भेट – भाग ४
उडप्याच्या हॉटेलात शिरताना येणारा तो मंद उदबत्ती आणि सांबार ह्यांचा संमिश्र सुगंध नकळत मनाला
शांत करत गेला. टेबल मिळाल्यावर ते दोघंही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या मेन्यूकार्डला
चाळण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती, तर त्याच मेन्यूकार्डच्या आडून तो तिचं निरीक्षण करत होता.
लांबून बघणार्याला हे दोन त्रयस्थ वेगळी टेबलं न मिळाल्याने बळजबरी एका टेबलावर बसली आहेत असं वाटलं
असतं. तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलं.
लहानपणी द्वाड, मस्तीखोर म्हणूनच सगळे ओळखायचे. दर दिवसाआड आईला शाळेत बोलावलं जायचं.
शाळेत बाईंचा आणि घरी आईचा मार ठरलेला. शिक्षा करून करून सगळे दमले आणि मी कोडगा होत गेलो. का
वागायचो मी असं व्रात्य, देवालाच माहिती. पण त्या मस्तीतही ही माझा चांगुलपणा शोधताना जाणवली. मॉनिटर
असताना घरचा अभ्यास तपासायची आणि मी केला नसेल तर बाईंना नावही नाही सांगायची. अशा माझ्या छोट्या-
छोट्या चुका ही सहज ना सांगता लपवायची. तिच्याबद्दल नक्की काय वाटतंय हे समजून घेण्याची अक्कलच
नव्हती, त्या वयात. त्यातच एकदा तिचं नाव गिरवत बसलो होतो,तर अचानक मागून दादा आला. त्यानी वही खेचून
घेतली आणि मला चिडवायला लागला. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचे मित्र मला चिडवायला लागले. इतका राग आला
ना! मग मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. माझा तिच्याशी काहीच संबंध नाही असं दाखवू लागलो. त्यातच मार्क्स
कमी पडल्याने मला वेगळ्या तुकडीत टाकण्यात आलं. मग तर आणखीनच चिडचिड झाली. सगळ्या दिड शहाण्यांना
“अ” तुकडीत आणि आम्हाला “ब” ! आपोआपच हिच्यापासून लांब होत गेलो, जे काही जाणवलं होतं ते तिथेच संपून गेलं.
त्याच्याही नकळत त्यानी बोलायला सुरुवात केली.
“आता मी काय बोलतोय ते ऐकून घे, शांतपणे. ह्या गोष्टी तू इतक्या मनाला लावून घेतल्या असशील हे
जाणवलं नव्हतं. मान्य आहे की तुला कुठलंही स्पष्टीकरण नकोय, पण मलाही मोकळं होऊ देत आज. आपली दहावी
झाली आणि कॉलेजचे मंतरलेले दिवस सुरु झाले. त्या काळात घरी नुकतीच लँडलाईन आली होती. माझ्या
वाढदिवसाला नेमकी सुट्टी होती आणि आम्ही सगळे घरी होतो. फोन वाजला आणि बाबांनी उचलला, काहीतरी
बोलले आणि मला हाक मारली. “तुझ्यासाठी कोणा मुलीचा फोन आहे. तिला तुझ्याशीच बोलायचं आहे!” दादा
लग्गेच फोनेजवळ येऊन बसला, “हम्म तिचाच फोन असणार…”मी फोन घेतला पण तोपर्यन्त फोन कट झाला होता.
दादानी घरी सगळ्यांना तू कशी माझ्या मागे पडलीयेस, शाळेत पण माझ्याकडे बघत असायचीस असं काहीबाही
सांगितलं. मीही ते उडवून लावलं. तो फोन तू केलेलास की दुसऱ्याच कोणी ह्याचाही आजतागायत पत्ता नाही, पण तो
फोन तूच केलेलास अशी मी समजूत करून घेतली. आणि तुझ्यामुळे दादाला चिडवण्याची संधी मिळाली म्हणून तुझा
आणखीच राग आला! दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा चालू होत्या… त्यातच एक मुलगी तुझ्या कॉलनीत
राहायची, तिनी तुझा उल्लेख केला. आदल्या दिवशीचा दादाचा राग डोक्यात होताच, मी लगेच तिखट-मीठ लावून तू
कशी माझ्या मागे पडली होतीस ते सगळ्यांना फुशारक्या मारत सांगितलं. पण त्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर
काय होईल हे कळलंच नाही, तेव्हा तर नाहीच पण इतक्या वर्षात मी ते सगळं विसरूनही गेलो होतो गं. नकळत
किती दुखावलं मी तुला- तुला जिच्याबद्दल मला… नाही ते शब्द ओठांवर काय मनातही येऊ देणार नाही मी!”
