Why should girls have all the fun?

आमच्या कन्येच्या आईची पदोन्नती होऊन कार्यक्षेत्र विस्तारल्याने तिला घरातून लवकर बाहेर पडावं लागतं. साधारण ऑगस्ट मध्ये सुरू झालेला हा दिनक्रम निदान डिसेंबर एन्ड पर्यंत तरी सुरू राहील अशी चिन्ह होती. त्यामुळे बिचारी पहाटे उठून घरातील (तिच्यासाकट) चार खाणाऱ्या तोंडांची सकाळची सोय करून पुढे कामावर जाऊ लागली. हे करताना तिची होणारी ओढाताण मला दिसत होती. मी अजूनही WFH असल्याने मी तिचा हा भार स्वतःवर घ्यायचा निर्णय घेतला!

अर्थात हे कळल्यावर मी वगळता इतर तीन खाणाऱ्या तोंडांनी प्रचंड धसका घेतला. बायको जाताना जड अंतःकरणाने कन्येला आणि स्वतःच्या सासूला निरोप देऊन निघाली. त्या दोघी फार काही न बोलता आलिया भोगासी असावे सादर असं स्वतःला समजावत समोर काय वाढलं जाणार ह्याची वाट बघू लागल्या. मी बायकोने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळत तांदूळ आणि डाळीचा कुकर लावला. सर्व डाळींमधील तूर डाळ नक्की कोणती आणि तो डबा कोणता हे बायकोने मला दाखवून ठेवल्याने तो अडसर आधीच दूर झाला होता. शिट्ट्या झाल्या. त्या नीट मोजून गॅस बंद करून दहा मिनिटांनी वरण बाहेर काढलं. गॅस वर कढई ठेऊन सुचनेबरहुकूम फोडणी टाकली. त्यात वरण ओतून आमटी केली. कन्या आणि मातोश्रींनी अत्यंत दडपणाखाली आमटी भाताचा पहिला घास तोंडात टाकला आणि त्यांना तो आवडल्याची पावती त्यांच्या स्माईल ने मला मिळाली.

मग काय. आठवडा भरात माझा आत्मविश्वास दुणावला. साधी आमटी न करता त्यात कधी कांदा, टोमॅटो वगैरे घालू लागलो. मिरच्या, कोथिंबीर, आले, लसूण वगैरे चिरून स्वाद वाढवू लागलो. आमसूल, हिंग, गोडा मसाला, मीठ, गूळ ह्यांचे अंदाज दिवसेंदिवस bang on बसू लागले! आमटी भात अपुन के बाये हाथ का खेल हो गया.

मध्ये एक दिवस कन्येला म्हणालो आज तुला टोस्ट सँडविच करून देतो. घरी खा आणि कॉलेजमध्ये पण ने. परत एकदा घाबलेली कन्या म्हणाली नको. तू आमटी भातच कर. मस्त जमतो तुला. माझा इगो हर्ट झाला. माझा प्लान सोपा होता. ब्रेड आणि बटर आणायचे. बटाटे उकडायचे. कांदा, काकडी आणि टोमॅटोच्या चकत्या करायच्या ज्या मला आता भन्नाट जमतात. चटणी आमच्या घराजवळील सँडविच वाल्याकडून आणायची. सँडविच बनवून भाजली की झालं! हाय काय अन नाय काय! बटाटे उकडून मी ब्रेड बटर आणि चटणी घ्यायला खाली उतरलो. ब्रेड आणि बटर मिळाले! सँडविचची चव चटणीतच असते हे माहीत असलेल्या सँडविचवाल्याने चटणी विकत घ्यायला नकार दिला!!!

मी घरी आलो! आमटी भात करायला वेळ नव्हता! बायकोला मेसेज केल्यावर तिने चटणी कशी करतात हे मेसेज मध्ये सांगितलं. त्यानुसार मी मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे सोलून घेतलं. आता मिक्सर मध्ये घातलं की चटणी तयार!

