आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 3

अमेय विनी ला  सोडून त्याच्या घरी निघून गेला आणि विनी तिच्या खोलीत गेली..उशीर झाला होता..बाबा कधीच झोपले होते आणि आई तिची वाट बघत टीव्ही बघत बसली होती..विनीला आलेली बघून आई म्हणाली झोप आता उशीर झालाय आणि सगळे दिवे मालवून आई झोपायला गेली…विनी बेड वर पडून तिचं आणि अमेय च बोलणं आठवत होती….अमेय ने तिला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल  सर्व तपशीलवार सांगितलं…त्याचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता..त्याचं लग्न शेफाली राव या मुलीशी झालं होतं..तेही बघूनच केलेलं..शेफाली दिसायला अत्यंत सुंदर आणि उच्चशिक्षित होती..तिचे वडील प्रथितयश व्यावसायिक होते आणि आईचं बुटीक होतं….कोथरूड मधील महात्मा सोसायटी मध्ये मोठा बंगला होता..एकुलती एक त्यात सुंदर आणि हुशार…प्रथम जेव्हा अमेय आणि ती भेटले तेव्हा अमेय ला ती दिसायला खूप आवडली….अमेय च्या आई-बाबांनी सुद्धा लगेच त्यांना पसंती कळवून टाकली आणि त्यांच्या इतमामाला साजेसं एका पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं..हनिमूनला दोघे थायलंड ला गेले…दोन तीन दिवस छान मजेत गेले…तिथे दोन रात्रीसाठी त्यांनी क्रूझ बुक केली होती..दोघे गप्पा मारत डेक वर उभे होते..ती तिच्या ऑफिस मधील कलिग्स , मित्रमंडळी, करिअर , तिची लाईफ स्टाईल वगैरे वगैरे विषयी त्याला सांगत होती….पण त्याला जाणीव झाली कि ती तिच्या बॉस विषयी जास्ती बोलत होती..कधीही बाहेर फिरायला जाताना कपडे कुठले घालायचे हा विषय निघाला कि हि आपली आशुतोष चा (तिचा बॉस) अमुक अमुक रंगाचा एक टी -शर्ट आहे तसा तू घातलास तर छान दिसशील म्हणायची..ते त्याला खटकत होतं पण त्याने दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी ते घरी परतले आणि दोघांचं रुटीन सुरु झालं…ती एका आय टी कंपनी मध्ये हेड एच आर म्हणून काम करत होती..पगार भरपूर..ऑफिस मधेच कॅन्टीन असल्यामुळे डबा वगैरे काही न्यायची नाही..रोज उशिरा उठायची आणि स्वतःच आवरून कॅब नि ऑफिसला निघून जायची..रात्री अमेय यायच्या वेळेला घरी यायची..घरी आलं कि तिच्या खोलीत जाऊन बसायची…जेवायला ये म्हंटलं कि बाहेर येऊन जेवायची कि परत आत..कोणाशी बोलणं नाही..साधी चौकशी पण नाही..काम करणं तर लाम्बचीच गोष्ट…

घरामध्ये तेव्हा अमेय चे आजी-आजोबा म्हणजे वडिलांचे आई वडील राहत होते..त्यांच्याशी तर चकार शब्द नाही..त्यांनी प्रश्न विचारला तर तेवढ्या पुरतंच उत्तर…स्नेहाताई एवढ्या स्वभावाने गोड, तिला हवं नको ते बघणाऱ्या पण त्यांच्याशी सुद्धा जास्ती बोलायची नाही…आधी, वेगळं वातावरण म्हणून असेल,  हा विचार करून सगळ्यांनी तिला समजून घेतलं…पण सुधारणा काही होतं नव्हती..

काही दिवसांनंतर  अमेय अमेरिकेला काही महिन्यांसाठी गेला..तेव्हा हि आणि घरातले बाकीचे एवढेच..घरा मध्ये ती एर्वी स्लॅकस टी-शर्ट मध्ये असायची पण नंतर टाईट्स आणि मग शॉर्ट्स घालायला सुरवात केली..आजी आजोबांना हे बिलकुल पसंत नव्हतं..त्यांनी तस स्नेहाताईंनाही सांगितलं…मग त्या तिच्या आईशी या विषयी बोलल्या..तिच्या आईने तिला समजावण्यासाठी फोन केला..तर हि तिच्यावर आणि बाकीच्यांवर पण रागावली..असेच कसेतरी दिवस पुढे जात होते..शनिवार रविवारी तर काय हि तिच्या माहेरी तरी जायची नाहीतर मैत्रिणींबरोबर फिरायला….स्नेहाताईंनी तिला स्पष्टच सांगितलं कि तुझा नवरा इथे नसताना तू असं दिवसभर बाहेर जाणं..रात्री उशिरा येणं..हे प्रकार नाही चालणार..वागण्याला काहीतरी धरबंध हवा…त्यावर ती काही दिवस गप्पं बसली…त्यांना म्हणाली कि माझ्या घरी तर मला कधीच कोणी या बाबत बोललं नाही..तुमची बाई फारच शिस्त….