तेवढ्यात वेटरनं येऊन विचारलं, “क्या लेंगे साब?” नको त्या वेळी येऊन नको ते प्रश्न विचारणं हे वेटरच्या
जॉबकोडमध्येच असावं बहुदा.
दोघांनी बराच वेळ मेनूकार्ड बघून शेवटी इडली-सांबाराची ऑर्डर दिली. खाणं येईपर्यंत ती उगाच इकडे तिकडे
बघत राहिली, तर तो मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत राहिला. भावना मोजक्या शब्दात मांडणं, ह्यात तिचा
हातखंडा होता. तर स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेऊन मुकं होत जाणं हा त्याचा स्थायी भाव! पण ह्या क्षणी
तिनी स्वतःला मिटून घेतलं होतं. शब्दांनी जणू साथच सोडली होती. आणि बांध फुटल्यासारखा तो बोलता झाला.
"सगळं सगळं आठवतंय गं मला! शाळेतले ते दिवस, माझा मूर्खपणा, रादर माझे अक्षम्य अपराध सगळं
आठवतंय. माफी मागूनही ते घाव कधी भरून निघणार नाहीत. मी तुझ्या लायकीचा नव्हतो कधीच. खूप लहान
वयातच सिगरेट, दारूची संगत जोडली. अभ्यासात तर उजेडच होता. कसा-बसा बी-कॉम झालो. दादाच्या ओळखीनीच
नोकरी लागली, मार्केटिंगमध्ये चिकटलो. मध्यन्तरी कितीतरी मुलींबरोबर लफडी झाली. त्यातच एकीला प्रेग्नन्ट केलं.
आईला कळलं आणि तिनी लग्नाशिवाय पर्यायच राहू दिला नाही. आमचं लग्न झालं खरं, पण आम्ही दोघेही
एकमेकांबाबत सिरीयस नव्हतोच. त्यात ती प्रचंड श्रीमंत, इंजिनीअर. त्यांच्या घरी सगळेच उच्च-शिक्षित. तिला
आमच्याकडे सगळंच खटकायला लागलं. आम्हाला खूप गोड़ मुलगा झाला, माझा जीव-की प्राण होता तो. पण तो
झाल्यावर ती जी माहेरी गेली ती परत आलीच नाही. आधी बाळंतपणात आराम, मग मुलाला सांभाळायला कोणी
नाही म्ह्णून, असं करत ती तिकडेच राहिली. तिचीही चूक नव्हतीच म्हणा. माझी व्यसनं बघता तिला मुलावर ते
संस्कार होऊ द्यायचे नव्हते. आईनं मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. बाबा, दादा-वहिनीही मला कुठे
व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, होमिओपॅथी सुरू करून बघ असे प्रयत्न करत होते. पण आमचं लग्न टिकलं नाही ते
नाहीच. घटस्फोटाच्या नादात बरीच वर्ष गेली. मला मुलगा हवा होता, पण तोही तिनी माझ्यापासून हिरावून घेतला.
आमचं राहतं घरही कायद्याने तिला द्यायला लावलं. मुलासाठी मी त्यावरही पाणी सोडलं, आणि पुन्हा आई-बाबांकडे
येऊन राहू लागलो. ह्या सगळ्या धक्क्यांनी आईही आम्हाला अकस्मात सोडून गेली. अवघ्या बत्तिसाव्या वर्षी
डायबिटीस जडला. जगायचाच कंटाळा आला होता, सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे काय ह्याचा बेमिसाल पुरावा होतो मी.
का माहित नाही पण, त्या काळात तुझी खूप आठवण यायची. तुला आठवतोय ना तो ड्रंक कॉल त्या
काळातलाच! असं वाटायचं जर मी तुझ्याशी शाळेत धड वागलो असतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात आजही
असतीस, आणि माझी अशी फरपट कधीच झाली नसती. पण ह्या सगळ्या जर-तरच्या गोष्टी होत्या. मला माहिती
होतं की, तुझं लव्ह-मॅरेज होऊन तू सुखात आहेस. नवराही तुला साजेसा, उच्च-शिक्षित! तुझ्या जगात मला कुठेच
स्थान नव्हतं. रात्र-रात्र नुसते सिनेमे बघत बसायचो दारूच्या संगतीत. बाबांनी खटपट करून ओळखीतल्या एका
मुलीशी लग्न लावून दिलं. तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न केला. दिड वर्षातच सानियाचा जन्म झाला. तू
म्हणालीस ना तसं तिच्या जन्माने मी पूर्ण बदलून गेलो. जगण्यासाठी आता एक वेगळीच उम्मेद आलेली. तिच्या
बोबड्या बोलांनी आणि जबाबदारीच्या जाणिवेनं मला खूपच सावरलं. बघता-बघता कशी वर्ष निघून गेली कळलंही
नाही. खोटं का सांगू, तुझी आठवण येणंही बोथट होत गेलं.
