भेट – भाग ३
“त्यानंतरची वर्षं सगळी घाई-गडबडीची गेली. सासरच्या तर्हा समजून घेणं, त्या घराला-माणसांना आपलं करून घेण्यात, स्वतःच्या करियरला पुढे नेण्यात कशी गेली कळलंच नाही. बरीच नवीन नाती जोडली गेली, नवीन सर्कल तयार झालं. इतक्या वर्षात पुण्यातल्या पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही. शाळेनंतर सगळेच आपापल्या फिल्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते. कॉलेज, क्लासेस, इंटर्नशिप सगळीकडचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्या सगळ्यांच्या गदारोळात मी नवर्याच्या साथीने व्यस्त होत गेले. त्यातच मध्यन्तरी ऑर्कुट आलं. आवर्जून तुला शोधलं. तिकडे तुझ्या पोस्ट्स, तुझे बायकोबरचे फोटोज बघून छान वाटलं. तुही तुझ्या आयुष्यात सेटल आहेस, खुश आहेस असं जाणवलं. तुझा नाद तिकडेच सोडून द्यायचा होता. इतक्या वर्षांनंतर तुझ्याशी बोलण्याची हिम्मत नव्हती, तरीही रेटानीच कॉन्टॅक्ट केला. तू तुझ्याच धुंदीत होतास, तुझ्याबद्दल भरभरून बोललास. पण माझ्याबद्दल एका शब्दानेही विचारलंसच नाहीस! मग कळलं की पुलाखालून कितीही पाणी गेलं तरीही पुलाला पत्ताच नाहीये! माझ्या मनाचा एक कप्पा तुझ्यात अजूनही कुठेतरी गुंतला होता हे माहितीच नव्हतं, आणि त्यावरची खपली पुन्हा एकदा मीच वस्तर्यानी खरवडून काढली होती. एक वेडी आशा होती की तूही मला इतकी वर्षं शोधत असशील, मी पिंग केल्यावर तू भरभरून बोलशील. माझ्यावरच्या ना व्यक्त केलेल्या प्रेमाची कबुली देशील. वेल, मनाचेच खेळ ते…
मग पुन्हा ना कधी मी तुला मेसेंजरवर पिंग केलं, आणि अर्थात तू करणारच नव्हतास! पुन्हा काही वर्षं अशीच गेली, स्वतःच्या आयुष्यात असलेलं सुख शोधण्यात-अनुभवण्यात. मुलांच्या जन्माने एका वेगळ्याच नात्याचा अनुभव आला. माझं सगळं अस्तित्व त्यांच्यासाठीच होऊन गेलं. ह्याआधी इतक्या निरागस प्रेमाचा अनुभवच घेतला नव्हता. मी जरा नजरेबाहेर गेले तरी कावरी-बावरी होणारी त्यांची नजर आणि मी समोर येताच मोठ्ठ बोळकं भरून हसू! सगळ्या जगाचा, अगदी तुझाही विसर पाडायला लावणारी होती ती वर्षं… त्यातच आम्ही सगळे औरंगाबादला शिफ्ट झालो, मग तर पुणं मागेच पडलं. येता-जाताना वळणावर कधीतरी तू नजरेस पडशील ही जीवघेणी प्रतिक्षाही संपली. मी कयासाने पुण्याला येण्याचं टाळत गेले. आई-बाबाच मग आमच्याकडे येऊन भेटून जात. मुलं लहान असल्याचं कारण कोणालाही पटण्यासारखंच होतं.
हल्लीच काही वर्षांपूर्वी व्हाट्सअँपचा ग्रुप झाला आपला. हळूहळू भेटी-गाठी व्हायला लागल्या. अगदी पहिल्या गेट-टुगेदरला तू भेटशील अशी हुरहूर वाटत होती. तू येणार की नाही हे कोणाला विचारूही शकले नाही. नवरा-मुलांसकट सगळे भेटलेलो, तेव्हा तुला तुझ्या बायकोबरोबर भेटायची खूप इच्छा होती. पण तुम्ही आलातच नाही. थोडी निराशा झाली खरी, पण मग हायसही वाटलं. तू समोर आल्यावर माझं वागणं काही बदललं असतं, तर नवर्याच्या नक्कीच लक्षात आलं असतं, असं उगाच वाटून गेलं. बावळट ती बावळटच राहिले मी! तुला कदाचित कळणार नाही हे सगळं. माझ्या आयुष्यात काही कमतरता होती, किंवा नवरा-सासर काही वाईट होतं अशातला भागच नाहीये. लौकिकार्थाने मी अतिशय सुखी होते, आहे. काडीचंही व्यसन नसणारा नवरा, प्रेमळ सासर, आर्थिक दृष्ट्याही कुठलीच कमी नाही, मुलंही वेळेत झाली आणि अगदी लाघवी आहेत. ते म्हणतात नं कधी कधी सुखी टोचतं, तशातला भाग आहे माझा. कुठेही काहीही कमी नसताना मनात एक सल राहून गेला. तुझी ठुसठुसणारी आठवण, आणि तुला माझ्या भावना कधीच न सांगू शकल्याचे शल्य! इंग्लिशमध्ये व्हॉट इफ म्हणतात तसं प्रश्नचिन्ह! तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असावं कधीतरी, अशी भाबडी आशा.
