भातुकली
गावचं घर पावसात पडल्याची बातमी ऐकली आणि मुग्धा च्या डोळयात पाणीच आलं. एक अनामिक हुरहूर दाटून आली. शंकराचं मंदिर, अंगण, बिट्ट्यांचं झाड, घर आणि विहीर. या परिसरात घालवलेल्या असंख्य उन्हाळी दुपारी. सुट्ट्यांचे शांत दिवस, वाड्यातल्या मैत्रिणी आणि त्यांच्या बरोबर केलेल्या उनाडक्या. मोबाइल, टीव्ही च्या आधीचे दिवस ते. गावात आजी आजोबांसोबत घालवलेल्या कितीतरी सुट्ट्या तिला आठवल्या. कोणाशी तरी बोलावं, मन मोकळं करावं म्हणून तिनी चुलत बहिणीला फोन लावला.
“निमा, कळलं का तुला ? घर पडलं ते ? ”
” गावचं ना…. हो कळलं ना….. पण मागच्याच वर्षी हे म्हणाले होते कौलं उखडली आहेत, डागडुजी करायला हवी… पण बाबांनी आणि भाऊनी लक्ष पण दिलं नाही. किंमतच द्यायची नाही इतरांना….. काय बोलणार मग ? असच होणार… ”
निमाचा तोफखाना सुरु झाला…. मागून नरेन भाऊजींची टिप्पणी ऐकू येत होतीच. मुग्धाला काही बोलावसं वाटेना.
तिनी मग भाऊला फोन लावला.
” बाबांची भुणभुण चालूच होती दुरुस्ती बाबत. आता तूच सांग मुग्धा, मला माझे व्याप कमी आहेत का ? सोहम पुढच्या वर्षी US ला जायचं म्हणतोय पुढच्या शिक्षणासाठी. तो एवढा मोठा खर्च आहे….. पण त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे….. आहे मुलगा हुशार…. करायला पाहिजे. त्यानंतर साक्षी पण इंजिनीरिंग ला जायचं म्हणते…… फिया कमी आहेत का ?
मला शक्यच नाही सध्या… ”
“पुन्हा होईल का रे बांधून कधी ? ”
” हे बघ, मी तरी सध्या यात नाही….. मला जमणार नाही स्पष्टच सांगतोय. आठवणी काढायला, मजा करायला सगळे आहेत. खर्च काढला की भाऊ आठवतो सगळ्यांना… ”
भाऊची गाडी वेगळ्याच ट्रॅक वर जाऊ लागली तशी मुग्धा ने फोन ठेवला. त्याचं चूक होतं असं नाही पण मुग्धा ला काय म्हणायचं होतं त्याला कळतच नव्हतं.
आई ला फोन करण्यात अर्थच नव्हता. पक्की मुंबईकरिण आई. आजी आजोबांसाठी त्या छोट्या खेड्यात कशीबशी येत असे. अजिबात आवडत नसे तिला तिथे.
पण मुग्धा ला गावात फार आवडत असे. आजी आजोबांबरोबरचे ते शांत, स्निग्ध आयुष्य. गावात आजोबांना असणारा मान, येणारी जाणारी माणसं आणि मनावर साचत जाणारा निवांतपणा……
तिच्या रक्तातच असावं ते….. बाकीच्या कुठल्याच भावंडांना गावची फार ओढ नव्हती. म्हणजे मुग्धा इतकी नव्हती.
मुग्धा मनाने तिच्या लहानपणात गेली.
गावचा उरूस……. ग्रामदैवत खंडनारायणाचा वार्षिक उत्सव. वाड्याच्या खालच्या बाजूला देऊळ होतं. देवळाच्या परिसरात इतर भग्न मंदिरे होती. गणपतीचं, देवीचं….. देवीच्या देवळा समोरून नदी वाहत होती आणि काठावर बकुळीच झाड होतं. इतर वेळी हा सगळा परिसर निर्मनुष्य असे. अशावेळी तासंतास त्या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचणे हा मुग्धा आणि वाड्यातल्या मुलींचा आवडता छंद होता.
उरुसाच्या वेळी मात्र सर्व परिसर सजवलेला असे. जत्रा असे. गावचं एकूणएक माणूस उरुसात आणि जत्रेत येत असे. आकाशपाळणे, खेळणी, गुडी शेव आणि रेवड्यांची दुकानं….
अशाच एका उरुसात आजोबांनी तिला भातुकली घेतलेली. आजीनी घरातला एक कोपरा तिची भातुकली मांडायला दिलेला. ती तिची जागा होती. तिचा कोपरा……
अजूनही खूप अस्वस्थ असली की तिला त्या कोपऱ्यात भातुकली खेळत असल्याची स्वप्न पडत असत.
तिची आवडती जागा आणि आजी आजोबा आजूबाजूला असल्याची आश्वासक जाणीव.
दिवसभर मुग्धा जुन्या आठवणीत भिरभिरत राहिली. मनाची घालमेल आता कुणापाशीही बोलायची नाही असं तिनी ठरवलं. हात सवयीने कामं उरकत होते. मुलांचा अभ्यास, वयस्क सासर्यांचं करणं, घरचं काम…..
नवरा टूर वर गेलेला. नाहीतर त्याला हि घालमेल नक्की समजली असती. मुग्धाने परेशला मेसेज करून ठेवला.
सगळं आटपून रात्री झोपेची तयारी करताना मुग्धा चा फोन वाजला,
” हॅलो, काय तायडे… कशी आहेस ?”
” बरी आहे बाबा….. आपलं घर….. ”
मुग्धा ला हुंदका फुटला.
” वाटलंच मला…. तूच फक्त हि गोष्ट मनाला लावून घेतली असणार….म्हणून मुद्दाम केला फोन….. जुन्या गोष्टी काळाआड होणारच तायडे…. आठवणी आपल्या असतात फक्त . त्याच जपायच्या.”
” बाबा…… ”
” अगं, लहानपणी भातुकली खेळायचीस तू…. आठवतंय ? आता राहिली का ती भातुकली ? पण आठवण आहे की नाही घट्ट ? तसंच हे……आपलं घर…. नवीन बांधणं सध्या तरी शक्य दिसत नाही. आणि बांधलं पुढे मागे, तरी तुझ्या मनातलं पूर्वीच घर नसणार ते…. त्यामुळे ते जुनं घर, आजी आजोबा यांना तुझ्या मनातच जपून ठेव. तुझ्या भातुकली सारखं…… ”
मुग्धा च्या ओठांवर हसू होते आणि गालावरून आसवांच्या धारा वहात होत्या……..
मंजिरी प्रसाद देशपांडे