मग गेल्या पाच-सात वर्षात आपला ग्रुप पुन्हा ऍक्टिव्ह झाला. मिट्स होत गेले. तू असताना शक्यतो यायचं
नाही हा अलिखित नियम पाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण मग तुझे फोटोज, स्टेटस बघितलं की, एकदा तरी
प्रत्यक्षात तुला भेटावसं वाटायचं. मग हळू हळू पुन्हा आपली मैत्री जुळली, नव्याने तुला जाणून घेऊ लागलो.
मनमोकळ्या गप्पा होतानाच कुठेतरी काहीतरी सुटून गेल्याचं जाणवायचं. पण कधी तू तर कधी मी त्या निसरड्या
वळणावरून परतायचो. पुन्हा कित्येक आठवड्यांचा, महिन्यांचा अबोला, पुन्हा ग्रुपबरोबर गप्पा-टप्पा, असं चालूच
राहिलं. आपण सगळे भेटायचो तेव्हा मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी कोणी ना कोणी घ्याचंच. त्यात मुद्दामून तुला सोडायला मीच येईन हयाची खबरदारी घ्यायला लागलो. हळूच एकदा तू गमतीत म्हणालीस, सोडायला येतोस
तसं घ्यायलाही ये की! मला काय तेवढंच कारण पुरेसं होतं. तेवढाच पाच-दहा मिनिटांचा तुझा जास्त सहवास! पण
सगळ्यांसमोर आपली फारशी मैत्री नाही, तू काहीच खास नाहीस ह्याचे नाटकही पुरेपूर करत राहिलो. मी तुला काहीही
बोललेलं नसतानाही तूही शाळेत असताना माझ्या चुका लपवायचीस तशी माझ्या नाटकात सामील होत गेलीस.
बायकोशी भांडण झालं की असं वाटायचं, तू असतीस तर तू खूप समजूतदारपणे घेतलं असतंस. मामेभावाशी
भांडण झालेलं तेव्हा तुलाच मेसेज करून तावातावाने सांगितलेलं. पहिल्यांदाच मनमोकळं रडलो होतो तुझ्याशी चॅट
करताना. कधी छोटा-मोठा अपघात झाला, प्रवासाला जाताना-घरी सुखरूप पोचल्यावर तुला कळवणं गरजेचं वाटू
लागलं. मला कळत होतं की, माझा तुझ्यावर कोणताच हक्क नाहीये. पण तुला कळवण्याशिवाय राहणंही शक्य
नव्हतं. तुला माहितीये, आजपर्यंत मी स्वतःशी ह्यातलं काहीच मान्य केलं नव्हतं. स्वतःच्या मनाला मी समजावत होतो की
ह्यात काहीही वावगं नाहीये. तरीही तुझ्याशी केलेलं प्रत्येक चॅट ताबडतोब डिलीट करत होतो. तू केलंस त्या
मेडिटेशनच्या मलाही गरज आहे बहुतेक. पण मला माहितीये तुझं नसलं तरी माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे! हो मी
आज तरी खोटं नाही बोलू शकत. माझं काही चुकतंय का? गप्प का अशी, बोल ना काहीतरी!”
त्यानी इतका वेळ बोलून झाल्यावर एक मोठ्ठा श्वास घेतला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्याही नकळत त्याचे
डोळे भरून आले होते आणि तिच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर आला होता . तरीही ती हसत होती. खूपच अजब
रसायन होतं ते!
बावळट, बोल ना …
“आजूबाजूला बघ, बाकीचे सगळे केव्हाच निघून गेलेत. हॉटेल स्टाफही आता आपली ब्याद कधी टळतेय ह्याचीच वाट
बघतायेत. डोळे पूस आणि निघूया आता.”
सुरुवातीला त्रयस्थांसारखे बसलेले दोघे एव्हाना सगळा परकेपणा सोडून गप्पांमध्ये हरवलेले असताना त्यांना डिस्टरब
न करण्याचे एटीकेट्स निदान आता तरी सगळेच वेटर्स पाळत होते. त्याला एकदम चोरट्यासारखं वाटू लागलं. बिल पे
करून आणि घसघशीत टीप ठेवून ते दोघे बाहेर पडले.
क्रमश:
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023