कोकण यात्रा भाग १

कुलदैवताच्या दर्शनाला जाऊन जवळजवळ एक तप उलटलं होतं. काही ना काही कारणाने जायची इच्छा असूनही जायला झालं नव्हत. कधी आम्हाला राजा नाही तर कधी कन्येला सुट्टी नाही. कधी सगळ जमून आल तर आयत्या वेळी काहीतरी मोडता येऊन जाणं होत नव्हत. पण ह्यावेळी मात्र देवानेच बोलावण धाडलं आणि डिसेंबरचा पहिल्या आठवड्यात कोकणात देव दर्शनाला जायचा निर्णय पक्का झाला. नाताळच्या मुहूर्तावर जायचं ठरलं. स्वतःची गाडी घेऊन जायचा प्लान झाला. मुंबई ती राजापूर ते गणपतीपुळे असा पहिल्या दिवसाचा प्लान ठरवला. साधारण अंतर सहाशे किलोमीटर. कोकणातील रस्त्यांची ख्याती माहित असल्याने त्याबद्दल चौकशी सुरु केली. फेसबुकवरील प्रवासाशी संबंधित एका समुहात कसं जाव ह्याची विचारणा केली. आम्हाला काहीच माहिती नव्हती. ह्या आधी नेहमी भाड्याची गाडी घेऊनच देवदर्शन केल असल्याने ड्रायव्हर इच्छित स्थळी नेत असे. आम्हाला रस्ता, अंतर वगैरेची चिंता कधीच नव्हती. पण ह्यावेळी स्वतः गाडी चालवत जायचं ठरवल्याने शक्य तितकी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होता.
सदर समुहातील सदस्यांनी इतकी सुरेख माहिती दिली की जणू ते आमच्या बरोबर प्रवास करत आहेत अस वाटावं. गोवा रोड टाळून बंगलोर रोड ने जाण्याबद्दल सर्वांच एकमत होत. कराड वरून पुढे आंबा घात की कोकरूड मार्गे अनुस्कुरा घाटातून राजापूर ह्यावर दोन गट पडले होते. काही लोक अनुस्कुरा घाट चांगला म्हणत होते तर काही कालच अंबाघाटातून आलो रस्ता सुसाट आहे सांगत होते. मला निर्णय घेण कठीण होऊन बसलं होत. Map वर अनुस्कुरा घाटातून जवळजवळ एक तास वाचत असल्याच दिसत होत. पण रस्त्याची स्थिती मात्र माहित नव्हती. एकुणात कराड मार्गे गेल्यास रस्ता गोवा रोड पेक्षा बरा मिळेल पण काही ठिकाणी अजूनही खराब असेल ह्याची मानसिक तयारी केली होती. निघायच्या आदल्या दिवशी काही फेसबुक मित्रांनी अनुस्कुरा घाटातून बिनधास्त या असे मेसेज केले आणि आम्ही अनुस्कुरा घाटावर शिक्कामोर्तब करून शार्प दहा वाजता झोपी गेलो .
सकाळी तीनला उठून अंघोळी वगैरे आटपून पहाटे शार्प चारला देवाच नाव घेऊन घरातून बाहेर पडलो. चोवीस डिसेंबर म्हणजे नाताळच्या आदला दिवस असल्याने रस्त्याला ट्राफिक खूप असेल ही अपेक्षा असल्याने मुंबई मधून शक्य तितक्या लवकर एक्झिट आणि खंडाला घाट गर्दी व्हायच्या आधी पार करणे ही दोन उद्दिष्ट होती. मला स्वतःला मुंबईत गाडी चालवायचा प्रचंड कंटाळा असल्याने गाडी बायको चालवत होती. मी कन्या आणि बायको चार वाजता निघालो. रस्त्यावर चिटपाखरू नव्हत. गाडी सुसाट निघाली. गुगल बाबाचा नकाशा साथीला होता. ज्या कोणी गुगल maps नामक संकल्पना शोधली आहे त्याला साष्टांग दंडवत. कन्या मागल्या सीटवर झोपी गेली. अगदी लहान असल्यापासून गाडी सुरु झाली की ती गाडीत गाढ झोपते. तिला सीट बेल्ट लावायला सांगितला होता. गाडी एक्स्प्रेस वे वर आरूढ झाल्यावर स्पीड ऐशीच्या आत ठेवत बायको गाडी चालवू लागली. हल्ली एक्स्प्रेस वे वर ठिकठीकाणी स्पीड गन लावलेल्या आहेत. स्पीड लिमिट आखून दिली आहे. बहुतांश ठिकाणी शंभर ही लिमिट आहे. घाटात काही ठिकाणी अगदी पन्नास किलोमीटर लिमिट असलेल्या काही जागा सुद्धा आहेत. जर स्पीड लिमिट ओलांडताना फोटो आला तर सरळ हजार रुपयांचा चुना आहे. आणि पुढील प्रत्येक चुकीला दोन हजारांचा बांबू. माझे अनेक मित्र मुंबईतील सी लिंक आणि एकस्रेस वे ह्या ठिकाणी पंधरा वीस हजार ओव्हर स्पीडिंगच्या नादात गमावून बसलेत. त्यामुळे स्पीड लिमिट आणि गाडीच्या स्पीडवर त्यावर लक्ष ठेवत आमचा क्रुझ सुरु होता.
