मी जाता…..(भाग पहिला. एकूण भाग २)
प्रसाद कोथरुडाच्या चिंगरी बार मध्ये एकटाच बसला होता. अपरेजल मध्ये बॉस ने त्याची ठासली होती. रेटिंग बेकार दिल्याने जेमतेम पाच टक्के पगारवाढ मिळणार होती. साला कोविड मुळे जॉब मार्केटची पण काशी झाली होती. आहे ती नोकरी टिकली होती हेच खूप होतं! अजून वर्षभर तरी ह्याच नोकरीत आणि ह्याच बॉसच्या हाताखाली झक्कत काम करावं लागणार होतं! प्रसादाची सटकली होती! त्याने ग्लास तोंडाला लावून संपवूनच खाली ठेवला!
डिप्लोमा इंजिनियर झालेल्या प्रसादला त्याच्याच शहरात एका मध्यम आकाराच्या कंपनीत नोकरी लागली. ती आजवर टिकली किंवा त्याने टिकवली. पंधरा वर्षांपूर्वी प्राजक्ताशी लग्न झालं आणि आज त्यांचा मुलगा अथर्व बारा वर्षांचा झाला देखील. वेळ उडून कशी गेली ते कळलंच नाही. प्रसाद आता जवळ जवळ पंचेचाळीसच्या आत बाहेर होता. शरीराने उत्तम असला तरी मनाने थोडा थकला होता. घरी तसं सगळं बरं होतं. म्हणजे पुण्यात स्वतःची जागा होती, टू व्हीलर होती. अथर्व इंग्रजी शाळेत शिकत होता. प्राजक्ता घर उत्तम सांभाळत होती. आई वडील गावातच होते. गाठीभेटी होत असत. त्याची बहीण प्रतिभा देखील चिंचवडला दिलेली होती. तिचा नवरा गडगंज होता. प्रसादाच्या डोक्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. म्हणजे तसं सगळं ठीक होतं.
पण हल्ली प्रसादला एक भीती सतावू लागली होती. ती म्हणजे मला काही झालं तर घरच्यांचं माझ्या नंतर काय होईल? कसे जगतील? प्राजक्ता सुखी राहील का? अथर्वच्या शिक्षणाच काय? फार सेव्हिंग नाहीयेत आणि त्यात वाढती महागाई. पगार मनासारखा नाही. नोकरीत फार ग्रोथ नाही. बदलायची शक्यता इतक्यात दिसत नाही. नवीन नोकरी टिकली नाही तर काय? मी गेलो तर घरच्यांचं काय होणार? ह्या भीतीने त्याच्या मनात घर केल्यापासून प्रसाद एका प्रचंड स्ट्रेसखाली जगू लागला. लहान लहान गोष्टीत त्याला रिस्क वाटू लागलं. “आज हे करतोय पण मी नसताना घरच्यांना हे जमेल का? परवडेल का?” असे विचित्र प्रश्न त्याला पडू लागल्याने त्याच्या वागण्यात बदल होत गेला. लहान लहान गोष्टींवरून त्याचे प्राजक्ताशी खटके उडू लागले! अत्यंत हुशार आणि जबाबदार प्राजक्ता त्याला निष्काळजी आणि उधळी वाटू लागली. अथर्वच्या लहान लहान मागण्या त्याला हट्ट आणि उधळपट्टी वाटू लागल्या!
आज चिंगरी बार मधून घरी आल्यावर शावर घेऊन अंथरुणात पडल्यावर त्याला डोक्यात भयंकर कळ आली. म्हणजे गेले काही महिने ती येत असे. पण आजच्या इतकी जोरात कधीच आली नव्हती! तो ओरडत उठला. रात्रीचे अडीच वाजले होते! प्राजक्ताला त्याचे हाल बघवत नव्हते. तिने तडक प्रसादाचा मित्र डॉक्टर अविनाशला फोन केला. अविनाश म्हणाला “हॉस्पिटलला घेऊन ये लगेच. मी पोहोचतो!” अविनाश प्रसादाचा शाळेपासूनचा मित्र. आज पुण्यातील विख्यात न्यूरो सर्जन. स्वतःच हॉस्पिटल असलेला. प्रसादला घेऊन ऍम्ब्युलन्स गोदावरी हॉस्पिटलकडे निघाली. अविनाश ने आपल्या आईच गोदावरी हे नाव हॉस्पिटलला दिलं होतं. पुण्यातील रिकाम्या रस्त्यांवर पिवळे सिग्नल लाईट उघडझाप करत होते आणि शांततेला चिरणारा सायरन वाजवत ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलकडे निघाली होती. स्ट्रेचरवर झोपलेल्या प्रसादाच्या हातात शेजारी बसलेल्या प्राजक्ताचा हात होता. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्याने क्षीण आवाजात विचारलं “मला काही झालं तर तुमचं काय होईल ग?” उत्तरादाखल प्राजक्ताने त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याच वेळी ऍम्ब्युलन्स गोदावरी हॉस्पिटलच्या गेट मधून आत शिरत इमर्जन्सी वॉर्ड समोर थांबली!
अविनाश स्वतःच हजर असल्याने ऍडमिशन सोपस्कार काही मिनिटात पार पडून प्रसाद ऍडमिट झाला! त्याला पेन किलर्स देऊन तो झोपल्यावर प्राजक्ता आणि अविनाश त्याच्या केबिन मध्ये बोलत होते. अविनाश ने सांगितलं की उद्या काही टेस्ट आणि स्कॅन केल्यावर नक्की निदान करता येईल. प्राजक्ताने अविनाशला प्रसादला ग्रासलेल्या “माझ्या नंतर काय?” ह्या चिंतेबद्दल सांगितलं. अविनाशच्या मते अश्या प्रकारच्या स्ट्रेसमुळे मेंदूच्या जवळ क्लॉटिंग होऊ शकत होतं. उद्याच्या टेस्ट आणि स्कॅन नंतरच चित्र स्पष्ट होणार होतं! प्राजक्ता सकाळी येते सांगून निघून गेली! इतका मोठा सर्जन असलेला अविनाश मात्र मित्रावर आलेल्या संकटाची चाहूल लागल्याने विचारमग्न होता! “माझ्यानंतर काय?” ह्या प्रश्नाने झपाटलेला प्रसाद खरच सर्वाना त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला भाग पाडून पुढल्या प्रवासाला जाणार होता का? उद्याची सकाळ ह्या प्रश्नाचे उत्तर मनात धरून अंधारातून पहाटेकडे सावकाश सरकत होती! प्रसाद त्याच्या बेडवर निपचित पडून होता!©मंदार जोग
क्रमश:
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023