हिरव्या डोळ्यांची, हिरव्या अंगाची बाई... नजरेनं ती आग ओकत होती.. तिच्या अंगातून लालपारंब्या बाहेर आल्या.. आणि त्या आमचा गळा आवळू लागल्या. हो मी पाहिलंय तिला... तीच होती... बाबा वाचवा मला.. ती जीव घेईल माझा.. तिचं बोलणं ऐकून काहीच बोध होतं नव्हता.. शेवटी डॉक्टरांनी तिला झोपेच इंजेक्शन दिलं आणि वरद तिच्या वडिलांशी बोलून तिथून बाहेर पडला.. ****** नैना ची आई खाली गेली आणि नैना नी एकवार आरशात पाहिलं.. आणि ती कपाटातली पितळी मूर्ती बाहेर काढली.. ती समोर ठेवून तिने डोळे मिटले आणि काहीतरी पुटपुटू लागली.. पाहता पाहता मूर्ती बुरसटलेल्या हिरवट रंगात परावर्तीत झाली.. नैना नी डोळे उघडले.. त्या मूर्ती मध्ये आणि नैनामध्ये एक समांतर हिरवट धुकं दाटलं..आणि त्यात काही आकृत्या दिसू लागल्या... त्यातली सगळ्यात पहिली आकृती एका 22 वर्षाच्या मुलाची होती.. हा होता तिच्या शाळेतल्या प्रिन्सिपलचा मुलगा.. त्यानं नैनावर कॉलेजमध्ये असताना तिचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न केला.. तेव्हा ती काहीच प्रतिकार करू शकली नव्हती..त्या नंतर तो परदेशीं गेला पण गेल्या वर्षी तो परत आला. गेट टुगेदर मध्ये नैना ला तो दिसला.. आणि त्या नंतर अवघ्या दोनच दिवसात त्याचा मृतदेह आरे कॉलनीत सापडला.. वन्य प्राण्याचा हल्ला अशी नोंद करत तपास बंद झाला... आता या आकृतीला नैना नी खिडकीतून समोर दिसणाऱ्या पिंपळावर एका वेलीच्या रूपात कैद केलं.. पुढची आकृती होती एका वयस्कर पुरुषाची... साठीच्या आसपास.. काहीसं स्थूल यष्टी.. हा होता नैनाचा शेजारी, सतत तब्येतीची कारणं सांगून तिला मदतीला बोलवायचं..आणि तिला नकोसे स्पर्श करायचे... एक दिवस तो हि गेला.. पिसाळलेलं कुत्रं चावून मेला म्हणे... आणि पुन्हा एकवार हि हिरवी वेल पिंपळावर चढली आणि सुकली...मग दिसला राहुल... नचि चा मित्र... तो ही तसाच गेलेला.. आणि आता एक मूर्तीचा साचा बाहेर आला.. कुणाचा बळी जाणार होता..?? नैना लाअचानक कसलीशी चाहूल लागली आणि तिने तें सगळं एका क्षणात पूर्ववत केलं.. तिचं जेवणाचं ताट घेऊन अम्मा वर आल्या होत्या.. तिने ताट घेतलं आणि हसून अम्माला निरोप दिला.. टेबलावरचा मूर्ती चा साचा मात्र अम्माच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही.. #विभा कुणाचं वर्णन सांगतीये? #वरदचा यावर विश्वास बसेल? #पिनाक ला परीक्षा कळेल? #नैना कोण आहे? क्रमश : ©मनस्वी
Latest posts by gangal_manasi (see all)
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021