आत्तु- भाग २

आधीच्या भागाची लिंक-आत्तू- भाग १

गावात एक सर्कस आली होती . त्यांच्या कडे सहा मोठे हत्ती आणि चार पिल्लं होती . त्यातलं एक पिल्लू खूपच अशक्त आजारी होतं . गावातील लोकांनी सर्कस मालकाला मंगलू चा सल्ला घ्यायला सांगितले . मंगलू गेला , त्याने त्या पिल्लाला बघितले . तिथे राहून त्याची आबाळ होईल , शिवाय प्रवास त्याला झेपणार नाही हे मालकाला कळत होते . मंगलू ने विनंती केल्यावर मालक पण तयार झाले आणि पिल्लाचा ताबा मंगलू ला मिळाला .

त्याला घेऊन जेव्हा मंगलू घरी आला , तेव्हा शिव दोन वर्षांचा होता . ते गोंडस लुदूलुदू चालणारं पिल्लू बघून शिव म्हणाला , “आत्तु !! अम्मा , आत्तु !! ” तेव्हापासून त्याचे नाव आत्तु पडले . मंगलू कडे काही दिवसातच आत्तु ची तब्बेत चांगली झाली . आत्तु म्हणजे शिवसाठी एक जिवंत खेळणेच होते . काळपट भुरा रंग , मोठ्ठे कान आणि अगदी निरागस डोळे .

लक्ष्मी त्याच्यासाठी मुद्दाम मल्लीपक्कम च्या टेकडीवरचे नारळ आणत असे .

बाबल्या ला नारळ कसे फोडायचे हे पक्के ठाऊक होते . त्याचे बघून आत्तु देखील नारळ आपटून फोडायला शिकला . नंतर तर वर्षभरात तो फुटबॉल देखील छान खेळायला शिकला होता . शिव थोडा मोठा झाला तेव्हा त्याचे मित्र शाळा सुटली की सरळ आत्तु शी खेळायला येत असत . बाबल्या देखील त्यावेळी खूप खुश होउन मान हलवी , त्यावेळी त्याच्या गळ्यातल्या छोट्या छोट्या घंट्या  टण

टण आवाज करत.

आताही  बाबल्या निवांत ट्रक मधून आजूबाजूला बघत होता .   मुरुगन चे चहाचे मळे मागे पडले होते . वळणं ओलांडत जंगलं सुरू झाले होते . ट्रक थांबला . बाबल्या आणि आत्तु  शहाण्या मूला सारखे खाली उतरले . बाबल्याने सोंड वर करून एक जोराचा आवाज काढला . जणू काही  अंगातला सगळा आळस बाजूला सारला . मंगलू ने दोघांना पुढे हाकले . आता चढाव जाणवायला लागला होता. हळू हळू त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली . मंगलू पुढे ,मागे बाबल्या ,त्याच्या मागे आत्तु आणि शेवटी लक्ष्मी . असा ताफा होता . सुरुवातीला आत्तु  चार पाऊलं चढला की मागे येई . बाबल्या मात्र शांत पणे चढत होता . मग लक्ष्मी पुढे आली . तिने फांद्या बाजूला सारून त्याला हळू हळू पुढे यायला लावले .

कानन देवन च्या जंगलात अनेक वनौषधी आणि मोठे वृक्ष होते .

पडॉक् , साल , मोहगनी च्या  दाट जंगलात  झाडीतून बाबल्याला बाहेर काढणे म्हणजे सर्कसच होती .

थोडा चढाव चढून गेल्यावर वरती थोडी सपाट जागा होती . आत्तु थकला होता . त्याला पाण्याची गरज होती . तहान लागली की आत्तु एक वेगळाच आवाज करीत असे . ताबडतोब लक्ष्मीला समजे की ह्याला पाणी हवे आहे .

” लेकरू ग माझं !! आणा आता पाणी .

मुकादम तर म्हणला की वरती लै

पाणीए . बघा असल इथं . ”

मंगलू नि सोबत आणलेली  बादली घेतली ,आणि पाणी शोधायला गेला .