काही दिवस ती तिच्या माहेरी राहून आली..एक दिवस शनिवारी, ऑफिस ची पार्टी आहे, यायला उशीर होईल म्हणून सांगून गेली…रात्रीचे दोन वाजले तरी हिचा पत्ता नाही..सगळे काळजीने फोन करत होते..पण हि फोन उचलत नव्हती..काही वेळानंतर बाहेर एक गाडी थांबली..त्यातून हि उतरली आणि एक सुटाबुटातला माणूस हि…हि त्याचा हात हातात घेऊन त्याच्याशी गप्पा मारत होती..आजोबांना झोप लागत नव्हती…बाहेर कोण बोलतय म्हणून त्यांनी त्यांच्याखोलीच्या खिडकीतून पाहिलं तर हे दृश्य…त्यांना संताप अनावर झाला आणि ते तिरीमिरीत तसेच बाहेर आले…स्नेहाताईंनी त्यांना शांत राहण्याविषयी समजावले..उद्या बोलू..तुम्ही जाऊन झोपा असे सांगितले..त्यांनी तिला दार उघडून आत घेतले  तर त्या जाग्या आहेत हे पाहून ती थोडी चपापली..आपण उद्या बोलू असे सांगून त्या झोपायला गेल्या आणि ती सुद्धा..दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी तिला अशा बेफाम वागण्याचा जाब विचारला..तर ती सरळ म्हणाली कि मला तुमच्या घरात बोर होतं…तुमच्या मुलाचे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत..माझं आणि त्याचं फार काळ जमेल असं मला वाटत नाही..सगळ्यांनी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला तरी तिने काही ऐकले नाही..आणि बॅग भरून सरळ माहेरी निघून गेली..आजी आजोबांना हि गोष्ट फार मनाला लागली..जास्ती करून आजोबांना तर फारच..अमेय तिकडे असल्यामुळे त्याला यातलं काहीच माहित नव्हतं..शेफाली शी त्याचं फोन वर बोलणं व्हायचं पण तेही मोजकंच…ती माहेरी निघून गेल्यावर दोन दिवसात अमेय नि  घरी येत असल्याचं कळवलं…तो घरी आल्यावर त्याला काय सांगायचं असा विचार सगळेच करत होते…आजोबांना हा ताण सहन झाला नाही..आणि ते हार्ट अटॅक नि गेले…ज्या दिवशी तो येणार होता त्या दिवशीच हे सगळं झालं….त्याचे आजोबांवर जीवापाड प्रेम..अमेय चे वडील त्याला विमानतळावर आणायला मुंबई ला गेले..अमेय खुशीत होता…गाडीमध्ये सगळ्यांची चौकशी करत होता…कसातरी वडिलांनी स्वतःवर सय्यम ठेवला..घरी आल्यावर त्याला सगळा प्रकार कळला तर त्याला धक्काच बसला..शेफाली आजोबा गेल्यावर सुद्धा घरी आली नाही…दिवस वार झाल्यावर तो शेफालीच्या घरी गेला आणि तिला बरंच बोलला…तुझ्यामुळे माझे आजोबा गेले…तू जबाबदार आहेस…तू खुनी आहेस..मी तुला कधीही माफ करू शकत नाही..ती त्याच्यासमोरच तिच्या आई वडिलांना म्हणाली, कसला बोर नवरा शोधलात तुम्ही माझ्यासाठी..याच्या घरचे हि असेच..हे करू नको ते करू नको..अस  चालणार नाही तसं चालणार नाही..मला नाही जायचं परत तिकडे…आणि काही दिवसातच त्यांचा ६ महिन्यांचा संसार मोडला..

Kanchan Badamikar

Kanchan Badamikar

My name is Mrs. Kanchan Anand Badamikar. I am a caterer by profession and a writer by passion. I have written a number of stories on Facebook and two articles for Sakal Newspaper and Times of India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!