जीपी

आमच्या लहानपणी म्हणजे जेव्हा जनरल प्रैक्टीशनर किंवा जीपी ही जमात अस्तित्वात होती तेव्हा त्यांना फॅमिली डॉक्टर म्हणत असत. 200 ते 300 फुटांच्या जागेचे 2 किंवा 3 भाग केलेले असत. एक दर्शनी भाग जिथे डॉक्टर स्वतः सर्व रोगांशी लढायला सज्ज असलेल्या योध्ध्यासारखा गुगुबित रिव्होल्वहिंग चेयर मध्ये डोके टेकायच्या ठिकाणी टॉवल ठेऊन स्थानापन्न असे. त्याच्या पुढ्यात त्याचे प्रचंड आकाराचे लाकडी टेबल. टेबलावरची काच आणि टेबल ह्यांच्या मधे अनेक मेडिकल रिप्रेझेंटिटिव्हनी सरकवलेली व्हिजिटिंग कार्ड्स. डॉक्टरच्या डोक्यावर माधोमध मोठ्ठा गोल असलेला एक पंखा. गळ्यात स्टेथोस्कोप उपरण्यासारखा लटकवलेला. सामोर पेशन्ट्सचे रब्बर बँडनी बाँधलेले, काचेच्या पेपरवेट ने सांभाळलेले केस पेपर्स, हाताशी आपले नाव, डिग्री, नोंदणी क्रमांक लिहिलेले लेटर हेड आणि फक्त त्यांच्या कम्पाउंडरला किंवा मेडिकल दुकानातील लोकांना कळेल अश्या अगम्य भाषेत काहीतरी लिहायला एक पेन. सामोर रुग्णांना बसायला समोरासमोर बनवलेले लाकडी बाक. ते संपले की दवाखान्याबाहेर ओसंडून जाणारी रुग्णांची गर्दी!
दुसरा भाग रुग्णाला चेक करायचा. दोन फुट बाय सहा फूटाचे एक टेबल ज्यावर रेगाझिन घातलेले असे. त्यावर बसायचे म्हणजे खाली ठेवलेल्या स्टुलावर पाय ठेउनच “चढ़ावे” लागे. बहुतेक डॉक्टरना प्रत्येक वेळेला वाकायला लागू नए म्हणून रुग्णांना एकदाच वरती चढून बसवायाची सोय असावी. बाहेरच्या खोलीत रुग्णाची एकंदर कथा आणि स्थिति पाहून डॉक्टर त्याला ह्या खोलीत बोलावत. रुग्ण शक्यतो त्या टेबलावर चढून बसत असे. मग डॉक्टर “आडवे व्हा” असे म्हणाले की कपडे सावरत झोपत असे. मग डॉक्टर हाताने पल्स मोजत, छातीत असलेल्या हृदयाचे ठोके छाती, पोट, पाठ सर्वत्र स्टेथोस्कोप लाउन मोजत. मग स्वतःच्या कपाळावर एक पट्टी बांधत ज्याच्या पुढे एक गोल आरसा असे. मग रुग्णाला “आsss” करायला लावून त्या आरशातून परावर्तित होऊन रुग्णाच्या घशात खोलवर जाणाऱ्या उजेडात ते मुखमंडलाचे दर्शन घेत. “काय खाल्ले?” असले जुजबी प्रश्न विचारात आणि “काळजी करू नको” इतके सांगून तिथेच असलेल्या छोट्याश्या बेसिन मध्ये साबणाने हात धुवून, शुभ्र टॉवेलला हात पुसून परत बाहेर आपल्या खुर्चीत स्थानापन्न होत. रुग्ण “काळजी करू नको” ह्या शब्दांनीच अर्धा बरा झालेला असे. क्वचित पितळ्याच्या, उकळवलेल्या सिरिंज मधून एखादे इंजेक्शन! बास. कम्पाउंडर ने बाहेरून डोसाचा नाक्षीदार कागद चिकटवून आत लाल रंगाचे औषध भरून बुचाची बाटली हातात दिली आणि तिच्या बरोबर 3 प्रकारच्या गोळ्या “ह्या सकाळी, ह्या दोन जेवणानंतर आणि ही फक्त रात्री” असे सामोर ठेवलेल्या गोळ्या कॅरमवरील सोंगट्या फिरवाव्या त्या गतीने फिरवत, त्याच्या सामोर असलेल्या छोट्याश्या खिडकीतून रुग्णाला फ़टाफ़ट सांगून “दहा रुपये” असे म्हणत व्यवहार पूर्ण केला की कम्पाउंडरच्या कॉंफीडन्समुळे उरलेला आजार देखिल पळून जात असे.
ह्या फॅमिली डॉक्टर्सना प्रत्येक रुग्णाची तब्बेत, त्याचा फॅमिली  इतिहास, आर्थिक स्तर सर्व माहीत असे. अनेक रुग्णांच्या शुभकार्याला त्याला जावे लागत असे. नाडी परीक्षा, स्टेथोस्कोप आणि घसा बघुन त्याच्या लाल औषध आणि चार गोळ्यानी कोणताही रोग दहा रूपयात बरा करणारा तो धन्वंतरी त्या भागातील हजारो लोकांचा देव असे. हातात लेदरची बॅग घेऊन तो कधी होम व्हिजिटला आला की मामला गंभीर आहे बरोबरच कोणीतरी सेलिब्रिटी इमारतीत आल्यासारखी त्याला पहायला गर्दी व्हायची. रुग्णांच्या किमान दोन ते तीन पिढ्या एखादा फॅमिली डॉक्टर जगवायचा, फुलवायचा. तो कुटुंबाचा भागच होऊन जायचा म्हणून बहुतेक त्याला “फॅमिली डॉक्टर” असे नाव पडले असावे.
आज असे दवाखाने काढून समाजसेवा करणाऱ्या फॅमिली डॉक्टरचे प्रमाण कमी झाले आहे. नाडी आणि घसा पाहून औषध न देता अनेक टेस्ट करायला लागत आहेत. अर्थात मेडिकलची फी आणि दवाखाना टाकायचा प्रचंड वाढलेला खर्च हे देखिल कारण आहेच. तसेच समाज वाढला तसे रोगही वाढले. ते रोग आमच्या जीपीच्या साध्या निदान प्रक्रियेतून लक्षात येत नसतील. आज जे आहे ते वाईट खचितच नाही पण हल्ली डॉक्टर किंवा इस्पितळात जायला जी भीती वाटते ती फॅमिली डॉक्टरकडे जाताना वाटत नसे. उलट काही महिन्यात त्यांना भेटल नाही तर निदान सर्दी तरी होऊ दे. त्या निमित्ताने “डॉक्टरांची” विचारपूस करता येईल असे विचार अनेक फॅमिली डॉक्टरांच्या रुग्णांच्या मनात यायचे! असो!
कालच्या लाल औषधाच्या पोस्टवरून ही जुनी पोस्ट आठवली. त्या निमित्ताने आमचे फॅमिली डॉक्टर तसेच माणसांच्या जीवन – मृत्यु किंवा सुदृढता – आजार ह्यांच्यामधे कुठेतरी राहून आजार व मृत्युवर विजय मिळवत सुदृढ़, दीर्घायुषी समाज बनवायचा वसा घेतलेल्या तमाम अजूनही तग धरून असलेले फॅमिली डॉक्टर्स, स्पेशलिस्ट, सर्जन, कंसल्टेंट आणि इतर जेजे डॉक्टर आहेत त्या तमाम डॉक्टरांना मनापासून धन्यवाद !!! ©मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!