आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 4

रविवारची सकाळ..त्यात थोडं ढगाळ वातावरण….आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे..विनी ९ वाजले तरी उठलेली नव्हती..तिचे आई-बाबा दुसऱ्यांदा चहा पीत मस्त बाहेर वऱ्हांड्यात बसले होते..बाबांनी पेपर चाळतच श्रद्धाताईंना विचारलं,” हे काय, अजून विनी उठली नाही का?” नाही अजून…काल अमेय बरोबर बाहेर गेली होती, यायला उशीर झाला..त्यात आज सुट्टी..जरा जास्ती वेळ झोपलीये…बरं बरं झोपूदेत तिला…स्नेहाताई त्या दिवशी आपल्या घरी आल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी मला अमेय च्या आधीच्या लग्नाविषयी सर्व काही सांगितलं..फार तुटलं हो ऐकून पोटात…बघा ना, काय असा संसार झाला त्याचा, त्याच्या बायको बरोबर तो नीट राहिला सुद्धा नाही…आणि बिचार्यावर ‘घटस्फोटित’ असा शिक्का बसला..कशा हो आजकालच्या मुली…मुलं सुद्धा तसलीच..स्नेहाताई सांगत होत्या त्या दोघांचा घटस्फोट झाल्यावर त्यांनी एकदा शेफालीच्या आईला तिचे दागिने परत देण्याबाबत फोन केला..तर म्हणे आम्ही घातलेले दागिने तेवढे द्या..बाकी तुमचे तुमच्याकडेच राहूंदेत… तसेही तुम्ही घातलेले दागिने आणि तुमच्या आजींचा तो बकुळीचा हार तसाही ओल्ड फॅशन्ड वाटत होता शेफालीला..तिने तो घातलाच नसता…हे ऐकून त्यांचा संताप झाला होता…एवढा पैशाचा माज या लोकांना..

पर्वा श्रीकांत भाऊजींचा फोन आला होता..अमेयच्या स्थळाबाबत विचारत होते…..म्हणाले एका घटस्फोटीताच स्थळ विनीसाठी कशाला पसंत केल…..दुसरं  मिळालं असतं कि…पण मग मीच त्यांना सांगितलं कि ६ महिन्यातच झालाय घटस्फोट म्हणून…नीट चौकशी केली का, वगैरे विचारत होते…मी हो म्हंटलं..

आता त्या संजय खरे चा आपल्याला काय अनुभव आला पाहिलंत ना….बरं झालं विनि चं त्याच्याशी लग्न नाही झालं.. काय तो आणि त्याच्या घरचे…नाव मोठं आणि लक्षण खोटं…दुसरं काय….श्रद्धाताईंच्या समोर पटच उभा राहिला..

पुण्यातील नामवंत खरे कन्स्ट्रक्शन च्या खऱ्यांचा संजय हा धाकटा मुलगा..सिविल इंजिनियर…साहजिकच वडिलांबरोबर व्यवसायात सामील झाला…ह्यांचं स्थळ विनीच्या सोसायटीत रहाणार्या थिटे काकूंनी सुचवलं….खर्यांकडेच दाखवण्याचा कार्यक्रम झाला..घर कसलं, पॅलेसच म्हणा ना…..कोथरूड मधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये यांचा बंगला.. गेट मधून आत गेल्यावर हिरवंगार लॉन, उजवीकडे एक छोटासा धबधबा…कमपौंड च्या भिंतीवर चढलेली वाघ नखी आणि त्याच्यापुढे चक्क एक होडी आणून ठेवलेली.. त्या होडीवर फळी ठोकून, त्यावर रंगीबेरंगी उशा ठेवून सुंदर बैठकच तयार केलेली…त्यांच्या घरी गेल्यावर दडपणच आलं..मनात सारखा विचार येतच होता, हा आपला घास नाही…कशाला थिटे काकूंनी हे स्थळ सुचवलं असं झालं….घरी गेल्यावर एका मुलीनी दार उघडलं…मग तिघांनाही दिवाणखान्यात बसायला सांगितलं….केवढा मोठा हॉल…पेशवाई थाटाचं फर्निचर…मोठा पितळी कड्यांचा शिसवीचा झोपाळा…एका बाजूला सिल्क च्या कापडाची कव्हर्स असलेली बैठक…संगमरवरी फरशी…सुंदर पडदे…सुंदर कोरीव  काम केलेले सोफे आणि मोठ्या खुर्च्या…हॉल च्या मधोमध केवढा मोठा टीपॉय… एका भिंती जवळ एका जुन्या वाड्याचा सुंदर कोरीव काम केलेला दरवाजा शो साठी ठेवला होता..

