Poked you ……
“यात्री क्रुपया ध्यान दे, अम्बरनाथ की ओर जानेवाली, एक बजकर तैतीस मिनट की धीमी लोकल प्लेटफार्म नंबर एक पर आ रही है ……”
अशी अनाऊन्समेंट विठ्ठलवाडी स्टेशनमधून झाली …….. बाहेरच्या शांततेवर विरत गेली. आणि तिथून जवळच असलेल्या मंदिरातील विठोबाने कमरेवरचा हात न काढता, रुक्मिणीला कोपरखळी मारली.
“कोपर काय मारताय ? …… जागीच आहे मी.”
“अनाऊन्समेंट ऐकलीस का ?”
“रोजच ऐकते, …… त्यात काय नवीन, ….. इथं एवढ्या रात्री, दुसरं काय ऐकू येणार आहे. ….. रात्री नीरव शांतता असायला, हे काय पंढरपूर आहे ?”
“मंदिराच्या भिंतीबाहेर पहा तरी, कोण चाललंय ?”
“अगं बाई, अण्णा परत आले ……. करमलं नाही वाटतं लेकाकडे.”
“तू पैज हरलीस, ….. मी म्हटलो होतो ना, शेवटच्या लोकल आधीच अण्णा परत येणार.”
“अहो पण चांगले भांडून गेले होते न, नानीशी, ……. लेकाकडे जातो म्हणून.”
“हम्मम ……”
. . . . . . . . . . . . ….. ….. ……. ……………..
विठ्ठलवाडीतल्या बैठ्या घरावर, लोखंडी चॅनेल टाकून छोटा मजला चढवलेल्या घराला अण्णा भिलारे, बंगला म्हणायचे. वरखाली मिळून एकूण तीन खोल्यांच्या, त्या कष्टातल्या वैभवात रवी वाढला. पण त्याने मात्र एमबीए केलं…… मोठ्या पगाराची नोकरी लागल्यावर, ठाण्याला शिफ्ट झाला. त्याच्या मोठ्या आलिशान फ्लॅटमध्ये अण्णा अन आईला आणण्याचा अनेकदा प्रयत्न करून झाला होता. पण आईचं मन काही त्या वैभवात अन हाय क्लास सोसायटीत रमलं नाही.
दोघे अधून मधून जायचे. एखादं दिवस नातवासोबत राहायचे. पण नानीचा जीव मात्र तिथं लागायचा नाही. शेवटच्या लोकलने का होईना, पण मुक्काम विठ्ठलवाडी. तिच्या मते, विठ्ठलवाडी मधलं घर, कसंही असलं तरी अण्णांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचं लेणं होतं.
पण अण्णांना मात्र, ठाणे आवडायचं. छान नाटक पहायला मिळायचं. त्याही पेक्षा अधिक आकर्षण तिथल्या चकचकीत बारचं होतं. कधीतरी, गावी रांजणीला गेले की, खास मैफल जमायची. पण ठाण्यातल्या एअर कँडीशन्ड बारचं त्यांना नेहमी कौतुक वाटायचं. मुख्य म्हणजे बिल रवी भरायचा. त्यामुळं अगदी मिशीवर ताव मारून, अण्णा तो एगझॉटिक अवर, एन्जॉय करायचे….. पूर्ण जिंदगी मिलमध्ये काबाडकष्ट करूनही, दूर …… मुंबई बाहेर, विठ्ठलवाडीत ते स्थिरावले होते. अन म्हणूनच, लेकाच्या पुण्याईने का होईना, पण हे महागडं जीवन ते जगून घ्यायचे.
आणि त्या बदल्यात इंग्लिश मधून धोधो आशीर्वाद द्यायचे त्याला…….
पण नानी “चला ….” म्हणाली की नाना निघाले.
आज मात्र गम्मतच झाली. नानीशी कसलंसं भांडण झालं अण्णांचं……. बहुतेक चहावरून.
अण्णा तडक निघाले…… लेकाकडे. थेट ठाणे गाठलं. ‘सेवंथ’ क्लास मधल्या नातवाला भेटल्यावर जीव शांत झाला. दोघांची भारी गट्टी जमायची. दिवसभरात नातू त्यांना स्मार्ट फोनवर काही न काही नवीन शिकवायचा.
त्या दिवशी, संध्याकाळी, बार दर्शन घेऊन आल्यावर मात्र, कॉलनीच्या बागेत, अण्णा उदास बसले होते.
“काय झालं ? Why are you upset आजोबा?”
“तुझी आज्जी रुसलीये माझ्यावर….. ” नातवाला खुदकन हसू फुटलं. तो खदाखदा हसत सुटला. त्याचं हसण्याचं कारण वेगळं होतं.
“का हसतोस ? तुझं नाही भांडण होत का कुणाशी ?”