अधून-मधून तूही सामील व्हायला लागलास गेट-टुगेदरमध्ये. आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं! इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्षात समोर बघून आत काहीच हाललं नाही. इतर मित्रांसारख्याच मी तुझ्याशीही सहज गप्पा मारू शकले. त्यात काहीच वावगं वाटलं नाही. मी खरंच पोक्त झाले होते एव्हाना. तुझं सुटलेलं पोट, पडलेले टक्कल आणि सतत दोन तासाला बाहेर जाऊन सिगरेट पिऊन येणं हेही जाणवलं नाही. तू कट्टर शाकाहारी, तर नॉन-वेजशिवाय माझं पानही हालत नाही. त्यामुळे मग तू येणार असलास की आपसूकच शुद्ध-शाकाहारी हॉटेलमध्ये बेत ठरू लागले. नाखुशीनेच मी सामील होत गेले. आठवतंय एकदा आपण सगळे लोणावळ्याला ओव्हरनाईट स्टे साठी गेलेलो. तिकडे रात्री मी पहिल्यांदाच वाईन घेतली. कॅम्पफायरच्या भोवती बसून आपण गाणी, गप्पा मारत होतो. तेव्हा गझलचा सिलसिला सुरु झालं आणि मी अचानक सेंटी झाले. तेव्हा मी गाणं म्हणटलेलं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा… त्यावेळी तू माझ्या डोळ्यात डोळे घालून असं काही बघितलंस नं, की आजूबाजूला कोण आहे ह्याचा विसरच पडला. त्या एका क्षणी पुन्हा तो व्हॉट इफचा भुंगा कानात गुणगुणायला लागला.
त्यानंतर तू काही मेसेजेस पर्सनलवर पाठवायला लागलास. गप्पांच्या नादात हमखास उशीर व्हायचा . त्यामुळे मिटनंतर मुलींना सोडायला कोणी नं कोणीतरी जायचंच. मला जाणवलं की मला सोडायला नेमका तूच यायचास. तसंच एकदा गमतीत मी म्हंटल काय रे फक्त सोडायला येतोस, घ्यायलाही येत जा की-रॉयल ट्रीटमेंट! आणि खरंच तेव्हापासून मला घ्यायलाही तू येऊ लागलास. तरीही मी मनाला समजावलं ह्यात काहीच विशेष नाहीये. आपण फक्त चांगले मित्र आहोत. अधून मधून चक्क गप्पा मारणं सुरु झालं. वयाचा पोक्तपणा म्हण किंवा एव्हाना मी वस्तुस्थिती मान्य केली होती असं म्हण, पण त्या काळातल्या आपल्या गप्पा खरंच मनमोकळ्या होत्या. पण तरीही कुठेतरी स्वतःचंच मन स्वतःला खायचं, मग उगाच आपले पर्सनल चॅट मी डिलीट करत गेले. त्यात एकदा तू खूप ड्रंक होतास बहुदा. तेव्हा काहीतरी बरळलास – तुला शाळेतलं काही आठवतंय का? मी होतो ना तुझा जवळचा मित्र? मग का नाही मला समजावून माझ्यासाठी भांडलीस? का आपल्यात अबोला येऊ दिलास? एकदा, फक्त एकदा विचार करून बघ ना आज की, आपण लांब गेलो नसतो तर काय झालं असतं? पुन्हा एकदा शाळेतले होऊया ना… असं काहीतरी. तुला आठवतही नसेल हे. की हेही माझ्याच मनाचे खेळ काय माहिती, पण मी ते चॅट डिलीट केलं एवढं मात्र नक्की. त्यावरून मी पुन्हा घसरण्याच्या आधीच स्वतःला सावरलं.
मग मात्र मी खाडकन जागी झाले. वस्तुस्थितीची जाणीव झाली. स्वतःलाच प्रश्न विचारले. खरंच मला तुझ्याबद्दल काही विशेष वाटतंय अजूनही? किंवा कधी वाटलं होतं ते ते एक प्रकारचं आकर्षण होतं, मनाचे खेळ होते? काय होते ते, काय वाटतंय आज? खूप मेडिटेशन केलं. तुझ्यापासून काटेकोरपणे स्वतःला लांब ठेवलं. आणि मग हळूहळू स्वतःचीच नवीन ओळख होत गेली. विचारांची सुसंगत सांगड लागली.
