भेट
ताडा माडांच्या रस्त्यातून , दूरवर पसरलेल्या गच्च ओल्या हिरवाईतून झोकदार वळण घेत जाणारी रेल्वे त्या हिरवाईच्या गळ्यात घातलेला हारा सारखी दिसत होती . डब्याच्या खिडकीतून लहान मुलासारखी सगळं विसरून विद्या एकटक बाहेर बघत होती . खिडकीला चिकटून बसल्याने तिचं चपटं झालेलं नाक बघून विवेक ला हसू आलं .
त्याला हवी होती अगदी तशीच होती विद्या . लहान गावात वाढलेली , निरागस , तरीही शहरात सराईतपणे नोकरी करणारी . दाट काळ्या केसांची वेणी घालून कपाळावर मोठ्ठी टिकली लावणारी , चेहऱ्यावर प्रसन्न लक्ष्मी सारखं हसू असणारी…टवटवीत मोगऱ्याच्या फुलासारखी .
तिला पहिल्यांदा बघायला विवेक आणि राजस केळशी ला गेले होते , तेव्हा मुद्दाम सांगितलेल्या वेळेच्या खूप आधीच तिथे पोहोचले होते . माया मावशीने विद्याचं केलेलं वर्णन त्याला मोहवून गेलं होतं . आजच्या ‘सुपरफास्ट’ 5 G इंटरनेटच्या काळात कुणी इतकी साधी पण शिकलेली मुलगीही असू शकते याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं . अचानक जाऊन तिला कुठल्याही कृत्रिम साजाशिवाय
बघायचं , भेटायचं असं त्याच्या मनात होतं .
ते दोघे केळशी ला पोहोचले , तेव्हा सकाळचे साधारण अकरा वाजले असतील . नाईकांचं घर म्हटल्यावर कुणीही सांगेल अशी परिस्थिती होती . सुंदर दौलदार कौलारू घर , भोवती देखणी बाग , नारळी पोफळी ची दाटी , आणि सारवलेलं अंगण …अगदी चित्रातल्या सारखं घर . दोघं फाटकातून आत गेल्या बरोबर वरून धप्पकन एक चुंगडं येऊन पडलं . विवेक झटक्यात बाजूला सरकला म्हणून नाहीतर कचऱ्याचा अभिषेक झालाच असता . त्याने दचकुन वर पाहिलं , तर वर कमरेला ओढणी बांधलेल्या आणि केस विस्कटलेल्या अवस्थेत एक चुणचुणीत मुलगी उभी होती . त्या क्षणातच त्याच्या मनाला मोहवून गेलं तिचं ते रूप .
” कुठे गेला हा दिन्या ? त्याला म्हटलं होतं खालीच उभा रहा म्हणून ….. अरे ? हे कोण ?…कोण हवंय आपल्याला ?” केस नीट करत वरून प्रश्न आला . विवेक काही उत्तर देणार
इतक्यात एक जण मागून पळत आला …”पटकन खाली उतर विद्या ! पाहुणे आलेत!!..पाहुणे !!”
पाहुणे शब्दावर जोर देत तो म्हणाला , आणि विवेक चं स्वागत केलं ..” या आत या ..माफ करा , आपण आत्ता येणार ही कल्पना नव्हती .” आतली खुर्ची पुढे करत तो म्हणाला .
कल्पना कशी असणार? विवेक मुद्दाम लवकर आला होता . पुढे पाच मिनिटातच विद्याचे वडील नाईक साहेब , भाऊ आणि आई तिथे आले . चहा पाणी झालं , पण तो दिन्या नावाचा मुलगा आणि विद्या मात्र गायब होते .
” कौलावर खूप गवत वाढलं होतं न , ते काढायला आमची विद्या वर चढली होती . न बघताच पोतं खाली फेकलं तिने , माफ करा …” नाईक चाचरत म्हणाले , आणि विवेक ला हसू आलं .
“नाही हो , चूक माझीच आहे . अचानक लवकर आलो .” म्हणत त्याने हळूच नजर आतल्या भागात फिरवली .
पडदा सरकला , आणि प्रसन्न गौराई अंगणी याव्यात तशी विद्या सामोरी आली . तिला पहिल्याच दर्शनात पसंत केलेल्या विवेक ला तिचं हे रूपही आवडलंच .
थोडीशी इकडची तिकडची चर्चा झाल्यावर नाईकांनी विद्याला आणि विवेक ला बाग बघून येण्यास सुचवलं . विवेक त्याचीच वाट बघत होता .
बाहेर विद्या त्याला सुपारीची बाग दाखवत होती , आणि विवेक तिच्याकडे एकटक बघत होता .
अचानक त्याने प्रश्न केला
“विद्या , मी कसा वाटलो तुला ?”
अजिबात न गंगारता ती म्हणाली ,
“दिन्याने चांगलं म्हटलं म्हणजे चांगलेच असणार.”
“दिन्या म्हणजे मी आलो तेव्हा मागून पळत आला तो ?”
“हो …अगदी लहानपणीचा मित्र आहे माझा…त्याला माझं बरं वाईट सगळं समजतं . तो म्हणेल ते मी ऐकते नेहमी . आत्ता आम्ही कौलं साफ करत होतो , आणि तुम्ही आलात .
थांबणार होता तो , पण दादा त्याला म्हणाला आता तू थांबू नकोस .घरी जा .”
“का ? का पाठवलं त्याला ?”
