“नाही गुंतुन जायचे”

काळ्याशार डांबरी रस्त्यावरुन वळण घेऊन त्याने कॉलनीत जाणारा रस्ता पकडला.कॉलनीच्या शेवटच्या टोकाला त्याची  सोसायटी. विघ्नहर अपार्टमेंट. पन्नास फ्लॅटचा भव्य प्रकल्प. गेटजवळ येताच सिक्युरिटीनं तत्परतेने गेट उघडलं. गाडी आत घेतली. पार्किंगमधल्या नेमुन दिलेल्या जागी त्याने पार्क केली. लिफ्टने चौथ्या मजल्यावर आला.

घरी आला..फ्रेश झाला.. बायकोने दिलेला चहाचा कप घेऊन बाल्कनीत आला. नुकतीच एक आरामखुर्ची त्याने घेतली होती. त्यावर जरा रिलॅक्स झाला.

नजर पोचेपर्यंत दुरवर असंख्य इमारतींचे लुकलुकणारे दिवे दिसत होते.संध्याकाळची गार हवा सुटली होती.सुर्य मावळतीला जात होता.पक्षी घराकडे निघाले होते.हे आपलंच गाव  ना..असा प्रश्न मनात येत होता.कारण गावात हे असलं द्रुष्य कुठुन दिसणार!

त्यांचं आजवरची आयुष्य गेलेलं गावातल्या जुन्या वस्तीत.गेली पन्नास वर्षे वास्तव्य केलेलं आपलं गाव कुठे..आणि हे आपल्याच शहराचं उपनगर  कुठं?दोन्हीत जमीन अस्मानाचं अंतर होतं.एकाच शहराची ही दोन रुपे होती.

तो या बाल्कनीत बसला  होता..पण मन गेलं होतं जुन्या वस्तीत.. तेथील गल्लीबोळात.. दगडी जोते असलेल्या वाड्यांमध्ये.. दोन फुट जाडीच्या मातीच्या भिंती मधुन मिळणारा थंडावा आणि या बाल्कनीत येणारी गार हवा..दोन्हीत काही तरी फरक जाणवत होता.

बाहेर पाहीलं..पावसाची रिपरिप सुरु झाली होती…पण त्याला दिसत होतं कौलांवरुन ओघळणार्या पागोळ्या..आठवतं होते पत्र्यांवर पडणारे ताड ताड ताड आवाज.

अचानक त्याला जुना अल्बम आठवला..त्यानं तो  कपाटातून शोधुन काढला.

हा फोटो.. त्याच्या जावळाचा.तेव्हा काही घरोघरी कॅमेरे नव्हते.मग या सोहळ्यासाठी खास फोटोग्राफरला बोलावुन आणलं होतं..म्हणजे असं त्याची आई म्हणायची.त्याला  कसं आठवणार ते.

पुर्णपणे चमनगोटा केलेलं ते त्यांचं डोकं.‌‌त्यावर गंधाने काढलेलं स्वस्तिक..आजुबाजुला बसलेली भावंडं..त्यांचे त्यावेळचे खास ठेवणीतले कपडे..सगळा काळ उभा राहीला डोळ्यासमोर.

एक एक पान उलगडत होतो..काळ मागे सरकत होता.

त्या जुन्या घरातले दिवस आठवत होते..ती माणसं..आई वडील..आजी यांनी वास्तव्य केलेलं ते जुनं घर फोटोमधुन पुन्हा एकदा डोळ्यासमोर येत होतं.

वाड्यातल्या त्या घरातील खोल्या तश्या छोट्याच होत्या.. आणि अडचणीच्या देखील होत्या.पण त्या अडचणीच्या खरंच होत्या का?की आज या प्रशस्त घरात आल्यावर त्याला छोट्या..अडचणीच्या वाटल्या?.तेथे रहात होतो तोपर्यंत हे कधीच जाणवलं नाही.त्या घरात असताना एक गोष्ट जाणवायची..आई..दादा..आजी इथे आपल्या आजुबाजूला कुठेतरी आहेतच.याच वास्तुत त्यांचा सहवास मिळालेला..या भिंतींनी त्यांना पाहीलंय.. ऐकलंय..याच देवघरात दादा पुजेला बसायचे..ती ‌अथर्वशीर्षाची..पुरुष सुक्ताचीआवर्तनं याच वास्तुत झालीय.. आजीच्या मुखावाटे आलेला हरीपाठ या भिंतींनी ऐकलाय.याच..याच शहाबादी फरश्यांना  आपल्या आजीच्या पायांचा स्पर्श झालाय.याच वास्तुत कितीतरी गणेश उत्सव.. नवरात्र साजरे झालेत.

अल्बमची पानं उलटता  उलटता  तो खुपचं भावनाविवश झाला.त्याला आतुन गलबलुन आलं मग का कोण जाणे..त्यांचं त्यालाच उमगलं..हे असं चांगलं नाही.आता ते घर.. त्या आठवणी मागे ठेवायला हव्यात.सुधीर मोघेंचे शब्द त्याला आठवले..

मित्रा,एका जागी नाही असे फार थांबायचे

नाही गुंतुन जायचे

नाही गुंतुन जायचे.

आणि मग एका मागुन एक येणार्या..न संपणार्या  आठवणींना त्याने मनातुन बाहेर काढले.

चहा पिऊन झाल्यावर तो उठला.आता त्याला या नवीन घराबद्दल आत्मियता वाटुन लागली.या घराचे रुप पुर्णपणे वेगळे.हॉल..किचन..बेडरुम..खोल्या खोल्यातुन तो हिंडला.मनाशी त्यानं ठरवलं..

जुन्या घरात  फार अडकायचे नाही.इथे येताना जुन्या आठवणी सोबत घेऊन आलो ते ठिकच..पण  आयुष्याचा उर्वरित काळ आता याच घरात घालवायचा.आता या घरात प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा.. प्रत्येक क्षण सोन्याचा करायचा.. आणि जाताना सुंदर सुंदर आठवणी मागे ठेवायच्या.. पुढच्या पिढीसाठी.

सुनील शिरवाडकर.

Sunil Shirwadkar
Latest posts by Sunil Shirwadkar (see all)

Sunil Shirwadkar

सुनील शिरवाडकर,नासिक. सुवर्णकार आणि ललित लेखक. महाराष्ट्र टाइम्स,लोकमत,सकाळ,सा.लोकप्रभा मधुन नियमित लेखन. राजहंस प्रकाशन कडुन 'सोन्याच्या संगतीत 'हे पुस्तक प्रकाशित. नाशिकच्या आठवणींवर आधारित 'पाऊलखुणा गोदाकाठच्या ' हे पुस्तक प्रकाशित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!