अजूनही अंधार होता. फारशी रहदारी नव्हती. घाटात काही अंतर पार केल्यावर मात्र अचानक वेग मंदावला. पहाटे पावणे सहा सहाच्या दरम्यान अचानक गाड्यांचा जत्था जमा झाला होता. एकमेकांना ओव्हर टेक करण्याची अहमिका सुरु होती. लोक अत्यंत बेशिस्त पद्धतीने गाड्या कश्याही रेटत होते. ह्या सगळ्याच्या मुळाशी होते उजव्या बाजूच्या पहिल्या (ओव्हर टेकच्या) मार्गिकेतून वीसच्या स्पीडने सावकाश आणि निर्लज्जपणे ट्रक हाकत असलेले मुजोर ट्रकवाले! हे लोक ओव्हर टेकच्या लेन मध्ये बेमुर्वतखोर पणे वर्षानुवर्ष गाड्या चालवत आहेत. संन्या माणसाने दहा किलोमीटर वेग मर्यादा ओलांडली तर लगेच फाईन लावणारे शासन आणि संबंधित अधिकारी सबंध वाहतुकीला वेठीस धरून एकमेकांच्या शेजारी एकमेकांशी वीस आणि तीस किलोमीटर प्रती तास अशी स्पर्धा लावत ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात सगळा ट्राफिक जाम करणाऱ्या ट्रक वाल्यांवर काहीच कारवाई का करत नाहीत? सामान्य माणसाची गाडी दिसते त्यात हे हरामखोर ट्रक दिसत नाहीत का? की वर्षानु वर्षांची सेटिंग आहे आणि सरकार कोणतही आल तरी ट्रक मालक प्रसाद वाटप सातत्याने आणि त्याच आस्थेने करत असल्याने त्यांच्याकडे कानाडोळा करून सामान्य माणसाला नेहमी प्रमाणे दंड केला जातो? ह्याच उत्तर आजवर कोणी दिलेलं नाही. पहिल्या लेन मध्ये ट्रक चालवल्यास चालकाचा परवाना तीन महिने जप आणि पहिल्या वेळेला दहा हजार दंड आणि पुढील प्रत्येक वेळेला पन्नास हजार दंड आकाराला तसेच तीनदा हाच गुन्हा केल्यास लायसन्स रद्द असा कायदा करता येणार नाही का? पण असो. सेटिंग नक्की जोरदार आहे त्या लॉबीच.