“तुम्हाला वाटलं असतं न , की कोण हा मुलगा …इथं काय करतोय…पण खरंच असं वाटलं का तुम्हाला? पण का बरं वाटेल ? तुमच्या तिकडं तर चालतं न मुला मुलींची मैत्री ?” असं म्हणून ती स्वतःच हसली .
तिच्या ह्या मोकळेपणाचं त्याला खूप कौतुक वाटलं . तो हसत म्हणाला ,
” हो , चालतं की ! मला देखील कॉलेज च्या आणि ऑफिस च्या मैत्रिणी आहेत न . बोलवायचं का त्याला ?”
उत्तरादाखल तिचा चेहरा पडला .
“का ग , काय झालं ? नाराज झालीस ?”
” मला आठवतं तसा तो मित्र आहे हो माझा . माझ्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार . पण दादानी ताकीद दिलीय न , त्याला आता भेटायचं आणि बोलायचं नाही म्हणून . तसंही तो आता नाही येणार . “
“का ? का नाही येणार ?”
” दिन्या ला सरकारी नोकरी लागली आहे . आजच जाणार आहे तो . आता काय माहीत पुन्हा कधी भेटणार .” भावुक होता होट्झ ती एकदम म्हणाली , “जाऊदे ….ही बघा आमची विहीर ..आणि ती पलीकडे आमराई ….” किती पटकन तिने तो विषय बाजूला सारत वास्तव स्वीकारलं होतं .
विवेक मात्र तिच्या निखालस लोभस रूपावर आणि वृत्तीवर फिदा झाला होता ..
काही महिन्यातच विवेक विद्याचं लग्न केळशी मध्येच खास कोकणातील पद्धतीने अगदी थाटात झालं . त्याच्या घरच्यांना विद्या फारच आवडली होती . सीमित पण गोड बोलणारी , उत्तम स्वयंपाक करणारी , मुंबईच्या नोकरीत लगेच रुळलेली ..आणि चट्कन सगळ्यांचं मन जिंकणारी विद्या म्हणजे विवेक च्या घरचं चैतन्य झाली होती .
एके दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर हळूच येऊन विवेक ने अलगद तिचे डोळे झाकले .
“अग बाई , आज हे काय नवीनच ?”
“थांब . डोळे उघडू नकोस . ….हं …हे घे …आता उघड .” तिच्या हातात काहीतरी ठेवत तो म्हणाला .
तिने हळूच बघितलं ..आणि ओरडली ” अय्या ! केरळ ट्रिप ?” तिचा तो आवेग बघून त्याने तिला प्रेमाने कवेत घेतलं .
” लग्नानंतर आपण हनिमून ला गेलोच नाही न ? तुझी नवीन नोकरी , सुट्टी ची अडचण …म्हणून आता हे सरप्राईज !”
“तुम्ही पण न !” म्हणत तिने प्रेमाने मानेला झटका दिला .
………”विद्या , ए विद्या …उठतेस का ? पुढच्या स्टेशन ला उतरायचंय आपल्याला .” गाढ झोपलेल्या विद्याला हळूच हलवत तो म्हणाला . सगळ्या सामानाची बांधाबांध त्याने करून ठेवली होती .
” ही शाल ओढून घे , थंडी आहे बाहेर . तू फक्त तुझी पर्स सांभाळ , मी बॅग्स घेतो .”
“अहो , अजून अंधार आहे बाहेर . आत्ताच कुठे उतरलो आपण ?” आजूबाजूला बघत ती म्हणाली .
“तू बस इथे शांतपणे . हे नागरकोईल आहे , कन्याकुमारी नाही .”
“पण आपण इथे का उतरलोय ?”
“दिनेश ची , तुझ्या बाल मित्राची पोस्टिंग सध्या इथे आहे म्हणून .”
” हो विवेक ? खरंच ? तुम्हाला कसं समजलं तो इथे आहे…मी .. आता ह्यावर काय बोलू ..”
” काहीच बोलू नकोस विद्या . फक्त माझं ऐक . नुसत्या एका मंगळसूत्राने इतक्या वर्षांची मैत्री झटक्यात मागे कशी काय सारू शकता तुम्ही बायका ? आणि आम्ही लोक तरी किती अप्पलपोटी म्हणावेत ? काऊ चिऊच्या घासापासून एकमेकांना सोबत करणाऱ्या मित्रांना बायकोने अक्षदा पडल्याबरोबर क्षणात परकं करावं आणि पुन्हा त्यांचा साधा उल्लेखही करू नये ही कसली अपेक्षा ? आधी माझं स्थळ तुला फारसं पसंद नव्हतं न? तू मला भेटायला तयार नव्हतीस तेव्हा दिनेश ने तुला समजावलं होतं न ? मगच तयार झालीस तू . सांगितलं मला माया मावशीने . तुम्हा दोघाना चांगली ओळखते न ती . आणि त्याला असं इतकं परक्या सारखी वागणूक कशी दिलीत तुम्ही ? तोही पठ्ठ्या किती समजूतदार ग ? आता भेटून जाब विचारतो त्याला . म्हणतो , कुठे होतास इतके दिवस ? बरं चल , टॅक्सी आलीय .”
ती उठून अलगदपणे त्याला बिलगली . तिच्या डबडबलेल्या डोळ्यांना आता त्याची आकृती धूसर दिसत होती .
© अपर्णा देशपांडे
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022