मर्म बंधाताली ठेव….

 
आज आईने तिची पोतडी उघडली होती. अनेक पत्र आणि काही महत्वाच्या नोंदी असलेल्या कागदांनी गच्च भरलेली. अगदी माझ्या आणि भावाच्या जन्माची डॉक्टरांनी दिलेली तारीख आणि आमच्या जन्माची खरी तारीख ह्याच्या नोंदीपासून जन्माच्या वेळी आमची वजने किती होती इथपर्यंत नोंदी असलेल्या चिठ्ठया आणि अनेक जुनी पत्रे असलेली पोतडी. त्यातील काही पत्रे वाचून मन आजच्या काळाची भूत कळाशी तुलना करू लागले!
 
पत्रे साधारण ऐंशीचे दशक सुरु होण्याच्या आतबाहेरची! जेव्हा कॉम्प्यूटर हा शब्द सामान्य माणसाच्या डिक्शनरीत अस्तित्वात नव्हता आणि फोन नामक काळे यंत्र फक्त गर्भ श्रीमंतांच्या दिवाणखान्यात तसेच मध्यम वर्गीय चाकरमान्यांच्या ऑफिसात अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विराजमान होत असे त्या काळातील!
 
तेव्हा पोस्ट कार्ड नामक पिवळा जाडा कागद सध्याच्या “पब्लिक डोमेन” नामक संकल्पनेचे प्रतिक होता. ते पत्र पोस्टमन पासून ज्याच्या हातात पडेल तो साक्षर इसम वाचू शकत असे. त्यामुळे त्यावर शक्यतो “जनरीक” गोष्टी लिहिल्या जात. प्रिव्हसी जपण्यासाठी “मर्म बंधातली ठेव” आयताकृति घडी होणाऱ्या निळ्या रंगाच्या इनलैंड लेटर नामक पत्रातून पाठवली जात असे!
आजच्यासारख्या शेकडो मेल्सनी दुथडी भरून वाहणाऱ्या इन बॉक्सचा तो ज़माना नव्हता. पोस्टमनने “जोग” अशी हाक देऊन पत्र हातात दिले किंवा घरात भिरकावले की ते उघडून वाचयाची सर्वांना घाई असे. पत्र येणे हा एक सोहळा असे! पत्रात कधी अगदी मुलुंडला राहणाऱ्या मावशीच्या गिरगावात पंधरा दिवसांनी येण्याच्या प्लान बद्दल माहीती असे, एखाद्या नातेवाईकाकडे असलेल्या सत्यनारायणाच्या पुजेचे आमंत्रण असे, कधी आमच्या अभ्यासातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक असे आणि बरेचदा आपली क्षेम खुशाली सांगून आम्हा सर्वांची क्षेमखुशाली विचारलेली असे!
 
अनेकदा  “पत्रास कारण की” मजकूर थोडक्यात सांगून क्षेमखुशालीची औपचारिकता पहिल्या परिच्छेदात संपली की मग खरे पत्र सुरु होई! पुढल्या परिच्छेदापासून अक्षरे अंधुक होत जात आणि पत्र लिहिणार्याची छबी दिसू लागे! खूप अंतरावर रहाणार प्रेमच माणूस पत्राच्या माध्यमातून हाताच्या ओंजळीत व्यक्त होऊ लागे! मग ती इनलैंड पत्राची नऊ बाय सहा इंचाची पाठपोट जागा भावना, प्रेम आणि आपुलकीच्या मनापासून लिहिलेल्या शब्दांचा खळाळता निर्झर बनत असे…पत्राचा इंचन इंच आणि वाचणार्याचा रुमाल मायेच्या पुरात भिजून जात असे! पत्राच्या प्रतलाचे इंच संपले की सेंटीमीटर, मिलीमीटर देखिल छोट्या अक्षरात आडव्या लिहिलेल्या वाक्यांनी भरून जात, ता.क. अनेकदा भिंग घेऊन वाचावा लागे…पण लिहिणार्याचे आणि वाचणार्याचे मन भरत नसे! तुझी ताई, माई, आई, बाबा, दादा असा शेवट वाचला की ओंजळीत असलेल माणूस हळूच दूर निघून जाई…हातात फक्त त्याची आठवण आणि मनात त्याची छबी पत्ररूपाने पुढील अनेक दिवस घुटमळत राही!
 