पुणे क्रॉस करून आम्ही कराडच्या दिशेने निघालो. मस्त सूर्योदय झाला होता. हातात वेळ कमी आणि कराड पासून पुढे रस्त्याची स्थिती फार माहित नसल्याने शक्यतो फार ब्रेक न घेता जायचा आमचा प्रयत्न होता. एका ठिकाणी फ्रेश व्हायला थांबलो आणि इडली वडा पोहे असा लाईट नाश्ता आणि चहा घेऊन पुढे निघालो. कराडच्या पुढे map दाखवत असलेला राईट टर्न घेतला आणि कोकरूड च्या दिशेने निघालो. लहान लहान गावे मागे टाकत, गावातल्या गर्दीत कमी होणारा वेग पुढे कव्हर करत निघालो. आणि हो नाश्ता झाल्यावर गाडी मी चालवू लागलो. बायकोने जवळजवळ पाच तास गाडी चालवली होती. आता माझी पाळी होती. मलकापूर फाट्याला डावीकडे वळून अनुस्कुरा घाटाकडे निघालो आणि आमच्या कुलदेवीचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर येऊ लागलं. अजून भरपूर वेळ होता पोहोचायला. पण आस लागून राहिली होती. त्यामुळे रस्त्यावर असलेले खड्डे फार त्रास देत नव्हते. एकूणच कोकणात रस्त्याचं काम जोरात सुरु आहे. अजून दीड ते दोन वर्षात कोकणातील रस्ते जबरदस्त होतील ह्यात शंका नाही. पण आतील रस्त्यांवर काम करायची गरज आहे. काही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. कोकणवासी वर्षनुवर्ष ह्याच रस्त्यांवरून प्रवास करतात ह्या कल्पनेने वाईट वाटल आणि आश्चर्य देखील. कोकणातून वर्षानुवर्ष निवडून येणारे लोकप्रतिनिधी चांगल्या रस्त्यासारख्या मुलभूत सुविधेपासून मतदारांना इतकी वर्ष वंचित ठेवतात आणि कोकणातील मतदार अजूनही मतदान करतात ह्याच वैषम्य वाटलं. असो.
तर आम्ही घाट पार करून राजापूरच्या दिशेने निघालो. आमचे देवस्थान राजापूर पासून आणखी खाली पंचवीस किलोमीटरवर आहे. राजापूर क्रोस करून map दाखवत असलेल्या दिशेने आम्ही निघालो. देवस्थान map वर पंधरा किलोमीटर दाखवत होते आणि आम्हाला रस्त्यात आमच्या कुलस्वामिनीचे मंदिर उजवीकडे आहे असा बोर्ड दिसला. Map अजूनही पंधरा किलोमीटर पुढे असच दाखवत होता. आम्ही आश्चर्याने थक्क झालो. तिथे रस्त्याने जात असलेल्या एका आजोबांना विचारलं. ते म्हणाले हेच मंदिर त्या देवीच. आम्ही त्यांना आमचं मंदिर असलेल्या गावाचं नाव सांगितल. ते म्हणाले की ते पुढे आहे. हे देऊळ त्याच नावाच्या दुसऱ्या देवीचे आहे. आम्ही हसून पुढे निघालो. काहीतरी चमत्कार झाला आणि देवी आम्हाला भेटायला आली असा क्षणभर झालेला गैरसमज दूर होऊन आपला पुण्यसंचय इतका नसल्याची जाणीव होऊन आम्ही मार्गक्रमण करू लागलो. गुगल दाखवत असलेल्या रस्त्याला फॉलो करत एका पठारावर आलो. तिथून उजवीकडे जायला सांगितल. आम्ही वळलो.
रस्ता मातीचा. फार तर दहा फुट रुंदीचा आणि उतार. आमच्या देवीच्या देवळाचा जीर्णोद्धार झाल्याचं ठाऊक होत. देऊळ मुख्य रस्त्यावर डावीकडे असल्याचं स्मरणात होत. तो रस्ता जरा वेगळा भासत होता. पण दहा वर्षात बदल झाले असतील किंवा माझी स्मरणशक्ती खराब झाली असेल अस म्हणत गुगल वर विश्वास ठेऊन आम्ही त्या उतरणीवर जाऊ लागलो. पुढे गाडी वळवायला तरी जागा असेल की नाही असा रस्ता. आता दोन्ही बाजूला झाडी. तीन चार किलोमीटर गेल्यावर एक घर दिसलं आणि पुढे आणखी खाली जाणारी अगदी कच्ची दगडी सडक. Map देऊळ शंभर मीटर वर असल्याच सांगत होता. आम्ही मनाचा हिय्या करून पुढे गेलो. पूर्वी नेहमी रस्त्याच्या डावीकडे येणार देऊळ ह्यावेळी उजवीकडे लागलं. त्याच्या बाजूला असलेला मोठा रस्ता, गाव, मैदान वगैरे जाऊन एक लहानशी सडक होती. रस्त्याच्या लेव्हलला असलेल देऊळ दहा पायऱ्या उररून खाली दिसत होत. हे पाहून मला आश्चर्य वाटलं. जीर्णोद्धारात मंदिर मूळ स्तनावरून हलवून गावातून ह्या जंगलात आणून बांधल्याच पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण तिथे विचारणार कोणाला? कोणीही नव्हत! सर्वांच्या फोनची नेटवर्क गेलेली.