आमच्या लहानपणी सोपे मिक्सर होते. दोन भांडी. एक स्टील आणि एक प्लास्टिक. त्यात वस्तू टाकायच्या आणि फिरवायचा. पण आमच्या घरचा मिक्सर वेगळाच आहे ह्याची त्या दिवशी जाणीव झाली. त्यात ज्यूस, ग्राइंड आणि आणखी काय काय होतं असं त्याला पाहून लक्षात आलं. चटणी नक्की कशी आणि कशात करायची हे कळत नव्हतं! बायकोला मेसेज केला पण ती मिटिंग मध्ये असल्याने रिप्लाय नाही! माझा चक्रव्यूहात घुसलेला अभिमन्यू झाला! एक झाकण काढलं तर तिथे चटणीच भांड बसेना! मिक्सर सुरू केला तरी आतल्या आत फिरत होता. माझं भांड तसंच! मिक्सर ऐवजी डोकं फिरू लागलं. ते यंत्र मला चिडवत होतं! दहा मिनिटे खाड्खुड करूनही भांड कुठे बसवाव ती जागा सापडत नव्हती! इतक्यात कन्या आली. माझी त्या यंत्राशी सुरू असलेली झटापट पाहून एखाद्या निष्णात डॉक्टर ने शिकवू डॉक्टरने थर्मामिटर रुग्णाच्या कानात लावलेला पाहून तोंड करावं तसे भाव चेहऱ्यावर आणत त्या यंत्राच्या वरचा आणखी एक लेयर सुटा केला आणि म्हणाली “कर आता चटणी”. मी चटणी केली. चव चांगली जमली होती. (कदाचित माझ्या हाताला चव असे असा समज करून घेऊन मी स्वतःच स्वतःची लाल केली.) मग सँडविच टोस्ट करून कन्येला दिलं. हॉटेलात साधारण शंभर ते दीडशे रुपयाला मिळणार तेच सँडविच मी त्याच्या एक चतुर्थांश पेक्षा कमी किमतीत केलं होतं. मग मतोश्रींना सँडविच दिली. कॉन्फिडन्स आल्यावर कन्येला व्हेज चीज टोस्ट सँडविच दिली. काम जमून गेलं. एकदम झकास!

काही दिवसात माझी ही कीर्ती संध्याकाळी येणाऱ्या आमच्या स्वयंपाकिण बाईंपर्यंत पोहोचली असावी. कारण रोज संध्याकाळी बायकोला “ताई जेवण काय करू” असं फोन करून विचारणाऱ्या त्या बाईंनी एक दिवस मला विचारलं “साहेब आज भाजी काय करू?” मी पण सराईतपणे आज दहा पोळ्या, फ्लॉवर भाजी करा बटाटा घालून आणि काकडी टोमॅटो सलाड करून ठेवा. कांदा बारीक चिरून ठेवा कोशिंबिरीसाठी सांगून मोकळा झालो! त्या दिवसापासून स्वयंपाकीण बाई देखील आधीपेक्षा जास्त चविष्ट जेवण बनवू लागल्याचं माझ्या लक्षात आलंय! बहुतेक माझं पोळ्या आणि भाजी देखील शिकायचं स्वप्न त्यांच्या लक्षात येऊन स्पर्धा निर्माण व्हायच्या आधी त्या त्यांचा दर्जा सुधारून मालकीण बाईंना इम्प्रेस करायच्या तयारीत आहेत!

हा मजेचा भाग सोडला तर स्वयंपाक करणे ही खरच खूप आनंददायी आणि मजेशीर गोष्ट आहे. आपण तयार केलेली वस्तू ज्यांच्यासाठी केली आहे त्यांना ती आवडणे ह्यात मोठं सुख आहे. त्यात हे बाईच काम अस अजिबात म्हणू नये. बाई जर अर्थार्जनाच काम, जे पुरुषांचं(च) काम आहे असा गैरसमज आहे ते करत असेल तर शक्य असेल तेव्हा पुरुषांनी स्वयंपाक का शिकू नये आणि करू नये? आणि स्वयंपाकात खरच खूप मजा म्हणजेच fun आहे. मग Why should girls have all the fun?- मंदार जोग

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!