यावर नातू शांत झाला. काही वेळ गप्प राहिला, अन थोडा गंभीर होत म्हणाला,
“अण्णा, पण कुणीही जवळचं रुसलं तरी आपण समजूत काढली पाहिजे, असं मम्मी म्हणते.”
“तू कशी काढतोस ?”
“हे बघा …..” असं म्हणत नव्या जमान्यातल्या नातवाने, मोबाईल काढला.
“हे फेसबुक आहे……. त्यावरचे बरेच मित्र माझ्याशी हल्ली बोलत नाहीत. काहीजण रुसलेत, ……. काहीजण स्टडीमध्ये इतके बिझी झालेत की मला विसरून गेलेत.”
“मग तू काय करतोस ?”
“मी त्यांना poke करतो, …… मग ते मला poke करतात. मग मी hi असा मेसेज टाकतो. आणि हळूहळू न बोलणारे मित्र गप्पा मारू लागतात…… सोप्पं आहे.”
“हे poke म्हणजे काय असतं…..” हा ओठावर आलेला प्रश्न अण्णांनी गिळला. आणि स्वतःचं अज्ञान न दाखवता, गुपचूप गुगलला विचारलं.
अरेच्चा ! हे तर ढोसलणं आहे …….. गप्प झालेल्या माणसाला धक्के देउन, कोपरखळ्या मारुन बोलतं करण्यासारखं आहे. पण आमच्या हिला कुठले माहीत हे फेसबुकचे नखरे…….
पण “कुणीही जवळचं रुसलं तरी आपण समजूत काढली पाहिजे” हे नातवाचे विचार त्यांना पटले होते. अन नानी कडे जाण्याची ओढ लागली होती. रातोरात अण्णा विठ्ठलवाडीतल्या त्यांच्या महालात आले. वरची खोली नानींची…….. खालची अण्णांची…….
अण्णा वर गेले…… दार उघडंच होतं……..
“पुष्पा …….. ए पुष्पा, …….. अजुन राग गेला नाही होय गं…….. जेवलीस का ? की उपाशीच निजलीस? ….. खरं सांगु,… मलाही नाही करमत गं ठाण्यात तुझ्याशिवाय………….. तुला इथं रहायला आवडतं ……. म्हणुन मग मीही रवी कडे रहायला जात नाही…….. जशी तुझी आठवण आली तशी लोकल पकडली……. बोल कि गं काहीतरी……. नातु म्हणत होता, आज्जीला poke करा,…… गुद्गुल्या करुन का होइना, पण आज्जीला बोलतं करा….”
बोलता बोलता अण्णांनी खरंच गुदगुल्या करण्यासाठी हात पुढे केले……….. अन नानी म्हणुन बेडवर ठेवलेला तक्क्या खाली पडला. अन तिकडे रुक्माईच्या काळजात चर्र झालं…………..
अण्णांनी मात्र सवयीप्रमाणे तक्क्या पुन्हा नानींच्या जागी ठेवला अन थंडी वाजु नये म्हणुन चादर घालुन, पंखा स्लो केला.
………………………………………………………………………………………………………………..
“अहो, सोडवा आता अण्णांना या सगळ्या व्यापातुन…. असे प्रसन्न मुद्रेनं फक्त पहात राहु नका त्यांचे हाल …….. गेले दोन वर्षे हे असंच चालू आहे.”
“हाल ? ……. किती सुखात आहेत बघ ते…….. कधी कधी वाटतं, खरंतर जन्ममृत्युच्या पल्याड ते गेलेत …… अजुनही नानींचा हात त्यांच्या हातात तसाच आहे,…… जसा त्या जिवंत असताना होता. त्यांचं हे अशरीर नातं असं अर्ध्यात तोडणं माझ्याही जीवावर आलंय बघ. बघ आता सकाळ होत आलीय,…… काल स्वतःच बनवलेला चहा बेचव झाला म्हणुन नानींशी भांडले. आता अण्णा आज पुन्हा चहा बनवतील. आणि दोन कप घेउन नानींच्या खोलीत जातील…….. …….
ए …, तु कुठं हरवलीस ? ……. मी आपला बोलतोय एकटाच आणि तु मात्र हरवुन गेलीस……… हे काय? डोळे पुस पाहु आधी ……….”
असं म्हणत, कमरेवरचे हात न काढता, विठोबा poked रुक्माई again ! …………….
©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
खरंच डोळे पाणावले सर,,अप्रतिम आवडलं आपल्याला ….धन्यवाद रवीला आपल्या लेखनात जागा दिल्याबद्दल🙏
वा खूपच छान..!!
It poked my marathi😁👍
खुप सुंदर मित्रा.. जिवंत केला सगळा प्रसंग 😊👍
खूप छान लेख आहे साहेब… असच लिहत रहा म्हणजे आम्ही वाचत राहू
सुंदर लिखाण
Nice