लैला मैं लैला अर्थात झिनिबेबी…(©मंदार जोग)



आमचं बालपण अमिताभ बच्चन नामक वादळाला वाहून घेतलेलं होतं. आजही तेच वादळ शांत होऊन एखादी झुळूक देऊन जातं आणि आम्ही कृतकृत्य होतो. नशीबवान आहे आमची पिढी जिने अमिताभ, लता, आशा, किशोर, आरडी, सुनील, सचिन, बाळासाहेब अश्या दिग्गज आणि दुर्मिळ लोकांना ह्याची देही ह्याची डोळा पाहिलं, अनुभवलं!

तर गोष्ट अमिताभ युगाची! तो असा काळ होता की अमिताभ हात लावेल त्याच सोनं व्हायचं! तो असलेले बकवास सिनेमे पण चालायचे! जया व्यतिरिक्त त्याच्या बरोबर भरपूर सिनेमे केलेल्या नट्या म्हणजे रेखा, परवीन आणि झीनत! त्या वेळी आम्हाला तिचं नाव झिन तमान आहे असं वाटत असे समहाऊ!

मला वाटतं डॉन हा तिचा नायिका म्हणून अमिताभ बरोबरचा पहिला सिनेमा असावा. रोटी कपडा मकान मध्ये अमिताभ असला तरी ती मनोज कुमारची हिरोईन होती! तर डॉन म्हणजे सलीम जावेदची बेफाट पटकथा आणि संवाद, अमिताभचा डबल रोल आणि बॉय कटवाली टणटणीत झीनत! पब्लिक खुळ झालं होतं. जीसका मुझे था इंतजार, खैके पान बनारसवाला ह्या गाण्यांवर थिरकणारी झीनत तेव्हा जाम आवडली होती!

पुढे ती बच्चन बरोबर great gambler मध्ये व्हेनिस मध्ये दो लब्जो की है कहानी गाताना दिसली. मग लावारीस, राम बलराम (धर्मेंद्रची हिरविण), महान, पुकार, दोस्ताना मध्ये त्याच्या साथीने हिट होत सुपरस्टार बनली आणि तिथून उतरताना मला वाटतं ती बूम नामक बकवास सिनेमात सुद्धा होती. बाकी दोस्ताना मध्ये अमिताभ बरोबरची पहिली भेट आणि दिल्लगी ने दी हवा ह्या गाण्यात ती बेफाट आवडली. “अमिता बच्चम आणि झिन तमान” अशी स्टारकास्ट त्या काळी आमच्या डोक्यात फिट झाली होती.

तिने धर्मेंद्र बरोबर देखील काही फुटकळ सिनेमे केले. पण अमिताभ बरोबरचे वगळता बहुसंख्य सिनेमे फुटकळच केले. अगदी चोप्राचा इंसाफ का तराजू सुद्धा लोक तिला ‘बघायला’ आल्याने हिट झाला होता. बाकी ती तारिक, देव आनंद, मनोज कुमार बरोबर देखील चमकली. पण तिचं काम इंग्रजी ऍकसेंट मिश्रित हिंदी बोलत पडद्यावर चमकणे इतकंच होत. म्हणूनच अभिनय वगैरेंच्या वाटेला ती कधीच गेली नाही आणि निर्माते दिग्दर्शकांनी तिला कधी त्यासाठी भरीस पाडली नाही.

झिनतमधील सुप्त गुण ओळखून रत्नपारखी राज कपूरने तिला सत्यम शिवम सुंदरम मध्ये मनसोक्त चमकवली आणि त्या नंतर फिरोज खान ने तर कुर्बानी मध्ये तिचा लखलखाट केला! आप जैसा कोई, लैला मै लैला मध्ये झीनत ने लोकांना वेड लावलं. हम तुमहें चाहते है ऐसें मध्ये समुद्र किनाऱ्यावर handsome विनोद बरोबर ती जबराट दिसली. झीनत म्हटल्यावर माझ्यासारख्या लाखो लोकांना कुर्बानी सर्वात आधी आठवेल!

झीनतच्या भरभराटीच्या काळात आम्ही झीनत कळण्याइतके मोठे झालो नव्हतो. पण मोठे झाल्यावर तिचे सिनेमे परत पाहिल्यावर झीनत अमान काय रसायन होतं हे लक्षात आलं! झीनत आपल्या रझा मुरदाची कझीन. आई मराठमोळी. झीनत परदेशांत शिकून वगैरे आली आणि इथे मिस इंडिया झाली! ती हेमा मालिनी, माधुरी किंवा मधुबाला सारखी सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्येत बसत नसली तरी तमाम पुरुषांच्या “आकर्षक बाई” ह्या व्याख्येत चपखल बसत असे. कमनीय देह आणि तो कोणतेही आढेवेढे न घेता दाखवायची तयारी ह्या भांडवलावर ती स्टार झाली. परवीन बाबी प्रमाणेच भूमिकेची लांबी, रुंदी, खोली अश्या उथळ गोष्टींना तिने कधीच महत्व दिले नाही. पण “भूमिकेची गरज” मात्र तिने नेहमीच समजून घेतली!

संजय खान किंवा इम्रान खान बरोबर अफेयर्स मग मजहर खान बरोबरचा त्रासदायक विवाह. नशिबी आलेली मारझोड, मुलाचा आजार, मजहरचा मृत्यू अश्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक आव्हानांचा सामना करत ती रुपेरी पडद्यावरून कधी अदृश्य झाली ते लक्षातही नाही आलं!

आज मात्र ती आपल्या दोन तरुण मुलांसह आनंदी जीवन जगत असल्याचं बघून बरं वाटतं. मारहाणीने कायम स्वरूपी थोडा तिरळा झालेला डोळा लपवायला सतत गॉगल वापरते. पण आजही झीनत ग्रेसफुल दिसते. एक कणखर स्त्री म्हणून तिच्याबद्दल आदर वाटतो!

काळ पुढे सरकतो आणि ऐन पंचविशीत पडद्यावर आग लावणारी झीनत आज चक्क सत्तरीत प्रवेश करते! आज मल्टिप्लेक्स मधील गुळगुळीत वातावरणात महागड्या तिकिटांनी सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांना कधीतरी अप्सरा, मिनर्व्हा, नोव्हेल्टी मध्ये नेऊन पडद्यावर लैला मै लैला वर थिरकणार्या झीनत वर चिल्लर उडवणारे वेडे फिल्लमबाज दाखवावे ही इच्छा अनेक वर्षे मनात आहे! पण मिनर्व्हा, अप्सरा केव्हाच लयाला गेली. झीनत सत्तरीची आजी झाली! लैला मै लैला मात्र आजही रिमिक्स होऊन वाजत. पण त्यात जान नसते कारण त्यात झिनीबेबी नसते!

झीनत अमानला आम्हा फिल्लमबाजांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!- ©मंदार जोग 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!