मंगलूला बादली घेऊन जाताना बघितलं आणि ते कळून आत्तु लगेच खाली लक्ष्मीच्या जवळ बसला .

त्याच्या सोंडेवर हात फिरवत ती म्हणाली , ” आता माझ्या बाळांना दागिने मिळणार !! आत्तु , तू ह्यावर्षी मोठ्या मिरवणुकीत जायचं बरं . ”

बाबल्या लगेच तिच्याकडे सोंड नेऊन खांद्यावर फिरवायला लागला .

” तुला पण रे राजा , आज मोठ्ठे काम करायचय बरं !  तुमची मदत पाहिजे हा ! ” बाबल्या ने समजल्या सारखे डोळे मिचकावले .

तोपर्यंत दुपार व्हायला आली होती .सूर्य वर डोक्यावर आला होता . मंगलू पाणी घेऊन आला . बादली भर पाण्याने हत्तीचे काय पोट भरणार , पण आत्तु ने अर्धीच बादली संपवली आणि बाजूला झाला . लक्ष्मी ने त्यावर हात ओवाळून नजर काढली . ” असं वाटून खायचं कुणी शिकवलं असल ह्याला ? अर्ध पाणी ठेवलंय बाबल्या साठी . वरती पाणी आहे न हो ? तिथं पीतील पोरं पाणी भरपूर .” लक्ष्मी ला कोण कौतुक तिच्या ‘ पोरांचं ‘.

वेल्लारीच्या पायथ्याशी पोहोचायला बराच वेळ लागला . मंगलू ने  बाबल्याच्या पाठीवर थोडे सामान ठेवले होते , त्यात  कुऱ्हाड पण आणली होती . जिथे हत्तींना पुढे जाता येत नव्हते तिथे तो कुऱ्हाडीने तो फांद्या कापून रस्ता थोडा मोकळा करी .

पुढे त्यांना पडलेले ओंडके दिसलेच . चार पाच झाडे कापून ठेवले होते . तिथे क्रेन पोहोचू शकत नसल्याने

हत्तीचीच गरज होती .

बाबल्या आणि आत्तु ला तिथे बरोबर उभे करून ओंडके एकावर एक ठेवण्याचे काम सुरू झाले होते .

लक्ष्मी ओडक्यावर हात ठेवी आणि आत्तु ते उचले . मग बाबल्याच्या मागे मागे जाऊन जागेवर नेऊन ठेवी .

मंगलू ला आकाशात ढग दिसू लागले , पावसाची चिन्हे होती , संध्याकाळ होत चालली होती  म्हणून मंगलू ला घाई करावी लागणार होती ……….

बाबल्या आणि आत्तु न थांबता काम करत होते . पण लक्ष्मीची ही बाळं शरीराने अवजड असल्याने वेगाला मर्यादा होतीच . मधल्या काळात मंगलू लक्ष्मी ने जेवण करून घेतले होते .

आकाशात गडगडायला लागले  . तीन चार ओंडकेच ठेवणे बाकी होते , आणि पाऊस सुरू झाला . डोंगरातला पाऊस तो . मुसळधार शब्द फिका पडावा इतका जोरात . दोघांना हाकत मंगलू लक्ष्मी ने झाडाखाली आश्रय घेतला .

” हे काय वो अचानक ? बिन मौसम बरसात !!”

” अग , आपल्याला हे नवीन आहे का ?

फक्त आता वाट निसरडी होणार . आत्तु ला जमेल ना ग ? ”

ती उत्तर देणार इतक्यात कडाडून वीज चमकली , वरून जबरदस्त पाण्याचे लोंढे खाली वहायला लागले .

अचानक आत्तु ने आवाज केला , मान हलवली , जसे की कुणी त्याला हाक मारतय …

क्रमश:

पुढील भागाची लिंक- आत्तु- भाग ३ (शेवटचा भाग)

Image by Christine Sponchia from Pixabay

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

One thought on “आत्तु- भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!