आज माहितीच्या महापुरात, I am just a click away च्या जमान्यात बाळाच्या जन्माच्या किंवा बापाच्या मृत्युच्या क्षणात जगभर पोहोचणाऱ्या बातमीला पुढल्या काही मिनिटांत congrats आणि RIP मिळतात. पण त्यात ओलाव्यापेक्षा औपचारिकता जास्त असते असे कुठेतरी वाटून जाते! दोष तशी प्रतिक्रया देणार्यांचा सुद्धा नाही. माहिती ही गोष्ट आज इतकी हलकी झाली आहे की आज माहिती मिळवणाऱ्यापेक्षा ती देणार्यांची संख्या वाढली आहे. त्यातून 99% असंबद्ध किंवा गरज नसलेली माहिती रोज फोन, मेल, टीव्ही, रेडियो अश्या माध्यमातून आपल्यावर ओतली जात असते. अगदी नाकतोंड बुडेपर्यंत! मग त्यातून रोज पोहुन बाहेर पडून कोरडे होण्याच्या प्रक्रियेत माणसांची मने आपोआप काही अंशी कोरडी आणि असंवेदनशील होतात. व्हाट्सअप आणि फेसबुक अश्या माध्यमातून रोज अपडेट मिळणाऱ्या अगदी परदेशातील नातेवाईकाबद्दलचे कुतूहल, ओढ निर्माण व्हायला संधीच मिळत नाही. परदेशातील सहकारी आणि भाऊ “whats up dude? All well?” अश्या सम पातळीवर येतात आणि दोघांचेही वाढदिवस “अलर्ट” आल्यावर केक आणि बुकेच्या HBD पोस्टच्या औपचारिक शुष्कतेने हातावेगळे केले जातात!
 
मी तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या विरोधात नक्कीच नाही. पण तंत्रज्ञान आणि खरे आयुष्य ह्यातील तारतम्य माझ्यासकट बहुतेक लोक आज विसरलेले आढळतात. भावना, जिव्हाळा ह्या फक्त दाखवण्याच्या गोष्टी नसून स्वतः अनुभवायच्या आणि आपल्या प्रिय जनांना जाणवून द्यायच्या मानवी संवेदना आहेत हे तंत्रज्ञान आणि माहितीच्या अतिरेकात आपण कुठेतरी विसरलो आहोत असे वाटून जाते!
 
व्हाट्सएप वर असलेले नातेवाईक, मित्र मैत्रिणी आणि जवळचे लोक ह्यांना महिन्यातून एखादा क्षेमखुशालीचा फोन, एखादी “आपण जाम बिझी आहोत” हे न दर्शवता दिलेली फुरसतमधली नो एजेंडा भेट ह्यातून रुक्ष होत चाललेल्या नात्यात ओलावा निर्माण व्हायला सुरुवात होईल! फेसबुकच्या प्रोफाइल पिकच्या पलीकडे असलेला खरा माणूस जो पूर्वी पत्राच्या दुसऱ्या परिच्छेदात दिसायचा तो आजही दिसायला सुरुवात होईल! आज मालक संध्याकाळी घरी आला की घरातील कुत्रा त्याच्या अंगावर उड्या मारून, त्याला चाटून आपले प्रेम, कृतज्ञाता, भावना व्यक्त करतो आणि त्याचा सख्खा मुलगा “हाय डॅड” इतकेच म्हणून व्हाट्सअप वरील जगतात परत रममाण होतो तिथे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींशी स्वतःहून प्रेमाचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्याची अपेक्षा करणे बुरसटलेपणाचे किंवा माझ्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असू शकेल.
 
पण आज माहितीच्या महापूरात न्हाऊन निघत असताना त्या जुन्या पत्रातील ओलावा मला अंतर्बाह्य कोरडा ठेवतो. यांत्रिक औपचारिकतेपेक्षा वैयक्तिक ओलाव्याचे दोन शब्द अजूनही मनाला आनंद देतात! कदाचित पुढली पीढी पर्सनल कनेक्शनला इंटरनेट कनेक्शन इतके सामान्य समजू लागेल किंवा समजू लागलीही असेल….पण इनलैंड लेटर मधील “मर्म बंधाची ठेव” अनुभवलेली आमची पीढी शेवटपर्यंत प्रोफाइल पिक आणि ईमेलपेक्षा पत्रातून ओंजळीत व्यक्त होणाऱ्या व्यक्तिशीच जास्त “कनेक्टेड” राहील…..ईमेल मधून येणाऱ्या रुक्ष स्टेटमेंटपेक्षा दर महिन्याला बँकेत जाऊन अपडेट करायच्या पासबुकाशी आहे तशी!!!©मंदार जोग

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

2 thoughts on “मर्म बंधाताली ठेव….

  • July 24, 2023 at 2:17 am
    Permalink

    अगदी खरंय

    Reply
  • July 24, 2023 at 8:01 am
    Permalink

    बंधू मी आजही मित्रांना पोस्ट कार्ड पाठवत असतो वर्षभरात किमान 70 ते 75 लिहितो

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!