सगळं बघून मनावर भयानक दडपण आलं.. मगाच्याच मुलीनी काचेच्या पेल्यामधून पाणी आणून ठेवल. म्हणाली…साहेब आणि मॅडम येतायत…तुम्ही बसा हं…..हॉल मध्ये मोठा टीव्ही होता, तो ऑन करून दिला आणि ती निघून गेली…विनी तर आईला घरी चलच म्हणत होती..तेवढ्यात खरे पती पत्नी आत आले…ते आत आल्याबरोबर सगळीकडे त्यांनी लावलेल्या परफ्युम चा सुगंध दरवळला…समोरच सोफ्यावर बसत त्यांनी नमस्कार केला आणि पुढे बोलायला लागले..मिसेस खरे म्हणाल्या कि अल्पना थिटे त्यांची लहानपणापासून ची मैत्रीण आणि आता भिशी ग्रुप मधली सुद्धा..तिनेच तुमच्या स्थळाबाबत सांगितलं…संजय येईलच इतक्यात..आज ऑफिस मध्ये थोडं थांबावं लागलं त्याला… घरकाम करणाऱ्या मुलीने मग सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट्स आणली…

मग विनीच्या शिक्षण, इतर छंद याबाबत चर्चा झाली…

मिस्टर खरे सतत मोबाईल मध्ये बिझी होते..आणि मधेच डोकं वर करून यांच्या गप्पांमध्ये भाग घेत होते.. मिसेस थिट्यान्च बोलणं झाल्यावर त्यांनी स्वतःच्या घराण्याविषयी माहिती सांगितली..कि ते मूळचे गुहाघरचे..त्यांचे वडील तिथले खोत..त्यांच्या नारळीपोफळीच्या आणि सुपारीच्या मोठ्या बागा…पण मिस्टर थिटे शिक्षणासाठी मुंबईला गेले आणि इंजिनीरिंग केल्यावर तिथेच कन्स्ट्रक्शन चा छोटा व्यवसाय सुरु केला..बरीच वर्ष तिथेच राहिले..आता मोठा मुलगा तिथला बिझिनेस बघतो…सून पण इंजिनियर आहे..पण घरचा व्यवसाय असल्यामुळे तिला त्यातच लक्ष घालायला सांगितलंय…..

तेवढ्यात संजय आला….आलोच फ्रेश होऊन म्हणून गेला…१० min हॉल मध्ये आला…उंच, देखणा, फक्त केस थोडे विरळ…सर्वांशी हसून बोलला…विनी पण त्याला खूप आवडल्याचं दिसलं….मग दोघे त्यांच्या बागेमध्ये बोलायला गेली..त्याने तिला सांगितलं कि त्याला मॉडर्न मुली खूप आवडतात..त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं आहे..त्याची आई पण वेस्टर्न ड्रेसेस घालते…त्याच्या बोलण्यावरून एकूणच त्याला त्याच्या श्रीमंतीविषयी गर्व असल्याचं जाणवलं…

