भेट – भाग १
“ह्या शुक्रवारी काय करतोयस?”
“काही विशेष नाही, बोल काय प्लॅन आहे?”
“भेटायचं का?”
“आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण-कोण आहे अव्हेलेबल…”
“बराच वेळ काहीतरी type करतेयस पण काहीच मेसेज नाही, कुठे अडकलीस?”
आता ह्याला कसं सांगू की ग्रुपला नाही तुला भेटायचंय एकटं. इतक्या वर्षांचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय. मोकळं व्हायचंय.
“ए बाई, बोल ना. कामं आहेत मला, एवढी फॉर्मॅलिटी तुला कधीपासून लागायला लागली. विचार करून बोलणं शोभत नाही हं तुला 🙂 “
“अरे काही नाही लिहीत होते तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आलेय. बरं तू फ्री आहेस का ते सांग शुक्रवारी, ग्रुपचं नंतर बघू.”
“मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे! कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांगा, मी येईन.”
“शाब्बास! शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पाषाण!”
“ठीक आहे, तुला साडे सहाला पीक करतो. वेळेवर ये!”
“अरे मी येईन की, कशाला पिकअप साठी उलटं येतोस?”
“गप बस, वेळेवर खाली उतर. चल, बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील.”
“ओके, बाय.”
हम्म प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे ठरवलयेस ना, सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं.
आठवड्याच्या गडबडीत त्यानी पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही, आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही ह्याची खात्री नव्हती. शेवटी न राहवून शुक्रवारी सकाळी तिनी पिंग केलंच.
“पिंग”
” पॉंग”
“भेटतोयेस ना आज?”
“अर्रे हो, आज भेटायचं ठरलंय ना. कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही बोललीस का? कुठे जायचंय जेवायला?”
“भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये.”
तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता. मग ऑर्कुटमुळे थोडंफार कळलं शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हयायचं. काही वर्षांनी आलं व्हाट्सअँप. मग कुठून कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधून मधून भेटणं व्हायचं पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची “बसायला” तर मुली त्यांची पोरा-बाळांसकट ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हंटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगळ्या असलेली काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात आठवीत “ब” तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्याकुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय? असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा दिसतोय खरा. ह्या आधी कधी आम्ही दोघेच भेटलो नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की, एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं. पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीही संपुष्टात येईल, व्यभिचार तर नाही हा- ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट! ह्या विचारांनी कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही.
“काय रे, आहेस का?”
“हो, भेटू संध्याकाळी. साडेसहाला तयार राहा.”
“अरे तू पण ना, येईन ना मी डायरेक्ट पाषाणला.”
“मी येतोय सांगितलं ना? बरं चल, बाय फॉर नाऊ.”
“बाय…”
भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते, मुलंही मागे-पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा,मुलं, सासू-सासरे, नोकरी ह्या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो. आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या, सगळ्यानपासून- कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. पन्नाशीकडे झुकताना हल्ली जाणवायला लागलंय की, आता वेळ फार उरला नाहीये. अधून मधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ऍक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगुर आहे हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आता ते पटायला लागलंय. त्यामुळे आता ह्या मनाला मोकळं करायचंय, सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेले असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच…
तिचं आवडीचं “एक आधी कहानी थी, जो मिलके सुनानी थी…” गाणं लुपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. साडेपाचला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग मात्र ती तयारीला लागली. आताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती, चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्यांचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती कधी नव्हतीच. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते रविवारी, निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो. पोट सुटलंय, टक्कल पडलंय आणि चष्माही! पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही चाळिशीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि हसरा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय, अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आपला छोटासा संसार, सुख-समृद्धीने भरलेले घर असतानाही कुठेतरी एक बोच जाणवत राहते खरी. कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरीही सगळ्यात जास्त ठेच जवळच्या माणसांकडूनच मिळते, हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा, ह्या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना, एवढंच जपायचं. जशा जुन्या गोष्टींना आपण विसरायचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःच स्वतःला समजावत राहिली की, जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये.
मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनानी तिनं स्वतःलाच एक छानसं स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं.
साडेसहाच्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला पटकन. तिनी हलकेच त्याच्या खांदयावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्यामागे ओढणी सावरत बसली. बाईक सुरु झाली आणि मग तिनं मागचं हॅन्डल पकडत तोल सावरला, त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला, पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोढीशी पुढे होऊन तो काय बोलतोय हे ऐकायचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त “स्पीडब्रेक!” एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिनी त्याच्या खांदयावर हात ठेवला.
“म्हणून सांगतोय, खांदयावर हात ठेव! मलाही सावरायला बरं पडेल.” त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाळया गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या पर्फ्युमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडंपिसं करत होता. सरते शेवटी ती थोडी मागे सरकून बसली, मागच्या हँडलला घट्ट धरून.
“ऐकू येत नाहीये, पाषाणला पोचलो की बोलू…” एवढंच मोट्ठ्यानी ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होतंय हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत माझ्यात? छे, भलतंच काहीतरी! पुन्हा एकदा काय बोलायचंय ह्याची मनाशी उजळणी करून घ्यावी नाहीतर आयत्या वेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या आज. “ती सध्या काय करते?” वरून काही गोष्टींचा उलगडा झालेला, थोडी हिम्मतही आलेली. तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं, खूपच वेगळं!
क्रमश:
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023