आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ५
विनी ने संजय खरेशी लग्न मोडल्याने थिटे काकू आणि विनी च्या आई-वडीलांमध्ये थोडं वितुष्ट आलं. पण एक दिवस विनी ने त्यांना समजावून सांगितलं, कि काकू तुम्ही माझ्या विषयी चांगला विचार करूनच हे स्थळ सुचवलं होतत, पण मी जर सुखी झाले नसते तर तुम्हाला आवडलं असतं का?? वर वर बघायला कोणालाही हेवा वाटेल असं स्थळ होत ते..केवढा पैसा, नोकर चाकर, दिमतीला गाड्या, ऊंची कपडे, पण जर नवराच समजूतदार नसेल आणि सारखं सारखं तुम्हाला खालवर बघून तुम्हाला सारखं शिकवत असेल, तर काय उपयोग….मुळात आमच्या दोघांच्या विचारसरणीत आणि घरातल्या वातावरणातच फरक होता..बरं मी एकवेळ तेही चालवून घेतलं असत..पण नवरा जर आपल्याकडे एक माणूस म्हणून नाही तर एक शोभेची बाहुली म्हणून बघत असेल…जर सोसायटी मध्ये बायको मिरवायची असेल, एक प्रेस्टिज पॉईंट म्हणून बघत असेल तर काय उपयोग..आणि मला माझं निम्म आयुष्य, त्याला माझे विचार पटवून देण्यात खर्च करायचं नव्हतं…..अबोलीच्या झाडाला गुलाबाची फुलं येण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे हे…थिटे काकूंना तिचं म्हणणं पटलं…आणि त्यांनी तिच्या गालावरून हात फिरवला..
असेच काही दिवस मध्ये गेले..रविवारचा दिवस…दुपारचं जेवायची वेळ झाली…विनी गाणी म्हणत ड्रेसेस ना इस्त्री करत होती…आठवड्याची तयारी..दुसरं काय..तेव्हड्यात आईनी तिला जेवायला बोलावलं….ओट्यावर ठेवलेल्या भाजीकडे बघत विनी म्हणाली हे काय गं आई…किती वेळा तुला सांगितलंय..मला फ्लॉवरची भाजी आवडत नाही म्हणून…आहा काय पण अगदी….फ्लॉवरची भाजी आवडत नाही, कि मी केलेली आवडत नाही…त्या दिवशी अमेय च्या आईनी केलेल्या भाजीचं वर्णन करायला शब्द पुरत नव्हते…..दोनदा मागून खाल्लीस ना..आता काय बाबा आईच्या हातचं खायला नको वाटतंय आणि तिकडचं सगळं गोड लागतंय…काय बरोबर बोलतीये ना मी…विनी लटक्या रागानी हसली…आणि आईच्या ओढणीशी खेळू लागली…म्हणाली असं काही नाही बरंका…तू त्यांच्या पद्धतीने भाजी करायला शिकून घे……….हे बघा काय ते…मी तशी भाजी करून काय करू…तूच शिकून घे…तिथे जाऊन तुलाच करायची आहे……विनीबाई आता तुम्ही संसारी होणार..आता हे असलं गाणी म्हणणं, कधीही झोपा, कधीही उठा..असलं काही चालणार नाही बरंका…..आता कंबर कसून कामाला लागा..तुमचे इथले दिवस संपले…आता तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी जाणार……विनी च्या डोळ्यात लगेच पाणी आलं…आई असं का गं म्हणतेस….लग्न झाल्यावर मी तुमची कोणीच नाही राहणार का…अगं तू तर माझी लाडाची लेक असशीलच गं….पण हि जगाची रीतच आहे…तुम्ही कुठेही जगात रहा…शेवटी मुलीलाच स्वतःचं घर सोडून नवर्याकडे जावं लागतं….शी बाई कोणी बनवल्या असल्या रीती आणि रिवाज…मला नाही माझ्या आई-बाबांना सोडून कुठे जायचं…..अगं वेडाबाई असं म्हणून चालत नसतं…तुझं लग्न होऊन काही दिवस जाऊदेत मग बोल माझ्याशी..मग जेव्हा मी तुला रहा रहा म्हणीन तेव्हा तूच नाही म्हणशील….विनी आईच्या गळ्याला मिठी मारून ओकसा बोक्षी रडली…
बरं डोळे पूस..जेऊन घे पोटभर….मग निवांत बोलू…आता आजच्या दिवस ही भाजी खा, पुढच्या वेळेस त्यांच्या पद्धतीने करून घालीन…मग तर झालं……
