आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग १
श्रद्धाताई दुपारच्या थोड्या लवंडल्या होत्या…पडल्या पडल्याच संध्याकाळी जेवायला काय करायचं याचा विचार करत होत्या. तेवढ्यात फोन खणखणला…ताडकन उठून पळतच फोन घ्यायला गेल्या..तर पलीकडून एका बाईंचा आवाज ऐकू आला…मी स्नेहा मराठे बोलतीये..अमेय ची आई.. हा हा बोला वाहिनी…कशा आहात? मी छान आहे..तुम्ही घरी असाल तर मी तुमच्याकडे यायचं म्हणत होते…चालेल का..वेळ नसेल तर परत कधीतरी पण लवकरच भेटूयात…
आहे मी घरी..या तुम्ही.
बरं..मी पंधरा मिनिटात येतेच…
थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली…श्रद्धाताईंनी स्नेहाताईंचे हसून स्वागत केले…बसण्यासाठी निर्देश करून चहा आणायला त्या आत गेल्या..कप बशी पुढे करून त्यांच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या…तसा स्नेहाताईंनी त्यांना विचारलं…विनी घरी यायला अजून किती वेळ आहे?? ती ७ च्या पुढेच येते..बरं मग मी आधीच बोलून घेते.
तुमची विनी आम्हाला खूप आवडली…बाकीची बोलणी व्हायच्या आधी मला तुमच्यामुलीविषयी जाणून घ्यायचं आहे.. तिची जीवनशैली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून आणि त्याच्या घरच्यांकडून काय अपेक्षा आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे. म्हणजे तिच्या जन्मापासून आत्तापर्यंत..तिचा स्वभाव, तिच्या आवडी निवडी..तुमची परवानगी असेल तर तिची खोली पण बघायला मला आवडेल..बघा हं, तुम्हाला चालत असेल तर…
हो चालेल कि, पण????
अहो घाबरू नका..जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या मुलीला आवडेल रुचेल असं वातावरण निर्माण करायचंय मला आमच्या घरात…म्हणजे तिच्या खाण्यापिण्याच्या सवई आवडी निवडी जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं तिच्यासाठी करायला आवडेल मला.
आपण सुद्धा या सगळ्यांमधून गेलो आहोत..आपल्याला हि तडजोडी करायला लागल्याचं कि..पण आपला काळ वेगळा होता..आताचा वेगळा आहे…आता या मुलांमध्ये सहनशक्तीचा अभाव आहे..जुळवून घेणं माहीतच नाही..तोंडातून शब्द बाहेर पडला कि यांना सगळं हवं असतं..मी अमेय ला जेवढ शक्य होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला आहे…लग्नाच्या दृष्टीने बरेच बदल त्याच्यात घडवून आणले आहेत…ठोकून तयार केलाय म्हणा ना…तो दोन वर्षे अमेरिकेला गेला तेव्हा तिथे उत्तम प्रकारे स्वयंपाक करायला शिकला..आपली मुलं वरण भात तूप वाली..जरा अवघडच गेलं तिथे..पण त्याला कळलं कि घरात किती कामं असतात..वेळ पडली तर धुणं भांड्यापासून सगळं आपल्यालाच करावं लागतं..
आणि आजकाल आपल्याला काय दुसरं हवं असतं सांगा…घरातल्या माणसांशी हसून बोलणे, त्यांचा आदर करणे, येणाऱ्यांचा पाहुणचार करणे वगैरे…जबाबदाऱ्या नीट संभाळल्याशी कारण..नातं टिकवणं फार कठीण आहे..
आता आमच्याघरी २-३ बायका कामाला आहेत..आम्ही तसे सधन आहोत ..घरात कशाला कमी नाही..तुमच्या मुलीला तसं काहीच करायला लागणार नाही..पण वेळ आलीच तर सगळं करायची तयारी पाहिजे…आम्ही हौशी आहोत पण उधळे नाही..त्यामुळे आमच्या मुलाला पण आम्ही हात राखून खर्च करायची सवय लावली आहे…शेवटी पैशानेच पैसा जोडला जातो..नाही का…आजकाल मुलांमध्ये वीकएंड औटींग कॉमन आहे… त्याचं एवढं काही नाही..पण त्याबरोबरच घरच्यांना काही खायला आहे का याची निदान चौकशी करण्याची अपेक्षा आहे.. ..बरं वाटतं हो असं केलं कि…नाहीतर आजकाल मुली पर्स उचलून सरळ काहीही न सांगता सवरता नवऱ्याबरोबर बाहेर चालू पडतात.
त्यामुळेच आजकाल जी वादाची क्षुल्लक कारणं आहेत तीच मला बायपास करायची आहेत…
बराच वेळ दोघींच्या गप्पा रंगल्या…श्रद्धा ताईंनी सुद्धा आपल्या मुलीविषयी त्यांना भरभरून सांगितलं…आणि खोली सुद्धा दाखवली…तिथला कॉम्पुटर, त्याच्या खुर्चीवर ठेवलेले तिचे ड्रेस बघून स्नेहाताईंना हसू आलं..विनीच्या खोलीमध्ये ठेवलेल्या गोष्टींवरून त्या तिच्या स्वभावाचा आणि सवयींचा अंदाज लावायचा प्रयत्न करत होत्या..बघता बघता दोन तास कसे गेले कळलंच नाही…तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला…श्रद्धाताई, “विनी आली वाटतं” असं म्हणत दार उघडायला गेल्या..तर मॅडम नि भराभरा चपला काढून, पर्स एका साईड ला फेकून स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं…आई फक्कड चहा दे बघू..असं म्हणत ऑफिस मध्ये दिवसभर काय काय झालं हे सांगायला सुरवात केली..श्रद्धाताई पण “ चहा आणते ग” असं म्हणून , आतून सगळ्या बडबडीला प्रतिक्रिया देत होत्या..स्नेहाताईंनी त्यांना हळूच खूण केली आणि चहा घेऊन त्यांनी विनी च्या समोर धरला..तिने पण न बघताच चहा घेतला..आणि कप बशी बाजूला ठेवली…आई खायला काय केलंयस असं म्हणत वर पाहिलं तर शॉक लागल्यासारखी ताडकन उठून उभी राहिली..समोर स्नेहा ताई हसून बघत होत्या..पटकन तिने कप बशी उचलून आत नेली आणि डोळ्यांनीच आईला त्यांच्या येण्याविषयी विचारले…तशी त्याच म्हणाल्या तुलाच भेटायला आले होते…आता एकदा तू पण अमेय घरात असताना अशीच सरप्राईज व्हिजिट दे..चला आता मला निघायला हवं..श्रद्धाताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून..आता एकदा विनी आणि अमेयची भेट झाली कि आपण या नात्यावर शिक्कामोर्तब करू..आणि कामाला लागू…असं म्हणून त्या निघून गेल्या..या अनोख्या वधू परीक्षेने श्रद्धाताई एक्दम भारावून गेल्या आणि आपल्या लाडक्या लेकीला कसं ठोकून तयार करता येईल याचा विचार करू लागल्या.
क्रमश:
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ६ - July 21, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ५ - June 30, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 4 - June 17, 2023