आत्तू- भाग १
संध्याकाळ होत चालली होती .मंगलू ला घाई करावी लागणार होती .
पुन्हा अंधार पडल्यावर खाली उतरायला त्रास होणार होता . बाकी लोक सगळे टेकडीच्या पश्चिमेकडे उतारावर काम करत होते , चहा मळ्यात . तिथे खाली उतरल्यावर कंपनीची गाडी येत असे सगळ्यांना न्यायला . पण आज वरती लाकडाचे ओंडके सरकवायचे होते , म्हणून आज मंगलू आपल्या हत्तींना घेऊन वर चढला होता . ती कानन देवन पर्वतरांग होती . ( माहिती :: अनामुडी हे केरळ मधील कानन देवन रंगामधील सर्वात उंच शिखर आहे .) …………..
आज अनामुडी शिखर त्याला खुणावत होते , सकाळपासून . कंपनीच्या मॅनेजर ने दोन दिवसांपूर्वी खास गाडी पाठवून मंगलू ला बोलावून घेतले होते . त्या भागात फक्त मंगलूकडेच पाळीव हत्ती होते , कारण पूर्वी पासून त्याच्या पणजोबाच्या काळापासून त्यांच्याकडे हत्ती पाळण्याचा परवाना होता . सद्य रेंजर साहेबांनी देखील तो सरकारकडून मान्य करवून घेतला होता .
जंगलात बगीच्यासाठी जागा साफ करतांना हे महाकाय हत्ती खूप मोठी कामगिरी पार पाडत असत .
मॅनेजर साहेबांनी विचारले , ” मंगलू , तुझे हत्ती अनामुडी पर्यंत चढतील का ?
म्हणजे टोकापर्यंत नाही , खालच्या थोड्या सपाट भागापर्यंत ?…म्हणजे वेल्लारी सुळक्याच्या पायथ्याशी ?”
” बघतो साहेब . बाबल्या तर जातो ,पण माझा आत्तु अजून लहान आहे साहेब . त्याला उंचावर जायची सवयच नाही .’
( हत्ती निसर्गतः उंचावर चढत नाहीत . आपत्कालीन परिस्थितीत मात्र ते अतिशय अवघड चढाव पण ते चढून जातात . अन्यथा त्यांना तसे ट्रेंनिंग द्यावे लागते .)
” अरे , तिथे काही प्रचंड मोठाले ओंडके आहेत . ते उचलून बाजूला करायचेत . बघ , कंपनीचे मालक उद्या येणार आहेत . त्या वेल्लारी सुळक्याच्या पायथ्याशी एक कॉटेज , म्हणजे झोपडी बंधायचिये .”
” नुसती झोपडी ? त्यासाठी इतका खर्च ? ” मंगलूचा भोळा प्रश्न .
” अरे ,म्हणजे तिथपर्यंत रस्ता बांधून तिथे लोकांना रहायची सोय करणार . बोल ,करशील ? तुला भरपूर पैसे मिळतील आणि हत्तींना पूरम च्या सणासाठी पूर्ण सजावटीचे दागिने देऊ .
करतोस का ? ”
” लक्ष्मी ला विचारून सांगतो साहेब .” मंगलू म्हणाला होता .
” अरे काम हत्ती करणार , तुझी बायको नाही . ”
” माझा आत्तु तिचंच ऐकतो साहेब .तिला संगत न्यावी लागल .”
” बरं बाबा , आजच विचार आणि लवकर कळव . पैसे नकोयेत का तुला ? पोरगा शिकतो का शाळा ? ”
” हो , जातो की . पहिलीत आहे . त्याच्याच साठी पैसे जमवतोय . …..पण साहेब एक नाही कळला . जमीन थोडी कमी पडली का मोठ्या लोकांना ? ते डोंगरावर का बांधायच्या तुमच्या ‘ काटेजी ‘? ”
उत्तरादाखल साहेब नुसता हसला .
त्यादिवशी घरी जाऊन मंगलू ने
बायकोकडे विषय काढला .
” ना बाबा !! जमिनीवर काय काम करायचे ते करा . तिथं डोंगरावर कसं जाईल माझं लेकरू ? मला चहा वेचायला जायचंय . मी नाही यायची ”
” तू नाही म्हणजे आत्तु नाही . छोटे छोटे ओंडके सहज उचलतो ग तो .”
” छोटेच का मोठ्ठे बी उचलतो तो . पण जमिनीवर . ”
एव्हाना मंगलूचा मुलगा शिव ह्याला हा विषय कळाला होता .
” बाबा , मी येऊ सोबत ? मी आन आत्तु , तुम्ही अन बाबल्या !! मस्तं काम करून टाकू .”
” न्हाई !!! मी न्हाई तयार .” लक्ष्मी घाबरून म्हणाली .
” येडे तुला माहितेय का किती पैसे देणार ते ? ”
“??….”
” पाच हज्जार !! ” तिच्यापुढे पाच बोटं नाचवत तो म्हणाला .
” असुदे हो , यल्लम्मा देती की आपल्याला . माझं मन नाही करत .”
मंगलू ने लक्ष्मीचे मन वळवले . शिव ला
पोचम्मा कडे ठेवून जायचे दोघांनी ठरवले .
त्या तिघांचाही आपल्या हत्तींवर खूप जीव होता . त्या भागात सणावाराला हत्तीवरून मिरवणूक काढत . कुणाचा वाढदिवस असला की अंबारीत बसवत . असे पैसे मिळत . त्यांच्या छोटेखानी लाकडी घरामागे दोन मोठाले बुंधे होते . त्याला बांधलेले असत हत्ती .
बाबल्या आणि अत्तु हे तसे प्रेमाने राहात . पण तरी त्यांना खूप जवळ बांधता येत नसे . बाबल्या चिडला की अत्तुला जखमी करण्याची भीती होती .
शेवटी आज मंगलू आणि लक्ष्मी पहाटेच निघाले . दोन्ही हत्तींना गवत आणि भरपूर केळी खाऊ घातली होती . कंपनीचा ट्रक आला होता . काही अंतरापर्यंत चढाव सुरू होईपर्यंत त्यांना ट्रक ने सोडणार होते .
रस्त्यात नदीवर बाबल्याला डुंबायचे होते .पाणी बघितले की अत्तुला रहावत नसे . सोंडीत पाणी भरून मनमुराद फवारे मारणे म्हणजे आत्तुचा आवडता खेळ . शिव तर त्याच्या सोंडेवर उभे राही ,आणि आत्तु त्याला उचलून पाठीवर उचलून ठेवी .
मंगलूचं पहिलं अपत्य म्हणजे बाबल्या . शिवचा जन्म नंतर झाला .
अत्तु ला तर मंगलू ने एक सर्कस वाल्याकडून घेतलं होतं .
काय झालं होतं …..
क्रमश:
Image by Christine Sponchia from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022