नवरात्र
गेली काही वर्षे उपनगरात जास्त राहायला लागल्यापासून मुंबईला कोणत्याच सणाला जाणे होत नाही. अगदी गणपतीला देखील नाही. परंतु मुंबईत अनुभवलेले गणपती, दिवाळी, होळी, संक्रांत, गोकुळाष्टमी आणि नवरात्र मनात आजही तसेच ताजे आहेत.
आमच्या गिरगावातील एकाच चाळीत दोन (हो दोन) सार्वजनिक गणपती असत. त्यामुळे भरपूर आरत्या, प्रसाद, डेकोरेशन, विसर्जन अशी डबल चंगळ असे. पण आमच्या चाळीत नवरात्रोत्सव नसे. तो आमच्या समोरच्या वाडीत साजरा करत. समोरच्या वाडीतील आमच्या इमारतीला चिकटून असलेल्या दोन इमारतींच्या मध्ये असलेल्या घर गल्लीतून गणपती नंतर काही दिवसात सुरू झालेले मांडव उभारणीचे काम दिसले की देवीच्या आगमनाची चाहूल लागे. मग आम्ही आमच्या चाळीतील काही मुलं मांडव घालणे हा कार्यक्रम तिथे उभे राहून बघत असू! दुपारची शाळा असताना पहिल्या दिवशी देवीचे होणारे आगमन, त्यावेळी लावली जाणारी फटाक्यांची लांब माळ, त्या धुराचा नाकात भरून घेत असलेला वास हे सगळं सकाळची शाळा झाल्यावर तुटलं.
पण आम्ही तिथली रात्रीची आरती आणि त्यानंतर कापडी पडद्यावर प्रोजेक्टर मधून दाखवले जाणारे सिनेमे कधीच चुकवले नाही. जय संतोषी माँ हा चित्रपट मी दर वर्षी किमान एकदा ह्या हीशेबाने साधारण सलग आठ ते नऊ वर्ष नवरात्रात रस्त्यावर बघितला आहे!
“देवीची आरती ही आपल्या चाळीतील गणपती सारखी नसते. आरतीच्या वेळी देवी मखर सोडून बाहेर येते” हे खूप लहानपणापासून माहीत असल्याने आम्हा मुलांना त्या आरतीच आकर्षण जाम कुतूहल असायचं! त्यांच्या वाडीतील मैदानात घातलेल्या मांडवात पन्नासेक पुरुष जमत. वाडीतील वीसेक बायका मखरच्या डाव्या बाजूला त्यांना दिलेल्या माईक जवळ गर्दी करून उभ्या राहात. सुखकर्ता दुःखहर्ता ने सुरुवात होऊन हळूहळू वातावरण निर्मिती होऊ लागे. संबंध मांडवात धूप आणि धूर भरत असे. आमचे डोळे थोडे चुरचुरले तरी तो वास खूप आवडतं असे. आणि पुढे होणाऱ्या एका चमत्कृतीपूर्ण गोष्टीची वाट आम्ही बघत असू. देवीची “उदो बोला उदो” ही आरती सुरू झाली की आम्ही मुलं सरसावून उभे राहायचो. टाळ्या थांबून भीतीने आपसूक एकमेकांचे हात घट्ट धरायचो!
अचानक एक एक करत चारपाच बायका मांडवात येऊन घुमायला लागायच्या. तासभर चालणारी ती रात्रीची आरती संपेपर्यंत त्या देवीच्या मूर्तीकडे बघत रिंगण घालावं तश्या गोल गोल फिरत असत. क्वचित एकमेकांवर आपटत. काही बायका जळता कापूर हातावर मागत, काही जळता कापूर खाऊन टाकत! एक पुरुष पण होता. दरवर्षी अंगात येणारा. तो फक्त अंग कडक करून जोरजोरात टाळ्या पिटत देवीकडे एकटक बघत असे. टाळ्या वाजवताना त्याचा चष्मा गळून पडत असे. आरती झाली की तिथल्या बायका ह्या अंगात आलेल्या सर्वाना ओवाळत, कुंकू लावत, नारळ देत असत. मग हे सर्व लोक देवीला नमस्कार करून निघून जात! हा प्रकार बघायला आम्ही ती आरती कधीच चुकवत नसू. अजून एक निरीक्षण. “उदो बोला उदो” आरती सुरू झाली आणि हे अंगात आलेले लोक घुमू लागले की देवीची मूर्ती खूप तजेलदार दिसत असे. देवी खरच आहे तिथे अस वाटत असे. त्या धुपाने भरलेल्या मांडवात तिचे अस्तित्व जाणवत असे!
अष्टमीला आणखी एका शेजारच्या वाडीत एक गोऱ्या गोऱ्या, तेज:पुंज आजी आणि त्यांच्या सहकारी आज्या गोरीगोरी महालक्ष्मी उभी करायच्या! तिच दर्शन घ्यायला गेलं की आमची आईपण एका घागरीत धूप भरून घेत काही वेळ घागर फुंकत असे. त्या महालक्ष्मी समोर पण अंगात आलेल्या अनेक स्त्रिया भरपूर वेळ घागर फुंकत. ती नटलेली तेजस्वी गोरीगोरी महालक्ष्मी, तिच्या शेजारी उभ्या असलेल्या गुलाबी नऊवारी नेसून पुतळ्याची माळ घातलेल्या तितक्याच तेजस्वी आजी आणि तो बत्ताश्यांचा प्रसाद इतक्या वर्षांनंतर आजही खूप खूप स्वच्छ आठवतात!
आता सर्वच उत्सव, ते साजरे करायचं स्वरूप बदललं. पण नवरात्र म्हटलं की मन अजूनही वर सांगितलेल्या वातावरणात जात. आजही अष्टमीला आम्ही उपनगरातील एका ठिकाणी उभी केलेल्या महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला जातो. सर्व सोहळा अगदी साग्रसंगीत असतो. आज आमची कन्या अंगात आलेल्या स्त्रियांना बघून अचंबित होते. सर्वत्र धूप भरलेला असतो. मी महालक्ष्मीला मनापासून नमस्कार करतो. बत्ताश्याचा प्रसाद खातो. समोर मांडलेल्या खुर्च्यांपैकी एक पकडून बसतो. गोरीगोरी तेज:पुंज महालक्ष्मी समोर असते. आणि का कुणास ठाऊक तिच्या शेजारी मला त्या लहानपणीच्या गोऱ्या तेज:पुंज आजी दिसतात. मन परत शेजारच्या वाडीत जात. कानात उदो बोला उदो वाजू लागत. अंगात आलेल्या बायका कापूर खात घुमताना दिसू लागतात! खूप वर्ष झाली त्याला, पण काही सण तसेच लक्षात आहेत….फक्त वर्ष बदलतात!- ©मंदार जोग
ReplyForward |
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023