मी बायको आणि मुलीला गाडीत बसायला सांगून पायर्या उतरून देवळात गेलो. देवळात कोणीही नव्हत. मी दार उघडून आत गेलो. मी दहा वर्षांपूर्वी पाहिलेलं मूळ मंदिर खूप लहान होत. हे मोठ जीर्णोद्धारानंतर झाल असाव अस समजून मी घंटा वाजवून आत गेलो. गाभार्या जवळ गेलो तर आत आमच्या देवीची मूर्ती नवती. त्या ऐवजी तिथे पूजा केलेल्या काही निराकार अश्या दगडांच्या प्रतिकृती होत्या. मी आणखी निरखून पाहिलं. आमच्या देवीची मूर्ती नव्हती. तिथे देवीच्या आकाराच काहीच नव्हत. मला काय कराव कळत नव्हत. कोणाला विचारावं कळत नव्हत. बाहेर आलो. भिंतीशेजारी एक घर होत. तिथे एक आजी दिसल्या. त्यांना मी विचारलं की हे मंदिर अमुक देवीच आहे ना? त्या हो म्हणाल्या. मी म्हणालो पण मूर्ती दिसत नाहीये. त्या म्हणाल्या आत आहेत त्याच मुर्ती आहेत. मी गाडीजवळ येऊन बायकोला आत काय आहे सांगितल. कदाचित जीर्णोद्धारात मूळ मूर्ती विसर्जित करून ह्या नवीन प्रतीकात्मक मूर्ती ठेवल्या असतील अश्या निष्कर्षावर आम्ही आलो आणि बरोबर आणलेली ओटी, साडी त्याच देवळात अर्पण करून निघावे अस ठरलं. पुढे गणपतीपुळे गाठायचं होत आणि रस्ता खराब असल्याची कल्पना होती. आम्ही गाडीतून निघणार इतक्यात काय झाल माहित नाही. मला माझ्या भावाने आमच्या देवीच्या देवळाचा फोटो पाठवला होता तो आठवला. मी तो फोटो काढून पाहिला. ते देऊळ समोर दिसत असलेल्या देवळा सारखंच होत पण त्याच्या घुमटाच्या सभोवार कठडा होता. थोडक्यात हे ते मंदिर नव्हत.
आम्ही नमस्कार करून कशीबशी गाडी वळवून तिथून बाहेर मुख्य रस्त्यावर आलो. देवीचे नाव आणि मंदिर ऐवजी देवीचे नाव आणि टेम्पल अस ना map वर टाकलं आणि map ने तिथून तीन किलोमीटर वर असलेल त्याच नावाच्या आमच्या देवीच देऊळ दाखवलं. आम्ही खूप खुश होत निघालो. आमच्या देवळाजवळ आलो. रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल देऊळ. समोर मैदान असलेलं आमच्या कुलदैवतेच देऊळ! त्यावेळी जो आनंद झाला त्याच शब्दात वर्णन नाही करता येणार. इतके तास केलेला खडतर प्रवास फळाला आला होता. चुकीच्या ठिकाणी गैर समजातून पूजा करण्याचा विचार करणाऱ्या आम्हाला देवीने स्वतः बोलावून घेतल होत तिच्या चरणी! आमच जून लहानस देऊळ जाऊन तिथे खूप सुंदर मोठ मंदिर उभ राहील होत. आम्ही आत जाऊन मनोभावे पूजा केली. बायकोने ओटी भरली. दानदक्षिणा करून, देवीची मनोभावे करुणा भाकून काही घटका तिच्या सहवासात देवळात बसून, पाणी पिऊन आम्ही अत्यंत समाधानाने गणपतीपुळ्याकडे मार्गस्थ झालो.