तिघांची जेवणं झाली…विनी च्या बाबांना टीव्ही वरची मॅच बघत कधी झोपलं लागली कळलं नाही…विनी आणि तिची आई विनी च्या खोलीत पडून गप्पा मारत होत्या…आईने विनी ला विचारलं, बेटा तू खुश आहेस ना….अमेय बद्दल, त्यांच्या घरच्यां बद्दल कुठलेही किंतु परंतु मनात नाहीयेत ना तुझ्या……अजूनही वेळ गेलेली नाही…तुझ्या मनात थोडी जरी शंका असेल तर आपण इथेच थांबू शकतो……लग्न म्हणजे खेळ नाही…हा नाही आवडला तर दुसरा खेळायला….आयुष्यभराची कमिटमेन्ट आहे हि….त्यात तुझं एकदा लग्न मोडलय आणि त्याचा घटस्फोट झालाय….जे निर्णय घ्याल ते नीट विचारपूर्वक घ्या…शेवटी हा एक जुगार आहे…नशीब चांगलं असेल तर लॉटरी नाहीतर….या परत आईच्या घरी……आणि मला परत पार्सल घरी यायला नकोय…समजलं का…
नाही गं आई…तसं काही होणार नाही…मी, अमेय आणि त्याच्या घरच्यांशी बोलून नीट विचार करूनच लग्नाचा निर्णय घेतलाय…….बोलता बोलता दोघींना डुलकी लागली….
थोड्या वेळानी विनी झोपेतून उठली आणि फोन कडे पाहिलं, तर स्नेहाताईंचे ४ मिस्स्ड कॉल होते…बापरे…असं म्हणत भीत भीतच तिने त्यांना फोन लावला….हॅलो काकू, बरेच वेळा तुम्ही फोन केलात ना, मी झोपले होते, रिंगच ऐकू नाही आली, सॉरी……अगं सॉरी काय…नंतर वाटलंच मला…तुम्ही झोपला असाल दुपारचे..झालीस का फ्रेश…..हो…बरं तुझा आत्ता काय प्लॅन आहे…कुठे जाणार आहेस का…..नाही ओ…घरीच आहे…फारतर आईबरोबर भाजी वगैरे आणायला जाईन….बरं, मग तुला आणि आईला चालत असेल तर आपण जरा गावात जायचं का….आमच्या ओळखीचे एक इंटिरियर वाले आहेत…त्यांच्याशी तुझी भेट घालून देते…तुझ्या requirements त्यांना सांग…त्याप्रमाणे ते तुमच्या खोलीमध्ये बदल करून देतील आणि काही कपाटं करून देतील…तुझा ड्रेसेस, चपला आणि जेवेलरी चा खजिना बघता, काही गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतील…शिवाय लग्न आता लवकरच होईल त्यामुळे घराला, तुमच्या खोलीला तुझ्या आवडीचा रंग, खिडकीचे पडदे वगैरे बरंच काही सिलेक्ट करायचे आहेत…बापरे कशाला एवढं काकू…अगं एवढं काय..उगीच नव्हते मी तुझ्या घरी त्या दिवशी आले…तुझ्या आवडी निवडी बघायच्या होत्या मला…तुलाही आनंद वाटला पाहिजे कि नाही…छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो अगं..त्यात काय मोठंसं …आता तू आमची होणार ना…मग आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं करणारच…..
संध्याकाळी, स्नेहाताई, श्रद्धाताई आणि विनी, तिघीजणी इंटेरियर डिझाइनर श्री आठवले यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्या……..आणि नंतर गावात फेरफटका मारून बाहेरच जेऊन घरी गेल्या..
दोन्ही परिवारामध्ये चर्चा होऊन, साखरपुडा न करता लग्नच करायचं ठरलं……जरी अमेय चं लग्न झालं होतं, तरी विनी ची हौस व्हायची होती…..त्यामुळे लग्न करायचं ठरलं पण थोडा ट्विस्ट देऊन…
क्रमशः
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ६ - July 21, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग ५ - June 30, 2023
- आगळी वेगळी वधुपरीक्षा- भाग 4 - June 17, 2023