वयात येण्याच्या काळात एखाद्या मुलाला आपण आवडतोय, ही कल्पनाच खूप सुखद असते. त्यात आजूबाजूच्या मैत्रिणीही भरीला घालतात-हो, हो, तुझ्याकडेच बघत होता तो! आणि मनाचे खेळ सुरु होतात. त्यात आपल्याकडचे सिनेमेही भन्नाट असतात. “नकारातच होकार असतो, खरं प्रेम खूप वेगळं असतं – ह्यांव असतं अन त्यंव असतं.” माझ्या मैत्रिणीही तेव्हा प्रेमात सपशेल आपटत होत्या. त्यांचंच बघून माझ्या मनानेही एक चित्र उभारलं असेल कदाचित. त्या कल्पनेचा माझ्यावर इतका काही पगडा बसला होता की मला सारासार विचार करण्याची बुद्धीच उरली नव्हती. इतकी वर्ष मी त्या संकल्पनेला इतकी घट्ट धरून बसले होते की, की तेच खरंय आणि माझं पहिलं प्रेम मी गमावून बसलेय असं वाटत होतं. पण त्या दिवशी जाणवलं की, तसं काही नव्हतंच, किंवा निदान तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तरी ते खास काही जाणवलं नव्हतं. पण ह्या नादात आता मी तुलाही कुठेतरी गुंफवत चाललेय. तुझं मला नशेच्या भरात का होईना तसं बोलणं,आताशा मला आवर्जून घ्यायला येणं-सोडायला येणं, प्रवासाला जाताना-घरी सुखरूप पोचल्यावर मला आवर्जून कळवणं, असं बरंच काही तू स्वतःहून करायला लागलेलास. आणि अंगावर शहारा आला. भीती वाटली त्या व्हॉट इफची. खरंच जर तुझ्याही मनात काही असेल, माझ्या वागण्याने मी तुला मिसलीड तर करत नाहीये नं? हे सगळं ह्या वयात? ह्याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मी व्यभिचार म्हणेन! आपलं लग्न झालंय, षोडश वर्षांची मुलं आहेत! त्यांना जर कळलं की, आईची काय थेरं चालू आहेत तर काय? हसू नकोस, बावळट!”
तो पोट धरून खो-खो हसत होता आणि तिला इतका राग आला नं त्याचा. ती इतकी घाबरून, मनापासून बोलत होती आणि तो हसत सुटला होता.
“अगं बावळट, कुठच्या कुठे जातेस तू! News flash!! मित्र-मैत्रिणी गप्पा मारू शकतात. एखाद्या लग्न झालेल्या, मुलं असणाऱ्या तुझ्यासारख्या काकूबाईला जवळचा मित्र असू शकतो! क्षणभर मला भीती वाटली की मी तुला काही भलते सलते मेसेजेस तर नाही केले. एखाद्या तिर्हाईतानी ऐकलं तर त्याला वाटेल आपलं खरंच काहीतरी लफडं चालू आहे आणि तू ब्रेकअप करतेयेस!”
ती अगदीच कावरी बावरी झाली. इतक्या वेळाने पहिल्यांदाच त्याच्याकडे वळून बघितलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी जाणवलं की अति हसल्यानी आलंय ते पाणी? खरंच वेड लागलंय का आताशा? काय खरं काय खोटं?
“बस इकडेच पाच मिनटं, मी एक सिगरेट पिऊन येतो…”
ती काही म्हणणार एवढ्यात तो उठून गेलाही. तो गेल्याच्या दिशेनी ती बघत राहिली.
तिच्यापासून थोडं लांब जाऊन त्यानं एक सिगरेट शिलगावली, तिचा धूर छातीत कोंडून घेतला! आणि मग इतका वेळ थोपवून ठेवलेल्या अश्रूंना वाट करून दिली. त्याच्या पाठीला तिची नजर जाणवली आणि त्यानी पटकन हातातली सिगरेट फेकून दिली. जवळच्या बाटलीतल्या पाण्याने खसखस चूळ भरली, तोंडावर पाणी मारलं आणि स्वतःला सावरलं. ती त्याच्याकडेच बघत होती.
“चला मॅडम, काहीतरी खाऊया नं? भूक लागलीये खूप! पाणीपुरी दिसतेय, खाऊया?”
तिनी डोळे मोट्ठे करून रागाने बघितलं.
“तुला काही वाटलंच नव्हतं नं? मग पाणीपुरी खायला काय हरकत आहे?”, त्यानी मुद्दाम तिला चिथावलं. आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्यालाच त्याची चूक जाणवली.
“ए बाई, डोळे पूस हं, नाहीतर येणाऱ्या-जाणाऱ्यांना मी तुला थोबाडीत मारलीये असं वाटायचं! हस की गं!”, असं म्हणत तिला हवेतच गुदगुल्या केल्या सारखं केलं तेव्हा कुठे ती थोडीशी रिलॅक्स झाली.
“समोरच उडप्याचं हॉटेल दिसतंय डोसा खाऊया चल. आज शुक्रवार आहे, व्हेज खा माझ्यासाठी एक दिवस.”
क्रमश:
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023