Map अंदाजे शंभर किलोमीटरच्या अंतराला अंदाजे तीन तास दाखवत होता म्हणजे रस्त्याची कंडीशन फार ग्रेट नव्हती हे लक्षात आलं. पण उत्तम दर्शन झाल्याच आनंद आणि रस्ते खराब असतील ह्याची मानसिक तयारी ह्यामुळे आम्ही मजेत निघालो. वेळ घालवायचा नाही म्हणून सकाळी नऊला केलेल्या नाश्त्यानंतर कुठेही थांबलो नव्हतो. पोटात आणखी काही नव्हत. बरोबर नेलेली बिस्किटे, चिवडा ह्यावर वेळ भागवली होती. तसेच मार्गक्रमण करत रत्नागिरी मधून जाताना लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान अशी पाटी दिसली आणि काही अंतरावर डावीकडे ती वस्तू दिसताच हात जोडले जाऊन गाडी पुढे काही अंतरावर थांबली. गाडी पार्क करून उतरून आम्ही बाहेरूनच त्या वास्तूला नमस्कार केला. फोटो काढले आणि जवळच असलेल्या एका हॉटेलातून काही नाश्ता आणि ताक बांधून घेऊन गणपतीपुळ्याकडे निघालो. काही वेळात अंधार झाला. मध्ये मध्ये रस्ता भयानक खराब होता. पण आम्ही देवीच्या उत्तम दर्शनानंतर लोकमान्यांचे जन्मस्थान देखील बघायला मिळाल्याच्या आनंदात गाडीची लागणारी वाट मनावर न घेता प्रवास करत होतो. शेवटी एकदाचे गणपतीपुळ्याला पोहोचलो. आमचं बुकिंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि रूम मध्ये गेलो. (ह्या ठिकाणाबद्दल पुढील लेखात विस्तृत लिहिणार आहे.). मस्त अंघोळी करून फ्रेश झालो आणि मग जेवायला बाहेर पडलो.
बाजारात जायची हिम्मत नव्हती इतकी प्रचंड गर्दी होती. म्हणजे आम्ही गणपतीपुळ्यात शिरल्यावर गोव्याला आलो की काय अस वाटावं इतकी गर्दी तिथे होती. अत्यंत बेशिस्तीने रस्त्यात कुठेही पार्क केलेली टुरीस्ट मंडळींची वाहन त्या बिचार्या लहानश्या गावाच्या रस्त्यांची परीक्षा बघत होती. बहुतेक मंडळी “जीवच गणपतीपुळे” करायला आलेली असल्याच लक्षात येत होत! (ह्यावर देखील पुढील भागात लिहिणार आहे.). तर आम्ही तो कोलाहल टाळायला जवळच हॉटेल शोधत होतो. बायकोला फारशी भूक नव्हती. मी आणि कन्येने एक लोकल बर्गर शॉप हेरलं. अजिबात गर्दी नसलेलं. आम्ही ऑर्डर दिली आणि उदर भरणं म्हणून दोन ओके चवीचे बर्गर खाल्ले आणि रूमवर आलो. उद्याचा दिवस आरामाचा होता. रात्री गप्पा मारत, काढलेले फोटो बघत उद्या आरामात उठायच्या तयारीने टीव्ही वगैरे बघून अंमळ उशिरा झोपलो. डोळे मिटताच डोळ्यासमोर सबंध दिवसाचा सहाशे किलोमीटरचा प्रवास आणि आमच्या देवीचा चेहरा दिसत होता. तिनेच बोलावण धाडल्याने हि ट्रीप ठरली होती. तिलाच आम्हाला दर्शनाची संधी द्यायची होती म्हणून रस्ता चुकलेल्या आम्हाला तिने एक क्लू देऊन स्वतःच्या चरणी बोलावून घेऊन छान दर्शन दिल होत. तिच ते रूप डोळ्यासमोर असतानाच झोप कधी लागली ते कळल नाही. पहिला दिवस खूप छान, यशस्वी आणि मंगलमय झाला. आम्हाला देवीच दर्शन, तिचा सहवास आणि आशीर्वाद देऊन गेला. उद्या आरामाचा दिवस. त्याबद्दल पुढील भागात.
– मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!