प्राथमिक बोलणी करून विनी आणि आई-वडील घरी आले..विनी ला खात्री होती कि तो संजय तिला पसंत करणार नाही..तिलाही सगळं प्रकरण अवघड वाटत होत…पण त्यांचा दुसऱ्या दिवशी पसंतीचा फोन आला…संजय आणि ती पुन्हा हॉटेल मध्ये भेटली…विनी ने सुंदर चुडीदारच घातला होता…विनी ला पाहून संजय म्हणाला..हे काय तू साधाच ड्रेस घातलास…मला वाटलं मला मॉडर्न मुली आवडतात हे सांगितल्यावर तू जीन्स किंवा स्कर्ट घालून येशील…..तिला काही आवडतं पेक्षा त्याच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत याचीच त्याने लांबड लावली…जेव्हा तिने सांगितलं कि तिला प्रेमळ आणि निर्व्यसनी नवरा हवाय तेव्हा त्याला फार हसू आल…फारच बाळबोध आहेस ग तू…अस नसत आजकाल कोणी..ऑफकोर्स मी काही घरी झिंगत येत नाही पण, ओकेजनली घेतो मी बियर….मला माझी बायको एकदम स्मार्ट असायला हवीय..काकू नकोय..तुला थोडी तुझी लाइफस्टाइल चेंज करावी लागेल आमच्या घरात आल्यावर…माझं शिक्षण लोयोलाज मध्ये झालंय..सो मला माझी बायको फ्लुएंट इंग्लिश बोलणारी हवीय.थोडक्यात तो विनी कडे बायको म्हणून नाही तर एक ‘आर्म कँडी’ म्हणून बघत होता..विनी त्याला म्हणाली कि तिचं शिक्षण मराठी मिडीयम मध्ये झालंय आणि तिला आवश्यक तेवढं इंग्लिश बोलता येत होतं…तो म्हणाला डोन्ट वरी, आम्ही तुला आम्हाला पाहिजे तसं तयार करू….बोलणं झाल्यावर विनी घरी आली…डोक्याला हात लावून बसली…दुसऱ्या दिवशी थिटे काकू घरी आल्या..विनी ला म्हणाल्या भाग्यवान आहेस पोरी…नशीब काढलंस…खर्यांकडे एखाद्या राणी सारखी राहशील…नोकर चाकर सगळी सुखं हात जोडून उभी आहेत बघ….त्यांनी तिच्या आई-वडिलांना आणि तिला पुढे जाण्यासंदर्भात पटवलं..

साखरपुडा थाटामाटात पार पडला….संजय रोज विनी ला बाहेर घेऊन जायचा…वेग वेगळी ५ स्टार हॉटेल्स, त्याची  सर्व सुखवस्तू लाडावलेली मित्र मंडळी…मैत्रिणी…नाइटआउट्स…नुसतं उधाण आलं होतं..त्याचे ओकेजनल ड्रिंक्स रोजचेच आहेत हे तिच्या लक्षात आलं…एका पार्टी मध्ये तिने संजय आणि त्याच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकलं…त्यांचं तिच्याकडे लक्ष नव्हत…संजयला थोडी जास्त झाली होती…त्याची मैत्रीण आणि काही मित्र त्याला विनी विषयी सांगत होते…ड्युड हि मुलगी तुझ्या टाईप ची नाही यार…फारच साधी घरेलू आहे…तुला एकदम सॉलिड बायको पाहिजे…तसा तो हलक्या कानाचा असल्यामुळे…रोजच विनी ला लेक्चर द्यायला लागला..इतका कि तिला त्याचा उबग आला..एकूणच तिच्या लक्षात आलं….कि हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही…काही दिवसातच तिने त्याला सांगून टाकलं कि तीला त्याच्याशी लग्न करण्यात रस नाही…आणि लग्न मोडलं…

बाकीची स्थळं पण अशीच येत होती….सगळ्याच मुलांना एक प्रोग्रॅम्ड बायको  हवी होती…सुंदर, उच्चशिक्षित, भरपूर पैसे कमावणारी, घरातलं पण बघणारी मल्टिटॅलेंटेड आर्म कँडी…एका संस्कृत वचनाप्रमाणे – कार्येषु  दासी, कारणेषु  मंथरी; भोजेशु  माता , शयनेषु रंभा, रूपेशु  लक्ष्मी, क्षमायेषु  धरित्री , शांत  धर्मयुक्त , कुळधर्म  पत्नी, फक्त मॉडर्निझम चा तडका मारून…..

Kanchan Badamikar

Kanchan Badamikar

My name is Mrs. Kanchan Anand Badamikar. I am a caterer by profession and a writer by passion. I have written a number of stories on Facebook and two articles for Sakal Newspaper and Times of India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!